' मंदिर की ग्रंथालय '  ते ' मंदिर आणि ग्रंथालय'  !

गेल्या एक दोन दिवसांत अनेकांना ' मंदिर नको ग्रंथालय  आणि हॉस्पिटल हवी   ' अशी वैचारीक उबळ येत असल्याने हा लेखनप्रपंच !!

 मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे .. काही लोक तर्कावर जगतात आणि काही लोकांना  जीवन व्यतित करण्यासाठीं श्रद्धेची  गरज वाटतें .. ज्यांना श्रद्धा गरजेची वाटते त्यांच्या श्रद्धेला कमी लेखण्याची गरज  कोणाला का भासावी ?विशेषतः जिथे तर्क  मागितला तर तर्कसुद्धा दिला जात नाही किंवा ज्यांना देता येत नाही  आणि इतरांच्या श्रद्धेचा उपहास करून केवळ बालहट्ट म्हणून '  मंदिर नकोच  ' ही मागणी केली जाते अशा ठिकाणी हा प्रश्न अधिक उचित आहे

ज्याप्रमाणे  बागा , खेळांची मैदानं , ग्रंथालयं , किल्ले , amusement parks , trekks , कलामंदिर , नाट्यगृह , सिनेमागृह   ही माणसाच्या जडणघडणीचा एक भाग असतात त्याचप्रमाणे श्रद्धास्थान म्हणून मंदिरंसुद्धा त्या जडणघडणीचा एक भाग असतात ..माणूस केवळ पैशावर आणि  ज्ञानावर जगू शकत नाही ..भावना, श्रद्धा , भक्ती , प्रेम , सहजीवन ह्या आणि अशा अनेक  अमूर्त  (intangible) गरजा माणसाला जगण्यासाठी आवश्यक असतात . पंढरीच्या वारीत एखाद्या तासासाठी जरी फेरफटका मारला की मन ओथंबून जातं आणि नकळत आनंदाश्रू डोळ्यात उभे राहतात, जो आनंद आणि समाधान तिथे अनुभवायला मिळतं ,त्यातून मनावरची जळमटं निघून जातात आणि मनाला उभारी येते . ॐकारेश्वराच्या मंदिरात डोळे मिटून दहा मिनिटं जरी बसलं तर जी शांतता आणि प्रसन्नता जाणवते किंवा घंटानाद ऐकून  एखाद्या देवळातल्या आरतीनी जे 'बरं वाटणं' असतं ती श्रद्धा असते .. लोकांना माहीत असतं की आपल्यालाच कृती करावी लागणार आहेत ..कष्ट घ्यावे लागणार आहे . देव येऊन ते करणार नाही .. पण  'माझा पांडुरंग आहे माझ्या पाठीशी ' , 'देवा, तूच बघ रे बाबा '  म्हणत कठीण प्रसंगी  जगण्याची धडपड करणारे लोक जो विश्वास आणि दहा हत्तींचं बळ अनुभवतात तो विश्वास कोणताच motivational speaker किंवा counsellor देवू शकत नाही .. आणि बऱ्याच  लोकांना असल्या services परवडत पण नाहीत .. देवळात हरिपाठ ऐकण्यात जर कोणाला आनंद मिळत असेल आणि वैयक्तिक जीवनात पडलेल्या प्रश्र्नांची उत्तरं मिळत असतील  तर त्या आनंदात खोडा घातलाच पाहिजे का ? हॉस्पिटल ज्याप्रमाणे आजारी माणसाला ठीक करण्यासाठी असते त्याचप्रमाणे श्रद्धा ही माणसाला प्रसन्न आणि आनंदी  ठेवण्यासाठी काम करत असेल तर त्याला विरोध कशासाठी ? ग्रंथालयं जर ज्ञानाची आणि बुध्दीची भूक भागवत असतील तर मंदिरं मनाची आणि बुद्धीची  भूक  भागवतात आणि कित्येक मंदिरं भुकेल्यांच्या पोटाची पण भूक भागवतात . 

दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीला right to religion अाहे ..आणि तो तर मुलभूत मानवाधिकार आहे .. जिथे right to religion हा Universal declaration of Human Rights मध्ये मूलभूत मानवाधिकार असतो तेव्हा श्रद्धा ही एक  गरज म्हणून अधोरेखित होतेच शिवाय मानवाधिकार बनते . त्या right to religion ला आचरणात आणण्याचं काम मंदिरं करतात . 

कोरोना सारख्या काळात मंदिरांनी करोडो रूपये दानासाठी दिले . दगडुशेठ हलवाई , शेगाव , अक्षरधाम , इस्कॉन , इशा योगा ध्यांनलिंग मंदिर , सिद्धिविनायक अशी किती नावं आहेत जिथे रोज हजारो नागरिक  विनामूल्य जेवतात किंवा जिथे  सामाजिक कार्याला करोडो रुपये देतात , शाळा चालवतात , वृद्धाश्रमात मदत करतात , शिक्षण साहित्य वाटतात. किती ग्रंथालयांनी किंवा हाॉस्पिटलनी  हे केलं ? किती हॉस्पिटल विनामूल्य लोकांची सेवा करतात ? आणि कितींनी पैसे भरले नाहीत म्हणून कोरोना मुळे मृत झालेल्यांची शरीरं अडवून ठेवली  ?  मी ग्रंथालयांच्या किँवा हॉस्पिटलच्या विरोधात मुळीच नाही पण जर कोणाला तुलना करायचीच असेल तर ह्याचं पण उत्तर द्यावं लागेल . अाणि हाे ! मंदिरं पुस्तकांसाठी पण देणग्या देतात . गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटप करण्याचे पण उपक्रम करतात .  किती ग्रंथालयं ते करतात हा प्रश्न आहे .  इस्कॉन संचलित अक्षयपात्रसारखे भारतातील लाखो  मुलांच्या जेवणाची सोय रोज करणारे आणि त्या माध्यमातून शालेय उपस्थिती वाढवणारे उपक्रम किती सामाजिक संस्था चालवतात? आणि अक्षयपात्र च्या माध्यमातून  differently abled व्यक्तींना रोजगारनिर्मिती सुद्धा केली जाते  . हे मोठ्या मंदिरांबद्दल झालं . लहान मंदिरं सुद्धा आपापल्या परीनं समाजाप्रती कर्तव्य करत असतात ..  मग असं असताना मंदिरांच्या मदतीने कुठे कुठे ग्रंथालयं किंवा हॉस्पिटल उभे राहू शकतात किंवा ' जिथे मंदिर तिथे ग्रंथालयं ' अशा प्रकारचे उपक्रम राबवता येवू शकतील का हा समावेशक विचार का बरं मनात येत नाही ? ग्रंथालयं वाढवायची आहेत ना ? हॉस्पिटल वाढवायची आहेत ना ? मग लोकांच्या श्रद्धेचा आदर करूनसुद्धा ते होऊ शकतं ना !! Symbiotic(सहजीवन)  विचाराने mutual coexistence (एकत्र अस्तित्व )  शक्य असताना मंदिर नकोच आणि फक्तं हॉस्पिटल आणि ग्रंथालये पाहिजेत हा एकतर्फी आणि असमावेशक विचार कशासाठी ? ग्रंथालयांनी मंदिराची मदत घेवून लोकांपर्यंत पोहोचायला आणि नवीन पुस्तकांसाठी देणग्या उभ्या करायला काहीच हरकत नाही .

ग्रंथालयं विरूद्ध मंदिरं किंवा हॉस्पिटल विरुद्ध मंदिरं असा असमावेशक आणि  व्देष वाढवणारा  प्रचार करण्याऐवजी  दोन्हीच्या co-existence  (एकत्र अस्तित्वाचा ) आणि परिणामी   mutualism (दोन्हींच्या उन्नतीचा)  चा प्रचार का केला जात नाही ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतः ला विचारला तर खरा प्रॉब्लेम काय आणि कुठे आहे ते कळेल .

कॅप्टन स्मिता गायकवाड

तळटीप : सदर पोस्ट ही केवळ राम मंदिर  विषयावर नाही . स्वत:चं पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी 'श्रद्धा म्हणजे मूर्खपणा आणि ढोंग'  ह्या असमावेशक आणि असहिष्णु विचाराचा समाचार घेणे हा उद्देश आहे.

या पोस्टला उत्तर

कॅप्टन स्मिता ताई,
1 लोकांच्या श्रद्धेची भूक भागवण्यासाठी देशात मंदिरांची, बुवा - बाबांची वानवा होती काय?
     2 लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा वैयक्तिक पातळीवरचा आहे सार्वजनिक नाही.
   3 लोकांच्या धार्मिक श्रध्दास्थानांची निर्मिती करणे हे राज्य संस्थेचे काम नाही. संविधानामध्ये प्रार्थनास्थळांच्या रक्षणाची, नियमनाची जबाबदारी राज्य संस्थेकडे आहे निर्मितीची नाही.
   4. मंदिरं जशी काही प्रमाणात सेवा कार्य करतात तशीच काळा पैसाही रिचवतात.
   देणगी कोणाकडून आली हे सांगण्याचं बंधन नसतं. देणगी देणारालाही पैसा कुठून आला कसा आला हे कोणी विचारत नसतात.
   5 मंदिरे त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग सेवा कार्यासाठी जरी खर्च करत असले तरी त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग हा सजावट, सोने, रत्ने यात अनुत्पादक भांडवल म्हणून पडून राहतो. उदा पद्मनाभन मंदिर, शिर्डी.
    6 मंदिरे श्रद्धास्थाने आणि हॉस्पिटल्स यांचं प्रमाण जर समतोल असेल तर  एक वेळ मान्य करता येईल की आस्तिकांच्या श्रद्धेसाठी काहीतरी असावं पण मुळातच हे प्रमाण आपल्या देशात खूप व्यस्त आहे. शिवाय काळ कोणता आहे, आपली गरज काय आहे, आपला प्राधान्यक्रम काय असावा याचा सारासार विवेकी विचार करावा लागतो.
म्हणून मंदिर नको हॉस्पिटल हवं.
   *पण मुख्य मुद्दा आणि स्पष्ट मुद्दा असा की - अयोध्येचे राम मंदिर हे काही भारतातील श्रद्धावान लोकांची गरज नव्हती मंदिर नव्हतं (आणि अजूनही निर्माण झालेलं नाही) म्हणून भारतातील श्रद्धावान लोकांच्या भक्तीभावात भक्तीच्या आनंदात काही कसर राहिली नव्हती किंवा त्यांची श्रद्धा पातळ झालेली नव्हती.
   रामाचं मंदिर नव्हतं म्हणून लोकांनी राम राम म्हणायचं सोडलेलं नव्हतं की रामायणाची पारायणे बंद केलेली नव्हती.
    रामाचे मंदिर ही भारतातील श्रद्धावान लोकांची कमी आणि आरएसएस प्रणित मोदी सरकारची जास्त गरज आहे. तो त्यांच्या धार्मिक राजकारणाचा भाग आहे हे स्पष्टपणे कॅप्टन गायकवाड यांनी सांगितलं पाहिजे. लोकांच्या भक्तीच्या पडद्याआड लपून चाललेलं हे राजकारण आहे हे संघालाही ठाऊक आहे आणि विरोधकांनाही ठाऊक आहे. उगीच ताकाला जाऊन भांडं का लपवायचं स्मिताताई!
   अशा धार्मिक राजकारणामुळे भारताची भौतिक प्रगती जरी झाली तरी भारत मध्यपूर्वेतील सौदी अरब सारखा भौतिक दृष्ट्या चकचकीत देश होईल(तशी शक्यता कमी) मात्र मुल्यांच्या पातळीवर मधूयुगीन मागास समाज म्हणूनच ओळखला जाईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य