आमच्याच धर्माबद्दल का करता तक्रार? (^m^) (^j^) (मनोगते)


*कोणत्याही धर्माप्रमाणे हिंदू धर्म हा जन्मत: लाभत असल्याने या देशातील ८०% लोक परंपरेने हिंदूच आहेत. चळवळीतील कार्यकर्तेही स्वाभाविकच प्रामुख्याने हिंदूच असणार. त्यामुळे त्यांच्याशी निगडीत अंधश्रद्धांवर साहजिकच ते प्रथम बोलणार. त्यामुळे काहीशी अपरिहार्यता म्हणून स्वधर्मीय टीका मान्य व सहन केली पाहिजे. तसेच आपल्या देशातील परस्पर धर्माच्या टीकेबाबत असलेली अनुदारता लक्षात घेतली, तर मुस्लिम वा अन्य धर्मियांनी हिंदू धर्मावर टीका केलेली आपल्याला अजिबात रुचत नाही ही वस्तुस्थिती आहे. (हिंदूंत तर एका जातीने दुसऱ्या जातीचे दोष दाखविले. उदा. महारांनी मराठ्यांचे, धनगरांनी ब्राह्मणांचे दोष दाखवले तरी रुचत-पचत नाही. ) हीच गोष्ट इतर धर्मीयांबाबत खरी आहे.*


*दुसरे म्हणजे बौद्ध, खिश्चन, मुस्लिम हे धर्म अलीकडच्या २ ते २ ।। हजार वर्षांतील आहेत. हिंदू धर्माच्या निर्मिती कालाबद्दल विविध मते असली, तरी तो या धर्मापेक्षा २ ते २ ।। हजार वर्षांनी नक्कीच जुना आहे. देवांची संख्याही फार प्रचंड आहे, तशीच उत्सवांचीही. (बाकीचे प्रमुख धर्म एकेश्वरवादी आहेत.)  पुराणेही हिंदू धर्मात भरपूर आहेत त्यांच्यामुळे अंधश्रद्धा निर्माण होण्यास सुपीक भूमी तयार होते. याच बरोबर दुसऱ्या बाजूला हिंदू समाजाला कठोर चिकित्सेची अशी परंपरा आहे. प्राचीन काळात चार्वाक, लोकायत, बुद्ध, अर्वाचीन काळात महात्मा फुले, लोकहितवादी, आगरकर, आंबेडकर, सावरकर, गाडगेबाबा यांच्या विचारांमुळे अंधश्रद्धेवर आसूड ओढण्याचे काम हे चालत आलेले आहे. (इस्लाममध्ये तर ते आताशी कुठे चालू होत आहे. ते काम जसे वाढेल, त्या वेळी त्या धर्माचीही अधिक परखड समीक्षा होईल.)*


*सर्वात महत्त्वाचे म्हणजे धर्माच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आधारावर असलेल्या अंधश्रद्धा दूर करण्याचे काम समाजाला हितकारक आहे की अहितकारक? हितकारक असेल तर ते आमच्याच धर्माबद्दल का करता अशा तक्रारी कशाकरिता? अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे काम हे थंडीत झोपलेल्या माणसाच्या अंगावरचे पांघरूण ओढण्याचे काम नसून अंधारात त्याच्या उशाशी दिवा ठेवण्याचे काम आहे. खरे तर सर्वच भारतीयांसाठी ते व्हावयास हवे. (अंनिस तसे करतेही. ) परंतु तरीही ज्यांना ते फक्त आपल्याच हिंदू धर्माबद्दल आहे असे वाटते, त्यांना ते फायद्याचे वाटते की तोट्याचे?*


आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, *महाराष्ट्रात समाजसुधारकांची दिग्गज परंपरा आहे. लोकहितवादी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, न्यायमूर्ती रानडे, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ गणेश आगरकर, शाहू महाराज, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकर, प्रबोधनकार ठाकरे अशी मोठी परंपरा आहे. या सर्वांचे प्रचंड साहित्य उपलब्ध आहे. या सर्वांनी वा यातील एकाने तरी मुसलमानांच्या वा अन्य धर्मीयांच्या अंधश्रद्धांबद्दल लिहिलेले एक टक्का तरी दाखवा. आंबेडकर, सावरकरांनी थोड्याफार प्रमाणात लिहिले असेलही, पण इतर दिग्गजांनी मुस्लीम किंवा अन्य धर्मीय अंधश्रद्धांबद्दल का लिहिलेले नाही? काय कारणं असावीत यामागे? ते भित्रे होते? की त्यांना मुसलमान व अन्य धर्मीयांच्या अंधश्रद्धांचे दुष्परिणाम समजले नाहीत? यामागचे खरे कारण हे आहे की, 80%हिंदू अंधश्रद्धामुक्त होऊन प्रगत झाल्यास त्याचे अनुकरण 20% अल्पसंख्य असलेले इतर धर्मीयही करतील.*


या आक्षेपासाठी *जगाच्या प्रगतीचा इतिहास तपासला तर उत्तर मिळेल. माणसे कशाच्या आधारे पुढे गेली? अंधश्रद्धा जोपासून की विज्ञानाची कास धरून?* या साठी पुन्हा एकदा सावरकर काय म्हणतात ते ऐकू या. ते म्हणतात, *"धर्मांधतेची आणि धर्मभेदाची नांगी मोडेल असे एकच बळ आहे, ते म्हणजे विज्ञान बळ!''*


हे सारे नीट समजून घेतले तर लक्षात येईल की अंनिस फक्त हिंदूंचेच अंधश्रद्धा निर्मूलन करते हा हास्यास्पद आणि हेत्वारोप आहे. अंनिसच्या कामामुळे पोटात उठलेल्या भितीच्या गोळ्यामुळे आलेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य