नासाने चंद्रावर झेप घेण्यासाठी अनेक मोहीम केल्या त्यात अपोलोचा विशेष सहभाग होता. परंतु यशस्वी झालेली पहिली मोहीम survyeyor 1 ही आहे. जी दिनांक 30 मे 1966 रोजी घेण्यात आली. त्यादिवशी निर्जला एकदशी होती. नासाने असंख्य मोहिमा केल्या आहेत. त्यापैकी काही मोहिमा इथे मांडत आहेत. ज्या एकादशी दिवशी झाल्या आहेत. एकादशी दिवशी अनेक मोहिमा झाल्या आहेत. पण प्रत्येक गोष्टीचा शोध प्रत्येकाने घ्यावा.पण काही महत्त्वाच्या मोहिमा मांडत आहे.

11 जुलै 2011 - स्पेस शटल अटलांटीसा
14 एप्रिल 1981- स्पेस शटल कोलनबिया जे मानवविरहित होतं आणि 11 नोव्हेंबर 1982 ला सेम मोहीम मानवरहीत केली.
9 एप्रिल 1983- स्पेस शटल चॅलेंजर
5 सप्टेंबर 1984- स्पेस शटल डिस्कव्हरी
13 सप्टेंबर 1959 - सेकंड सोव्हिएत रॉकेट



भारतीय पंचांग आणि वातावरण याचा खूप जवळचा संबंध आहे. हे खूपजणांना माहित नसेल. भरतीची वेळ पंचांगातल्या तिथीला ३/४ ने गुणून जो आकडा येतो त्याच्या आसपासच्या घड्याळाच्या वेळेला असते. हे माहित असेलच ! एकादशी आणि चतुर्थी या दोन तिथी पोर्णिमा आणि अमावस्ये पासून समान अंतरावर असतात. या तिथींच्या दिवशी चंद्र आणि सूर्य यांची जी स्थिती असते , त्यामुळे पृथ्वी भोवतीच वातावरण अन्य दिवसाच्या तुलनेत विरळ असत. तसच अंतराळात यान भरारी घेताना त्यावर परिणाम करणारे गुरुत्वाकर्षणासारखे घटक अन्य दिवसाच्या तुलनेत क्षीण असतात. यान अवकाशात झेपावताना पृथ्वीच गुरुत्वाकर्षण आणि चंद्र व सूर्याच गुरुत्वाकर्षण याला तोंड द्याव लागत ! ही परिस्थिती चतुर्थी व एकादशीच्या दिवशी वातावरण भेदण्यासाठी अनुकूल असते. म्हणून एकादशी अथवा चतुर्थीला यान अंतराळात पाठवल जात.
गणपती किंवा विठ्ठल भक्तीचा यात काहीही संबंध नाही.
एकादशी आणि चतुर्थी या दोन तिथींच्या दिवशी असणार वातावरण पचनावरही परिणाम करत , म्हणून त्या दिवशी उपवास सांगितला आहे. भांगेची भरती आणि उधाणाची भरती याही तिथीनुसारच ठरतात हे ही टिका करणाऱ्यांनी विचारात घेतल पाहिजे. नजिकच उदाहरण म्हणजे डॉ.नितू मांडके पोर्णिमा आणि अमावस्येला ऑपरेशन करत नसत. कारण त्या दिवशीच वातावरण अधिक रक्त प्रवाहीत करणार असत. ऑपरेशन करताना जास्त रक्त वाहिल्यास त्याचा पेशंटच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो हे मांडकेसर जाणून होते.

आता कालमापन पद्धतीबाबत पराशर दादांनी दिलेले हे खालील उत्तर पाहूया...

भारतीय कालमापन पद्धती म्हणजे हिन्दु कालमापन पद्धती! या कालमापन पद्धतीमध्ये वर्षाचे बारा मास आणि प्रत्येक मासाचे पंधरा दिवसांचे दोन पंधरवडे असतात.

परंतु हिन्दु कालमापन पद्धतीमध्ये चंद्र आणि सूर्य या दोहोंच्या गतींचा विचार करण्यात आलेला आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ हा पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा सुमारे ५० मिनिटे कमी असतो. हा काळ साचत तीन वर्षांत एका संपूर्ण महिन्याचा काळ तयार होतो. म्हणून प्रत्येक तीन वर्षांनी आपल्या हिन्दु कॅलेंडर(पंचांगात) मध्ये अधिक मास येतो. हा अधिक मास चैत्र ते मार्गशीर्ष अशा आठ महिन्यांना लागूनच येतो. म्हणून प्रत्येक तीन वर्षांनंतर चवथ्या वर्षी अधिक मास(म्हणजे मल मास) ही संकल्पना हिन्दु कालमापन पद्धतीमध्ये आहे. या अधिक मासाच्या संकल्पनेमुळे हिन्दु कालमापन पद्धती अधिक अचूक बनली आहे. अधिक मासाच्या योजनेमुळे हिंदूंचे सर्व सण, वार, उत्सव त्या त्या ऋतूंत येतात(जसे हिजरी कालगणना अत्यंत सदोष असल्याने प्रतिवर्षी रमजान वेगवेगळ्या ऋतूंत येतो.).

हिन्दु कालमापन पद्धतीमध्ये प्रत्येक दिवस २४ तासांचा नसतो.  प्रत्येक दिवसाचा कालावधी वेगवेगळा असतो आणि तो अधिक अचूक असतो. आपण अनेकदा "पौर्णिमा प्रारंभ दु २ वाजून १२ मिनिटांनी" अशा प्रकारचे उल्लेख कालनिर्णय मध्ये पहिले असतील. हिन्दु कालमापन दिनदर्शिका म्हणजे पंचांग. या पंचांगात वर्षातील प्रत्येक दिवसाच्या सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळा, नक्षत्रांची स्थिती यासह अनेक गोष्टींचा उल्लेख असतो. पंचांगाला नावे ठेवणारे लोक पंचांग कधीही न पाहता त्यावर टीका करतात यावरून त्यांची एकूण वैज्ञानिक पात्रता ध्यानात येते!

हिन्दु कालगणना ही इतकी अचूक आहे की सर्वच खगोलशास्त्रीय घटना हिन्दु कालगणनेनुसारच घडतात. उदा. चंद्रग्रहण अथवा सूर्यग्रहण या खगोलीय घटना अनुक्रमे पौर्णिमा आणि अमावस्येलाच येतात. असं कधीही होत नाही की सूर्यग्रहण अमावस्या सोडून अन्य दिवशी घडले!

समुद्राची भरती आणि ओहोटी देखील हिन्दु कालमापन पद्धतीनुसारच(म्हणजे तिथीप्रमाणे) घडते.

या खगोलीय घटना हजारो वर्षांपूर्वी कधी घडल्या होत्या तसेच भविष्यात केव्हा घडणार याचे नेमके भाकीत करण्याचे सामर्थ्य केवळ हिन्दु कालमापन पद्धतीमध्ये आहे.

हिन्दु कालमापन पद्धतीमध्ये राशी आणि नक्षत्रे या महत्त्वाच्या संकल्पना आहेत. एकूण २७ नक्षत्रांपैकी केवळ ९ नक्षत्रे पावसाची असतात. शेतीचे सर्व वेळापत्रक हे इंग्रजी कॅलेंडर वर नव्हे तर हिन्दु कालमापन पद्धतीनुसारच चालते.

अजून दहाहजार वर्षांनी देखील सूर्यग्रहण हे अमावस्येला आणि चंद्रग्रहण हे पौर्णिमेलाच येणार हे सुर्यप्रकाशाईतके स्पष्ट आहे. ही हिंदू कालमापन पद्धतीची महती आहे. तसे अमुक एका इंग्रजी दिनांकाला सूर्यग्रहण/चंद्रग्रहण घडेल असे नेमके सांगता येत नाही. मुस्लिम लोक तर आजही ईद चा चंद्र कधी उगवणार हे जाणून घेण्यासाठी हिजरी कॅलेंडरचा नाही तर हिन्दु कालमापन पद्धतीचाच आधार घेतात. दाते पंचांग पाहून ईद चा चंद्र केव्हा दिसणार ते ठरवले जाते.

दुर्दैवाने सध्याच्या काळात विद्वान लोकांना देखील या अत्यंत अचूक आणि वैज्ञानिक कालगणना शास्त्राची माहिती नसते. आपल्या देशात शिक्षण व्यवस्थेत परकीयांच्या विशेषतः पाश्चात्य लोकांच्या सर्व गोष्टी बरोबर/उत्तम/चांगल्या आणि आपल्या देशातील सर्व गोष्टी टाकाऊ/बेकार/निरर्थक असे आवर्जून बिंबवले जातते.



हिन्दु कालमापन पद्धतीचे हे महत्व जाणून शिवाजी महाराजांनी बाळकृष्ण आणि रामकृष्ण संगमेश्वरकर या बंधूंकडून "करण कौस्तुभ" हा ग्रंथ सिद्ध करवून घेतला. संभाजी महाराजांनी देखील गागाभट्ट यांच्याकरवी "समयनय:" हा असाच हिन्दु कालमापन शास्त्रावर आधारित ग्रंथ लिहून घेतलेला आहे. हा ग्रंथच मुळात तिथीनिर्णय या विषयावर लिहिला गेला आहे. हे दोन्ही ग्रंथ आजही उपलब्ध आहेत.

अमरिकेने देखील अपोलो यान ३० मे १९६७ या दिवशी म्हणजे त्या देशात एकदशी ही तिथी असताना सोडले होते याचे पण संदर्भ उपलब्ध आहेत.

एकादशीला उपग्रह का प्रक्षेपित करतात याचे नेमके कारण जरी मला माहिती नसले तरीही गेल्या तीन वर्षांत झालेल्या १९ उपग्रह प्रक्षेपणांपैकी १० प्रक्षेपणे एकादशीला झाली आणि ती यशस्वी झाली हे सत्य नाकारता येणार नाही.

नासाने एकादशीला म्हणजे हिन्दु कालगणनेचा अभ्यास करून योग्य तिथीला प्रक्षेपण केले

 बहुतांश वेळी उपग्रह प्रक्षेपणे एकादशीला झालेली आहेत आणि ती यशस्वी पण ठरलीय आहेत हे वास्तव आहे. परंतु हिन्दु कालमापन शास्त्राचा अभ्यास करून योग्य तिथीनुसार प्रक्षेपण केले जाते हे वैज्ञानिक वास्तव आहे.

इंग्रजी कालमापन पद्धती तर त्यांना अनेकदा बदलावी लागलेली आहे. शिवाजी महाराजांच्या काळात प्रचलित असलेले ज्युलियन कॅलेंडर अठराव्या शतकाच्या मध्यात अचानकपणे बदलून ग्रेगोरीयन कॅलेंडर वापरात आणले गेले कारण आधीचे कॅलेंडर सदोष होते. तसे हिंदूंवर आपले कॅलेंडर(पंचांग) बदलण्याची वेळ कधीही आलेली नाही आणि येणार पण नाही. कारण हिंदूंची सहस्रावधीं वर्षांपासून चालत आलेली कालमापन पद्धती नेहमीच अचूक राहिलेली आहे.

हेच आपल्या निदर्शनास आणून देण्यासाठी हा लेखनप्रपंच!

एकादशी माहिती - नरेंद्र काळे सर
भारतीय कालमापणपद्धती माहिती - पराशरदादा मोने
नासा मोहीम आणि इतर माहिती संकलन - नेहा जाधव.


*नासा ने आखलेल्या मोहिमा, एकादशी व भारतीय पंचांग यावरील पोस्टाला उत्तर:*
“चला उत्तर देऊ या” टीम कडून: 

नरेंद्र काळे सर, पराशरदादा मोने आणि नेहा जाधव यांनी गोळा केलेल्या माहितीवर आधारित वरील पोस्ट रेटून केलेली लबाडी, अहंगंड, बादरायण संबंध याचा उत्कृष्ट नमूना म्हणून ओळखली जाईल. जगातील एक ‘महान’ अवकाश शास्त्रज्ञ, ज्यांनी मिळवलेल्या डिग्र्या साक्षात त्यांच्या विश्वविद्यालयाला देखील माहिती नाहीत असे उच्च-विद्या-विभूषित, विश्वातील सर्व शास्त्रज्ञांचे ज्ञान ज्यांच्या पायावर लोळण घेते आहे असे, नासा, इस्रो, Roscomos (रशिया) ज्यांना लोटांगण घालतात अशा आपल्या भारत देशातील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु भिडे गुरुजी यांनी अमेरिकन अंतराळ मोहिमांमधील एकादशीचे माहात्म्य सांगितले असल्याने त्यांच्या वक्तव्याचा बचाव काहीही आणि कसेही करून करायचाच म्हटल्यावर ही लबाडी माफच असणार ना? असो, या लबाडीचे वस्त्रहरण करू या:

उदाहरण म्हणून एकादशीच्या दिवशी राबवविलेल्या ७ अंतराळ मोहिमा या पोस्टच्या लेखकांनी आपल्या समोर ठेवल्या आहेत. त्याची नासा साईट व इंटरनेट वरील माहितीवरून चिकित्सा करू या:
१) ३० मे १९६६: सर्वेयर १, *(होय या दिवशी पंचांगानुसार एकादशी होती.)*

२) ११ जुलै २०११ - स्पेस शटल अटलांटीस. *(ही मोहीम खरे तर ८ जुलै ची आहे. त्यामुळे त्या दिवशी एकादशी नाही.)* 

३) १४ एप्रिल १९८१  स्पेस शटल कोलंबिया (मानवरहित): *(खरे तर या मोहिमेची तारीख १२ एप्रिल आहे. म्हणून एकादशी नाही. तसेच ही मोहीम मानव रहित नव्हे तर मानव-सहित होती.)*

४) ११ नोव्हेंबर १९८२ कोलंबिया: सेम मोहीम मानवरहीत. *(या दिवशी एकादशी असली तरी ही मानव-रहित नव्हे तर मानव-सहित होती.)*

५) ९ एप्रिल १९८३ - स्पेस शटल चॅलेंजर. *(ठीक आहे या दिवशी एकादशी होती.)*
६) ५ सप्टेंबर १९८४- स्पेस शटल डिस्कव्हरी. *(याची खरी तारीख ३० ऑगस्ट आहे. म्हणजे या दिवशी एकादशी असणे शक्य नाही.)*
७) १३ सप्टेंबर १९५९ - सेकंड सोव्हिएत रॉकेट : *(याची लॉंच तारीख १२ सप्टेंबर आहे. इथेही एकादशीचा अंदाज एक दिवसाने चुकतो आहे. तरीही लेखकांच्या समाधानासाठी या दिवशी एकादशी आहे असे गृहीत धरू या.)*
(या पोस्ट मध्ये असेही म्हटले आहे की अमरिकेने देखील अपोलो यान ३० मे १९६७ या दिवशी म्हणजे त्या देशात एकदशी ही तिथी असताना सोडले होते याचे पण संदर्भ उपलब्ध आहेत. ही लोणकढी थाप आहे. या दिवशी अशी काही मोहीम राबविल्याचे पुरावे दिसून येत नाहीत.) *किती ही फेकाफेकी?* 

म्हणजे, ७ पैकी ३ उड्डांनांच्या दिवशी एकादशी येत नाही. *फक्त चार* उड्डांनांच्या दिवशी एकादशी येते. 

आता नासाच्या व रशियाच्या आतापर्यंतच्या अंतराळ मोहिमा किती आहेत ते पाहूया:
*अमेरिका:*
मानव-रहित मोहिमा: १०००+
मानव-सहित मोहिमा: १६६
स्पेस शटल : १३५
*रशिया:*
मानव सहित मोहिमा: १४२
मानव रहित मोहिमा: ८००-९०० तरी असतील.
पुढे या आकडेवारीसाठी वापरलेल्या लिंक देत आहे.
(https://en.wikipedia.org/wiki/NASA)
(https://en.wikipedia.org/wiki/List_of_Space_Shuttle_missions)
(https://moon.nasa.gov/exploration/moon-missions/)

म्हणजे या दोनच देशाच्या जवळपास २२०० पेक्षा अधिक (यात थोडा फार फरक असू शकेल, पण त्याने आपल्या निष्कर्षावर परिणाम होणार नाही)अंतराळ मोहिमांपैकी ४ मोहिमा (म्हणजेच ०.१८ टक्के) एकादशीला लॉन्च झाल्या (म्हणजे योगायोगाने त्या दिवशी एकादशी होती) यावरून *“नासाने एकादशीला म्हणजे हिन्दु कालगणनेचा अभ्यास करून योग्य तिथीला प्रक्षेपण केले”* असा निष्कर्ष काढणे हे *सुतावरून स्वर्ग गाठणे याचे उत्तम उदाहरण* आहेच परंतु *सामान्य ज्ञान, तर्क, अक्कल, वैज्ञानिक दृष्टीकोण या बाबींना तिलांजलि दिल्याचे* सुद्धा उत्कृष्ट उदाहरण आहे. *यात चीन, भारत, जपान, कॅनडा या देशांच्या मोहिमांचा आकडा समाविष्ट केलेला नाही.* तो केल्यास ही टक्केवारी (एकादशीची) अत्यंत नगण्य स्वरूपाची असेल.

अशी बिनबुडाची उदाहरणे देऊन हिंदू कालमापन पद्धतीची भलावण या पोस्ट मध्ये केलेली आहे.

*आता या तथाकथित ‘हिंदू’ कालमापन पद्धती विषयी!*

१) कालमापन हे सामान्यपणे चंद्र, सूर्य आणि, अथवा पृथ्वीच्या भ्रमणावर आधारित असते. सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि त्यांचे भ्रमण हे हिंदूंसाठी वेगळे, मुसलमान, ख्रिस्ती, बौद्ध लोकांसाठी वेगळे असते असे काही नाही. त्यामुळे ‘आपले हिंदू’ कॅलेंडर वगैरे टिमक्या वाजवायची काही गरज नाही. ज्याप्रमाणे ग्रेगरीयन कॅलेंडर मध्ये लीप वर्ष असते (जे भ्रमणामधील वेळेच्या फरकाचा ताळमेळ साधण्यासाठी असते) तसेच या ‘हिंदू’ कॅलेंडरचे अधिक मास हे प्रकरण आहे.  हिजरी कालगणना वेगळी असली तरी ती पूर्णतः चंद्रावर आधारित असल्याने ‘हिंदू’ कॅलेंडर सोबत जुळत नसली तरी त्यात चूक काय आहे? हिंदू कॅलेंडर यात श्रेष्ठ ठरत नाही?
२) ‘हिंदू’ कालगणना खूपच अचूक असेल तर खरोखरच चांगली बाब आहे. ते खगोलशास्त्राशी सुसंगतच आहे.  परंतु यामध्ये शुभ, अशुभ, अनुकूल, प्रतिकूल अशा शेंडा बुडखा नसलेल्या, अवैज्ञानिक बाबी घुसडून ज्योतिष नावाचे थोतांड उभे करून भारतातील या पुरातन खगोलशास्त्राचे मातेरे करून टाकले गेले आहे व या क्षेत्रातील आपली प्रगतिच खुंटवून टाकली आहे.
३) डॉ मांडके अमावास्येला शस्त्रक्रिया करीत नसत, अमुक तिथीचे वातावरण पचनावर परिणाम करते यासाठी कसलाही शास्त्रीय आधार नाही. मांडके यांच्या नावावर तर काहीही खपवले जाते. 
४) *“समुद्राची भरती आणि ओहोटी देखील हिन्दु कालमापन पद्धतीनुसारच(म्हणजे तिथीप्रमाणे) घडते.”* हा दावा तर अत्यंत हास्यास्पद आहे. हे म्हणजे आमच्या पंचांगात लिहल्यामुळेच त्या वेळेला सूर्योदय होतो असे म्हटल्यासारखे आहे.
५) हे लेखक म्हणतात की अजून दहा हजार वर्षांनी देखील सूर्यग्रहण हे अमावस्येला आणि चंद्रग्रहण हे पौर्णिमेलाच येणार हे सुर्यप्रकाशाईतके स्पष्ट आहे. ही हिंदू कॅलेंडरची महती आहे. ग्रहणे या खगोलीय घटना आहेत आणि त्या तशाच होणार ना? यात हिंदू कॅलेंडरची महती कसली. ग्रहणावर जगात विविध संशोधने होत असतांना हिंदू मात्र सूर्य/चंद्राला राहू, केतूने गिळले, असल्या भाकडकथांवर विश्वास ठेवत आहेत, ग्रहणात खात पीत नाहीत, गरोदर महिलांची स्थिती अवघड करून ठेवतात व ग्रहण संपल्यावर घरातील अन्न पाणी फेकून देतात. वा रे हिंदू कॅलेंडर!
६) हिंदू कॅलेंडरचे श्रेष्ठत्व दर्शविण्यासाठी नासा ही अमेरिकन संस्था हिंदू कॅलेंडर नुसार आपले कार्यक्रम ठरवते अशी खोटी साक्ष्य काढणे हे या लेखकांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहेच शिवाय बौद्धिक गुलामीचे सुद्धा लक्षण आहे. 

हिंदू कॅलेंडरची एवढी महती गाणारे हे लोक आपल्या हिंदू सरकारला (राज्य आणि केंद्र) देशात सर्वत्र हिंदू कॅलेंडर सुरू करण्यासाठी आग्रह का करीत नाहीत? तसेच आपले श्रेष्ठत्व जगाला का पटवून देऊ शकत नाहीत?

यावरून हे लक्षात येईल की अशा या खोट्या, अर्धवट माहितीवर आधारित पोस्ट हिंदुत्वाच्या पोकळ अहंगंडातून येतात. असे फालतू लेखन करणारे लोक आपला अहंगंड जोपासण्यासाठी जगात आपलेच हसे करून घेत आहेत हे देखील यांना कळत नाही.
- उत्तम जोगदंड
“चला उत्तर देऊ या” टीम

टिप्पण्या

  1. मेघनाथ सहा यांचे संशोधन वाचा . हिन्दू कालगणना त्रुट्या कळतील -

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य