प्रेशर कुकरची शिट्टी का होऊ द्यायची नाही?

प्रेशर कुकरची शिट्टी का होऊ द्यायची नाही?
- शरद काळे, निवृत्त वैज्ञानिक, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई.

स्वयंपाक घरातून वेगवेगळे वास जसे सकाळ संध्याकाळ येत असतात तसेच काही आवाज देखील स्वयंपाक घराशी जोडलेले असतात. त्यातील एक आवाज आहे कुकरच्या शिट्टीचा! बऱ्याच गृहिणींच्या मनात कोणत्या पदार्थासाठी किती शिट्या व्हायला पाहिजेत हे गणित पक्के बसलेले असते. भातासाठी दोन, डाळ असेल तर तीन, राजम्यासाठी चार शिट्या अशी ही गणिते वर्षानुवर्षे सोडविली जात असतात. आईकडून किंवा सासूकडून (आमच्या जमान्यात!) ही शिकवण लेकीला किंवा सुनेला दिली जात असे. त्यात आपले काही चुकत तर नाही ना असा विचार देखील कधी मनात येत नाही. शालेय विज्ञानात शिकवितात की पदार्थ वाफेवर लवकर शिजतो. शिवाय वाफेवर शिजलेले पदार्थ दाताखाली येत नाहीत म्हणजेच चांगले शिजतात. त्या तत्वाचा वापर करून ज्या वैज्ञानिकाने प्रेशर कुकर हे उपकरण बनविले त्याचे नाव होते पपेन. त्याला शतशः धन्यवाद द्यायला हवेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का की हा पपेन त्याच्या थडग्यात रडत आहे! घरोघरी वाजणाऱ्या कुकरच्या शिट्या त्याला ऐकायला जातात तेंव्हा तो तळमळून म्हणत असतो, "अरे जन लोक हो, मी हा प्रेशर कुकर शिट्टी होऊ नये म्हणून बनविला, तुमचे काम सोपे करण्यासाठी बनविला, शिट्टी नव्हे, शिट्या देऊन तुम्ही माझ्याशीच नव्हे तर विज्ञानाशी प्रतारणा करीत आहात! कुकरची एक ही शिट्टी होऊ देऊ नका! ज्या दिवशी मला या पृथ्वीतलावर एक ही शिट्टी ऐकू येणार नाही तो दिवस माझा मुक्तिदिन असेल!"

कुकरच्या जेंव्हा शिट्या होत असतात त्यावेळी त्याच्या मूळ हेतूला हरताळ फासला जात असतो. वाफेवर पदार्थ लवकर आणि चांगले शिजतात हा प्रेशर कुकरचा मूळ उद्देश्य असतो. त्यासाठी कुकरचे बाहेरचे भांडे बनविले आहे. त्या भांड्यात पाणी घालून मग त्या पाण्यात एक धातूची जाळीदार ताटली तळाला ठेवली जाते. त्या ताटलीच्या वर थोडे पाणी घालून मग त्या जाळीवर कुकरच्या भांड्यांमध्ये डाळ, तांदूळ वेगवेगळे ठेवून ते एकावर एक ठेवून सर्वात वरच्या भांड्यावर झाकण ठेवले जाते. या भांड्यांमध्ये किती पाणी घालायचे याचा अंदाज गृहिणीला असतो आणि तेव्हढे पाणी ती त्यात घालते. त्यावर बटाटे, रताळी किंवा बीट ठेवता येतात. कुकर भरला की मग त्याचे झाकण शिट्टीसकट लावून तो गॅस च्या शेगडीवर ठेवतात. झाकण लावतांना त्याला रबर रिंग लावली जाते कारण ती रिंग लावली नाही तर निर्माण होणारी वाफ दाबाखाली असल्यामुळे हवेत निघून जाते आणि मग कुकर मध्ये पदार्थ शिजत नाहीत किंवा खूप वेळ लागून शिजतात. गॅस पेटवून मोठी ज्योत ठेवली जाते आणि तीन चार शिट्या झाल्या की गॅस बंद करून कुकर थंड व्हायची वाट पाहिली जाते. काही कुकर्स मध्ये वाफेचा दाब शून्य झाला की झाकण पडण्याची सोय असते. काही कुकर्स मध्ये शिट्टीतून वाफ येणे थांबले की कुकरचे झाकण उघडता येते. ही आपल्या स्वयंपाकघरात वापरली जाण्याची सर्वसाधारण रीत आहे. आता यात कोणत्या चुका आपण केल्या ते लक्षात घेऊ. 

१. कुकर मध्ये बऱ्याच वेळा धातूची जाळीदार चकती किंवा ताटली ठेवली जात नाही कारण ती भांड्यांच्या पसाऱ्यात किंवा इतर आहेरांच्या वस्तूंप्रमाणे कधी आणि कुठे लुप्त झाली ते लक्षात देखील येत नाही! कुकरच्या बाहेरच्या भांड्यात घातल्या जाणाऱ्या पाण्यावर त्यामुळे नियंत्रण राहात नाही. 

२. कुकरमध्ये भांडी भरल्यानंतर झाकण लावतांना त्याची रिंग ओली केली जात नाही. त्यामुळे कुकर हवाबंद होत नाही आणि कुकरमध्ये वाफेचा दाब निर्माण होण्यासाठी वेळ लागून इंधनाची थोडीफार नासाडी त्यात होते. 

३. शिट्टीसकट कुकरचे झाकण ठेवल्यामुळे सुरुवातीचा जो दाब निर्माण होतो तो आतील हवेचा आणि पाण्याचा एकत्रित दाब असतो. वास्तविक तो फक्त वाफेचा दाब म्हणून अपेक्षित असतो. जर त्यात हवा मिश्रित राहिली तर दाब निर्माण होतो पण त्याचे तापमान मात्र अपेक्षेप्रमाणे वाढत नाही. शिट्टी होइपर्यंत जेव्हढा वाफेचा दाब निर्माण होतो त्याचे तापमान १२१ अंश सेल्सियस इतके असते. पण जर त्यात हवा असेल तर ते तापमान १०५ अंश सेल्सियस इतकेच वाढते. आणि पहिली शिट्टी होऊन ती हवा बाहेर फेकले जाईपर्यंत उष्णता त्या हवेला तापवित राहून वाया जाते. 

४. प्रत्येक होणाऱ्या शिट्टीबरोबर आतील पाण्याची वाफ काही प्रमाणात बाहेर फेकली जाते आणि शिट्टी झाली की ती पुन्हा काही इंधन खर्च होऊन नव्याने वाफेचा दाब निर्माण करावा लागतो. त्यात वेळ देखील जातो आणि इंधन अपेक्षेपेक्षा अधिक जाळावे लागते. प्रत्येक शिट्टीबरोबर साधारण ३० मिलिलिटर पाण्याची वाफ बाहेर फेकली जाते. या वाफेत जवळजवळ सोळा किलो कॅलरी उष्णता बाहेर फेकली जाते. म्हणजे ही उष्णता जर तिथल्यातिथे बर्फ वितळविण्यासाठी वापरली तर १०० ग्राम तरी बर्फ त्यात वितळेल! अर्थात सर्व क्षमतांचा विचार केला तर तुमच्या घरात होणाऱ्या तीन शिट्ट्यांमुळे हिमालयातील ३०-४० ग्रॅम बर्फ वितळून जागतिक तापमान वाढीला रोज सकाळी संध्याकाळ हातभार लागत आहे आणि त्यामुळं होणारे हवामान बदल आपल्याला भोगावे लागत आहेत. बाहेर जाणाऱ्या वाफेमुळे आजूबाजूच्या वातावरणात ही फुकाची उष्णता मिसळून ते तापमान वाढते! स्वयंपाक घर गरम का होते त्याची जी अनेक कारणे असतात त्यातील हे एक प्रमुख कारण आहे. भारतातील प्रत्येक घरात कुकरच्या शिट्या होऊन किती जागतिक तापमान वाढ आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. 

५. बाहेर जाणाऱ्या वाफेबरोबर अन्नातील जी पोषक तत्वे आहेत ती काही प्रमाणात तरी बाहेर फेकली जातात व अन्नाचे पोषणमूल्य घटते. 

हे सर्व सहज टाळता येण्यासारखे आहे. त्यासाठी कटाक्षाने कुकर लावण्याची रीत समजावून घेणे आवश्यक आहे. ती रीत अशी:

१. कुकरमध्ये खाली जाळीदार ताटली ठेवूनच ती पूर्ण बुडेल इतकेच पाणी त्यात घाला. 
२. कुकरमधील भांडी ठेवून झाली की मग झाकण लावीत असतांना रबर रिंग ओली करायला विसरू नका. 
३. बटाटे, रताळी, बीट अशी कंदमुळे एक भांड्यात ओली करून ठेवा, त्या भांड्यात पाणी घालू नका, अन्यथा सर्व चांगली पोषणमूल्ये त्या पाण्यात उतरतील आणि तुमच्या आहारातून वजा होतील. 
४. झाकणावर शिट्टी न ठेवता झाकण लावा आणि गॅसच्या शेगडीवर ठेवून ती ज्योत मोठी पेटवा. 
५. काही वेळाने कुकर जसा गरम होईल तशी हवा बाहेर जात असल्याचे आवाजावरून समजते. जेव्हा वाफ यायची सुरुवात होते तेंव्हा शिट्टी ठेवा.
६. आतला वाफेचा दाब आता वाढू लागेल. तो एक विशिष्ट पातळीवर आला की शिट्टी फुरफुर करू लागेल.तो क्षण अचूक पकडून गॅसच्या शेगडीचे बटन सिम वर आणा म्हणजे शिट्टी होणार नाही. 
७. घड्याळ लावून भातच शिजत असेल तर दीड ते दोन मिनिटांनी, डाळ, राजमा वगैरे पदार्थ असतील तर  पाच मिनिटांनी गॅस बंद करा.
८. कुकरची वाफ नैसर्गिक रीत्या हवेत जाऊ द्यात. कारण थंड होत असतांना शिजलेल्या अन्नातील रेणूंची पुनर्रचना होत शिजण्याची प्रक्रिया पूर्ण होत असते, म्हणून नळाखाली धरून कुकर थंड करू नका! 

ही योग्य रीत तुम्ही वापरलीत तर तुमचे जे फायदे होतील ते असे असतील.

१. तुमचे इंधन वाचेल
२. चांगली पोषणमूल्ये तशीच राहून रुचकर भोजन मिळेल
३. जागतिक तापमान वाढीस तुमचा हातभार लागणार नाही आणि निदान त्या पापातून तरी मुक्ती मिळेल! 
४. विज्ञान योग्य रीतीने वापरल्याचे समाधान तुम्हाला मिळेल. 
५. आपला वैज्ञानिक मित्र पपेन ला मुक्ती मिळेल! 
मग करणार ना आपल्या पर्यावरणाला आणि स्वतःला मदत? वसुंधरेशी ही सेवा प्रत्येकाने करावी, असे एक वैज्ञानिक म्हणून मला मनापासून वाटते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य