प्राचीन भारतीय विज्ञान?

हल्ली सोशल मीडियातून दिशाभूल करणाऱ्या पोस्ट पसरवण्याचा एककलमी कार्यक्रमच काही लोकांनी हातात घेतला आहे. हे लोक सतत खोटी, अवैज्ञानिक, वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी माहिती पसरवतात आणि त्याला विशेषकरून शिकले सवरलेले लोक बळी पडतात. त्यामुळे या खोटेपणाला उघडे करत राहणे हे एक कामच लागून राहिले आहे. आता आणखी एक लेख सोशल मीडियातून फिरत आहे. तो लेख खाली देत आहे. आणि त्या लेखातच कंसामध्ये प्रत्येक मुद्द्याला उत्तर देत आहे .
आपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का ? आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ? ( एक अभ्यासपूर्ण विवेचन ) 
(लेखाच्या शीर्षकातच खोटेपणा! वेद आणि प्राचीन ज्ञानाला संपूर्ण थोतांड कोणीच म्हणत नाही. त्यातील काही गोष्टी आजच्या काळात टिकत नाहीत, काही गोष्टी अवैज्ञानिक, काही गोष्टी विषमतावादी आहेत असे विवेकवादी लोकांचे म्हणणे आहे. प्राचीन ग्रंथांना ज्ञानाचा स्रोत मानणे, त्यानंच प्रमाण मानणे, त्यातच विज्ञान आहे असे मानणे चुकीचे आहे इतकेच आमचे म्हणणे आहे.)
सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत वापरून सिद्ध करतो हि सगळी तार्किक दृष्टी आहे. आपला हा सुद्धा दावा आहे कि मानवाने ३०० वर्षात अफाट प्रगती केलेली आहे.

सूर्य-चंद्र ग्रहणे, कोणत्या दिवशी, नेमक्या कोणत्या वेळी, जगात कुठे, कशी दिसतील याची अचूक गणिते या सिद्धांताच्या आधारे आपण गेली तीनशे वर्षे करीत आहोत. असा आपला दावा आहे

ज्या माणसाला वेद म्हणजे काय आहे हे माहित नाही. ज्या माणसाला उपनिषदे म्हणजे काय हे माहित नाही. ज्या माणसाला प्राचीन भारतीय गणिती पद्धत म्हणजे काय हे माहित नाही. ज्या माणसाला प्राचीन भारतीय खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र काय हे माहित नाही त्या माणसाला हा लेख वाचून विज्ञानाबद्दल प्रेमाचे भरते येणे स्वाभाविक आहे. परंतु हे सगळे अर्ध सत्य आहे. मध्यंतरी एका विद्वानाने अशीच टिप्पणी केली होती सगळे काही वेदात असेल तर तुम्ही पुढचे १० -१५ शोध आजच लावा कि, विज्ञान हे शोध लावण्याची वाट का पहात बसला आहात. (मग घ्या ना चॅलेंज! वेदमंत्र किंवा इतर मंत्र, पूजापाठ, कर्मकांडे, यज्ञ करून लावा ना शोध. जुनीच मढी का उकरत आहात?)

तर विज्ञान विरुद्ध प्राचीन भारतीय ज्ञान / अध्यात्म या विषयावर आपण मुद्देसूद, पुराव्यांच्या सह चर्चा करूया. विज्ञानाचे जे प्रेमी असतील त्यांनी आवर्जून हा लेख वाचावा माझ्या मुद्द्यांच्या बद्दल काही आक्षेप असतील ते नोंदवावे. आणि जर माझे मुद्दे योग्य असतील तर मान्य करण्याचा मोठेपणा सुद्धा दाखवावा.

१) https://www.speakingtree.in/allslides/mystery-behind-the-iron-pillar-of-qutab-minar/288949
या पेज ला भेट द्या. कुतुब मिनार च्या समोर एक लोहस्तंभ आहे. २२ फुट उंच सुमारे ६.५ टन वजन असणारा wrought iron अर्थात ओतीव लोखंडाचा बनलेला स्तंभ. ज्याचे वय कमीत कमी १६०० वर्षे आहे. ज्याच्यावर एक अत्यंत पातळ असे आवरण चढवले आहे ज्यामुळे गेली १६०० वर्षे या खांबाला गंज लागलेला नाही. आय आय टी कानपूर च्या धातू तज्ञांनी अभ्यास करून एका विशिष्ट रासायनिक प्रक्रियेचा उल्लेख केला आहे ज्याचे आवरण फक्त १० micron आहे त्यामुळे हा स्तंभ अजूनही गंज पकडत नाही.

आपल्या महान वैज्ञानिक प्रगती चे मापदंड असणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या कारला सुद्धा मुंबईच्या खाऱ्या वातावरणात ३ ते ५ वर्षात बुडाला भरपूर गंज लागतो आणि मुंबईतील जुनी कार नेहमीच निम्म्या किमतीला विकली जाते. १६०० वर्षांच्या पूर्वी जिवंत असणारी अंधश्रद्धाळू विज्ञान परान्मुख माणसे जे करून गेली आहेत त्याची नक्कल तरी करण्याची आजच्या वैज्ञानिकाची आणि त्यांच्या समर्थकांची तयारी आहे का ??
('आयत्या बिळावर नागोबा' या म्हणीचा प्रत्यय हा लेख वाचल्यावर येतो. कर्तृत्व गाजवले एकाने आणि त्याचे श्रेय घेतोय दुसराच. कर्तृत्व गाजवले भारतातील कष्टकरी वर्गाने आणि त्याचे श्रेय घेताहेत धर्ममार्तंड. लोहविज्ञानात आणि एकूणच धातूविज्ञानात भारत पूर्वीपासून प्रगत होताच. (इतर देशही होते.) हे कोणीच नाकारत नाही. मुद्दा असा आहे की यात अध्यात्माचे योगदान काय? हे तर अस्सल भारतीय वैज्ञानिक दृष्टिकोनाचे, तर्कशास्त्राचे, वैज्ञानिक तंत्रज्ञानाचे यश आहे. यात धर्म आणि अध्यात्माचे योगदान काय आहे? लोहस्तंभ बनवण्याची कृती तुमच्या एखाद्या अध्यात्मिक ग्रंथात असेल तर सांगा. लोहस्तंभ बनवण्यासाठी कोणते मंत्र, कोणता यज्ञ, किंवा कोणते पूजापाठ कामी आले ते सांगा. राहिला मुद्दा असाच स्तंभ पुन्हा उभारण्याचा. तर त्याची आजच्या काळात गरज काय? गरज असेल तर असाच किंवा याहीपेक्षा चांगला स्तंभ उभारता येईल.)

२) https://www.quora.com/What-is-so-unique-about-the-Lepakshi-temple-Andhra-Pradesh

लेपाक्षी मंदिर आंध्र प्रदेश. या मंदिरात एक दगडाचा स्तंभ ( column ) आहे तो अधांतरी आहे. त्या खांबाच्या खालून आपण एक इंच जाडीची कोणतीही वस्तू फिरवून त्याची खात्री करून घेऊ शकतो. याच पद्धतीचा दीपस्तंभ मी विजयनगर साम्राज्यात सुद्धा पहिला होता. एक मेकानिकल इंजिनियर म्हणून मी तो कसा बनवला असेल हे नक्की सांगू शकतो. सुमारे १० टन वजन असणारा एक २ फुट व्यास असणारा दगड घ्या. त्याच्यावर तुम्हाला हवे तसे नक्षीकाम करा ( सुमारे ५ ते १० वर्षे लागणार हे करायला पारंपारिक हत्यारे वापरून. ) नंतर त्या खांबाच्या एका बाजूला एक मोठे गोल भोक करा त्यात लोहकांत दगड ( चुंबकीय गुणधर्म असणारा दगड ) घट्ट ठोकून बसवा. नंतर जिथे हा स्तंभ उभा करायचा असेल तिथे जमिनीत या दगडाचे वारा, पाउस, उन, वादळ या सगळ्या प्रकारात सुद्धा रक्षण करू शकेल इतका मजबूत पायाचा दगड बसवा त्यात तितकाच मजबूत पायाचा लोहकांत दगड ठोकून बसवा. आता या दोन्ही लोह्कांत दगडांचा असा संयोग हवा कि त्यांनी परस्परांना दूर तर लोटले पाहिजे पण ते स्थिर सुद्धा राहिले पाहिजेत ( १० टन वजनाचा दगड घेऊन आजच्या कोणत्याही वैज्ञानिकाने हे करून दाखवावे ) मग खालील दगडावर हा वरील दगड ढकलत ढकलत आणा दोन्ही दगड एकमेकांच्या चुंबकीय क्षेत्रात आले कि ते स्थिर होतील. आणि नंतर १००० वर्ष तसेच राहतील.. ( अजून किती काळ राहतील ते माहित नाही ) असा अफलातून तंत्रज्ञानाचा वापर करणारी मंडळी निर्बुद्ध होती ? त्यांना विज्ञान तुमच्या न्यूटन पेक्षा कमी समजत होते असे तुमचे मत आहे का ? बर हे करणारी मंडळी कलाकार होती, शिल्पी होती, तुमच्या पुरोगामी भाषेत बहुजन.. ब्राह्मण सुद्धा नव्हती तरी त्यांचे गणित, विज्ञान आणि निसर्गाचा अभ्यास इतका पक्का होता कि ती मंडळी या गोष्टी लीलया करत होती.
(बरे झाले स्वतःच मान्य केलेत की हे तयार करणारी मंडळी बहुजन होती. म्हणजेच ज्यांना तुम्ही राक्षस, दानव, नाग, पिशाच्च म्हणून हिणवले तीच ही मंडळी. त्यांचे ग्रंथ, जे खरोखर विज्ञानवादी आणि समतावादी होते, ते तुम्ही लोकांनी नष्ट केले तो भाग सध्या सोडून देऊ. आता जे विज्ञान या सगळ्या रचनेत आहे ते तुमच्या कोणत्या ग्रंथात आहे ते सांगा.)

३) महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर किरणोत्सव : आदिमाया महालक्ष्मीचे हे मंदिर कमीत कमी १००० वर्ष जुने आहे. या मंदिरात भूगोलाचा अभ्यास करून मुख्य द्वार असे बनवले आहे कि दर वर्षी विशिष्ट नक्षत्र असताना सूर्याचे पहिले किरण हे देवीच्या पायावर पडते आणि जसा सूर्य वर वर जातो ती किरणे तिच्या मुखापर्यंत पोचतात. हा सोहळा किरणोत्सव म्हणून ओळखला जातो. ज्या लोकांनी हे मंदिर बांधले त्यांचा भूगोल अत्यंत पक्का असल्या शिवाय आणि त्यांचे गणितीय ज्ञान अत्यंत चपखल असल्याशिवाय हे शक्य होऊ शकेल ? आज असेच एक मंदिर उभे करायचे ठरले तुमचे शास्त्रज्ञ सध्या ज्ञात असणारी साधने आणि तंत्रज्ञान घेऊन सुद्धा १००० वर्ष टिकेल अशी वस्तू निर्माण करू शकतील ? आणि याच पद्धतीचा किरणोत्सव तुमच्या न्यूटन च्या मूर्तीवर पाडून दाखवू शकतील ???
 (प्राचीन  काळात जगभरात सगळीकडेच ग्रह, तारे यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून ग्रहण, पिधान, युती इ. गोष्टी चा अंदाज बांधण्याचे शास्त्र बऱ्यापैकी प्रगत होते. याचे उदाहरण म्हणजे पिरॅमिड ची रचना. त्यात सुद्धा सूर्याच्या आकाशातील फिरण्याचा मार्गानुसार रचना केली आहे, तसेच इन्का संस्कृती जी सूर्योपासक होती त्यात सुद्धा सूर्याच्या आकाशातील फिरण्याचा मार्गानुसार इमारती बांधल्या होत्या. आपल्याकडे सुद्धा जयपूर ला जंतरमंतर ही खगोल शाळा आहे, ब्रिटन मधील स्टोन हेंज हे सुद्धा खगोल घटनांवर आधारित रचना आहे. त्यामुळे अशा रचना फक्त प्राचीन भारतातच होत्या हा दावा खरा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे यात अध्यात्माचे योगदान शून्य आहे.)

४) कैलाश मंदिर वेरूळ : वेरूळ येथील लेणीनच्या मध्ये असणारे कैलास मंदिर हे जगातील पहिले आधी कळस मग पाया या पद्धतीने बांधलेले मंदिर आहे. ७व्या शतकात बांधलेले हे मंदिर एकाच शीलाखंडाला पूर्णपणे कोरून बनवले आहे. कमीत कमी तीन पिढ्या या मंदिराच्या निर्मितीसाठी राबल्या आहेत. त्या काळातील लोकांना एकच इतका मोठा दगड कसा ओळखू आला असेल. त्याचे माप कसे कळले असेल कि त्यांनी बरोबर तीन मजली मंदिर उभे केले. आधी कळस मग पाया पद्धती वापरून बनवलेले हे एकमेव मंदिर म्हणजे शिल्पकलेचा आणि तत्कालीन लोकांच्या भूमीच्या गर्भाच्या अभ्यासाचा एक जिवंत नमुना आहे.
(होय. शिल्पकलेचा हा उत्कृष्ठ नमुना आहेच. पण ते तुमच्या यज्ञ करणाऱ्या लोकांचे ज्ञान नाही हेही खरे आहे. ते इथल्या राबणाऱ्या हातांचे कसब आहे.)
५) https://plus.google.com/101257929962594949214/posts/gTq2Jyaj8ga
बाण स्तंभ. सोरटी सोमनाथाचे कुप्रसिद्ध मंदिर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे हे मंदिर गझनीच्या मोहमदने १७ वेळा लुटले होते. या मंदिरात एक बाणस्तंभ आहे. त्या स्तंभावर संस्कृत मध्ये असे कोरले आहे कि या स्तंभापासून अंतर्क्तिका पर्यंत सरळ रेषा मारली तर भूमी लागत नाही. या लेखासोबत त्याच्या लिंक सुद्धा दिल्या आहेत. गुगल map चा फोटो सुद्धा दिला आहे. त्या काळातील लोकांच्याकडे आज असणारी कोणतीही सामुग्री नसताना सुद्धा ते या पद्धतीची घोषणा कशी काय करू शकले असतील ? आज च्या विज्ञानाकडे याचे उत्तर आहे ?? त्यांनी नक्की कोणती यंत्रे, कोणती तंत्रे वापरली असतील ज्यामुळे त्यांना हे ज्ञान प्राप्त झाले ???
(हा दावा खोटा आहे. अधिक माहितीसाठी या लिंकवरील मजकूर वाचावा- http://sawalandjawab.blogspot.in/2017/04/blog-post.html?m=1 )

६) http://justfunfacts.com/interesting-facts-about-meenakshi-amman-temple/

मीनाक्षी टेम्पल मदुराई : सुमारे २५०० वर्ष जुने मंदिर. बांधकाम करताना ३० ते ३५ टन वजनाच्या शिळा हत्तींच्या सहाय्याने ढकलत आणून निर्मिती केलेली आहे. या मंदिरात सहस्त्रखंबी मंडप आहे. त्यात ९८५ खांब आहेत आणि त्यातील काही खांबांवर आपण नाणे वाजवले तर सा ते नि असे सप्तसूर ऐकू येतात. मी मध्यंतरी डिस्कव्हरी वर एक कार्यक्रम पाहिला होता ज्यात या मंदिराचे वर्णन आहे. त्यात त्यांना सुद्धा हाच प्रश्न पडला कि २५०० वर्षांच्या पूर्वी ३० टन वजनाचा दगड कसा हलवला असेल. त्या साठी त्यांनी एक दगड आणला सुमारे २५ टन वजनाचा कारण आजच्या वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत भारतात दगड वाहण्यासाठी असणारा सगळ्यात मोठा ट्रेलर सुद्धा २५ टन वजनच वाहून नेऊ शकतो. आणि जुन्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे त्यांनी लाकडी ओंडके तासून गोल केले त्यावर तो दगड टाकून त्यांनी हत्तींचा वापर करून ढकलून पहिले आणि त्यांना तसे करता आले . ( ज्याला आपण तरफ चे तत्व किंवा लिव्हर आर्म प्रिन्सिपल म्हणतो त्याच तत्वाचा वापर करून हि अत्यंत अवजड वस्तू हत्तींनी लीलया ढकलून दाखवली )
(हे तंत्रज्ञान तुमच्या कोणत्या धार्मिक ग्रंथात स्पष्ट करून सांगितले आहे ते सांगा. फुकट दुसऱ्यांचे कर्तृत्व आपल्या नावावर खपवू नका.)

७) https://en.wikipedia.org/wiki/Konark_Sun_Temple

कोणार्क चे सूर्य मंदिर : संपूर्णपणे लोह्कांत दगड वापरून बनवलेले मंदिर म्हणजे कोणार्क चे सूर्य मंदिर. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे लोह्कांत दगड एकमेकांचे magnetic forces balance करून घट्ट बसवले होते. त्या नंतर त्यावर शिल्पे घडवली. मंदिराचा कळस हा सुद्धा लोह्कांत दर्जाचा होता आणि तो कळस संपूर्ण मंदिराचे magnetic forces control करत असे. या मंदिराच्या आत जे राशी चक्र काढले होते ते या पद्धतीचे होते कि रोज सूर्य उगवताना ज्या राशीत असेल त्या राशीवर बरोबर सूर्याचे पहिले किरण पडणार. अर्थात रोज राशी बदलला अनुसरून किरणांची जागा बदलणार. कल्पना करा याला भूगोल आणि स्थापत्याचा काय दर्जाचा अभ्यास लागला असेल.

या मंदिराची मला माहित असणारी कथा सांगतो. हे मंदिर समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे. आणि त्या भागात समुद्र किनारा अत्यंत खडकाळ आहे. या किनाऱ्याजवळ येणारी जहाजे त्यातील लोखंड या magnetic forces ने ओढली जाऊन खडकावर आपटून फुटून जात असत.  ज्यावेळी वास्को द गामा भारतात आला त्याच्या दोन पैकी एका जहाजाचा याच पद्धतीने खडकावर आदळून अंत झाला. त्याला यात मंदिराचा काही तरी परिणाम आहे हे लक्षात आले त्याने जहाजावरून तोफा डागल्या. त्यामुळे मंदिराचा कळस निखळला. कळस निघाल्याने सगळे magnetic forces unbalance झाले आणि मंदिर जवळ जवळ उध्वस्त झाले. नंतर ब्रिटीश कालखंडात ब्रीतीशाना कल्पना होती कि आपण हे मंदिर पूर्ववत करू शकत नाही. त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात चक्क कोन्क्रीट ठासून भरले.

आजच्या महान विज्ञान आणि वैज्ञानिकांना आवाहन आहे. ते कोन्क्रीट काढा आणि पुन्हा ते मंदिर पूर्ववत करून दाखवा.
(मंदिरे बांधणे हे वैज्ञानिकांचे काम नाही. वास्को द गामाच्या कथेचा पुरावा द्या. उगाच हवेत गोळ्या मारू नका. राहिला मुद्दा मंदिररचनेचा तर त्याच्या बांधणीची पद्धत, शास्त्र, तंत्रज्ञान याचे स्पष्टीकरण तुमच्या कोणत्या अध्यात्मिक ग्रंथात दिले आहे ते सांगा.)

८) https://en.wikipedia.org/wiki/Varāhamihira

हि माझी पोपटपंची नाही. विकिपीडियाच वराह मिहीर चे गणितातील योगदान सांगतो आहे. सदरील ऋषींच्या बद्दल अजून एक ज्ञात बाब म्हणजे ते सूक्ष्म देह धारण करून ( यावर विज्ञानाचा बिलकुल विश्वास नाही ) अंतराळात भ्रमण करत असे. आणि त्यांनी काही श्लोक लिहिले आहेत ज्यात त्यांनी तुम्ही अंतराळात प्रवास करत असला आणि तुम्हाला जिथे आहात तेथून सूर्य अथवा पृथ्वी दोन्ही सुद्धा दिसत नसेल तरीपण आपले लोकेशन ( स्थान ) कसे ओळखावे आणि प्रवास करावा यावर मार्गदर्शन केलेले आहे.
 (विकिपीडियावरील माहिती कुणीही बदलू शकतो. तुमच्यासारख्या अंधविश्वासू माणसाने त्याला हवी तशी माहिती तिथे लिहिली म्हणजे ती खरी ठरते असे नाही. सुक्ष्मदेह ही एक थाप आहे.)

मध्यंतरी डिस्कव्हरीवर मंगलयान सफल झाल्यावर एक कार्यक्रम दाखवला गेला. त्यात नासा पहिली प्रयत्नात का अपयशी झाली याची चर्चा होती. आणि भारत का सफल झाला याचे सुद्धा विवरण होते. मंगलयान मंगल ग्रहाच्या कक्षेत स्थिर करताना एक समस्या वर सांगितल्या प्रमाणेच उद्भवली कि मंगल यान मंगल ग्रहाच्या उलट बाजूला होते. एका बाजूला सूर्य अन दुसऱ्या बाजूला पृथ्वी होती यानाला या पैकी काहीही दिसत नव्हते. या ठिकाणी वराह मिहीर ने सांगितलेली पद्धत वापरून प्रोग्राम बनवला होता आणि तो परफेक्ट होता त्या प्रमाणे मंगल यान सफलपणे मंगळावर उतरले.
(ही चक्क थाप आहे. लेखकाने या कार्यक्रमाच्या व्हिडिओची लिंक द्यावी.)
९)  http://www.ancientpages.com/2014/05/15/atomic-theory-invented-2600-years-ago-acharya-kanad-genius-ahead-time/

आचार्य कणाद ज्यांनी अणु त्याच्या गर्भातील छोटे पार्टिकल यांच्यावर शास्त्रीय भाष्य केलेले आहे. आणि हा लेख वाचा. मी सांगत नाही तज्ञ अश्या पाश्चात्य विद्वानांनी सुद्धा यावर शिक्का मोर्तब केलेलं आहे.
(कणाद यानी जसं अणू बद्दल भाष्य केलंय तसच एका ग्रीक तत्ववेत्त्याने सुद्धा मांडलय. आणि पाश्चात्य वैज्ञानिकांनी कणादचा दावा पूर्ण खरा होता हे मान्य केल्याची बातमी मी तरी कुठे बघितली नाहीये. खोटं बोला पण रेटून बोला हे सूत्र या संपूर्ण लेखात दिसतंय.)

१०) वैदिक गणित, आपले पंचांग आणि त्यावर आधारित पर्जन्य मानाचे अंदाज:
गणित हा भारतीयांनी जगाला दिलेला शोध आहे. शून्यावर आधारित गणमान पद्धती हि भारताची देण आहे. भारतातून हे ज्ञान मध्य पूर्वेला गेले अरब लोकांनी ते युरोपात नेले. त्यामुळे गणिताला युरोपियन लोक अरेबिक म्हणत आणि अरबी लोक हिंदसा म्हणत अर्थात हिंद मधून आलेली गणन पद्धत. यावर आधारित आपले पंचांग हे आज सुद्धा सगळ्यात परफेक्ट आहे. आपल्याकडे पर्जन्यमान दर्शवणारे जितके ग्रंथ आहेत ते नक्षत्रांची स्थिती आणि त्यानुसार पर्जन्य आणि येणारे पिक हा अंदाज वर्तवतात तो अंदाज आपल्या हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा अधिक चांगला असतो.
(वैदिक गणित म्हणून ज्याचा गाजावाजा केला जातोय त्याचा वेदांशी काडीचाही संबंध नाही. हे गेल्या शंभर दीडशे वर्षांतील खूळ आहे. भारतीय गणितींच्या ग्रंथांतील काही सूत्रे घेऊन त्यालाच वैदिक गणित म्हणून जगासमोर मांडले आहे. भारतातील गणितींनी गणितात काही चांगले योगदान दिले आहे. परंतु त्याचा वेदांशी काही संबंध नाही. उलट वैदिक लोकांनी या गणितींना त्रास देण्याचे काम इमानेइतबारे केल्याचे इतिहास सांगतो. आज मात्र अध्यात्माला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्या महान गणितींना वेठीस धरले जातेय. गणिताच्या विकासासाठी तर्कबुद्धी आणि बुद्धिप्रामान्यच कामाला आले हे लक्षात घ्यावे. तिथे साक्षात्कार, कर्मकांडे, पूजापाठ कामाला आले नाहीत.)

११) ज्या विज्ञानाच्या यशाच्या आपण गप्पा मारत असतो त्याचा पाया उत्तम गणिती ज्ञान हा आहे आणि त्यात भारतीय खूप आधी पासून तज्ञ आहेत. आज तुम्ही गणिताचे ऑलिम्पियाड जिंकलेल्या कोणत्याही मुलाला विचारा तू काय करणार तो सांगतो मी पाय चे मूल्य अधिकाधिक चांगले मांडणार. पाय हा वर्तुळाचा व्यास मोजण्यासाठी वापरला जाणारा स्थिरांक आहे.

https://hindufocus.wordpress.com/2009/07/16/the-sanskrit-verse-for-the-value-of-pi/
http://www.sanskritimagazine.com/vedic_science/value-pi-upto-32-decimals-rig-veda/

पाय चे मूल्य ३२ अंशापर्यंत या श्लोकातून समजते. पाय चे मूल्य शुल्बसूत्रातून काढले गेले आहे. आधुनिक विज्ञानाने पाय चे मूल्य २२ अंशापर्यंत काढले आहे.
(वरच्या मुद्द्याला दिलेले उत्तर यालाही लागू पडते.)

१२)  आपण गणन करण्यासाठी जी पद्धत वापरतो त्यात इंग्रजी अक्षरात
trillion च्या पुढे गणना नाही. आपल्या पद्धतीत. पद्म, महापद्म, अर्व, खर्व पर्यंत गणन करण्यासाठी शब्द आहेत.
(अभिमानाची गोष्ट आहे. पण हे सगळे करणाऱ्या गणिती लोकांना तुमच्या अध्यात्मिक म्हणवणाऱ्या लोकांनी त्रास दिला होता त्याचे काय?)

१३) https://www.speakingtree.in/blog/from-kedarnath-to-rameswaram-7-ancient-shiva-temples-fall-in-straight-line-638811

प्राचीन भारतातील हि सात शिव मंदिरे एकाच अक्षांशाला संदर्भ घेऊन बांधली आहेत. सर्व मंदिरे एकमेकांच्या पासून कमीत कमी काही हजार किलोमीटर दूर आहेत. असे असताना त्यांना ती एका रांगेत बांधता आली याचा अर्थ त्यांचे भूगोलाचे आणि अक्षांश आणि रेखांशाचे ज्ञान किती परिपूर्ण होते याचे द्योतक आहे.
(ही शुद्ध थाप आहे. या लिंकवरील लेख पहावा- http://sawalandjawab.blogspot.in/2018/04/blog-post.html?m=1  )

मी इथे दिलेली माहिती म्हणजे सागरातील काही थेंब आहेत. शक्यतो प्रत्येक मुद्याचे स्पष्टीकरण सुद्धा देण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिक विज्ञान म्हणजे कचरा आहे असे माझे बिलकुल मत नाही. आधुनिक विज्ञानाची दृष्टी वेगळी आहे. प्राचीन ऋषींची दृष्टी वेगळी होती. त्यांच्या दृष्टीत लोककल्याणाची तळमळ अधिक होती. त्यांची दृष्टी अधिक निसर्गपूरक होती. दुर्दैवाने सध्याचे विज्ञान हे निसर्गाला आव्हान देण्यासाठी विकसित होते आहे. (हा मोठा गैरसमज आहे. काही लोकांनी विज्ञानाचा गैरवापर केला. परंतु निसर्गाला समजून घेणे हे विज्ञानाचे मूलतत्त्व आहे.) भारतीय ऋषींनी विकसित केलेले विज्ञान हे निसर्ग आणि मानव यांनी शांततापूर्वक सहजीवन व्यतीत करावे असे होते. (असे विज्ञान अस्तित्वातच नाही.)

याठिकाणी मला चीनमधील एक महान विचारवंत कान्फूशियस याचे एक वाक्य उधृत करायचे आहे. तुम्ही निसर्गाच्या नियमांना बांधील राहून काही निर्माण केले तर निसर्ग ते टिकण्यास मदत करतो. तुम्ही निसर्गाला आव्हान देऊन काही निर्माण केले तर निसर्ग ते उध्वस्त करण्याच्या उद्योगाला लागतो.
आपले आजचे विज्ञान असे संहारक होऊ लागले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पर्यावरणाच्या बदलांशी झुंजतो आहोत. (याला मानवी अभिलाषा कारणीभूत आहे. विज्ञान नव्हे.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य