व्हायरस दिसत नाही तसाच देव सुद्धा दिसत नाही म्हणून देवावर विश्वास ठेवा?



*“डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा विश्वास असेल तर डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो यावर सुद्धा विश्वास ठेवायला काय हरकत आहे?* *या पोस्टला उत्तर...* 

देव किंवा भगवंत किंवा गॉड किंवा अल्ला यांच्यावर विश्वास ठेवावा की नाही, कोणत्या देवावर ठेवावा, की विश्वास ठेऊच नये *हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.* कारण, श्रद्धेचा, विश्वासाचा (Faith) अधिकार संविधांनानेच आपल्याला दिला आहे. परंतु वरील पोस्ट प्रमाणे श्रद्धा ‘लादण्याचा’ प्रयत्न, तो ही अत्यंत चुकीच्या, अतार्किक, अवैज्ञानिक  गृहितकांवर, केल्यास त्याची चिकित्सा होणे क्रमप्राप्त ठरते. त्यानुसार पुढीलप्रमाणे विश्लेषण करीत आहे. 

1) मुळात व्हायरस आणि भगवंत/देव यांची तुलना करणे अत्यंत हास्यास्पद आहे. कोणीही समजदार भक्त देवाला व्हायरसच्या रांगेत बसवणार नाही. 
2) व्हायरस डोळ्याला दिसत नसला तरी सूक्ष्मदर्शकातून दिसू शकतो. म्हणजेच त्याचे फिजिकल अस्तित्व सिद्ध झालेले आहे. त्यामुळे व्हायरस असणे/नसणे हा मुद्दा विज्ञानाने सप्रमाण सिद्धा केलेला आहे.
3) देवाचे अस्तित्व ज्ञानेंद्रिये किंवा वैज्ञानिक साधनांनी अजूनही सिद्ध झालेले नाही. भक्त आणि बाबालोकच सांगतात की देव असण्यावर विश्वास ठेवावा लागतो. त्यामुळे देव असणे/नसणे हा श्रद्धेचा भाग आहे. विज्ञानाच्या कसोट्यांवर मात्र तो अनुत्तीर्ण ठरतो.  
4) व्हायरसचे अस्तित्व सिद्ध झाल्याने तो मारू शकतो (सर्वच व्हायरस मारत नसतात हे ही लक्षात ठेवावे! आपली साधी सर्दी सुद्धा व्हायरसमुळेच होते.) ही वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेली वस्तुस्थिती आहे पोकळ विश्वास किंवा कल्पना किंवा श्रद्धा नव्हे. 
5) न दिसणारा भगवंत वाचवू शकतो हे म्हणणे वस्तुस्थितीला धरून आहे असे दिसत नाही. भगवंत जर वाचवू शकतो तर ‘In God we trust’ हे बिरुद आपल्या नोटांवर मिरवणार्‍या अमेरिकेत आतापर्यंत (३ मे २०२०) कोरोनाव्हायरसने ६६,००० पेक्षा अधिक लोक कसे काय मृत्यूमुखी पडले. अत्यंत श्रद्धाळू अशा भारतात सुद्धा १,३०० पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. ते सर्व लोक देवावर विश्वास न ठेवणारे होते असे म्हणावे काय?
6) न दिसणारा भगवंत वाचवू शकतो हे म्हणणे आणि मशिदीत नमाजसाठी या, अल्ला तुम्हाला वाचवेल असे म्हणणे, या दोन्हीही म्हणण्यात गुणात्मक दृष्ट्या काहीही फरक नाही. असा विश्वास ठेवल्याने कोरोनाव्हायरस झालेला प्रत्येक मनुष्य वाचेलच असे नाही. वृद्ध, रक्तदाब-मधुमेह असलेले कोरोनाबाधित रुग्ण कितीही देवभक्त असले तरी शक्यतो मरतातच असे आढळून आले आहे. जे केवळ देव, अल्ला, गॉड वाचवील असे समजतील ते स्वतःच्याच मृत्युला करणीभूत ठरतील. वाचण्यासाठी वैज्ञानिक उपचार करावेच लागतील.  
थोडक्यात, भगवंताची, अल्लाची, गॉडची भक्ति/विश्वास ही बाब विज्ञानाच्या कक्षेत (म्हणजे निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती, प्रयोग यात) अजिबात बसत नाही. तरीही ती बसवायचा प्रयत्न काही भक्त करतात आणि नंतर तोंडघशी पडतात. अशी अनाठायी तुलना गरज नसताना सुद्धा करून स्वतःच्या देवाचे आपणच अवमूल्यन करीत आहोत हे ही यांच्या लक्षात येत नाही. स्वतःला अभिप्रेत असलेल्या भक्तीत, श्रद्धेत, विश्वासात त्यांनी जरूर रममाण व्हावे पण चुकीच्या गृहीतकांचा आधार घेऊन त्याचा प्रचार करू नये ही अपेक्षा आहे. - उत्तम जोगदंड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?