*चुंबन, आलिंगन फार दूर राहिलं, हस्तांदोलन सुध्दा आमच्या संस्कृतीत वर्ज आहे. एका ताटात जेवणं, एकमेकांचे उष्टं खाणं, हेही हिन्दू संस्कृतीत मान्य नाही. शैशव संपलं की मुलं सुध्दाआई-वडलांचंही उष्टं खात नव्हते, आजही जुन्या घरांमध्ये हा नियम पाळला जातो. जेवताना अन्न मधोमध घेऊन , ज्यानं त्यानं लागेल तसे आपल्या हातानं वाढून घेणं असंस्कृत मानलं गेलंय. याला उष्टेटाळ वा उष्टा विटाळ असा शब्दप्रयोग प्रचलित आहे. बाहेर जाऊन आल्यावर सर्वप्रथम हातपाय धुवूनच घरात यावे असा दंडक आजही अनेक हिंदू घरात आहे, आणि पाळलाही जातो. सकाळी झोपेतून उठल्यावर स्नान झाल्याशिवाय चुलीला (आता गॅस) स्पर्शही करायला परवानगी नाही. काय खावं किंवा खाऊ नये, कधी खावं, कशा सोबत काय खावं, खाताना कसं बसावं, या सगळ्यांचा अतिशय बारकाईने, सखोल अभ्यास झाला आहे.  असो . अशा शेकडो गोष्टी सांगता येतील. पण आम्ही इंग्रजांच्या गोऱ्या कातडीनं एवढे प्रभावित झालो की आम्हाला पाश्र्चात्य संस्कृतीचं प्रचंड आकर्षण वाटायला लागलंय. ते जे काय करतात, वागतात त्याचंच अनुकरण करायला लागलोय. वरील नियमांचं, त्यांचं महत्त्व समजून, श्रध्देनं पालन करणाऱ्यांची कुचेष्टा करणं,  आम्ही आधुनिक असल्याची खूण बनली आहे. खरेतर आमची प्रत्येक कृती विज्ञानाला धरून आहे. पण आमच्यातील न्यूनगंड आमच्या विज्ञानाधिष्टित धर्म आणि संस्कृती यांची कुचेष्टा करायला आम्हाला भाग पाडतो.*
*पण अलिकडच्या काळात रोज नवनवीन नैसर्गिक संकटं, साथींचे रोग, शारिरिक व मानसिक आजार उत्पन्न होत आहेत, त्यामुळं जगाला भारतीय संस्कृतीतील एकाएका गोष्टीचं महत्त्व उलगडत आहे.*
*आमचे ऋषी मुनी ज्ञानी होते,जीवनाच्या प्रत्येक अंगाचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता. गरज आहे ती आपल्यातील न्यूनगंडाची भावना त्यागून पाश्र्चात्यांचं अंधानुकरण टाळण्याची. आणि म्हणूनच म्हणायचं "गर्व से कहो हम हिन्दू है |"*

*(करोना वायरसच्या आलेल्या नियमावली निमित्ताने)*

~~~~~~~~~~
या पोस्टला उत्तर

स्वच्छतेच्या सवयी हा शिस्त आणि नितीशास्त्राचा भाग आहे. त्याचा धर्माशी काय संबंध? उठसुठ प्रत्येक गोष्ट धर्माशी जोडून आपण काय साध्य करू इच्छित आहात? फारतर त्याने धार्मिक अस्मिता जागरूक होईल.

जर स्वच्छतेचे धार्मिक अंगाने एवढे महत्व होते तर
गेल्या शतकापर्यंत पटकी, प्लेग आणि नारूच्या साथीने गावेच्या गावे रिकामी का झाली? संसर्ग होऊ नये म्हणूनच सरकारने आताशा पंढरपुरला किंवा इतर यात्रांच्या ठीकाणी लसीकरण अनिवार्य का केले? जर आपण एवढे स्वच्छतेचे भोक्ते आहोत तर आज आपल्याला पूर्ण देशभर रस्त्यांवर घाणीचे उकिरडे फुललेले का दिसतात? नद्यांची प्रदूषित गटारे का होतात? आणि गंगा शुद्धीकरणासाठी कोट्यवधींचा खर्चही का करावा लागतो?

त्या उलट पाश्चात्य देशात जाऊन पहा, त्यांची शहरे-खेडी तर स्वच्छ असतातच, पण जंगलही स्वच्छ असते. कुठल्याही प्रकारचा कचरा सार्वजनिक जागेत कुठेही दिसत नाही. तेव्हा पाश्चात्यांना तुच्छ लेखणे सोडून हिंदू संस्कृतीचे वृथा कढ काढणे सोडून द्या. कारण धर्म वेगळा आणि स्वच्छतेचे शास्त्र वेगळे, हे लक्षात घ्या. - जेट जगदीश.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य