इंडोनेशियन सरस्वतीच्या मूर्तिचा फोटो

 ही सरस्वती देवी आहे वॉशिंग्टनमध्ये. अमेरिकेत! तिच्या पायाशी बसून ३ विद्यार्थी अभ्यास करत आहेत. सरस्वतीच्या  पायाशी बसलेला एक मुलगा आहे - बराक ओबामा. वंशाने आफ्रिकन, कर्माने अमेरिकेचे अध्यक्ष, धर्माने ख्रिश्चन. 

लहानपणी इंडोनेशिया मधील शाळेत शिकलेला हा मुलगा अमेरिकेचा अध्यक्ष झाल्यावर, इंडोनेशियाने ही सरस्वतीची मूर्ती त्यांना भेट दिली. एका मुस्लिम धर्मीय देशाच्या सरकारने, ख्रिश्चन धर्मीय देशाच्या अध्यक्षांना दिलेले सन्मानचिन्ह! 

'सुसंस्कृत'पणा म्हणतात तो हा. जे सुसंस्कृत असतात त्यांना विद्येचे, विद्येच्या देवतेचे महत्व.  विद्येच्या देवतेची पूजा करायला - धर्म, देश, वंश, पदवी आड येत नाहीत.

*दिपाली पाटवदकर*


इंडोनेशियन सरस्वतीच्या मूर्तिचा फोटो आणि त्याखाली दिपाली पाटवदकर यांची पोस्ट सध्या फिरत आहे. या पोस्टला पार्श्वभूमी आहे यशवंत मनोहर यांनी मंचावर सरस्वतीची प्रतिमा ठेवल्याने पुरस्कार नाकारल्याची. या पोस्ट मधील बाबींची तपासणी न करता वाचल्यास कोणीही लेखिकेला अभिप्रेत असे पुढील निष्कर्ष काढू शकेल: 


१) धर्माने ख्रिश्चन असलेले बराक ओबामा सरस्वतीच्या पायी बसून अभ्यास करीत होते. 

२) ओबामा इंडोनेशिया येथे शाळेत शिकले म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर ही मूर्ति त्यांना इंडोनेशियाच्या मुस्लिम सरकारने दिली. 

३) यावरून, विद्येच्या देवतेची पुजा करायला धर्म, देश, वंश, पदवी आड येत नाही. यालाच सुसंस्कृतपणा म्हणतात. 


या पोस्टच्या बाबतीत शोकांतिकेचा भाग बघा. ज्या सरस्वती देवीने भारतातील स्त्रियांना शतकानुशतके शिक्षणापसून वंचित ठेवले, त्यांना शुद्रांपेक्षा वाईट जीने दिले त्याच सरस्वती देवीची भलावण कोण करतंय? तर तथाकथित संस्कृतीने बंद केलेले शिक्षणाचे दरवाजे ज्या सावित्रीमाइ यांनी सताड उघडे केले, स्त्रियांना मुक्तीचा मार्ग दाखविला, त्या मार्गाने जाऊन शिक्षण घेतलेल्या दिपाली पाटवदकर! या पेक्षा मोठा कृतघ्नपणा आणखी कोणता असू शकतो? एका कृतघ्न व्यक्तीने दुसर्‍यांचा सुसंस्कृतपणा काढणे या पेक्षा मोठा दांभिकपणा आणि विनोद कोणता असू शकतो? आता त्या काय म्हणतात याचे विश्लेषण करू या. 


१) ओबामा इंडोनेशिया येथे सुमारे दोन-अडीच वर्षे (पहिली ते तिसरी) शिकले कारण त्यांना त्यांच्या आई बरोबर सावत्र वडिलांकडे जावे लागले. तिथे सरस्वतीची पुजा करत बसले नव्हते तसेच हिंदू संस्कृती शिकत नव्हते. 

२) सदर मूर्ति इंडोनेशियाने अमेरिकेला दिली आहे ओबामा यांना नव्हे. तसेच ओबामा त्यांच्याकडे शिकले म्हणून नव्हे किंवा धार्मिक आधारावर नव्हे तर Education and people-to-people contact या विषयातील कामाच्या दोन देशांच्या भागीदारीमुळे प्रतीक स्वरूप दिलेली आहे. पुढील लिंक मधील बातमी वाचल्यावर या मूर्ति विषयी लेखिकेने बाळगलेले कृतघ्न गैरसमज दूर होतील. (https://www.thehindu.com/news/international/world/indonesia-gifts-us-a-saraswati-statue/article4798380.ece) २०१३ साली ही मूर्ति एक प्रकारचे गिफ्ट म्हणून किंवा स्मरणीय आयटम म्हणून दिलेली आहे. त्यामुळे आता तिचे नाव घेऊन सुसंस्कृततेच्या वांत्या काढायची लेखिकेला काही गरज नव्हती. 

३) बरे, अमेरिकेने तरी या मूर्तिची पुजा अर्चना सुरू केली आहे काय? अजिबात नाही! ती एका चौकामध्ये उघड्यावर प्रदर्शनीय वस्तूसारखी ठेवली आहे. म्हणजे इंडोनेशियन सरकारने दिलेला तो एक कलात्मक गिफ्ट आयटम मानून तशीच ट्रीटमेंट त्या वस्तूला उर्फ सरस्वतीला दिलेली आहे. लेखिकेला याचा अभिमान वाटत असल्यास गोष्ट वेगळी. 

४)सदर पोस्ट मध्ये लेखिकेने अनावधानाने एक मोठी चूक केली आहे ती म्हणजे एका मुस्लिम देशाची केलेली स्तुति. त्यामुळे त्या कट्टर हिंदुत्ववाद्यांची शिकार होऊ शकतात. इंडोनेशियात फक्त तीन टक्के हिंदू आहेत असे म्हणतात. तिथे हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा दिसतात. तिथल्या मुस्लिम लोकांची नावे सुद्धा हिंदू नावे असतात. पण ते सरस्वतीची पूजा करत बसतात असे ऐकिवात नाही. त्यांनी सरस्वतीच्या मूर्तिचा प्रतीक म्हणून वापर केला असेल तर तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. असा मोठेपणा भारतातील हिंदू आपल्याच अनुसूचीत जाती/जमाती, ओबीसी यांच्या बाबतीत दाखवतील काय?   

५) विद्येच्या देवतेची पुजा करायला धर्म, देश, वंश, पदवी आड येत नाही असे म्हणणार्‍या लेखिकेला हे माहितीच नाही की या देवीने सर्व-वर्णीय हिंदू महिलांबरोबरच समस्त हिंदू बहुजनांना म्हणजे अनुसूचीत जाती/जमाती, ओबीसी, भटके यांनाही (म्हणजे एकूण सुमारे ९०-९२ टक्के लोकसंख्येला) शिक्षणापासून वंचित ठेवले होते. म्हणजेच या देवीलाच महिला आणि हिंदू बहुजनांनी केलेली आपली पुजा मान्य नव्हती, त्यांची अॅलर्जी होती, हे स्पष्ट आहे. असल्या भेदभाव करणार्‍या देवीची भलावण करताना लेखिका आपल्याच गेल्या शतकातील आणि त्या आधीच्या शेकडो पिढ्यातील स्त्रियांचा घोर अपमान करीत आहेत. गुलामगिरीची ही परिसीमा आहे. 

- चला उत्तर देऊ या टीम.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य