प्रत्येक वर्षी दसऱ्या नंतर बरोबर २१ दिवसांनंतरच दिवाळी का येते?

प्रत्येक वर्षी दसऱ्या नंतर बरोबर २१ दिवसांनंतरच दिवाळी का येते? विश्वास नसेल तर कॅलेंडर चेक करा, वाल्मिकी ऋषी सांगतात की प्रभु श्रीराम यांना व सर्व सैन्याला श्रीलंकेतून अयोध्येत पायी चालत पोहोचायला २१ ( एकवीस दिवस म्हणजे 504 तास, ) दिवस लागले !!!! म्हणजे 504 तास / भागीले 24 तास करा उत्तर येईल 21.00 म्हणजे 21 दिवस!

मला ही आश्चर्य वाटले. काहीतरीच सांगत असतील म्हणून सहज कुतूहल म्हणून गुगल मॅपवर सर्च केले *श्रीलंका ते अयोध्या पायी अंतर 3145 व वेळ 504 पाहून मला धक्काच बसला!* 

गुगल मॅप हे हल्ली आलेय पूर्ण विश्वसनीय आहे. आपण तर दसरा व दिवाळी ही (त्रेतायुग) पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार साजरी करतो. त्यामागील वेळेचे तथ्य आज पटले आहे. तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर गुगल सर्च करुन पहा व इतरांना ही माहीती सांगा. वाल्मिक ऋषींनी तर आधीच रामायण लिहुन ठेवले आहे तर त्यांचा भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज किती अचुक होता! *आपली हिंदु संस्कृती किती महान आहे!* *गर्व असु द्या, हिंदुसंस्कृतीत जन्म झाल्याचा...!*
*।। जय श्रीराम ।। ।। जय श्रीराम ।।*
 *खूप इंटरेस्टिंग आहे ना?*

या बुद्धिभेद करणाऱ्या भ्रामक पोस्टला Uttam Jogdand यांनी दिलेले हे उत्तर...

दसर्‍या नंतर २१ दिवसांनी दिवाळी येणे यात अविश्वसनीय काय आहे? साधे कॅलेंडर आहे ते. २१ दिवसात प्रभू राम अयोध्येत पोहोचले म्हणजेच ५१५ तासात पोहोचले हे साधे परंतु चुकीच्या आधारावर सोडवलेले गणित आहे. पण एकदा का बावळट व्हायचे, डोके गहन ठेवायचे ठरवले की या बाबी आश्चर्यकारक वाटणारच. म्हणून गुगलमॅप वरील श्रीलंका (म्हणजे नक्की कुठून?) ते अयोध्या हे २५८९ किमी अंतर पायी २१ दिवसांचेच आहे हे वाचून धक्का बसणारच! आणि अशा बुद्धीहीन लोकांच्या मनात पुढील साध्य व रास्त शंका येणे दूरच!! 
१) प्रभू राम श्रीलंकेतून अयोध्येला रावणाच्या पुष्पक विमानाने आले होते ना? मग त्यांचे विमान एवढे स्लो होते का की या प्रवासाला २१ दिवस लागावेत? की ते पुष्पक विमानाने आले हे खोटे आहे?  
२) आता त्या पोस्ट-कर्त्याचा ‘संस्कृती-महानतेचा’ कंडू शमविण्यासाठी प्रभू राम पायीच श्रीलंकेतून अयोध्येला आले असे खोटे खोटेच गृहीत धरू या.  तसे असेल तर, गुगल वरील २१ दिवसांची वेळ ही सलग म्हणजे दिवसाचे २४ तास चालल्यास लागू होते. मग प्रभू राम, सीतामाता व सैनिक रात्री विश्रांति न घेता (आणि प्रातर्विधी, जेवण वगैरे साठी ब्रेक न घेता!) २४ तास चालतच होते काय?
३) जर प्रभू रामांनी रात्री विश्रांति घेतली असेल, प्रातर्विधी व जेवण यासाठी वेळ दिला असेल (सगळ्या सैनिकांचे जेवण बनवायला पडाव तर टाकावा लागेलच! नुसते रामाचे नाव घेऊन भूक पळणार नाही!), तर त्याच वेगाने हे अंतर पार करायला ४२ दिवस किंवा अधिक वेळ लागणार नाही का? किंवा २१ दिवसात (रात्री विश्रांति घेऊन) हे अंतर पार करायचे तर स्पीड डबल करावा नाही लागणार का?
४) त्यांच्याकडे हनुमानासारखा, लाखो किलोमीटर दूर असणार्‍या सूर्याकडे उडत जाऊन त्याला गिळणारा, हजारो किलोमीटर दूर अंतरावरून पर्वतच उचलून आणणारा सेवक असतांना, त्याच्या खांद्यावर बसून एका उड्डाणात भुर्र्कन अयोध्येला पोहोचायच्या ऐवजी प्रभू राम सपत्नीक व सैंनिकांसह चालत का राहिले? 
५) श्रीरामाबरोबर सैन्य कुठले होते? वनवासात तर त्यांच्या सोबत सेना नव्हती. नंतर भेटलेली वानरसेना, आपले गाव सोडून अयोध्येला प्रभू राम यांच्या सोबत का गेली?

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?