लोकांच्या श्रद्धांवर टीका करून त्यांच्या भावना दुखावणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचे समाजसेवा प्रेम हे बेगडी आहे. अंधभक्तांच्या या दूषित दृष्टिकोणाला उत्तर - जेट जगदीश.


देवळे, धर्म यामुळे निर्माण झालेल्या अंधश्रद्धामुळे माणसे मानसिक गुलाम होतात, आणि पिढ्यानुपिढ्या कर्मकांडात अडकतात. डोके गहाण ठेवून गुप्तधनासाठी नरबळी सारखे आणि भूत अंगात येणे यासाठी भगत वा मांत्रिकाकडून मारझोड सहन करणे अशी अत्यंत विघातक कृत्येही करतात. 


धार्मिक अंधश्रध्दा हा प्रकार श्रध्देच्या क्षेत्रातला काळाबाजार असतो. काळाबाजार करणारांची कुठली जात आणि कुठला धर्म आहे, हे विचारायची पध्दत नाही. त्यामुळे अंनिसनं सर्व जातिधर्मांमधल्या अंधश्रध्दांना विरोध करत असते.


आधुनिक वैज्ञानिक अंधश्रद्धा आहेतच. यावर कोणाचे दुमत नाहीत. पण मानसिक गुलामगिरीशी तुलना करता त्या फारच वरवरच्या आहेत. त्यामुळे अंनिस धार्मिक अंधश्रद्धावर जोर देते. लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करायचा प्रयत्न करते. 


एवंच अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचे समाजसेवा प्रेम हे बेगडी आहे असे म्हणणे हा तर तुमचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन झाला. म्हणून हा आरोप एकाच वेळेला हास्यास्पद आहे, त्याचवेळेला हेत्वारोपही आहे; आणि एकाच वेळेला अंनिसच्या कामामुळे पोटामध्ये उठलेल्या भीतीच्या गोळ्यामधून आलेला आहे. तुम्ही जगाचा इतिहास काही बघाल की नाही? माणसं कशाच्या आधारे पुढं गेली? अंधश्रध्दा जोपासून पुढं गेली काय? की वैज्ञानिक दृष्टिकोनाने निरपेक्ष निसर्गातील प्रत्येक घटनेवर प्रश्न उपस्थित करत आणि त्याची उत्तरे शोधत जाण्याच्या प्रक्रियेमुळे पुढे गेली?


मुळात अनेक अंधश्रद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात तेव्हा कोणत्या अंधश्रद्धेला जास्त महत्त्व द्यायचे याचाही विचार करायला हवा. पण पुरोगामित्वाचा आव आणणाऱ्या दांभिक लोकांना अंनिसला ठोकायला विकृत आनंद मिळतो म्हणून अशी फालतू विधाने करत असतात.😠


अंनिस फक्त विचार पेरत जाते. ज्यांना आवडतील ते विचार करून बदलतील, आणि ज्यांना आवडणार नाही ते शंख करतील. हे आम्ही जाणून आहोत. तेव्हा आमचे विचार समोरच्याने स्वीकारलेच पाहिजे असा आमचा कधीही अट्टाहास नसतो. म्हणून अंनिस कधीच दमदाटीची भाषा करत नाही. लोकांच्या मन:परिवर्तनावावर आमचा भर असतो. कारण अट्टाहास फक्त स्वतःला शहाणे समजून लोकांना अक्कल शिकवणारेच करतात. म्हणूनच अशा लोकांच्या शिव्यांनाही ओव्या समजून न थकता शांतपणे उत्तरे देऊन विचारप्रवृत्त करणे हेच आमचे काम आम्ही इमानेइतबारे करत असतो. भलेही आपल्या आयुष्यात आपल्या कामाचा result नाही मिळाला तरी आम्ही कधीच निराश होत नाही. कारण हे काम पिढ्यांच्या मापनात मोजायचे असते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य