राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

 *राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत.*

_राजीव दीक्षित यांच्या आवाजात व्हायरल होत असलेल्या  व्हिडीओबाबतची सत्यता_


डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. त्याच्या अवघ्या नऊच दिवसांत राजीव दीक्षित यांच्या आवाजातील जवळपास साडेतीन तासांचा एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड झाला. ते ऑडिओ स्वरूपातील भाषण आहे. त्याला अगदी व्यवस्थित एडिट करून, ॲनिमेशन समाविष्ट करून हा व्हिडीओ युट्युबवर अपलोड केलेला आहे. (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मृत्यूची ते वाटच पाहत होते का?) त्यापूर्वी कुणालाही माहीत नसलेला व्हिडिओ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतरच युट्युबला अपलोड झाला, यालाही एक कारण आहे. व्हिडिओ पाहताना पहिल्या काही मिनिटांत हे कारण उघड होते. ते कारण म्हणजे या व्हिडीओमध्ये असलेली  धादांत खोटी विधाने. त्या खोट्या विधानांना उत्तर देऊ शकणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर हयात नसल्याचा फायदा घेण्यासाठीच जणू हा व्हिडिओ त्यांच्या मृत्यूनंतर युट्युबवर अपलोड केला असावा. खरे तर त्याचवेळी काही अंनिस कार्यकर्त्यांच्या लक्षात ही बाब आली होती. परंतु विरोधकांना उत्तरे देण्यात वेळ न घालवता कामावर लक्ष केंद्रित करणे हा डॉ. नरेंद्र दाभोलकरांचाच शिरस्ता अंनिस पाळत असल्यामुळे आणि संबंधित व्हिडिओची फारशी कुणी दखल घेतली नसल्यामुळे अंनिसने त्या व्हिडिओला उत्तर देणे टाळले. (अगदी आजही १ सप्टेंबर २०२३ रोजी त्या व्हिडिओला फक्त २३ हजार लोकांनी पाहिले आहे.) त्यामुळे त्या व्हिडिओची दखल घेण्याची अंनिसला काहीच गरज नव्हती. परंतु बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री या भोंदू बुवाला महाराष्ट्रातून पळ काढावा लागल्यानंतर मात्र काही धर्मांध लोकांनी राजीव दीक्षित यांच्या आवाजातील व्हिडीओचा काही भाग मोठ्या प्रमाणात व्हायरल केला आहे. त्यामुळे त्यातील खोटेपणा उघड करणे भाग पडत आहे.

त्या व्हिडीओमध्ये खोट्या बाबी आणि त्यासंबंधीची तथ्ये  या पोस्टमध्ये देत आहे.

१) मी डॉ. नरेंद्र दाभोलकरांना अनेक वेळा भेटलो आहे. त्यांच्या घरी जाऊन राहिलो आहे.

➡️ *तथ्य- ही पूर्णपणे खोटी गोष्ट आहे. राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या घरी कधीही आलेले नाहीत. राहण्याची गोष्ट तर लांबच. राजीव दीक्षित डॉ. दाभोलकरांच्या घरी आलेत आणि त्यांच्या कुटुंबियांनाच ते माहीत नाही असे कसे होईल? तसेच बाहेरही राजीव दीक्षित यांच्याशी भेट झाल्याचे नरेंद्र दाभोलकरांनी कुटुंबियांना अथवा जवळच्या कार्यकर्त्यांनाही सांगितले नाही. त्यामुळे व्हिडीओमध्ये पुढे सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी खोट्या आहेत हे उघड आहे. तरीही त्यातील पुढच्या मुद्द्यांचा समाचार घेत आहे.*

२) ज्या गोष्टी वैज्ञानिक असतात त्या श्रद्धा आहेत आणि ज्या गोष्टी अवैज्ञानिक असतात त्या अंधश्रद्धा आहेत. युरोप अमेरिकेत असतात त्याच गोष्टी वैज्ञानिक असतात आणि भारतातील गोष्टी अवैज्ञानिक असतात असे नरेंद्र दाभोलकरांनी मान्य केले आहे.

➡️ *तथ्य- नरेंद्र दाभोलकर यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांवर अतिशय स्पष्टपणे मांडणी केलेली आहे. तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय, यावरही अतिशय छान मांडणी केलेली आहे. या विषयांवरची त्यांची पुस्तके आणि भाषणे सर्वत्र उपलब्ध आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या टेलिग्राम चॅनेलवर ही सर्व भाषणे उपलब्ध आहेत. जिज्ञासूंनी या टेलिग्राम चॅनेल वर जाऊन ती भाषणे जरूर ऐकावीत.*

टेलिग्राम चॅनेल लिंक- https://t.me/MaharashtraAns


३) ख्रिश्चन आणि मुस्लिम समाज जे करतो त्या अंधश्रद्धा नाहीत, हिंदू समाज जे करतो त्याच अंधश्रद्धा आहेत, असे नरेंद्र दाभोलकर मानतात. त्यामुळे ते ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मांतील अंधश्रद्धांचे निर्मूलन करत नाहीत. ते फक्त हिंदू धर्मालाच टार्गेट करतात. हिंदू धर्मातीलच गोष्टींना शिव्या घालतात.

➡️ *तथ्य- हे पूर्णपणे खोटे आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सर्व धर्मांतील अंधश्रद्धांवर काम केले आहे. त्याबाबतचे पुरावे सोबतच्या लिंकवर मिळतील. तसेच एकाच धर्माला टार्गेट करणे, शिव्या देणे असले काम अंनिस कधीच करत नाही. अंनिसने केलेली चिकित्सा ही सभ्य भाषेतच असते.*

अंनिसने अन्य धर्मांत केलेल्या कामांचे पुरावे-  https://drive.google.com/file/d/1cMmomKwmUkCfn-DaZBZ-WvbtNe6S_1TE/view?usp=drive_link


४) आम्ही एफ. सी. आर. ए. सर्टिफिकेट घेतले आहे. त्याच्या आधारे आम्हाला अमेरिकेतून भरपूर पैसा मिळतो. त्या पैशांतून आम्ही भारतात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतो, असे दाभोलकरांनी मान्य केले आहे.

➡️ *तथ्य- अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुरुवातीपासूनच लोकवर्गणीतून निधी जमवत आहे. कोणत्याही प्रकारच्या सरकारी अथवा बिगरसरकारी संस्थांकडून अंनिसला पैसे मिळत नाहीत. परदेशी फंडिंगचा सोपा मार्ग तर नरेंद्र दाभोलकरांनी जाणीवपूर्वक टाळला आहे. इथल्या लोकांसाठी याच मातीतून काम उभे राहिले पाहिजे, असे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. परंतु एकदा अंनिसने एफ.सी.आर.ए. सर्टिफिकेट घेतले होते. महाराष्ट्राच्या विधिमंडळात तत्कालीन गृहमंत्री मा. आर. आर. पाटील यांनी याबद्दलचे सत्यशोधन मांडले आहे. अमेरिकेतील मराठी माणसांनी स्थापन केलेल्या 'महाराष्ट्र फाऊंडेशन' या संस्थेचा दशकातील उत्कृष्ट कार्यकर्ता हा पुरस्कार डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मिळाला होता. त्या पुरस्काराची सर्व रक्कम डॉ. दाभोलकरांनी अंनिसला दिली होती. अशा प्रकारे परदेशी राहणार्‍या _महाराष्ट्रीयन लोकांनी_ दिलेल्या देणग्यांच्यासाठी हा FCRA वापरण्यात आलेला आहे. गेली दहा वर्षे तर अंनिसने FCRA बंद (surrender) केला आहे.*


काही महत्त्वाचे मुद्दे

🔷 *ज्या गोष्टी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आपल्या कुटुंबियांना किंवा अंनिसच्या कार्यकर्त्यांना देखील सांगितलेल्या नाहीत _(कारण मुळात त्या गोष्टी घडलेल्याच नाहीत)_ त्या गोष्टी ते कधीही भेट न झालेल्या राजीव दिक्षित यांना सांगतील, असे मानणे हास्यास्पद आहे.*

🔷 *व्हिडिओमधील आवाज राजीव दीक्षित यांचा वाटतो. पण राजीव दीक्षित यांचाच तो आवाज आहे का? याचीही तपासणी व्हायला हवी.*

🔷 *अंनिस परदेशी फ़ंडिंग मिळवत नाही. तरीही एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे की FCRA सर्टिफिकेट काढून परदेशी देणग्या मिळवण्यात काहीही बेकायदेशीर अथवा गैर नाही. भारतातील अनेक सामाजिक संस्था अशा पद्धतीने परदेशातून फंडिंग मिळवत असतात. हे पूर्णपणे कायदेशीर आहे.* 

🔷 *अंनिसला बदनाम करण्यासाठी वारंवार खोटे बोलावे लागते. यातच अंनिस-विरोधकांचा पराभव आहे.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य