ख्रिसमस ट्री आणि तुळस
झाडाला श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठेवणारे धर्मांध विकृत – जेट जगदीश
"मी तुळशीच्या झाडाचे 50 फायदे सांगतो, तुम्ही ख्रिसमसच्या झाडाचे फक्त 2 फायदे सांगा. अंधश्रद्धा निर्मुलन सप्ताह स्पेशल..."
काही विकृत धर्मांधांकडून अशी आव्हान देणारी पोस्ट गेल्या दोन-चार दिवसापासून अनेक ग्रुपवर फिरत आहे. त्यांच्या या खोडसाळ पोस्टला उत्तर...
मुळात ख्रिसमस ट्री हा नाताळाच्या दिवशी केवळ सुशोभिकरणासाठी ख्रिस्ती बांधव उपयोगात आणतात. त्यापासून समाजाला काहीही धोका नाही. ख्रिसमस झाडाचे धार्मिक महत्व श्यून्य असते. ही फक्त सजावटीची प्रथा आहे. ख्रिसमस झाड सजवले नाही तर ख्रिसमस होत नाही, असे काही नाही. इथे अंधश्रध्देचा संबंध येतोच कुठे? म्हणून तुळशीच्या झाडाशी तुलना करणे सर्वथा चूक आहे.
ख्रिसमसचा दिवस हा येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस असतो. त्याच्या आनंदाप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. जर परशुराम, कृष्ण, राम, गणेश या काल्पनिक देवांच्या जन्मतारखा माहित नसूनही त्यांच्या जयंत्यांचे दिवस साजरे करणे ही हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टिकोनातून अंधश्रद्धा नाही. पण ज्यांच्या जन्मतारखा माहित आहेत असे प्रत्यक्षात होऊन गेलेले बुद्ध, येशूख्रिस्त, पैगंबर यांच्या जयंत्यांचे दिवस साजरे करणे म्हणजे हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टिकोनातून कशाच्या आधारावर अंधश्रद्धा ठरतात?
प्रत्येक झाडाचा या ना त्या प्रकारे औषधी उपयोग असतोच तसेच ख्रिसमसट्रीचेही औषधी उपयोग आहेत. हे झाड बर्फाळ प्रदेशात उगवणारे झाड आहे. बर्फाळ प्रदेशांतील झाड असल्याने मुख्य फायदा प्राणवायूच्या निर्मितिचा... विरळ वातावरणात फार उपयोगी. भरपूर उंचीची त्याची वने बर्फाळ वादळ रोखते व सपाट पातळीवर पोचू देत नाही. रेनडियर, अस्वले, लामा सारख्या शाकाहारी प्राण्यांना या झाडाचा खुराक मिळतो. त्याचे लाकूड घरे उभारण्याच्या कामात उपयोगी येते. अखेर बर्फाळ प्रदेशांत केवळ प्राणीच नव्हे तर माणसेही रहातात,... त्यांना हे झाड आसरा देते. तरीही तुम्हाला क्रिसमसच्या झाडाचे आणखी औषधी फायदे हे माहीत करून घ्यायचे असतील तर खालील लिंकवर जा आणि माहिती वाचा...
https://frugallysustainable.com/how-to-capture-the-medicinal-benefits-of-your-christmas-tree/
तुळशीच्या पानांचा उपयोग आयुर्वेदात नमुद केलेला आहेच. परंतु सनातनी लोकांनी त्यांस धर्माचे अधिष्ठान देत विज्ञानाऐवजी त्यांत अंधश्रद्धा घुसवल्यामुळे बघण्याचा दृष्टीकोन बदलला गेला आहे. म्हणून रोज तुळशीची पुजा आणि दरवर्षी तुळशीचे विष्णूशी लग्न लावले जाते.
'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे', असा संतांचा दाखला देणाऱ्यांनो, झाडांची तरी धार्मिक वाटणी करणे सोडा आता... हे झाड चांगलं का ते चांगलं अशी विभागणी करणे हा तर तुमच्या मनाचा संकुचितपणा झाला. याच संकुचितपणामुळे मासिक पाळीतील स्रीयांनी तुळशीला पाणी घातलेले चालत नाही. आणि हो, झाडाचे फायदे बघून त्या झाडाविषयी आस्था निर्माण करणं स्वार्थीवृत्तीचे लक्षण आहे. म्हणूनच तुळशीच्या झाडाचे गोडवे गाणारी हीच मंडळी 25 डिसेंबरच्या क्रिसमसला शिव्या देत 31 डिसेंबरला मात्र कुठे बसायचं, याचा विचार करित असतात. दांभिक कुठले!
यावरून तुमच्या लक्षात आले असेलच की, एखादे झाड जास्त महत्त्वाचे आणि दुसरे कमी महत्त्वाचे असे काही नसते. असा श्रेष्ठ आणि कनिष्ठपणा असतो तो फक्त विकृत धर्मांधांच्या मनातच. त्या ऐवजी त्यांनी इतर धर्मियांच्या चालीरीतींची समीक्षा करण्याऐवजी आपल्याच धर्मातील अस्पृश्यता, स्त्रीला अन्यायकारक वागणूक देणे, इत्यादी बाबींवर जरा लक्ष दिले तर आपल्याच समाजाच्या उद्धारासाठी ते जास्त उपयोगी ठरेल. अंधश्रद्धाना विरोध म्हणजे आमच्या सणांना तुम्ही विरोध करता म्हणून तुमच्या सणांना आम्ही विरोध करतो; हे कुठलं तर्कशास्त्र आहे? कारण अंधश्रद्धा ही अंधश्रद्धाच असते, मग ती कोणत्याही धर्माची का असेना? पण तुळशीच्या झाडावर असलेली आमची ती श्रद्धा आणि क्रिसमस ट्रीवर असलेली तुमची ती अंधश्रद्धा! असा उफराटा न्याय आहे तुम्हा विकृत धर्मांधांचा!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा