गणेशोत्सवाची बदनामी थांबवा !
- नित्यानंद भिसे

मागील १-२ दशकांपासून गणेश मूर्तींमुळे जलप्रदूषण होते, असा गैरसमज समाजमनावर बिंबवण्यात आला आहे. यासाठी गोबेल्स नीतीचा शिताफीने वापर करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या आधी तीन-चार महिने काही लोक अचानकपणे गणेश मूर्तीच्या प्रदूषणाचा विषय चर्चेत आणतात. त्यानंतर या उत्सवावर टीकाटिप्पणी सुरू करतात. वाद-विवाद होतात, त्यातून उत्सवाची बदनामी सुरू होते. दरवर्षी गणेशोत्सवात हे नित्याचे बनले आहे. वास्तविक कोणत्याही प्रकारे जलप्रदूषण होत असेल, तर त्याला आळा  घालणे आवश्यक आहे, परंतु त्याआधी ज्या कारणामुळे जलप्रदूषण होत असल्याचा दावा केला जात आहे, त्या कारणांची विज्ञानाच्या कसोटीवर पडताळणी होणे गरजेचे आहे. तेव्हाच योग्य काय आणि अयोग्य काय, हे उमजेल, त्याचा अभ्यास करून शासकीय पातळीवर धोरण ठरवणे आवश्यक आहे.असे झाले, तरच या उत्सवाची बिनबोभाटपणे होत  असलेली बदनामी थांबेल.

   गणेश मूर्तीमुळे प्रदूषण होते, असा दावा सर्वातआधी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला, त्यानंतर या समितीने गणेश मूर्तीद्वारे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तात्काळ काही नवे पायंडे पाडण्याचा सपाटा लावला. सरकारनेही याला अंधपणे दुजोरा दिला, ही दुर्दैवी बाब आहे. खरेतर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींमुळे जलप्रदूषण होते का, हे पडताळूनच या दाव्याला मान्यता देणे गरजेचे होते, परंतु सरकारकडून असे कोणतेही प्रयत्न न करता गणेशोत्सवावर प्रदूषणाचा शिक्का मारून या उत्सवाच्या बदनामीला एकप्रकारे राजाश्रय दिला. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दीड, पाच, सात आणि अकरा दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन झाले, त्या त्या वेळी महाराष्ट्रातील काही निवडक ठिकाणांकडील जलस्त्रोतांतील पाण्याच्या नमुन्यांची चाचणी केली, त्यावेळी काही प्रमाणात प्रदूषण झाले. मात्र ते प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे न होता, गणेश मूर्तींना लावण्यात आलेल्या रासायनिक रंगामुळे झाल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीमुळे प्रदूषण होते, हे धादांत चुकीचे आहे, हे सिद्ध झाले आहे. परंतु तरीही याबाबतीत सरकार पातळीवर दबाव आणण्यात आला. त्यानंतर याला एकामागोमाग एक पर्याय शोधून काढण्यात येऊ लागले, त्यावेळी गणेशभक्तांचे काय म्हणणे आहे, त्यांच्या धार्मिक भावना दुखावतील का, जे पर्याय शोधण्यात येत आहेत, ते हिंदु धर्मातील शास्त्राशी सुसंगत आहेत का, याचा कुठलाही विचार करण्यात आला नाही. या नव्या पर्यायांमध्ये गणेश मूर्ती कागदाच्या लगद्याची बनवा किंवा धातूची बनवून त्या एकाच मूर्तीची दरवर्षी प्रतिष्ठापना करत जा आणि घरच्या बादलीतच तिचे प्रतिकात्मक विसर्जन करून पुन्हा देव्हार्‍यात ठेवा, मूर्ती विसर्जन नदी, नाल्यात न करता घरातच बादलीत करा, ती माती झाडांच्या कुंडीत टाका किंवा कृत्रिम हौद बनवण्यात येतील त्यामध्ये विसर्जित करा किंवा गणेश मूर्ती झाडाच्या कुंडीत टाकून त्याची माती करून त्या कुंडीत झाड लावा, अशा पद्धतीचे अनेकविध पर्याय तथाकथित पर्यावरणप्रेमी त्यांच्या मनाला येईल तसे पसरवत आहेत, त्यासाठी प्रदूषणाचा दाखला देत आहेत, कोर्टाच्या आदेशाचा विपर्यास करून सांगत आहेत.
म्हणूनच या सर्व पर्यायांमुळे केवळ धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, कुठेही प्रदूषण रोखले जात नाही, असा प्रतिदावा करणारा मतप्रवाह निर्माण झाला आहे. याही मतप्रवाहाचा गांभीर्याने विचार होणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. वास्तविक गणेश मूर्तींमुळे जर प्रदूषण होत असेल तर यावर मूळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. गणेश मूर्ती शाडुच्या मातीची आणि नैसर्गिक रंगाची असावी, ती मूर्ती एक ते दीड फुटापर्यंत घरगुती आणि जास्तीत जास्त ५ फुटांपर्यंत सार्वजिक गणेश मंडळांची असावी, तसेच एक गाव एक गणपती असावा, हाच यावर परिणामकारण उपाय आहे. परंतु तथाकथित पर्यावरणप्रेमी नेमके याचा आग्रह न धरता अन्य पायंडे पाडून या उत्सवाबाबत वाद निर्माण करत आहेत. जर गणेश मूर्ती शाडूच्या मातीची आणि नैसर्गिक रंगाची तसेच एक ते दीड फुटांची असेल, तर जलप्रदूषणाचा विषयच उरणार नाही. खरेतर हिंदू धर्मशास्त्रातही हेच सांगितले आहे, तथाकथित पर्यावरणप्रेमी यासाठी सरकारकडे कायदा करण्याचा आग्रह धरत नाहीत किंवा स्वखर्चाने शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती बनवून त्यांची विक्री करून समाजात खर्‍या अर्थाने प्रबोधन करत नाहीत. याउलट हे तथाकथित पर्यावरणप्रेमी गणेश विसर्जनाच्या दिवशी जलस्त्रोतांजवळ ट्रक उभा करतात, जे गणेशभक्त पारंपरिक, पूर्वापार रुढी-परंपरेनुसार डोक्यावरून गणेशमूर्ती घेऊन समुद्र, नदी अथवा तलावाच्या दिशेने जात असतात, त्यावेळी त्यांची वाट अडवतात, त्यांना ‘ही गणेशमूर्ती आमच्याकडे द्या, ती विसर्जित करू नका, तिच्यामुळे जलप्रदूषण होते’, असे तावातावाने सांगतात, मागील पाच, सात, अकरा दिवस भक्तीभावाने पुजलेल्या गणेश मूर्तीचा संबंधित गणेशभक्तांच्या मनात तिटकारा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, शेवटी कंटाळून तो गणेशभक्त ती मूर्ती तथाकथित पर्यावरणप्रेमींच्या हवाली करतो, अशा प्रकारे ट्रक भरून जमा केलेल्या गणेश मूर्ती खाणीमध्ये फेकल्या जातात किंवा त्यावर रोलर फिरवून त्याच्या विटा बनवल्या जातात, काही वेळा तर या गणेश मूर्ती दोन-तीन दिवसांनी पुन्हा जलस्त्रोतात विसर्जित केल्याच्याही घटना घडल्या आहेत, अथवा त्या खाडीत किंवा भरावाच्या ठिकाणी फेकल्या जातात. हे वास्तव असून त्याचे पुरावेही उपलब्ध आहेत. या घेतलेल्या गणेश मूर्तींचे पुढे काय करायचे, याचे कुठलेही शासकीय धोरण नाही, त्यामुळेच हे तथाकथित पर्यावरणप्रेमी गणेश मूर्तींची अशी बिनबोभाटपणे विटंबना करतात. असे करण्याऐवजी संबंधित तथाकथित पर्यावरणप्रेमी गणेश मूर्ती शाडूच्या मातीची आणि नैसर्गिक रंगाची असावी, याकरता वर्षभर मोहीम का राबवत नाहीत? सरकारी पातळीवर कायदा करण्यासाठी का आग्रह धरत नाहीत? त्याऐवजी सरकारी पातळीवर गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रित हौदासाठी  लाखो रुपयांचा निधी संमत करून घेतात.
या नव्या पायंड्यांमध्ये गणेश मूर्ती कागदाच्या लगद्यापासून बनवण्याचाही एक पायंडा पडलेला आहे. त्यालाही सरकारने प्रोत्साहन दिले आहे. सरकारी निर्णयानुसार मे २०११ मध्ये गणेशभक्तांना पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले होते. यामध्ये कागदीमूर्ती या पर्यावरणपूरक असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू कागदीमूर्तींचे प्रमाण वाढत गेले. आता तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या २०-२२ फुटांच्या गणेश मूर्ती कागदाच्या लगद्यापासून बनवल्या जात आहेत. मागील काही वर्षांपासून तर घरगुती मूर्ती मोठ्या संख्येने कागदाच्या लगद्यापासून बनवल्या जाऊ लागल्या आहेत. याकरता जो कागद वापरला जातो, तो वर्तमानपत्राचा असतो. त्या कागदामध्ये धातू असतो, रासायनिक शाई असते. या कागदात गुंडाळलेला खाद्यपदार्थही आरोग्यासाठी घातक ठरतो, अशा असंख्य कागदांचा लगदा आणि रासायनिक शाईमुळे खरेतर अधिक जलप्रदूषण होते. राष्ट्रीय हरित लवादाने ३० सप्टेंबर २०१६ रोजी त्यांच्या आदेशात हे स्पष्टपणे नमूद केले आहे. १० किलो कागदी लगद्याच्या मूर्तीपासून एक हजार लिटर पाणी प्रदूषित होते. कागदी मूर्तीमूळे जलचर आणि वनस्पतींवर परिणाम होतो, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. तरीही आता जलप्रदूषण रोखण्यासाठी कागदी लगद्याची गणेशमूर्ती इकोफ्रेंडली असा गैरसमज रुढ झालेला आहे.
वास्तविक सरकारने आता या सर्व गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. जलप्रदूषणाच्या नावाखाली तथाकथित पर्यावरणप्रेमी करत असलेले दावे किती खरे आहेत, हे पडताळून घेऊन योग्य काय अयोग्य काय, याचा निवाडा करण्याची गरज आहे. कृत्रिम हौद, त्यात होणारे गणेश मूर्ती विसर्जन, त्यानंतर त्या मूर्तींची होणारी विटंबना आदी गोष्टींवर पायबंद घातला पाहिजे. सरकारने गणेश मूर्तींबाबत आता अभ्यासपूर्ण निकष ठरवले पाहिजेत, ती शाडूची आणि नैसर्गिक रंगांची असावी आणि तिची उंची घरगुती गणपतीसाठी १ ते दीड फूट आणि सार्वजनिक गणपतीसाठी ५ फूट असावी, यादृष्टीने सरकारची विचारप्रक्रिया सुरू झाली पाहिजे. जसे स्वच्छ भारत, उज्ज्वल गॅस योजना अशा मोहिमा सरकार राबवते, तसेच आता गणेश मूर्तींबाबत सरकारने अभ्यासपूर्ण मोहीम राबवली पाहिजे, तेव्हाच या गणेशोत्सवाची प्रदूषणाच्या नावाखाली होणारी बदनामी थांबणार आहे.

[http://epaper.mymahanagar.com/viewpage.php?edn=Mumbai&date=2019-08-26&edid=AAPLAMAHAN_MUM&pn=6](http://epaper.mymahanagar.com/viewpage.php?edn=Mumbai&date=2019-08-26&edid=AAPLAMAHAN_MUM&pn=6)

[http://www.mymahanagar.com/featured/stop-defaming-ganesh-idols/120487/](http://www.mymahanagar.com/featured/stop-defaming-ganesh-idols/120487/)


गणेशोत्सवाची बदनामी थांबवा ! या नित्यानंद भिसे यांच्या पोस्टला उत्तर:

गणेश मूर्तींमुळे जलप्रदूषण होते, यास ‘गैरसमज’ असे संबोधून व त्यामुळे उत्सवाची बदनामी होते असा कांगावा करून भिसे यांनी आपल्या पोस्टची दिशा दाखवून दिली आहे. समजा, खरोखरच प्रदूषण होत असेल व ते टाळायचे उपाय सुचवले तर यात उत्सवाची बदनामी कशी काय होते? आणि प्रदूषण होतच नाही हे जर विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत असेल तर तसे सिद्ध करून दाखवावे.  खरे तर सार्वजनिक गणपतीसाठी सक्तीची वर्गणी, रस्ते अडवून बांधलेले मंडप, मंडपामागे रंगलेले जुगाराचे डाव, दारू पिऊन गणपतीसमोर केलेला ‘मुन्नी बदनाम हुई....’ सारख्या गाण्यांवर केलेला बीभत्स नाच, तासंतास अडवलेले रस्ते, इत्यादि मुळे गणपती उत्सवाची यथेच्छ बदनामी होत असतांना त्यावर काही उपाय न सांगता, प्रदूषणाच्या विषयामुळे बदनामी होते हे लेखकांचे म्हणणे अतार्किक व हास्यास्पद वाटते.

गणेश मूर्तीमुळे प्रदूषण होते, असा दावा सर्वात आधी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (महा. अनिस) केला असे सांगून सरकारने यास अंधपणे दुजोरा दिला असा आरोप भिसे यांनी केला आहे. सरकार खरोखरच जर महा. अनिसच्या म्हणण्यास आज्ञाधारकपणे व अंधपणे दुजोरा देणारे असते, तर जादूटोणा विरोधी कायद्यासाठी १८ वर्षे लढा व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे बलिदान द्यावे लागले नसते. तसेच त्यांच्या हत्येच्या सूत्रधाराला कधीचेच अटक केले गेले असते. तर त्यांचा हा दावा बिनबुडाचा व हास्यास्पद ठरतो. प्लास्टर ऑफ पॅरिस च्या गणेश मूर्तींमुळे जल प्रदूषण होते का हे पडताळून पाहणे गरजेचे होते असे ते म्हणतात. परंतु शाडू मातीच्या मूर्ती बनवून त्या बसवायची आपली परंपरा असतांना ती परंपरा तोडून प्लास्टर ऑफ पॅरिस या रासायनिक पदार्थापासून गणेश मूर्ति बनवून बसवायची नवी परंपरा सुरू करतांना श्रीगणेशांचा अपमान झाला नाही का? की मूर्ति स्वस्तात पडते, मग गणेशांचा अपमान झाला तरी चालेल हा शुद्ध व्यवहार या मागे होता काय? या प्रश्नांची उत्तरे भिसे यांनी द्यायला हवी होती. तसेच समुद्रकिनारी, नदीकिनारी, डोहांमध्ये भग्न अवस्थेत गाळात पडलेल्या, शेवाळाने वेढलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या विसर्जित मूर्तींमुळे गणेशांचा अपमान होत नाही असे भिसे यांचे म्हणणे आहे काय?  जे विविध पर्याय पर्यावरणवादी लोकांनी सुचविले आहेत त्यातील अनेक पर्याय देशाच्या अन्य भागात प्रचलित आहेत. त्यामुळे गणेशांचा अपमान होतो असा कांगावा कोणी केलेला नाही. कोर्टाच्या आदेशाचा विपर्यास करून कोणी सांगत असेल तर पोस्ट लिहीत बसण्यापेक्षा त्याच्यावर कोर्टाच्या मानहानीचा खटला दाखल करावा. सुचविलेल्या सर्व पर्यायांमुळे केवळ धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत हे म्हणणे भिसे यांचे असू शकते परंतु ते पूर्णतः निराधार आहे. गणेशभक्त पर्यावरणाबाबत जागृत होत आहेत व म्हणून ते सुद्धा विविध पर्यायांचा शोध घेत आहेत. पर्यावरणप्रेमी हे कोणी दुश्मन नाहीत. परंतु धार्मिक भावनांचा बुरखा पांघरून त्यांना वेगळे पाडणे हे केवळ अश्लाघ्य आहे. तसेच धार्मिक भावनांचा आधार घेऊन सुधारणांना विरोध करून आपला बुरसटलेपणा दाखवणारे आहे. 

‘कुठेही प्रदूषण रोखले जात नाही, असा प्रतिदावा करणारा मतप्रवाह निर्माण झाला आहे’ असे लेखक म्हणतात व त्यास ते सुदृढ लोकशाहीचे लक्षण मानतात. मग त्याच न्यायाने, सुधारणा सुचविणे हे लोकशाहीचे लक्षण नाही काय? पण त्यास तसे न मानणे (व धार्मिक भावना दुखवण्याचे कारण पुढे करणे) हा लेखकांचा दुटप्पीपणा आहे. शाडूची माती वापरणे, मूर्तींची ऊंची, एक गाव एक गणपती या लेखकांच्या सूचना अत्यंत स्वागतार्ह आहेत. परंतु त्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. लेखकांनी हे अभियान जरूर सुरू करावे त्यास पर्यावरणप्रेमी जरूर पाठिंबा देतील. इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो आर आर पाटील (आबा) यांचा. त्यांनी गृहमंत्री असताना एक गाव एक गणपती हे अभियान सुरू केले होते. परंतु या उत्सवात वर्गणीच्या रूपाने मोठ्या प्रमाणात वसूल होत असलेल्या पैशाच्या लोभामुळे म्हणा किंवा बसता उठता ‘धार्मिक भावना’ दुखावल्या जाणार्‍या लोकांमुळे म्हणा, ही मोहीम बारगळली असावी. त्या वेळेस हे लेखक महाराष्ट्रात असते तर ही मोहीम यशस्वी व्हायला त्यांचा नक्कीच हातभार लागला असता. गणपती हे बुद्धीचे दैवत मानले जाते तसेच निसर्गाला सुद्धा आपल्या संस्कृतीत देवता मानले जाते. निसर्ग देवतेचे (पर्यायाने पर्यावरणाचे) संरक्षण करण्यासाठी बुद्धीच्या दैवताने दिलेल्या बुद्धीचा वापर करून, पर्यावरण प्रेमींनी केवळ काही सूचना केल्यामुळे लेखक महोदयांच्या किंवा त्यांच्यासारख्या लोकांच्या भावना दुखावल्या जात असतील तर ते दांभिकतेचे लक्षण नाही काय? छोट्या छोट्या समाजोपयोगी सूचनांमुळे उठसूठ धार्मिक भावना दुखावून घेणारे लोक, जर पर्यावरण प्रेमींनी मूर्ति-विषयक कायदा करण्याची मागणी केली तर कदाचित त्यांच्यावर मॉर्निंग वाक करतांना गोळ्याच झाडतील की हो!

लेखकांनी केलेले मूर्ति विसर्जनाच्या वेळचे वर्णन विपर्यस्त असल्याने त्यावर भाष्य करण्याची गरज नाही. परंतु पर्यावरणप्रेमी द्वारा मूर्तींची विल्हेवाट लावताना त्यांची विटंबना केली जाते असा जो आरोप आहे, त्या पुराव्यात पर्यावरणप्रेमींचा सहभाग नव्हता असे आढळून आले होते. 
विसर्जनासाठी कृत्रिम हौद निर्माण करणे हे काम स्थानिक स्वराज्य संस्थांचे असते. त्यात पर्यावरणप्रेमींचा कसलाही रोल नसतो हे लेखकांना माहितीही नसावे याचे आश्चर्य वाटते.

लेखक महोदयांनी कागदाच्या लगद्याच्या मूर्ति सुद्धा बनवल्या जाऊ नयेत हे आवाहन केले आहे व केवळ शाडूच्या मातीच्या ठराविक उंचीच्याच मूर्ति बनवण्याबाबत जी सूचना केली आहे त्याचे स्वागत करतानाच (आता तर आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा शाडूच्या मूर्ति वापरण्याचे आवाहन केले आहे.) या कामी लेखक महोदयांनी पुढाकार घेऊन सर्व गणेश मंडळांमध्ये जाऊन जागृती निर्माण करावी. सार्वजनिक गणेश उत्सवांचा एक महासंघ असल्याचे सुद्धा ऐकिवात आहे. त्यांनी त्यांच्याकडे जाऊन आपली मागणी ठेवावी व ती पुढे रेटावी. त्यांचे म्हणणे सर्व मंडळांनी व गणेश-भक्तांनी ऐकले तर त्या विषयी कायदा करण्याची सुद्धा गरज भासणार नाही. तसे झाल्यास सामाजिक सुधारणा आणण्यासाठी कायद्याची वाट न पाहता आम्ही स्वतःच त्या सुधारणा अमलात आणू शकतो असा संदेश देशभर व जगभर जाऊन समाजाची प्रगल्भताच सर्वांसमोर येईल. धार्मिक भावना दुखवल्याचा बुरखा पांघरून बाळगलेला पर्यावरणप्रेमींच्या विषयी द्वेषभाव मनात न ठेवता लेखक महोदयांनी एवढे तरी काम करावेच. खरे तर भिसे यांनी या पोस्ट मध्ये चांगल्या बाबी सुचवताना पर्यावरणप्रेमींवर नाहक व बिनबुडाचे आरोप करून एका चांगल्या विषयाला स्वतःच गालबोट लावले आहे असे नाइलाजाने म्हणावेसे वाटते.
-चला उत्तर देऊ या टीम

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?