पुराणातील वांगी: ककनमठ मंदिर
⛔ *गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगणारे ककनमठ मंदिर!* — कौस्तुभ शेजवलकर (14 jun 2021)
"गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगणाऱ्या मंदिराची गोष्ट" ह्या ककनमठ मंदिरासंबंधीच्या संदेशात त्याचे लेखक, विनीत वर्तक, हे अनाहूतपणे किंवा सहेतुकपणे उपायोजित विज्ञान (applied science) आणि मूलभूत विज्ञान (pure science) यांत गल्लत करत आहेत.
आधार घेऊन, अडखळत चालणारं लहान मूल, गुरुत्वाकर्षण, गुरूत्वमध्य, तोल ह्या गोष्टी शिकल्यावर मग आधाराशिवाय चालायला लागत नाही तर ते आधी आधाराशिवाय चालायला लागतं आणि नंतर कधीतरी ह्या गोष्टी, न्युटनचे गुरूत्वाकर्षणाचे नियम वगैरे शिकतं. एवढंच कशाला, रस्त्यावर उंच ताणलेल्या दोरावर कसरतीचे खेळ करणारे कित्येक डोंबारी तर बहुधा जन्मात कधीही न्यूटन, गुरुत्वाकर्षण, गुरूत्वमध्य, तोल यातल्या कशाशीही पाला न पडतादेखील न पडता आयुष्यभर कसरत करतात. त्यामुळे ककनमठ मंदिर हे आजही न पडता उभं आहे म्हणजे ते बांधणाऱ्या स्थापत्यकारांना गुरूत्वाकर्षणाचे नियम आणि त्यांचं विज्ञान माहित होतं हा दावा, मूल आधाराशिवाय चालतंय, किंवा डोंबारी न पडता कसरती करतोय म्हणजे त्यांनाही गुरूत्वाकर्षणाचे नियम आणि विज्ञान माहिती असतं ह्या दाव्यासारखाच बाष्कळ आणि हास्यास्पद आहे.
मान्य की चालणं, कसरती करणं ह्या मंदिर बांधण्यापेक्षा त्यामानाने सोप्या, सामान्य, प्राथमिक गोष्टी आहेत. पण काही वेळा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या पण अननुभवी अभियंत्यापेक्षा अशिक्षित पण अनुभवी मुकादम, मजूर सुध्दा योग्य, अचूक तांत्रिक सल्ला देतात. अनुवंशशास्त्र, जनुकशास्त्रातलं ओ की ठो माहित नसतांनाही कितीतरी अशिक्षित माळी, शेतकरी फळफुलझाडांची उत्तम कलमं, धान्यांची नवीन वाणं शोधून काढत असतात. गोल, बोथट गोट्या ऐवजी कड, धार असलेल्या दगडाने मांस कमी श्रमात, सहज कापले जाते हे आदिमानवाने आधी ओळखलं आणि नंतर हजारो वर्षांनंतर क्षेत्रफळ, दाब ही त्यामागची वैज्ञानिक कारणं शोधली गेली. तीच गोष्ट बाण, भाला या शस्त्रांची. आधी बाण, भाले वापरले जाऊ लागले आणि नंतर कित्येक वर्षांनंतर aerodynamics (मराठीत?) ने त्यांमागचे विज्ञान शोधले. तीच गोष्ट आजीबाईच्या बटव्यातल्या घरगुती औषधांची. मला वाटतं मी थांबतो; माझा मुद्दा लक्षात आला असावा.
त्यामुळे एखादा आविष्कार, एखादी रचना वैज्ञानिक दिसत असली तरी ती अनुभवजन्य निरीक्षणातून कमावलेल्या ज्ञानातून (empirical knowledge) केलेली असू शकते. त्यामागे शास्त्रशुद्ध, वैज्ञानिक ज्ञान आहे हा दावा सिद्ध करण्यासाठी वेगळ्या ठोस आणि लिखित पुराव्यांची आवश्यकता आहे. आणि हे लिखाण, उपयोग, फायदे, परिणाम यांची शाब्दिक वर्णनं, सुभाषितं, पद्य यास्वरूपात न देता सूत्रबद्ध स्वरूपात वस्तुनिष्ठ पध्दतीने मांडलेले हवे.
आणखीन एक मुद्दा म्हणजे आज उभे असलेले अवशेष हे मुळात, हे मंदिर धरून बांधलेल्या पाच मंदिरांच्या समूहापैकी कालौघात तग धरून शिल्लक राहिलेल्या एका मंदिराच्या काही भागाचे आहेत. व्यावहारिक दृष्ट्या विचार केला केला तर हा संपूर्ण मंदिर समूह कोणातरी एकाच स्थापत्यकाराच्या देखरेखीखाली बांधला गेला असावा. त्यामुळे सगळी मंदिरे एकसारख्या साहित्यातून, ठराविक कारागिरांकडून, एकाच शैलीत, एकाच विज्ञान-तंत्रज्ञानाने बांधली गेली असणार. असे असतांनाही पाच पैकी केवळ एका मंदिराचा काही भाग आज शिल्लक आहे. आज उभ्या असलेल्या एका मंदिराला मानदंड म्हणून मिरवतांना पडझड होऊन जवळपास नामोनिशाणही शिल्लक नसलेल्या बाकीच्या चार मंदिरांकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं जातंय.
गणिती आकडेमोड केली तर त्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या टिकाऊपणाचा, यशाचा दर हा जेमतेम २०% निघतो. एवढा कमी टिकाऊपणाचा दर असलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानात काही भूषणावह, अभिमानास्पद आहे असे मला तरी वाटत नाही. हां, त्यातली कला, सौंदर्य ह्या गोष्टी जरूर बघाव्यात पण त्यात विज्ञान आहे असा दावा करायचा असेल तर त्याला वैज्ञानिक कसोट्यांवर उतरतील असे पुरावे देणं आवश्यक आहे.
त्यामुळे आपल्या पूर्वजांना न्यूटनच्या आधीपासून गुरूत्वाकर्षणाचे नियम माहित होते या दाव्याच्या पुष्ट्यर्थ आज उभ्या असलेल्या ककनमठ मंदिराचे अवशेष हा पुरावा अपुराच नव्हे तर अग्राह्य, अस्वीकारार्ह आहे म्हणून तो दावा पोकळ आणि बिनबुडाचा ठरतो.
⚠ *ज्या व्यक्तीने मूळ संदेश पाठवला आहे तिला कृपया हा माझा संपूर्ण संदेश नावानिशी पाठवून चुकीच्या माहितीच्या प्रसाराला आळा घालायला हातभार लावा.*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा