गुरुवार, २ मार्च, २०२३

 (१) एकाही नदीला शबनम, शबाना, रुखसाना असे नाव नाही, कारण गंगा यमुना नर्मदा सारख्या अनेक नद्या अनादी काळापासून आहेत.

 (२) अब्दुल, सलीम चे नाव  एकाही पर्वताला देता आले नाही, कारण हिमालय, निलगिरी असे अनेक पर्वत अनादी काळापासून आहेत.

 (4) पींपळ वड,लिब सारख्या अनेक झाडांची नावे उर्दूमध्ये का नाहीत?

 (५) तुळशी, अर्जुन ,पळस अशा अनेक वनस्पतींची नावे उर्दूमध्ये का नाहीत?

 (६) आयुर्वेदाची औषधी प्रत्येकाला लागते, पण हे वेद नाव उर्दूमध्ये का नाही?

 (७) रहीम, अकबर हे नाव एकाही महासागराला  देऊ शकले नाहीत, कारण प्रशांत, हिंदी महासागर सारखे अनेक महासागर अनादी काळापासून आहेत.

 (8) चार दिशांची नावे उर्दूमध्ये का नाहीत?

 (9) नेमक्या औषधाला रामबाण उपाय का म्हणतात, अल्लाबाण, येशूबाण का नाही?

 कारण :-

 मुघलांनी केवळ मंदिरे पाडून मशिदींची, गावांची आणि शहरांची नावे बदलली आहेत.


 नद्या, पर्वत, समुद्र यांची नावे अजूनही चिरंतन आहेत.

 हे शाश्वत सत्य आहे...

यालाच म्हणतात सनातन...🚩🕉🙏🏻

।। जय श्रीराम ।।

।। जय हिंदुराष्ट्र ।।

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

उर्दू भाषेत नदी, पर्वत झाडे इत्यादींना नावे नाहीत म्हणून हिणवणार्‍या पोस्टला उत्तर: 

 

उर्दू भाषेला हिणवण्यासाठी अत्यंत खुळचट असे युक्तिवाद करणारी एक पोस्ट फिरत आहे त्या पोस्टच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर पुढील प्रमाणे: 

मुद्दा: 

(१) एकाही नदीला शबनम, शबाना, रुखसाना असे नाव नाही, कारण गंगा यमुना नर्मदा सारख्या अनेक नद्या अनादी काळापासून आहेत.


उत्तर: 

उर्दू भाषेचा विकास होणे दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशात १२व्या शतकात सुरू झाले. उर्दू भाषा स्थानिक भाषेवर आधारित होती आणि तिच्यावर अरेबिक, पर्शियन आणि तुर्की भाषेचा प्रभाव होता. तिची लिपि अरेबिक लिपीवर आधारित आहे. असे असताना भारतात अनादीकाळापासून वाहणार्‍या गंगा, यमुना, नर्मदा या नद्यांना उर्दू नावे कशी असतील? अशाच नद्या अन्य कित्येक देशांत देखील अनादीकाळापासून वहात आहेत. मग त्यांना तरी हिंदू नावे कुठे दिसतात? नदीला तिकडे नदी मानतात, म्हणून इथल्यासारख्या नदीवरच्या भाकडकथा तिकडे नसतात. तसेच कित्येक शतके या भूप्रदेशावर राज्य करून देखील पर्वत, नद्या, झाडे इत्यादीची नावे मुस्लिम शासकांनी बदलली नाहीत त्याचे काय? 


मुद्दा:  

(२) अब्दुल, सलीम चे नाव  एकाही पर्वताला देता आले नाही, कारण हिमालय, निलगिरी असे अनेक पर्वत अनादी काळापासून आहेत.


उत्तर: याचे उत्तर सुद्धा मुद्दा क्रमांक १ प्रमाणेच आहे. 


मुद्दा: 

 (4) पींपळ वड,लिब सारख्या अनेक झाडांची नावे उर्दूमध्ये का नाहीत?


उत्तर: 

या झाडांना उर्दू भाषेत नावे आहेत. पोस्ट लिहणार्‍याला ती माहिती नसावीत याचे आश्चर्य वाटत नाही.  मुद्दा: 

 (५) तुळशी, अर्जुन ,पळस अशा अनेक वनस्पतींची नावे उर्दूमध्ये का नाहीत?


उत्तर: 


याचे उत्तर मुद्दा क्रमांक ४ प्रमाणे आहे. 


मुद्दा: 

 (६) आयुर्वेदाची औषधी प्रत्येकाला लागते, पण हे वेद नाव उर्दूमध्ये का नाही?


उत्तर: 

१२व्या शतकात विकसित होत असलेल्या उर्दू भाषेत हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या वेदाचे नाव कसे असेल? 


मुद्दा:  

 (७) रहीम, अकबर हे नाव एकाही महासागराला  देऊ शकले नाहीत, कारण प्रशांत, हिंदी महासागर सारखे अनेक महासागर अनादी काळापासून आहेत.


उत्तर: 

महासागराला जी नावे पडलेली आहेत ती हिन्दी किंवा भारतीय भाषेत आहेत काय? मग उर्दूचा आग्रह का?  


मुद्दा: 

 (8) चार दिशांची नावे उर्दूमध्ये का नाहीत?


उत्तर: 

आहेत की! फक्त डोके जिथे गहाण ठेवले आहे तिथून सोडवून आणावे, म्हणजे सापडतील. 


मुद्दा: 

 (9) नेमक्या औषधाला रामबाण उपाय का म्हणतात, अल्लाबाण, येशूबाण का नाही?


उत्तर: 

औषधाच्या प्रभावाच्या तीव्रतेला देवाचे नाव देण्याचा बावळटपणा अन्याधर्मीय करत नाहीत.  


 

मुद्दा:  

कारण :-

 मुघलांनी केवळ मंदिरे पाडून मशिदींची, गावांची आणि शहरांची नावे बदलली आहेत.


उत्तर: 

हे अर्धसत्य आहे. गावे शहरे त्यांनी वसवली आहेत आणि त्यांस आपली नावे दिली आहेत. मंदिरे त्यांनी जरूर पडली आहेत. परंतु त्यापेक्षा भयानक काम हिंदूंनी केले आहे ते बौद्ध धम्मावर आक्रमण करून, त्यांच्या लेण्यांवर आक्रमण करून (लेण्याद्री, एकवीरा आणि अन्य कित्येक मंदिरे आणि अनेक बौद्ध गुंफा आहेत, ज्यांच्यावर जबरदस्तीने हिंदूंनी आक्रमण केले आहे हे वास्तव आहे.) प्रतिक्रांतीच्या काळात हिंदूंनी केलेल्या बौद्धांच्या कत्तली तर सर्वज्ञात आहेत. 

 

मुद्दा: 

 नद्या, पर्वत, समुद्र यांची नावे अजूनही चिरंतन आहेत.

 हे शाश्वत सत्य आहे...

यालाच म्हणतात सनातन...🚩🕉🙏🏻

।। जय श्रीराम ।।

।। जय हिंदुराष्ट्र ।।


उत्तर: 

नद्या, पर्वत, समुद्र यांची नावे चिरंतन आहेत पण याचा उर्दू भाषेशी काय संबंध. अशा प्रकारची फालतू पोस्ट टाकून त्याला सनातन नाव देणे आणि उर्दूला हिणवणे यातून सनातन हा प्रकार काय लायकीचा आहे हेच दिसून येते.  

सनातनी प्रवृत्तीने निर्मिलेल्या असल्या टाकावू पोस्टवर विश्वास ठेऊ नका. 

॥जय भारत॥ 

॥जय संविधान॥  

🇮🇳🇮🇳🇮🇳

- चला उत्तर देऊया टीम


शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

दुसर्‍यांच्या अपप्रचारामुळे आपल्याच धर्मावर प्रश्न उभे?

 कुणा बिनडोक नव-हिंदुत्ववाद्याने मुस्लिम, इसाई (ख्रिश्चन), हिंदू धर्मग्रंथांच्या बाबतीत एक पोस्ट व्हायरल केली आहे. ती पोस्ट आणि त्याचे उत्तर पुढील प्रमाणे: 


*त्या बिनडोक माणसाची पोस्ट पुढील प्रमाणे:*  


*मुस्लिम: उर्दू येते आणि कुराण वाचतात* 

*इसाई: इंग्रजी येते आणि बायबल वाचतात* 

*हिंदू: ना संस्कृत येते ना वेदांबद्दल माहिती* 

*फक्त दुसर्‍यांच्या अपप्रचारामुळे आपल्याच धर्मावर प्रश्न उभे करतात.* 

*कटू आहे पण सत्य आहे.* 


*त्या पोस्टला उत्तर पुढील प्रमाणे:* 


*मुस्लिम:* 

मुळात कुराण हे उर्दू भाषेत नव्हे तर जुन्या *अरेबिक* भाषेत लिहिले गेले आहे, *उर्दूत नव्हे.* ते उर्दूत (आणि जगातील विविध भाषांमध्ये, आता अगदी मराठीत सुद्धा उपलब्ध आहे) अनुवादीत केलेले असू शकते. आणि हा त्यांचा एकमात्र पवित्र ग्रंथ आहे.  


*इसाई:* 

बायबल हे मुळात *हिब्रू, अर्माईक आणि ग्रीक* भाषेत लिहिले गेले आहे, *इंग्रजीत नव्हे.* ते नंतर जगभरातील विविध भाषांमध्ये अनुवादीत केले गेले (मराठीत सुद्धा उपलब्ध आहे). इसाई किंवा ख्रिस्ती लोकांसाठी बायबल हा एकमात्र ग्रंथ आहे. 


*हिंदू:* 

१)वेद हे *संस्कृत भाषेत* आहेत. भारतात सुमारे १२१ भाषा (२२ अधिकृत भाषा धरून) आहेत तसेच २७० मायबोली आहेत. त्या भाषांमध्ये वेद कधीही उपलब्ध नव्हते.   

२) संस्कृत भाषा ही फक्त ब्राह्मण जातीची, फक्त अध्ययन-अध्यापनाची भाषा होती. त्यांची बोली भाषा नव्हती. त्या भाषेला देववाणी असेही  म्हणतात. भारत देशाची सामान्य व्यवहाराची भाषा संस्कृत कधीही नव्हती. तसे पुरावे सापडत नाहीत.

३) हिंदू धर्मातील सुमारे ८० टक्के असलेले शूद्र, अतिशूद्र (एससी, एसटी, ओबीसी-बहुजन) लोकांना संस्कृत शिकण्यास/शिकवण्यास किंवा वेद शिकण्यास/शिकवण्यास (अगदी विसाव्या शतकात देखील) कडकडीत बंदी होती. शुद्रांनी वेद नुसते ऐकले तरी त्यांच्या कानात वितळलेले तप्त शिसे ओतण्याच्या शिक्षेची या धर्मात तरतूद होती. त्यामुळे देशातील या ८० टक्के हिंदूंना संस्कृत येण्याची किंवा वेद समजण्याची शक्यता नव्हती आणि आता तर त्यांचे अनुवाद जरी त्यांच्या मातृभाषेत उपलब्ध असले तरी ते वाचण्याची गरज देखील राहिलेली नाही.   

४) इसाई आणि इस्लाम यांचा एक एकच धर्मग्रंथ असताना, हिंदूंचे मात्र वेद (चार), उपनिषदे (चौदा), पुराणे (अठरा), अरण्यके (सात), श्रुति (बावीस), स्मृति (अठरा) एवढे (अजूनही काही असू शकतात. संख्येत थोडाफार फरक असू शकतो) धार्मिक ग्रंथ आहेत. रामायण, महाभारत हे देखील धार्मिक ग्रंथ मानले जातात. हे सारे ग्रंथ किती ब्राह्मण वाचतात हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. यातील मनुस्मृती हा ग्रंथ तर मानवतेला काळिमा फासणारा आहे. हे एवढे सारे कोण वाचणार? आणि का? यातून वाचणाराला काय मिळणार? 


एकूणच हिंदू धर्मातील विषमता, जाती-आधारित तीव्र भेदभाव, तिरस्कार आणि धर्ममान्य अन्याय-अत्याचार, स्त्रियांना दिलेला गुलामाहून हीन दर्जा, लोकांना अंधश्रद्धेत आकंठ बुडालेलेच ठेवणे, लोकांमधील ज्ञानार्जनाची, नवनिर्माणाची, वैज्ञानिक दृष्टीकोणाची गळचेपी करणे हे प्रकार जर वरील हिंदू धर्मग्रंथांमुळे अस्तित्वात आलेले आणि टिकून राहिलेले असतील तर समता, स्वातंत्र्य, बधुता, न्याय मानणार्‍या हिंदूंनी का वाचावेत? आणि मृतवत झालेली संस्कृत भाषा, जिचा काडीचाही उपयोग नाही ती भाषा तरी का शिकावी?


आणि हो, हा कोणी दुसर्‍यांनी केलेला अपप्रचार नाही. जेव्हा बहुजन हिंदू लोकांना संस्कृत शिकायची संधि मिळाली तेव्हा त्यांना संस्कृत धर्मग्रंथ वाचून हे सारे कळले आहे की या ग्रंथांच्या आधारेच त्यांना शतकानुशतके गुलामीत आणि अत्याचाराच्या दलदलीत ठेवले होते. हेच कटू सत्य आहे. ते पचविता न आल्याने काही काही नव-हिंदुत्ववादी तथाकथित उच्च-वर्णीय जात्यंध लोक अशा प्रकारच्या पोस्ट बनवून व्हायरल करतात.   

- उत्तम जोगदंड

सोमवार, ४ एप्रिल, २०२२

समजून घ्यायचे असेल तर...

समजून घ्यायचे असेल तर... जेट जगदीश 

आम्ही जेव्हा देवाधर्मातील कर्मकांड, अंधश्रद्धा, चुकीच्या रूढी-परंपरा,नास्तिक्य तसेच धर्मसुधारणेच्या बाबत आमचे विचार मांडतो तेव्हा अनेकदा अंधभक्त हा प्रश्न विचारतात की, 'तुम्ही तुमच्या घरातल्या किती लोकांचे विचार बदलले आहेत, किती लोकांना नास्तिक केले आहे?' वरवर पाहता हा प्रश्न अगदी बिनतोड वाटतो, पण विचार केल्यावर त्यातील फोलपणा सिद्ध होतो. कसा तो खालील उदाहरणावरून स्पष्ट होईल...

यासंदर्भात मला ल. रा. पागारकरांना सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकरांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते. आगरकर हे पांगारकरांचे शिक्षक होते. एक दिवशी वर्गात पांगारकरांनी आगरकरांना प्रश्न विचारला, "सर तुम्हाला एक प्रश्न विचारू काय?" 

आगरकर म्हणाले, "विचार की, त्यात परवानगीची काय गरज?" 

पांगारकर म्हणाले, "काल श्रीमती आगरकरांना मी देवळात नाकदुऱ्या काढताना पाहिले." 

आगरकर म्हणाले, "मग?" 

पांगारकर म्हणाले, "नाही, पण सर तुम्ही देव मानत नाही ना." 

त्यावर आगरकर म्हणाले, "अरे मी म्हणजे माझी बायको नाही ना." (म्हणजे तिला तिचे स्वातंत्र्य आहे.) 

याचा मतितार्थ असा की, देवाधर्मावर टीका करणारे जर स्त्रियांना गुलाम समजत नसतील तर ते त्यांच्यावर दबाव आणू शकत नाहीत. ते समजावू मात्र शकतात, नव्हे ते त्यांचे कर्तव्यच आहे. त्याप्रमाणे वागणे न वागणे हे त्या व्यक्तीच्या मनावर अवलंबून आहे. कारण ते त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य आहे असे आम्ही मानतो. म्हणूनच सुधारक कधीही परंपरावाद्यांसारखी दादागिरीची भाषा करत नाहीत, तर लोकांना प्रथा परंपरेतील चुकीच्या गोष्टी काय आहेत ते समजावून देण्याच्या प्रयत्न करतात. त्यातून विचार करणारे बदलतात आणि कट्टर असतात ते मात्र आमच्या नावाने शंख करतात. थोडक्यात काय तर आम्ही समोरच्यावर दाबावाची भाषा न वापरता आमचे विचार स्पष्टपणे मांडतो... अंधश्रध्दांनी भरलेले धर्मातील खाचखळगे आणि खड्डे दाखवतो. अर्थात ज्यांना आमचे विचार पटत नाही त्यांचा त्या खड्ड्यात पाडण्याचा अधिकारही आम्हास मान्य आहे... कारण आमच्यालेखी हा हार-जितीचा मामला नसतोच मुली, तर हा मन परिवर्तनाचा प्रदीर्घ काळ चालणारा कार्यक्रम असतो. जो आम्ही न थकता अथक परिश्रमाने करत असतो.

माझ्याकडे जेव्हा मी नास्तिक्याकडे वळत होतो आणि घरात कर्मकांडाच्या विरोधात बोलत होतो तेव्हा माझे आई-वडील म्हणाले की, 'तू आता मोठा झाला आहेस. तुझे विचार तुला कळतात, पण आमच्या लहानपणापासून आमच्यावर असेच संस्कार झाले आहेत. त्यामुळे आम्ही काही आता बदलू शकत नाही. तेव्हा व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून तू तुझा कसाही वागायला मुक्त आहेस.' याचपद्धतीने मीही मग ठरवले की, त्यांचे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून तेही त्यांच्या पद्धतीने जायला मुक्त आहेत. ह्यात मी त्यांना नास्तिक बनवू शकलो नाही याचे मला दुःख वाटत नाही.

मुळात विवेकवादी नास्तिक होण्याची प्रक्रिया ही एक वेळ घेणारी प्रक्रिया आहे. कारण लहानपणापासून आपण ज्या धर्मात जन्मलो आहोत त्याचे संस्कार आपले आई-वडील सतत करत असतात, आणि लहानपणी झालेले संस्कार जोपर्यंत तुम्ही स्वतः विचार करून... स्वतःशी झगडून बदलत नाही तोपर्यंत ते बदलणे कठीण! पण अशाप्रकारे विचार करणारी किती मंडळी असतात? समाजात चालत आलेल्या रीतीरीवाजाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी अंगी धाडस लागते. असे धाडस सगळ्यांच्यातच असते असे नाही. असे बरेच लोक असतात की, ज्यांना समाजातील घातक रूढी-परंपरा आवडत नाहीत. पण त्याविरोधात बोलायला त्यांची जीभ रेटत नाही. कारण समाजाच्या विरोधात जायचे धाडस नसते. त्यापेक्षा 'यामुळे आपले काही नुकसान होत नाही ना' असा कातडीबचाऊ विचार करून ते गप्प राहणे पसंत करतात आणि प्रवाहपतित त्याप्रमाणे वाडवडील जे करत आहेत तेच कुळाचार पुढे करत राहतात. पण सगळ्यांनाच असे गप्प राहणे जमत नाही, म्हणून ते तेवढे बदलतात. अशावेळी त्यांच्या घरच्यांनीही त्यांच्याप्रमाणे बदलावे अशी अपेक्षा करणे गैर आहे. कारण त्या परिस्थितीत आम्ही आमच्या परीने जेवढे प्रयत्न करायचे ते केलेलेच असतात, पण आम्ही व्यक्तिस्वातंत्र्य मानतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे 'तुम्ही तुमच्या घरातील किती लोकांना नास्तीक बनवले?' असे बोल लावणे चुकीचे आहे, असे मला वाटते.

शनिवार, १९ मार्च, २०२२

तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन की खून?

तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन की खून?(^m^)(^j^)(मनोगते)
              
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या अभंग व किर्तनातून समाजाची जनजागृती करायचे. त्यांनी पुराणातील खोट्या कर्मकांडावर प्रचंड प्रमाणात टिका केली. अनिष्ट चालीरीती रुढी परंपरेला विरोध केला. अंधश्रद्धा निर्मूलन केले. तुकाराम महाराजांच्या किर्तनातून गावोगावी सुधारणा होऊ लागली. वर्णभेद, जातीभेद कमी होऊ लागला. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या किर्तनातुन नुसते जन जागृतीच करत नव्हते तर ते आपल्या किर्तनातून तयार झालेल्या युवकांना स्वराज्यासाठी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात भरती करत होते. शिवाजी महाराजांचे मावळे घडवत होते. त्यांना आर्थिक मदत पुरवत होते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात गुरु-शिष्याचे नाते तयार झाले होते. त्यामुळे भटांचे मनुवाद्यांचे लोकमनातील वर्चस्व कमी होत चालले होते. लोक अंधश्रद्धेतून बाहेर पडू लागले होती. या गोष्टीचा भटांना जास्तच त्रास झाला. परिणामी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज भटांना नकोसे वाटू लागले. म्हणून त्यांनी धुळवडीच्या खेळाचा गैरफायदा घेतला. रामेश्वर भट, मंबाजी भट, सालोमालो या तिघांनी मिळून धुळवडीच्या दिवशी 1650 मध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा निर्घृण खून केला.  त्यांच्या मृत शरीराची विल्हेवाट लावून टाकली. आपण केलेल्या खूनाची माहीती जर लोकांना समजली तर ते आपल्याला मारून टाकतील. या भितीने आपला गुन्हा लपविण्यासाठी या भटांनी धुळवडीच्या दुसर्‍या दिवशी तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्याचा बनाव रचला. महाराज पुष्पक विमानात बसून सदेह वैकुंठाला जाताना आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहीले. असे खोटेनाटे सांगून आपला खून पचवला. लोकांची दिशाभूल करुन बीज नावाचा नवीन सण सुरू केला. आपल्या संतांचा खून या नतद्रष्ट भटांनीच केला. ज्या ज्या वेळी असे खून झाले त्या त्या वेळी भटांनी आपल्याला नव-नवीन सण दिले आणि आपण ते आनंदात साजरे करतोय; यापेक्षा दुर्दैव ते कोणते?
          
माणसं मारून विचार कधीच मरत नाहीत. जो गाथा वाचेल तो तुम्हांला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सत्य हे सर्वांना समजणारच. प्रस्थापित परंपरेमध्ये धर्म सांगण्याचा अधिकार हा उच्चवर्णीयांकडे भटाकडे होता. तुकोबांनी त्यांना आव्हान दिलं आणि धर्म सांगण्याचा अधिकार आपल्या हातात घेतला. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात,
वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा।
येरांनी वाहावा भार माथां।
तुम्हांसी वाळीस ब्राह्मणाचे पंक्तिं।
तुम्ही गुरुभक्ती नका सांगू॥

बहिणाबाई सांगतात, बहिणी म्हणें ऐसें मंबाजी बोलिला।
द्वेषही मांडिला तेच क्षणीं॥
यात मंबाजी, तुकाराम महाराज हे ब्राह्मण नाहीत म्हणून त्यांना स्वतःच्या पंक्तीत बसत नसल्याचे सांगून गुरुभक्ती बाबत त्यांनी बोलू नये असं म्हटलं आहे. *म्हणजे भेदाभेद, वर्चस्ववाद या जोरावर ज्ञान संपादन करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता हे समजतं.* एवढंच नाही तर सत्य प्रबोधनातून जनसामान्यांपर्यंत पोचवणे आणि त्यांना जागृत करणे हा अक्षम्य गुन्हा समजला जात होता. तरी तुकाराम महाराज ठामपणे सत्यशोधक विज्ञानवादी बंडखोर विद्रोही भूमिकेतून बहुजन आणि मराठा जनतेसमोर सत्य मांडत राहिले. हे विचार मूळ धरत होते जे या मंबाजी सारख्या मनुवादी ब्राह्मणवादी लोकांना न पचणारं होतं...!
          
बहिणाबाई पुढे सांगतात, हे सर्व काही मंबाजीने द्वेषातून दाखवून दिले होते. ज्यांना ज्यांना वाटतं की, तुकाराम महाराज यांना खरचं पुष्पक विमान वैकुंठाला घेवून जाण्यास आलं होतं, तर हे शक्य आहे का? असा साधा प्रश्न स्वतःला विचारून बघावा. उगाच नको त्या अफवांना देवभोळी भक्ती या नावाखाली अजून किती वर्ष मूर्ख बनणार आहात? आजही मनुवाद्यांना विरोध दर्शवणारे दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्यासारखे मानवहीत जोपासणारे विज्ञानवादी परिवर्तनवादी सत्यशोधक, निर्भीड मत मांडणारे लोक मारले जातात. म्हणजेच पुष्पक विमानात बसून तेही वैकुंठाला जातात असे म्हणायला मनुवाद्यांनी मागेपुढे पाहिले नसते. आज जर सत्य पोचवणारी माध्यमे नसती तर यांच्या बाबतही असंच काही खोटंनाटं पसरवलं असतं आणि आपण ते मान्य केलं असतं. अगदी हेच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या बाबत घडलं. तुकाराम महाराज यांचे विचार मनुवादी लोकांना न पटणारे होते.
            
मला माहीत आहे हा विषय वादग्रस्त आहे. मला याचीही पूर्णत: जाणीव आहे की या घटनेची चिकित्सा करणे वारकरी संप्रदायालाही मान्य करत नाही. संतश्रेष्ठ तुकारामांचे सदेह वैकुंठगमन झाले. त्यांना नेण्यासाठी वैकुंठगमन झाले. त्यांना नेण्यासाठी वैकुंठाहून गरूडध्वजधारी विमान आले. त्यात बसून त्यांचे वैकुंठी निर्गमन झाले अशी सर्वांची श्रद्धा आहे. गेली साडेतीनशे वर्षे महाराष्ट्रातील मराठी माणूस या भाकडकथेवर डोळे झाकून विश्‍वास ठेवत आहे.

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?

 मूळ पोस्ट


हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?


१) *लग्नात मांडव कशासाठी ???*

= मातेनं माझ्या मुलीचं मनही मांडवासारखं मोठं आहे, हे सांगण्यासाठी !!!

२) *विहिणबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी???*

= माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा, हे सांगण्यासाठी !!!

३) *नवरदेवाची कानपिळी वधुच्या भावानेचं पिळायची,हे कशासाठी???*

=माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा, हे सांगण्यासाठी !!!+++

४) *मुलीच्या मागं मामाचं उभा राहतो,हे कशासाठी???*

= मुलीला सांगण्यासाठी की मी तुझ्या आईच्या पाठीशी भक्कम उभा आहे, हे सांगण्यासाठी !!!

५) *लग्नात वधु-वरांनी एकमेकास घास द्यायचा,हे कशासाठी???*

= प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या- माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही, राहणार नाही व राहू नाही  हे सांगण्यासाठी !!!

६) *लग्नात सप्तपदी माहित आहे का कशासाठी???*

= तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं हि केवळ मर्यादा आहे, हे सांगण्यासाठी !!!+++

७) *लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी???*

= तांदूळ ची अक्षता याच्या साठी की तांदूळ चे बीज लावताना आपण एक जागी लावतो ते थोडे मोठे झाले की मग त्याची लावणी वेगळ्या जागी करतो तसेच मुलींचे बालपण माहेरी असते त्या जिथे मोठ्या होतात तिथून त्यांना दुसऱ्या जागी जावे लागते तिथेच त्यांचा वंश वाढतो, याची आठवण रहावी म्हणून लग्नात तांदुळाच्या अक्षता टाकतात *पण हे शास्त्र बऱ्याच लोकांना माहीत नाही..+++*

🙏🙏


*!! श्री स्वामी समर्थ !!*


==================

या पोस्टला उत्तर

1) मांडवापेक्षाही खुले आकाश मोठे असते. मग खुल्या आकाशात लग्न का नको. मुलीचे मन जास्त मोठे होऊ नये म्हणून मांडवातच लग्न केले जाते का? 

अनेक संकुचित मनाच्या मुलींची लग्ने मांडवात केल्याने त्यांची मने मोठी होतात का? प्रत्यक्षात तर तसे काहीच दिसत नाही. 

आणि महत्वाची गोष्ट मोठ्या मनाची अपेक्षा मुलीकडूनच  का?  म्हणजे सगळे सहन करायचे ते मुलीनेच. मुलांना सगळ्या बाबतीत सूट का दिली जाते? आपल्या बुरसटलेल्या विचारांच्या समर्थनासाठी कोणत्याही गोष्टींचा (पारंपरिक असो की आधुनिक) आधार घेतला जातो. त्यातलाच हा एक प्रकार आहे.

2) ही गोष्ट सुद्धा पुरुषप्रधान मानसिकतेचे प्रतीक आहे. वराकडील लोकांना मोठेपणा आणि वधूकडील लोकांना उणेपणा देण्याचा हा प्रकार आहे. वधूचे घरात आगमन होत असताना तिच्यासाठी पायघड्या का नाहीत?

३) कानपिळी करताना वधूच्या भावाला हे सांगितले जाते का? आणि प्रत्यक्षात त्याच्या बहिणीला नीट वागवले जात नसताना त्याला पुन्हा कान पिळण्याचा अधिकार परंपरेत आहे का? तो अधिकार परंपरेने दिला नाही परंतु संविधानाने दिला आहे, याचा विसर सोयीस्करपणे पडतोय.

4) लग्नात मुलाच्या मागेही त्याचा मामा उभा असतो. तो कशासाठी? केवळ मामाच कशासाठी हवा? बाकीचे नातेवाईक का नको? मामानेच आपल्या आईच्या पाठीशी उभे राहावे आणि वडील, भाऊ यांनी आईला वाऱ्यावर सोडावे असा यातून संदेश द्यायचा आहे का?

5) ही एक रोमँटिक गोष्ट आहे. यावर आक्षेप असण्याचे कारण नाही. पण काही ठिकाणी याची जबरदस्ती केली जाते. अतिरेक केला जातो. या जबरदस्तीच्या प्रेमावर पोस्टमध्ये एक अक्षरही लिहिले नाही.

6) सप्तपदीचा हा अर्थ किती जोडप्यांना माहीत आहे? आणि सोबत चालणे आणि फरफट यामध्येही फरक आहे. स्वभाव किंवा इतर कारणांनी एकाची दुसऱ्यासोबत फरफट होत असेल तर परंपरेत काय तरतूद आहे?

7) याच पद्धतीने कांद्याची लागवडही केली जाते. वांगी, मिरची, इ. पिकांची लागवडही याच पद्धतीने केली जाते. मग त्यांच्या बिया अक्षदा म्हणून का वापरत नाही? केवळ तांदळाच्या वंशाचीच आठवण राहावी असे वाटते का? दुसरी गोष्ट सगळीकडेच अक्षदा म्हणून तांदूळ वापरले जात नाहीत. बऱ्याच ठिकाणी ज्वारी, गहू वापरले जातात. त्यांची लागवड तर बी पेरून होते.  मग इथे कुठल्या वंशाची आठवण राहते?

एकंदरीत सदर पोस्टला कोणताही आधार नाही. केवळ हवेत गोळ्या मारण्याचे काम केलेले आहे.

शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

गायत्री मंत्रात किती सामर्थ्य आहे?

 "गायत्री मंत्र हा जगातला एकमेव पाॅवरफुल मंत्र आहे असे डॉ. हाॅवर्ड स्टेनरेजिल यांनी जाहीर केले आहे...त्यांनी जगातील सर्व मंत्र गोळा केले असून त्यांनी स्वतःच्या प्रयोगशाळेत चाचणी घेतली आहे... त्यांना असे आढळले की फक्त गायत्री मंत्र हाच एकमेव सर्वोच्च शक्तिशाली  मंत्र आहे... हिंदूंचा हा मंत्र एका सेकंदात एक लाख दहा हजार ध्वनी लहरी निर्माण करतो असे त्यांना आढळले.... एवढ्या प्रचंड ध्वनी लहरींमुळे व तरंगलांबी मुळे अध्यात्मिक क्षमता प्रचंड वाढते....गायत्री मंत्राचे शारीरिक व मानसिक फायदे खूप आहेत... अमेरिकेतील एका राज्यात व हॉलंड मध्ये रेडिओ स्टेशन वरून रोज गायत्री मंत्र म्हटले जातात..."

 अशा आशयाची पोस्ट फिरत असते...!! 

वास्तवात जगातील कोणत्याही धर्माच्या वा संस्कृतीच्या मंत्रांमध्ये कोणतेही सामर्थ्य नसते. 

कारण मंत्र-तंत्राने जर रोग बरे झाले असते व समाज सुखी झाला असता तर, राजकारण अस्तित्वात आले नसते आणि शासन यंत्रणा निर्माण करण्याची गरजच उरली नसती ! 

मग वरील पोस्टमध्ये जे दावे करण्यात आलेले आहेत त्यात तथ्य किती आहे याचा धांडोळा आपण घेऊ या... 

गायत्री मंत्र हा एका सेकंदामध्ये एक लाख दहा हजार वेळा ध्वनी लहरी  निर्माण करून पॉवर्फुल ऊर्जा देते हे म्हणणे मुळात संपूर्ण  अवैज्ञानिक आहे. कारण ध्वनिलहरी या सेकंदामध्ये मोजल्या जात नाहीत. त्या हर्टज मध्ये मोजल्या जातात. अगदी ध्वनी लहरी जर वेगात मोजायच्या ठरवल्या तरीही  ध्वनी लहरींचा वेग हा मिटर किंवा किलोमीटर मध्ये मोजला जातो. वरील पोस्टमध्ये ११०००० प्रति सेकंद एवढेच म्हटले आहे. ज्याला कोणताही वैज्ञानिक अर्थ नाही. मंत्राच्या ध्वनीलहरींची तरंगलांबी, वेग, वारंवारिता, प्रकार जसे की उभ्या किंवा समांतर ध्वनीलहरी , इ. कोणतेही मोजमाप इथे दिलेले नाही. केवळ प्रती सेकंद म्हटले आहे ज्याला काहीही अर्थ नाही.

आपण सर्व मनुष्यप्राणी २० हर्टज ते २०००० हर्टज ( २० kHz किलो हर्टज) च्या दरम्यानच्या ताकदीचे ध्वनि ऐकू शकतो. समजा या पोस्ट मधील म्हणणे खरे आहे असे समजून आपण गणित करूया. हर्टज गुणिले सेकंद किंवा हर्टज  गुणिले साठ म्हणजेच एक लाख दहा हजार गुणिले साठ बरोबर ६,६००,००० हर्टज झाले.  म्हणजेच ६६००० किलो हर्टज झाले. आपण जेव्हा वैद्यकीय कारणासाठी सोनोग्राफी करतो तेव्हा त्या मशीन मध्ये २०००० हर्टजच्या वर जर ध्वनीलहरींची वारंवारिता गेली तर त्यास अल्ट्रासाऊंड ध्वनीलहरी म्हणतात. याचा अर्थ गायत्री मंत्राने सोनोग्राफी मशीन चालू शकते पण तसा तरी अजून शोध लागलेला नाही. आणि लागणार ही नाही कारण तुमचे आमचे सर्वांचे  कान २०००० किलोहर्टज पर्यंत ताकदीचे ध्वनी ऐकू शकतात. २०००० च्यावर जर ते गेले तर आपल्या कानाचे काय हाल होतील ते मंत्रच जाणोत. 

गायत्री मंत्राने अचाट उर्जा जर निर्माण होत असेल तर ऐकणारे बहिरे होऊन जातील किंबहुना कानच बाद होऊन जातील! गायत्री मंत्रवाल्यांचे जर असे म्हणणे असेल की अज्ञात शक्ती ती निर्माण करते तर अज्ञात शक्ती ज्ञात करून दिली तर जगद् कल्याण होईल. कुत्र्याचे कान तीक्ष्ण असतात असे आपण म्हणतो.. कारण कुत्रे हे २० हजार किलोहर्टज पेक्षा जास्त ताकदीचे ध्वनी ऐकू शकतात.  म्हणजे माणूस नव्हे तर प्राणी हे गायत्री मंत्र जर ऐकत असतील तर त्यांच्यात प्रचंड सुधारणा दिसून यायला हव्यात. 

ध्वनी लहरींची लांबी ही फूटात, इंचात किंवा मीटरमध्ये मोजली जाते. ( सामान्य ध्वनी लहर लांबी ही १७ मीटर ते १७ मिमी मध्ये असते ) गायत्री मंत्रवाल्यांनी त्यांच्या लहरींची लांबी मोजलेली दिसत नाही. कारण तसा कुणीच उल्लेख करत नाही. ध्वनीलहरींची ताकद जर मोजायची ठरवली तर ती परिस्थितीनुसार बदलते. ज्या माध्यमातून ध्वनी जाणार आहेत त्या माध्यमांची घनता ही महत्त्वाचे ठरते. गायत्री मंत्र सर्व घनतांमधून जात असेल तर त्याचे कुठलेच पुरावे कोणीही दिलेले नाहीत. 

कान आणि कानातील पडदा हे ऐकण्यामध्ये भाग घेतात. तिथून ध्वनिलहरी मेंदूकडे ऑडिटरी नर्व किंवा कर्ण शिरेतून मेंदूकडे जातात. आणि तिथून ते ऐकण्याच्या केंद्रात जातात. या सर्व गोष्टी मोजण्याकरिता सायकोऍकॉस्टिक किंवा मनोश्रवण विज्ञान वापरले जाते. आणि या विज्ञानानुसार गायत्री मंत्राचा कोणताही दावा टिकलेला नाही. 

न्यूटन-लाप्लास समीकरणाने ध्वनीच्या लाटांचा वेग मोजला जातो. गायत्री मंत्राचा वेग पोस्टकर्त्याने या  समीकरणाने मोजून दाखवावाच. मग सत्य बाहेर येईल. प्रती सेकंद किती मीटर वेगाने गायत्री मंत्राच्या ध्वनीलहरी धावतात ते न सांगता सेकंदास ११०००० लहरी असले भंकस विज्ञान मांडले आहे. 

विज्ञानानुसार, पाण्यातून वाहताना ध्वनीलहरींचा वेग १४८२ मीटर प्रती सेकंद असतो.   तोच स्टील धातूतून जाताना ५९६० मीटर प्रती सेकंद असतो. तर सर्वांत जास्त वेग घन रूपातल्या हायड्रोजन मधून असतो. तो ३६००० मीटर प्रती सेकंद असतो इतका असतो. आता गायत्री मंत्राचा वेग लाखांच्या वर गेला असा दावा केला असेल तर जगाच्या बाहेरील मोजणी यंत्र बहुधा असावे..देवाचे! आणि घनता असावी श्रद्धेची !! जाता जाता गायत्री मंत्राच्या ध्वनीचा दाबही (साऊंड प्रेशर) ही सांगितले असते तर देवाचे कौतुक करायला वाव तरी मिळाला असता. 

ध्वनीलहरींचे मोजमाप करण्यासाठी ६ पद्धतीने ते करावे लागते. ही पद्धत डॉक्टर हावर्ड स्टॅनरेजीलला माहित नसावी. ती माहित नाही त्याचं कारण डॉक्टर हाॅवर्ड स्टॅनरेजील नावाची व्यक्तीच कुठे अस्तित्वात नाही. पोस्टमध्ये म्हटले आहे की ती अमेरिकन सायंटिस्ट आहे. पण अमेरिकेत असा कुठलाच वैज्ञानिक नाही. इंटरनेटवर शोधल्यानंतर अशा नावाचा माणूस सापडत नाही. त्याचे प्रसिद्ध झालेले शोधनिबंध नाहीत. त्यामुळे जगात कुठेही खळबळ उडालेली नाहीय्ये.  बहुदा पोस्ट करणाऱ्यांनी स्वतः वैज्ञानिक पैदा केला असावा. आणि तो पोस्टमध्ये घुसडला  असावा. गायत्री मंत्राच्या सामर्थ्याचे पुरावे देणारा वैज्ञानिक बेनामी आणि गायब असावा यासारखे मंत्र सामर्थ्य कोणते नसावे. त्याचे नाव घेऊन अनेक अंधभक्त ट्विटरवर, फेसबुकवर, युट्युबवर, गायत्रीमंत्राचे अफाट आणि अचाट कौतुक करणारे व्हिडिओज, पोस्टस्  आणि ट्विट्स टाकून मोकळे झाले आहेत. या सर्वांनी मिळून डॉक्टर हाॅवर्डला शोधून आणावे आणि त्याचे नाव, गाव, पत्ता, आणि त्याच्या मानसिक प्रयोग शाळेचा पत्ता मला दिल्यास पुढचा शोध घेणे आणखी सोपे होईल. आणखी एक रेफरन्स दिलेला आहे. हॅम्बुर्ग यूनिवर्सिटीमध्ये गायत्री मंत्राचे संशोधन झाले आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. डॉक्टर हावर्ड स्टॅनरेजील अमेरिकन आहे आणि हॅम्बुर्ग युनिव्हर्सिटी जर्मनीत आहे.  या युनिव्हर्सिटी मध्ये जर गायत्री मंत्रावर संशोधन झालेले असेल आणि ते प्रचंड क्रांतिकारी असेल तर त्याचा गाजावाजा न होता सर्व ठिकाणी जागतिक पातळीवर सारे काही थंड थंड आहे. याचे कारण ही पोस्ट फेकू युनिव्हर्सिटी मधून आल्यामुळे भक्तांमध्येच गाजावाजा होणार. 

दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर गायत्री मंत्र म्हटल्याने भयंकर ऊर्जा निर्माण होत असेल तर म्हणणारा जिवंत कसा काय राहू शकतो? त्याच्या तोंडातून मंत्र बाहेर पडल्या पडल्या निर्माण होणार्या अफाट ऊर्जेमुळे तो आणि त्याचा परिसर क्षणार्धात हलून जायला हवा. ध्वनीवादळच म्हणा ना!पण तसे तर काही घडत नाही. कारण गायत्री मंत्राच्या अफाट सामर्थ्याचा दावा करताना असेही सांगण्यात येते की ते म्हटल्यावर शरीरात अफाट आध्यात्मिक शक्ती जागृत होते. म्हणजे नेमके काय ते सांगितले नाही.  

एका भक्ताने तर असा दावा केला आहे की या मंत्रामुळे दुसऱ्याच्या मनातले सुद्धा ओळखता येते. टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वृत्तपत्राने, तुमच्या शरीरातील सर्व विषारी द्रव्य या मंत्राने बाहेर टाकली जातात, तुमच्या मेंदू आणि फुप्फुसांना निरोगी बनवले जाते, ह्रदयातली नकारात्मकता (??) घालवली जाते, तुमची ताणविकृती आणि काळजी विकृती दूर होते,... इत्यादी अफाट दावे बिनबुडाचा आधार घेत केले आहेत. हे प्रतिष्ठित वृत्तपत्र जर असे दावे करत असेल तर इतर वृत्तपत्रांची काय कथा? एवढेच नव्हे, तर गायत्री मंत्र म्हटल्यामुळे बुद्धिमत्ता वाढते आणि माणूस इंटेलिजंट होतो असा वेडगळ दावा करण्यात आला आहे. असे जर असते तर भारतात पुरातन काळापासून लाखो वैज्ञानिक  निर्माण झाले असते !!

मंत्र सामर्थ्य दाखवण्याच्या नादात विज्ञानाचा आधार घेतला तर तो किती हास्यास्पद होतो त्याचा नमुना म्हणजे ध्वनी लहरी आणि गायत्री मंत्र यांचा संबंध जोडणे. 

जगातील कुठल्याही धर्मातल्या, मंत्र, तंत्र, जप आणि तप यांच्यात कोणतेही अचाट आणि अफाट सामर्थ्य नसते. तोंडातून बोलले गेलेले, नादाचा ठेका धरलेले, शब्द हे जर प्रत्येक व्यक्तीस निरोगी बनवत असते तर वैद्यकीय विज्ञानाचा उदयच  झाला नसता एवढे जरी लक्षात घेतले तरी पुरे!

- डाॅ.  प्रदीप पाटील

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..!

*चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..! म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!*🤔

मित्रांनो, शिवजयंती बंद पडणारे व गणेश उत्सवाचे जनक बाळ गंगाधर टिळक. यांनी गणपती बसविला. दहा दिवसांपर्यंत सभा-सम्मेलने घेतली. दहाव्या दिवशी बसवलेल्या गणपतीची पुण्यातून वाजत गाजत मिरवणुक निघाली. त्यात दर्शन खुले होते.
         

एका चर्मकाराने (चांभार) गणपती जवळ जाऊन चक्क मुर्तिला स्पर्श करुन दर्शन घेतले..!

मिरवणुकीतील सर्व ब्राम्हणांनी एकच बोभाटा केला... गणपती बाटला, गणपति बाटला म्हणून टिळकांवर खेकसायाला लागले.

"हे पहा, सर्वाना दर्शन खुले केले तर हे असे होते. धर्म बुडाला, चांभाराने धर्म बुडविला..!" 

तोपर्यंत मिरवणुक पुण्याबाहेर आली होती.

टिळक म्हणाले - "ओरडू नका. धर्म कशाला बुडू द्यायचा. त्यापेक्षा आपण या बाटलेल्या मुर्तिलाच विसर्जित करू (म्हणजे पाण्यात फेकून बुडवून टाकू...)

अश्याप्रकारे तो चांभाराच्या स्पर्शाने बाटलेला गणपती बुडवला गेला आणि तेंव्हापासून दरवर्षी गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली!✍🏻

- डॉ. नरेंद्र दाभोळकर

*या दाभोळकरांच्या बदनामीकारक पोस्टला उत्तर... – उत्तम जोगदंड.*

आता तरी डाँ नरेंद्र दाभोलकरांना सोडा...!

हा दाभोळकर यांच्या नावाने केला जाणारा अपप्रचार आहे. पोस्टकर्त्याने दाभोळकरांनी हे विचार कोणत्या पुस्तकात, कोणत्या वर्तमान पत्रात, कोणत्या मासिक वा साप्ताहिकात लिहीलेले आहे किंवा कोणत्या भाषणात हा उल्लेख केलेला आहे त्याचा पुरावा द्यावा. सनातनी व्यवस्थेमध्ये आज पर्यंत हजारो वर्षे 'ध' चा 'मा' करणारी माणसं होऊन गेली, आजही आहेत व पुढेही राहतील. यांनीच संत तुकारामांना सदेही वैकुंठाला पाठवले. यांनीच हनुमानाला आकाशात उडतांना दाखवलं. संघोट्या हिंदुत्ववाद्यांच्या सडक्या मेंदूतून असे विकृत विचार सतत बाहेर पडत असतात. आपण त्यांच्या अपप्रचाराला बळी पडू नये, एवढेच खरे.

डाँ नरेंद्र दाभोलकर: विचार पेरणारा माणूस! त्यांनी त्यांच्या विचारातून कधीही कट्टरता, नास्तिकता किंवा भाषेची पातळी सोडलेली नाही. त्यांची पुस्तके, लेख, आॕडिओ, विडिओमध्ये अशी ओळही दिसणार नाही. विचारांची लढाई कशी लढावी याचा आदर्श ठेवणाऱ्या दाभोलकरांचा ही विचारांची लढाई आधीच हरलेल्या भ्याड शक्तींनी भेकडपणे गोळ्या घालून खून केला.

ह्या आधीही आणि नंतरही, दाभोलकरांच्या अनेक वाक्याचा विपर्यास केला गेला. तेवढ्यानेच भागले नाही म्हणून अनेक गोष्टी त्यांच्या नावावर खपवल्या जावू लागल्या. फेसबुक, व्हाटसअप सारखा सोशल मिडिया वाढला आणि हे प्रकार जास्तच वेगाने पसरु लागले. दाभोलकरांच्या विचारांची पुरेशी ओळख नसलेले, तर काही जाणिवपूर्वक दाभोलकरांना बदनाम करण्यासाठी पेरलेलं षडयंत्र आहे हे!  

ज्या भक्तांना अजून काही कट्टर विचार पसरवायचे असतील ते ते त्या त्या लोकांनी आपापल्या नावानीशी पसरवावे. काही दिवसांपूर्वी "होय, मी नास्तिकच" ही कविता असो किंवा आता गणपती विसर्जनामागची कथा...! या आधी सुद्धा एक 'निर्भीड' कविता दाभोलकर यांच्या नावाने सोशल मीडियावर खपवली गेली होती आणि त्यावरून सनातन्यांनी त्यांच्यावर भरपूर तोंडसुख घेतले होते. नंतर ती कविता भीमराव सुर्वे नावाच्या व्यक्तीची होती असे आढळून आले होते.

गणपती विसर्जनाची पोस्ट वाचून काही प्रश्न उपस्थित होतात ते असे,
मला तरी ही पोस्ट खरी वाटत नाही. कारण:
१) पोस्टची सुरुवात 'शिवजयंती बंद पाडणारे...' असे टिळक यांना संबोधून झाली आहे. त्यावरून ती पोस्ट बनवणाऱ्याचा उद्देश कळतो.
२) गेल्या एक दोन वर्षांपासून फिरत असलेल्या या पोस्टमधील 'इतिहास' अज्ञात पोस्ट लेखक वगळता अन्य कोणालाही ज्ञात नाही किंवा आधी कुणीही तो सांगितलेला नाही.
३) ही घटना कोणत्या वर्षी, किती तारखेला घडली? नेमकी दहाव्या दिवशी मिरवणूक कशासाठी काढली जात होती? याचे स्पष्टीकरण या पोस्टमध्ये दिसत नाही.
४) या कथित घटनेआधी गणपती विसर्जन होत नव्हते, असा या पोस्टमधून अर्थ निघतो. त्याची चिकित्सा होणे गरजेचे आहे. त्या आधी मूर्तीचे काय केले जायचे?
५) एका वर्षी चांभाराने मूर्तीला स्पर्श केला म्हणून मूर्ती पाण्यात बुडवली असे मान्य केले तरी प्रश्न असा निर्माण होतो की, पुढील वर्षी चांभारांना मूर्तीच्या जवळ येण्यास बंदी घालण्या ऐवजी असा स्पर्श झालेला नसताना, मूर्ती बाटलेली नसताना ती दरवर्षी पाण्यात बुडविणे ब्राह्मणांनी का सुरू केले? 
६) त्या काळात जातीभेद अत्यंत क्रूरपणे पाळला जात होता हे खरे आहेच. त्यानुसार खरे तर त्या मूर्तीला स्पर्श करणाऱ्या चांभाराला ब्राह्मणांनी अत्यंत कडक शिक्षा करून समस्त चांभारांवर जरब बसवून पुन्हा कधी कोणी चांभार मूर्तीला स्पर्श करू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली असती. पण त्या ऐवजी, एकदा मूर्ती बाटली म्हणून पुढे दरवर्षी ती बुडावण्याचा मूर्खपणा ब्राह्मण करतील असे वाटत नाही.
७) शेवटी पोस्टखाली डॉ नरेंद्र दाभोलकर यांचे नाव टाकून या पोस्टला सच्चेपणा देण्याचा प्रयत्न करून एका दगडात दोन पक्षी मारायचा प्रयत्न केलेला दिसतोय. 

एकीकडे जातिभेदासाठी ब्राह्मणांना लक्ष्य करायचे आणि दुसरीकडे अंनिसला लक्ष्य करायचे. या पोस्टला कसलाही आधार नसल्याने सनातनी लोक दाभोलकर यांना खोटारडे म्हणणार, ब्राह्मण-द्वेषी म्हणणार. अंनिसवाले याचा बचाव करण्यासाठी धडपडणार. असा हा कावा आहे. दाभोलकर कधीही अशा गोष्टी पुराव्याशिवाय सांगत नसत हे लक्षात ठेवावे. गणपती कृत्रिम तलावात विसर्जित करण्याविषयी जी चळवळ दाभोलकरांनी उभी केलेय, त्याबाबत त्यांनी अनेक ठिकाणी लिहलेय. पण या प्रसंगाचा उल्लेख कुठेही नाही. तेव्हा डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या नावे काही फाँरवर्ड करण्याआधी जवळच्या महा.अंनिस कार्यकर्त्यांचे मत तरी विचारात घ्या, आणि डॉ दाभोलकरांच्या बदनामीच्या षडयंत्रात सामील होवू नका!

तरी, अशा पोस्ट्स, कविता येतात तेव्हा त्याची तर्काच्या आधारावर तपासणी करणे, ज्याने ही पोस्ट पाठवली त्याच्याकडे पुरावे मागणे आवश्यक आहे.