‘मारुतीस्त्रोत्र’च्या खर्‍या अर्थाची थापेबाजी

 *मारुतीस्तोत्र खरा अर्थ*


इंग्लंड मधील शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी लावलेल्या ‘सिम्युलेरीटी थेरम’ आणि ‘थर्मोडायनॅमिक्स ऑफ ब्लॅकहोल्स’ या दोन क्रांतिकारी शोधामुळे विज्ञानाच्या क्षेत्रात फार मोठी क्रांती झाली. शास्त्र हे तर्क आणि सिद्धांत सिद्ध करण्याच्या कसोटीवर सिद्ध होते हे या शरीराने विकलांग पण बुद्धीने अत्यंत कणखर असलेल्या शास्त्रज्ञाने जगाला दाखवून दिले. ताऱ्याचा अंत होतो, तसाच संपूर्ण विश्वाचाही अंत होऊ शकतो असा निष्कर्ष हॉकिंग यांनी मांडला. जगभर हा सिद्धांत चर्चेचा विषय झाला. भारतीय अणू वैज्ञानिक श्री रामदास स्वामी......!

खरेतर भारतीय विद्वान शास्त्रज्ञांना धर्माच्या कोंदणात बसवल्यामुळे त्यांना संत पद प्राप्त झाले पण त्यांनी मांडलेल्या सिद्धांताचा बोजवारा उडाला. समर्थ रामदास स्वामी हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. समर्थांनी लिहिलेले मारुती स्तोत्र धर्माची झापडे काढून शास्त्रीय नजरेने पाहीले तर फक्त मनन आणि चिंतन करून त्यांनी जे साहित्य (खरेतर शोध निबंध) लिहून ठेवले आहेत त्याचे अनन्य साधारण महत्व अधोरेखित होते.

समर्थांना 'मारुती' या अणू शक्तिला ब्रिक हिस्ट्री ऑफ टाइम (विश्वोत्पत्तीचा सिद्धांत) हे म्हणायचे होते असा माझा ठाम विश्वास आहे. त्याची अनेक उदाहरणे फक्त एका मारुती स्त्रोत्रात दाखवता येतील. समर्थ रामदास स्वामी यांच्या ठायी अपरा मानसशास्त्र ज्याला Advance Psychology असेही म्हणतात ती जन्मताच अवगत होती. मानवता मनोविज्ञान (Humanistic Psychology) या गोष्टीचा विकास  १९५० साली झाला असे मानले जाते. परंतु सुमारे ३५० वर्षापूर्वी मनश्चिकित्सा (Psychotherapy) या विषयात श्री रामदास स्वामी हे जगाच्या कितीतरी पुढे होते हे त्यांनी दासबोधातून सिद्ध केले आहे.


मारुती स्त्रोत्रातील काही श्लोकांचा या ठिकाणी आपण विचार करू या ---

मारुती स्त्रोत्र हे अणुशक्ती चे वर्णन समर्थांनी एकांत गुहेत बसून कुठल्याही साधना शिवाय केले होते परंतु ते समजण्यात आपण कमी पडलो आहोत.


१) मनासी टाकले मागे गतीसी तुळणा नसे..........


मनाचा वेग हा ध्वनी आणि प्रकाशाच्या वेगाच्या पेक्षा प्रचंड असतो हे त्यांना म्हणायचे होते अर्थात वेगा बद्दल त्यांना सखोल ज्ञान होते.


२) अणू पासोन ब्रम्हांडा  एव्हडा होत जातसे........ Big bang theory...!!!

या वाक्यात समर्थांना लहानात लहान कण ज्याला आपण अणू Atom असे म्हणतो आणि ब्रह्मांड म्हणजे अनेक सूर्यमाला असलेला समूह असे म्हणतो या खगोल शास्त्रीय सत्याची जाणीव करून दिली   Big bang theory मध्ये महाविस्फोट सिद्धांत सांगितला आहे. महाविस्फोट सिद्धांतच्या अनुसार जवळजवळ १३.७ अब्ज वर्षापूर्वी अणू स्फोटातून एक उर्जा उत्पन्न झाली आणि तिचे स्वरूप सतत वाढत आहे. या स्फोटानंतर अंतरीक्ष हे  १.३ सेकंदात निर्माण झाले होते हे आता आधुनिक संशोधनात सिध्द झाले आहे ते समर्थांनी एका निर्जन गुहेत बसून आपल्याला  सांगितले होते.


३) कोटीच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे .......


पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाताना जी याने सोडली जातात त्या यानांना पृथ्वीची कक्षा सोडताना उत्तर दिशा अत्यंत योग्य असते हे त्यांनी जाणले होते.


४) आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा ....

सूर्य मंडळ या शब्दाचा अर्थ अनेक सूर्य आणि त्यांचे उपग्रह आहेत हे त्यांनी एकांतात बसून जाणले होते.


५) वाढता वाढता वाढे, भेदिलें शून्यमंडळा......

पृथ्वीच्या कक्षे बाहेर "शून्य मंडळ" म्हणजे निर्वात पोकळी असते हे त्यांना माहिती होते. या शिवाय पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाताना प्रचंड उर्जा आवश्यक असते हे माहित असल्याने त्यांनी  "भेदिले " हा शब्द प्रयोग केला आहे.


६) दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें.

चंद्राच्या कलेसारखा विस्तार आणि नंतर चंद्रकला जशी लहान होत जाते तशी ब्रह्मांडाची अवस्था होणार आहे हे जे काही स्टिफन हॉकिंग यांनी सांगितले तेच समर्थ रामदास स्वामींनी जगाला सांगितले होते‌, पण आपण त्यांची दृष्टी समजून घेण्यास कमी पडलो.


प्रत्येक घटनेची शास्त्रीय कारण मीमांसा आपल्या देशातील संशोधकांनी केली होती. खगोल शास्त्राला आपण फल जोतिष्य थोतांड बनवले. आपल्याच ज्ञान देवांचा, संताचा, आपण विनाकारण अजाणतेपणी अपमान केला‌ शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग हे इंग्लंड मधील ज्ञानदेव होते. त्यांना आपण डोक्यावर घेणे उचितच आहे पण आपल्या ज्ञानदेवांना जागतिक मान्यता कधी मिळणार हाच तर कळीचा मुद्दा आहे. आपल्या ला आपल्या संस्कृतीचा, अफाट ज्ञानाचा अभिमानाचा अभाव असल्याने आपण अजून ही "तुझं आहे तुजपाशी पण मार्ग भुललाशी" या चा प्रत्यय येतो.


 माझा भावपूर्ण नमस्कार ..👏🏻🙏🏻


‘मारुतीस्त्रोत्र’च्या खर्‍या अर्थाची थापेबाजी. 

 

‘मारुतीस्तोत्र खरा अर्थ’ या शीर्षकाची एक पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. स्टीफन हॉकिंग यांचे नाव व ‘सिम्युलेरीटी थेरम’, Advance Psychology  आणि ‘थर्मोडायनॅमिक्स ऑफ ब्लॅकहोल्स’ असे वैज्ञानिक शब्द वापरुन मारुतीस्तोत्र हे संत रामदासांनी अणुशक्तीचे केलेले वर्णन आहे असे सांगायचा केविलवाणा प्रयत्न त्या पोस्ट-लेखकाने केला आहे. या पूर्वी शिवथरघळ बाबतीत सुद्धा अशीच अवैज्ञानिक पोस्ट कोणीतरी पसरवली होती ती पुराव्यांसह खोडून काढली गेली होती.  


आता मारुतीस्तोत्र पाहू या. या स्तोत्राचा संपूर्ण अर्थ पुढील लिंक मध्ये उपलब्ध आहे. हे स्तोत्र मारुती या देवाचे वर्णन व गुणगान करणारे आहे. ( स्तोत्रं म्हणजे स्तुती) मारुती किती शक्तीशाली आहे वगैरे माहिती यात आहे. 


https://www.marathisrushti.com/articles/the-marathi-meaning-of-maruti-stotra/


यात कुठेही अणुशक्तीशी संबंधित असा अर्थ कल्पनेला कितीही ताण दिला तरी निघत नाही. खरे तर या स्तोत्रातील एकूण एक कल्पना हा कल्पनाविलासाचा नमूना आहे. कोणाला तो श्रद्धेचा भाग मानायचा असेल तर ठीक आहे पण त्याचा विज्ञानाशी काडीचाही संबंध नसताना तो ओढून ताणून जोडायची काहीही गरज नव्हती.  


मनासी टाकले मागे गतीसी तुळणा नसे.......... यात मारुती ज्या वेगाने द्रोणागिरी घेऊन आला त्यास मनाच्या वेगची उपमा दिली आहे. मनाने आपण एका क्षणात कुठेही गेल्याची कल्पना करू शकतो हे शाळेतील मुलांना सुद्धा माहिती असते. यात कसले आलेय वेगाचे सखोल ज्ञान? मुळात एवढा मोठा देव साधी वनस्पति सुद्धा का ओळखू शकत नाही? आणि एवढा मोठा पर्वत कसा काय उचलून आणू शकतो आणि तो पर्वत युद्धभूमीवर कोठे ठेवतो? आता करोनावर अशीच वनस्पती वैगरे आहे काय? असेल काय? हे प्रश्न कोणाला पडत नाहीत.  

 

अणू पासोन ब्रम्हांडा  एव्हडा होत जातसे........ या मध्ये मारुती अत्यंत सूक्ष्म रूप तसेच त्या काळात माहिती असलेले ब्रह्मांडाएवढे रूप घेऊ शकतो असे त्याचे वर्णन आहे. यात बिग बँग कुठून आले? कोणी असे अत्यंत सूक्ष्म किंवा अत्यंत विशाल रूप घेत असेल तर वैज्ञानिक दृष्ट्या त्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहते. आणि त्यात हा बिग बँग म्हणजे कहरच!


कोटीच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे ....... याचा अर्थ मोठे उड्डाण घेऊन मारुती उत्तरेकडे झेपावला असा आहे. तो कुठल्याही दिशेला झेपाऊ शकतो. त्याचा संबध यानाशी जोडणे निव्वळ बावळटपणाचे आहे. 


आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा .... याचा अर्थ लालभडक सूर्यबिंब पाहून व त्याला फळ समजून ते गिळण्यासाठी उड्डाण केले असा आहे. सुमारे १५ कोटी किलोमीटर दूर असलेला, पृथ्वी पेक्षा ज्याचा व्यास १०९ पट मोठा आहे अशा सूर्यला मारुतीबाळ गिळायला निघाला ही कल्पनाच मुळी हास्यास्पद आहे. आणि त्यावरून अनेक सूर्य उपग्रह हा कल्पनविलास तर त्याहून हास्यास्पद आहे. 


वाढता वाढता वाढे, भेदिलें शून्यमंडळा...... संपूर्ण विश्वाला भेदून जाईल असा आकार मोठा करणे त्याला शक्य होते असा याचा अर्थ आहे. वरील एका श्लोकात हे आलेले आहेच. 


दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें.... जो हे स्त्रोत्र म्हणेल त्याला निश्चितपणे शुक्लपक्षातील चंद्राच्या कालेप्रमाणे सतत वृद्धिंगत होत जाणारा बलिष्ठ देह प्राप्त होईल. याचा संबंधं स्टीफन हॉकिंग, वाढते ब्रह्मांड यांच्याशी कसा काय पोहोचतो? मुळात त्या काळात असलेली ब्रह्मांड हि संकल्पना व आताची संकल्पना यात जमीन आसमानाचा फरक आहे. 


प्राचीन भारत वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत असण्याला कोणाची काहीही हरकत असण्याचे काहीही कारण नाही. अशी वस्तुस्थिती असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. प्रत्येक भारतीय माणसासाठी तर अभिमानास्पद! पण प्रश्न आहे तो खणखणीत पुराव्याचा. नाकारता येणार नाही असा पुरावा... जगातली ( केवळ भारतातील नव्हे ) कोणतीही वैज्ञानिक संस्था आणि वैज्ञानिक नाकारूच शकणार नाही असा पुरावा! असा पुरावा म्हणजे संघ परिवाराशी संलग्न असलेल्या वैज्ञानिकांची भाषणे नव्हेत, की दावे नव्हेत. तेथे हवेत प्रयोगसिद्ध निष्कर्ष. म्हणूनच रामदासांच्या वैज्ञानिकतेचे तुम्ही जे दावे करत आहात ते प्रात्यक्षिकाने सिद्ध करण्यासाठी गरज आहे.


सर्वात महत्वाचे म्हणजे विज्ञान हे वैयक्तिक अनुभवांना महत्व देत नाही, तर ते सार्वत्रिक प्रयोगाला महत्व देते. म्हणजे त्याचे सिध्दांत जगातील कोणत्याही अभ्यासू माणसाला पडताळून पाहता येतात, आणि ते सगळीकडे सारखेच असतात. ते व्यक्तीनुसार बदलत नसतात.


जगात अनेक लोक वैयक्तिक पातळीवर आपापल्या कल्पनाविलासाच्या पातळीवर अनेक संशोधने करत असतात, पण जोपर्यंत ते संशोधन तज्ञाच्या देखरेखीखाली तावून सुलाखून बाहेर पडत नाही, तोपर्यंत ते वैज्ञानिक जगतात स्वीकारले जात नाही. त्याचीही एक जागतिक पद्धत आहे. ती रामदासांच्या या वैज्ञानिक(?) संशोधनाचा दावा करणाऱ्यांनाही लागू पडते.


कारण विज्ञानातील सिध्दांत nature वा medical science सारख्या वैज्ञानिक मासिकात आधी प्रसिद्ध व्हावे लागतात. मग ते Royal Society of Sciences या जागतिक संस्थेत जगन्मान्य नोबेल पात्र वैज्ञानिकांच्या सभेत सिद्ध करावे लागतात. नंतर जगात इतरत्र अनेक वैज्ञानिक त्यावर प्रयोग करतात. त्यात जर तो सिध्दांत खरा ठरला तरच त्या संशोधनावर स्वीकृतीची मोहोर उठते, आणि मगच तो सिध्दांत वैज्ञानिक जगात स्वीकारला जातो. जर ते संशोधन व्यापारी तत्वावर वापरायचे असेल तर अर्ज केला असल्यास पेटंट दिले जाते.


जसे की, आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांत त्याने जरी वैचारिक गणिती पद्धतीने 1905 सालीच लावलेला असला तरीही त्याचे शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन करून 1915 सालच्या सूर्यग्रहणाच्या काळात तो सिद्धांत खरा ठरल्याचे सिद्ध झाले. त्यानंतरच तो शास्त्रीय जगात स्वीकारले गेला. तो विश्वाच्या उत्पात्तीसंबंधातील मूलभूत सिद्धांत असल्यामुळे त्याला 1921 साली नोबेल पारितोषिक दिले गेले.


म्हणून गुगलवरील ब्लॉग, हिंदुत्ववाद्यांच्या IT सेल मधून व्हायरल झालेले लेख, युट्युबवरील अनेक वैयक्तिक मतांना मर्यादा पडतात. याचा अर्थ ते चुकीचे आहेत असा नाही, पण ते जोपर्यंत वरील प्रकारे वैज्ञानिक कसोटीला खरे उतरत नाही तोपर्यंत ते सार्वत्रिक मत होऊ शकत नाही.


तेव्हा सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या हिंदुत्ववादी अंधभक्तांनो, रामदास आणि ज्ञानदेवांना शास्त्रज्ञ बनवण्याच्या नादात त्यांची शब्दरचना म्हणजे बुडत्याला काडीचा आधार अशी केविलवाणी गत करून घेतली आहे तुम्ही!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य