कोकणातील गावपळण

कोकणातील गावपळण ही प्रथा. अख्ख्या गावाने गावाच्या वेशीबाहेर उघड्या माळावर जाऊन राहण्याची ही प्रथा कधी आणि कशासाठी निर्माण झाली, हे समजून न घेताच तिच्यावर अंधश्रद्धा म्हणून ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’पासून ज्यांना गावपळण ही काय भानगड आहे हे माहीत नाही ते कोकणातील लोकही गावंढळपणाचा शिक्का मारून मोकळे झाले आहेत. काय आहे हा गावपळणीचा प्रकार? सिंधुदुर्गात आचरे, चिंदर, मसुरे, देवगड आणि रत्नागिरीत लांजा तालुक्यातील वाघण या गावात गावपळण होते. संपूर्ण गावाने या दिवसात काही दिवस गावाबाहेर राहाण्याची परंपरा आहे. या गावपळणीत मालवण तालुक्यातील आचरे आणि चिंदरची गावपळण सर्वात चर्चेचा विषय ठरली आहे. मसुरे गावातही गावपळण होते, पण ती एका वाडीपुरती मर्यादित आहे. दर तीन वर्षांनी येणारी गावपळण पूर्वी महिनाभर चालत असे. आधुनिक काळाचा स्पर्श झालेल्या या जमान्यात इतके दिवस घराबाहेर राहणं कुणालाही शक्य नसल्याने ही प्रथा आता सात, पाच आणि तीन दिवसांवर आली आहे.
गावपळणीप्रमाणेच देवपळण अशी प्रथाही कोकणातील काही गावांमध्ये आहे. गावपळण व देवपळण या प्रथा नेमक्या कधी सुरू झाल्या याचे संदर्भ सापडत नाहीत. मात्र अनेक पिढ्यांपासून कुळधर्म आणि कुळाचार जपण्यासाठी वंशपरंपरेने त्या चालत आल्या आहेत. कधी तरी गावावर एखादा बाका प्रसंग ओढवला असावा, त्यातून देवाने वाचवले या कृतज्ञतेपोटी ही परंपरा तशीच सुरू ठेवली नाही तर गावावर काही तरी अरिष्ट ओढवेल, या भीतीपोटी जुन्या पिढीच्या खांद्यावरून नव्या पिढीने आपल्या खांद्यावर ही परंपरा वाहून नेली आहे. गावपळण व देवपळण या दोन्ही प्रथांचा संबंध तज्ज्ञमंडळी आध्यात्मिक आणि निसर्गविज्ञानाच्या पातळीवरचा असल्याचे मानतात. शिवाय या प्रथांसाठी कोणताही पशुबळी दिला जात नाही किंवा कुणाचंही शोषण होत नाही. मग हिला अंधश्रद्धा कसं म्हणायचं, असा सवालही करतात.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गावपळणीला भुताखेतांशी जोडल्याने नवा वाद उभा राहिला आहे. गावपळणीची प्रथा वर्षानुवर्ष चालवणाऱ्या गावांनी भुताखेतांच्या भीतीने गाव सोडत असल्याचं कधीच म्हटलेलं नाही. फक्त या परंपरांमागे संकेत आणि प्रथा असल्याने त्या आम्ही पाळत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. निव्वळ कुणी तरी मनात आणलं म्हणून ही प्रथा सुरू झालेली नाही. आध्यात्मिकतेप्रमाणेच संपूर्ण गाव काही दिवस निसर्गाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. कोकण मुळातच निहायत सुंदर आहे. सौंदर्याच्या कल्पनांशी मानवी जीवनाचा संबंध आहे. गावपळणीच्या निमित्ताने सूर्योदय, सूर्यास्त, मोकळी हवा ही निसर्गाचा आस्वाद घेण्याची प्रक्रिया या दिवसांत घडते. माणसांप्रमाणेच गुराढोरांनादेखील गावाबाहेर आणलं जातं. म्हणजे त्यांनाही काही दिवस रोजच्या काबाडकष्टापासून मोकळीक मिळावी, हा यामागचा दृष्टिकोन आहे.
आचरे गावच्या गावपळणीवरून झालेल्या वादानंतर या गावाचा इतिहास कुणी जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचं प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झालेलं नाही. रामेश्वर हे आचरे गावाचं ग्रामदैवत. या ग्रामदैवताचा सुमारे ७०० वर्षांचा इतिहास सापडतो. रामेश्वर हा शंकराचा अवतार मानला जातो. आचऱ्यात मंदिर शंकराचं आहे, पण उत्सव मात्र रामाचा साजरा केला जातो. त्यामागे शैव आणि वैष्णव या पंथांचा संदर्भ आहे. शैव-वैष्णवांत प्रचंड भेद होते. गंध आणि वेशभूषेवरूनही दोन्ही पंथांमध्ये संघर्ष झाल्याची नोंद आहे. कालौघात दोन्ही पंथांचा मिलाफ झाला. आचऱ्याच्या कानविंदे कुटुंबीयांच्या देवघरात असलेली रामाची मूर्ती उत्सवानिमित्त रामेश्वराच्या मंदिरात आणली जाते. शैव आणि वैष्णव पंथांच्या संघर्षात ही गावपळण निर्माण झाली काय, याचा शोध तज्ज्ञांनी घ्यायला हवा.
गावपळणीत श्रीमतांपासून गरिबांपर्यंत सर्वांनी एकत्र यावं, असा दृष्टिकोन आहे. तसंच गावाबाहेर राहताना निर्माण होणारी एकोप्याची भावनाही या गावपळणीच्या मागे असल्याचं सांगितलं जातं. गावपळण प्रथा चालवणारे आचरे गाव इतर सामान्य गावाप्रमाणे नाही. ‌विविध क्षेत्रांतील नामवंत मंडळींचं हे जन्मगाव आहे. मुंबई विद्यापिठाची स्थापना १८५७ साली झाली. कणकवलीत १९१० मध्ये मराठी शाळा सुरू झाली. आचऱ्यात शाळा सुरू झाली तीही १८५७साली. म्हणजे मुंबई विद्यापिठाच्या बरोबरीनेच. त्यामुळे अंधश्रद्धा जोपासणारं गाव म्हणून या गावावर सरसकट शिक्का मारता येणार नाही, असं आचरे गावचे सुपुत्र व सध्या कणकवलीत राहत असलेले साहित्य-संस्कृतीचे अभ्यासक डॉ. विद्याधर करंदीकर सांगतात.

या पोस्टला उत्तर

संस्कृतीचे अभ्यासक डॉ. विद्याधर करंदीकर यांच्या नावाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील गावपळण व देवपळण या नावाने पोस्ट सोशल मिडियावर फिरत आहे. त्यांनी लिहिलेली आहे की त्यांच्या नावाने फिरत आहे, हे माहित नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ता म्हणून या गोष्टीत लक्ष घालावे लागत आहे.

 अंनिसने लक्षच दिलं नाही तर लोकं  म्हणणार, आता अंनिसवाले काय करत आहेत.

एकीकडे म्हणायचे या प्रथा कधी सुरू झाल्या याचा नेमका संदर्भ सापडत नाही. तसेच या प्रथा कशा सुरू झाल्या हेही लेखकाला आणि इतर कुणालाच माहीत नाही. दुसरीकडे अंनिसला मात्र म्हणायचे या प्रथा कधी व कशासाठी निर्माण झाल्या हे समजून न घेताच अंधश्रद्धेचा शिक्का मारला.
म्हणजे स्वतःला काहीच माहीत नसताना उदात्तीकरण केलेले चालते, पण अंनिसने उघड अंधश्रद्धा असलेल्या गोष्टीला अंधश्रद्धा म्हटलेले चालत नाही.

जर गावातील लोक गावाबाहेर राहण्यासाठी गेली नाही तर देवीचा कोप होतो. उगाचच विषाची परिक्षा का घ्या. म्हणून हि प्रथा तिथे आजवर सुरू आहे.

लेखकाच्या म्हणणे असे आहे की, हि प्रथा पहिले महिनाभर चालत होती. आधुनिक काळाचा स्पर्श झाल्याने इतके दिवस घराबाहेर राहणं कुणालाही शक्य नसल्याने ही प्रथा आता सात, पाच आणि तीन दिवसांवर आली आहे.

तुम्ही जर एवढे कट्टर संस्कृती रक्षक आहात तर तडजोड कशाला करत आहात? का रहात नाही महिनाभर गावाच्या बाहेर?

आधुनिकतेचा स्पर्श कशाला करुन घेताय? विज्ञानाने प्रगत केलेली सर्व साधने वापरता पण तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन नको आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विज्ञानाने प्रगत केलेली साधने वापरायची आणि गोडवे मात्र जुनाट, टाकाऊ प्रथांचे मिरवायचे, त्याचा बादरायण संबंध संस्कृतीशी जोडायचा, अशी अवस्था आहे. जस जसा विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होईल, तरुणाई मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन जागा होईल. तेव्हा जी प्रथा तीन दिवस पाळत आहात ती सुद्धा बंद होईल हे नमुद करु इच्छितो.

तुमचा पुढचा मुद्दा आहे संपूर्ण गाव निसर्गाशी जोडण्यासाठी आम्ही बाहेर राहतो.
कोकण हे निसर्ग रम्य आहे. गाव हे खेड्यात डोंगरांळ भागात निसर्गाच्या कुशीत असतं. नदी, विहिर, शेती, डोंगर, अशा ठिकाणी कोकणातील गावे असतात. त्यामुळे वेगळं निसर्गाशी जोडण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही.

लेखकाचा पुढचा मुद्दा आहे की, गावातील श्रीमंत गरीब एकत्र यावे हा दृष्टिकोन आहे.
गावात संस्कृती जपणाऱ्यांनी संपत्तीचे समान वाटप करा. म्हणजे गरीब श्रीमंत भेद भाव राहणार नाही. असं तुम्ही केलं तर तुमचा आदर्श पुर्ण देश घेईल. जगाला सांगता येईल हि आमची संस्कृती अशी आहे. श्रीमंत गरीब भेद भाव मिटविण्यासाठी अनेक मार्ग आहेत. श्रीमंताची गरीबांची मुले एकाच शाळेत शिकू द्या. त्यांना समान वागणूक द्यावी. तरच गरीब श्रीमंत भेदभाव नष्ट होईल.

पुढचा मुद्दा आहे मुंबई विद्यापीठ १८५७ सुरू झाले. तेव्हा आमच्या आचऱ्या गांवात शाळा सुरू झाली.
एवढा मोठा शैक्षणिक इतिहास असताना सुद्धा तुमच्या गावात अशा प्रथांना खत पाणी घातले जाते हि लाजिरवाणी गोष्ट आहे.
शिक्षण घेतले म्हणून कोणी अंधश्रद्धामुक्त होत नाही. तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन स्विकारावाच लागेल. विज्ञान विषयाचे शिक्षकसुद्धा मांजर आडवं गेल्यावर पाच पाऊले मागे जाताना आम्ही पाहिले आहेत.
अंनिसने गावपळणीच्या प्रथा असणाऱ्या गावात राहून दाखवले आहे.

गावपळण हि प्रथा महिनाभर असायची ती आता तीन दिवसावर आली आहे हे, लोक बदलत असल्याचे  द्योतक आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?