आईन्स्टाईन व कलाम यांच्या नावे खपवलेली नास्तिक शिक्षकाची तर्कहीन कहाणी

*चला उत्तर देऊ या :*

नास्तिक शिक्षकाची ही तर्क हीन कहाणी ओढूनताणून तयार केलेली दिसतेय. त्याची कारणे पुढील प्रमाणे:

1) ही कहाणी या आधी बर्‍याच कालावधी पासून अल्बर्ट आइनस्टाइन या शास्त्रज्ञाच्या नावाने (आधी इंग्रजीत व नंतर त्याचे जसेच्या तसे मराठी, हिन्दी भाषांतर) प्रसारित करण्यात आली होती. ती अर्थातच खोटी होती हे आढळून आले. या कहाणीचा उल्लेख आइनस्टाइन च्या चरित्रात कुठेच आढळत नाही.  अधिक माहिती साठी पुढील लिंक वाचावी:  (http://www.snopes.com/religion/einstein.asp) आता तीच कहाणी आइनस्टाइन च्या जागी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे नाव टाकून पुन्हा जशीच्या तशी प्रसारित करण्यात येत आहे. या वरून ही खोटी कहाणी नाव बदलून पुढे रेटून (खोटे बोल, पण रेटून बोल) प्रसारित करणार्‍यांचा ‘हेतु’ लक्षात येतो. आपल्या खोट्या कहाणी साठी अब्दुल कलाम यांच्या सारख्या महान वैज्ञानिकास वेठीस धरायला खरे तर या कहाणीच्या लेखकास लाज वाटली पाहिजे. असो, तरीही या खोट्या कहाणीच्या पुढील भागाचा व त्यातील मुद्द्यांचा समाचार घेऊ या.
2) या कहाणीतील नास्तिक शिक्षक (पुढे त्यास प्रोफेसर असे ही म्हटले आहे. कॉपी सुद्धा नीट केली नाही तर अशा चुका होणारच) हे पात्र स्वतःच्या सोयीसाठी लेखकाने ओढून ताणून तयार केलेले दिसते आहे. विद्यार्थ्याच्या काही बिनडोक प्रश्नांना तो उत्तर देऊ शकत नाही असे दाखवले आहे, ते केवळ लेखकाने तसे लादल्यामुळेच! तसेच आधी शिक्षकाने उपस्थित केलेले प्रश्न अनुत्तरित ठेऊन, त्याच्या पुढे नवीनच प्रश्न (ते ही बिनडोक/अतार्किक) उपस्थित करून मूळ प्रश्नांस सोयीस्करपणे बगल दिली आहे. 
3) ईश्वराचे अस्तित्व आहेच हे पट‍वून देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. पंचेंद्रियांना (यात सूक्ष्मदर्शक, दुर्बिण व अन्य वैज्ञानिक उपकरणे सुद्धा येतात कारण अंतिमतः ही उपकरणे आपल्या ज्ञानेंद्रियांना सूक्ष्म/दूरस्थ/अन्य प्रकारांची जाणीव करून देतात)   ईश्वराची अनुभूति येत नाही म्हणून, तसेच ईश्वर ज्या कारणांसाठी मानला जातो तसे काही होत नाही म्हणून ईश्वर नाकारणार्‍या नास्तिक शिक्षकास उत्तर देतांना, आपला मुद्दा पुढे रेटण्यासाठी लेखकाने ‘हुशार’ विद्यार्थ्याच्या तोंडी उष्णता-शीतलता, अंधार-प्रकाश, मानवाची मकडापासून उत्क्रांती, व शिक्षकांचा मेंदू या गोष्टी घालून, ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांचा आधार घेतला आहे. परंतु या गोष्टी ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करू शकत नाहीत कारण त्या इथे गैरलागू आहेत. कसे ते पाहू या.
4) उष्णता-शीतलता : इथे उष्णता व शीतलता यांच्या व्याखेचा घोळ घातला आहे. शीतलता म्हणजे कमी उष्णता हे सांगून तापमानाची सापेक्षता सांगितली आहे. शीतलतेला दुसरे नाव देऊन ईश्वराचे अस्तित्व किंवा शीतलता अस्तित्वात नसणे हे कसे काय सिद्ध होते?
5) अंधार-प्रकाश : एक तर शिक्षकाच्या तोंडी जाणून बुजून चुकीची वाक्ये घातली आहेत. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे हे हुशार विद्यार्थ्याच्या तोंडी घातलेले योग्य असे वाक्य (जे मुद्दाम पेरलेले वाटते) त्याच्या नंतरच्या वाक्यांच्या अगदी विरोधी वाटते. ईश्वर ही मोजता येणारी किंवा स्पर्श करता येणारी वस्तु नाही असे हा विद्यार्थी मानतो. पण वरील त्याच्याच उदाहरणाप्रमाणे (उष्णता-शीतलता, अंधार प्रकाश) जाणवणारा तरी हवा ना? तो कुठेतरी जाणवतो किंवा सिद्ध होतो असे एक ही उदाहरण किंवा पुरावा लेखकाने दिलेला नाही.
6) मानवाची माकडापासून उत्क्रांती: यात उत्क्रांती कुणी पाहीली नाही हे सांगतांना विद्यार्थ्याचे घोर अज्ञान दिसून येते. उत्क्रांती ही अत्यंत धीम्या गतीने, हजारो/लाखो वर्षांत होत असते. म्हणूनच याला उत्क्रांती म्हणतात. एका जंगलातील माकडे दहा-पंधरा वर्षात लगेच माणसे होत नाहीत. हल्ली हायब्रिड पीक किंवा क्रॉस ब्रीड पशू ही याची उत्तम उदाहरणे आहेत. निसर्गात मात्र असे बदलाचे चक्र धीमेपणाने चालू असते.
7) मेंदू: शेवटी हा विद्यार्थी क्लासला विचारतो की सरांचा मेंदू पाहीलाय काय?  त्याला स्पर्श केलाय काय, त्याची चव बघितली आहे काय? त्या वरून  विद्यार्थी निष्कर्ष काढतो की सरांना मेंदू आहे हे कसे मानायचे! हा तर त्या विद्यार्थ्याच्या अज्ञानाचा कडेलोटच झाला! CT scan किंवा एक्स रे वगैरे उपकरणातून मेंदू पाहता येतो. अगदी त्या विद्यार्थ्याची कवटी फोडून सुद्धा मेंदू विद्यार्थ्यांना दाखवता आला असता.

मनातील विचार, चुंबकीय शक्ति, विद्युत शक्ति इत्यादि बाबतीत केलेली विधाने सुद्धा लेखकाचे विज्ञानाच्या बाबतीत अज्ञान दर्शवितात. विज्ञानाविषयी उगीचच नन्नाचा पाढा वाचून देवाचे अस्तित्व कसे सिद्ध होऊ शकते याचा साधा विचार सुद्धा लेखकाने केलेला दिसत नाही. 

तर, उष्णता-शीतलता, अंधार-प्रकाश, मानवाची माकडापासून उत्क्रांती व शिक्षकांचा मेंदू या गोष्टी पाहील्या किंवा अनुभवल्या जाऊ शकतात. तसे ईश्वराच्या बाबतीत अजून तरी शक्य झालेले  नाही. श्रद्धा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्याला जशी पटते तशी श्रद्धा त्याने जरूर ठेवावी. परंतु ती दुसर्‍यावर थोपवण्यासाठी किंवा सिद्ध करण्यासाठी बिनबुडाचे, अतार्किक व खोटे युक्तिवाद करू नयेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य