'हिंदू सण आणि स्वघोषित लिबरलांचे अरण्यरुदन' या शेफाली वैद्य यांच्या व्हायरल होत असलेल्या लेखाला उत्तर. उत्तर त्यांच्याच लेखामध्ये कंसात दिले आहे. खाली आहे त्यांचा व्हायरल होत असलेला लेख जसाच्या तसा आणि त्याला उत्तर कंसामध्ये.

एक काळ असा होता जेव्हा वर्षभराचे हिंदू सण कुठल्या दिवशी येतात हे बघण्यासाठी मला  कालनिर्णय विकत घ्यावं लागायचं. पण सोशल मीडियावर सध्या स्वघोषित लिबरलांचा इतका सुळसुळाट झालाय की हल्ली मला ट्विटर आणि फेसबुकवरून सगळं पंचांग समजतं. 'सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे, पाणी वाचवा' हा संदेश त्याच त्या भेगा पडलेल्या मातीच्या पार्श्वभूमीवर डोळ्यांवर हात ठेवून आभाळ न्याहाळणाऱ्या शेतकऱ्याच्या श्वेतशाम चित्रसकट जिकडे तिकडे  फिरायला लागला की समजावं, 'अरे वा, होळी महिन्यावर आली वाटतं'. मागे एका इंग्रजी मध्ये लिहिणाऱ्या पत्रकार जोडप्यामधल्या पतीने, 'ह्या वर्षी कोरडीच होळी खेळ हो, पाण्याचा किती दुष्काळ आहे' वगैरे टाहो ट्विटरवरून फोडला होता. त्याच्या दुर्दैवाने त्याच्या दोन-तीन दिवसच आधी त्याच्या बायकोने 'किती गरमी आहे ह्या वर्षी, पण माझ्या मोठ्या खासगी स्विमिंगपूल मध्ये थोडा वेळ पोहायला गेलं की कसं रिफ्रेशिंग वाटतं', ह्या अर्थाचं ट्विट केलं होतं. म्हणजे स्वतःच्या आलिशान घराच्या स्विमिंग पूल मध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी केली तरी चालते, पण इतरांनी मात्र होळीसाठी बादली भर पाणी घेतलं तरी ती पाण्याची अक्षम्य उधळपट्टी असते. *(खोटेपणा हा धर्मांधांचा स्थायीभावच असतो. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. हे पत्रकार जोडपे आणि त्यांचे twit खरे असते तर त्या जोडप्याचे नाव सांगायला काय अडचण होती? पुराव्यासाठी त्या twitचा स्क्रीनशॉट सुद्धा देता आला असता. पण धर्मांधांमधील अंगभूत खोटेपणा असे करून देत नाही.)* हे असलेच लोक जिथे जिथे सीलबंद पाण्याच्या बाटल्या विकत घेतात आणि एक-दोन घोट घेऊन उरलेलं पाणी बाटलीसकट खुशाल फेकून देतात, आणि वर इतरांना अनमोल सल्ले  देतात की पाणी कसं नासू नये. *(हा सर्वे कुठे केला? कुठून माहिती मिळवली? काहीही आधार नाही. हीही थापच आहे. आता कुणीही मी सांगतो त्या पद्धतीचे सर्वेक्षण करावे. आपल्या जवळचे बस स्थानक निवडावे. आणि तिथे अशा पद्धतीने सीलबंद पाणी बाटलीतले पाणी वाया घालवणारे लोक शोधावेत आणि त्यांची विचारसरणी तपासावी. त्यात एक टक्का तरी पुरोगामी लोक सापडतात का बघावे.)*  त्यातही हिंदू सणांवर ह्या असल्या स्वतःला पुरोगामी वगैरे म्हणवणाऱ्या लोकांचा खास राग असतो. प्रत्येक हिंदू सणाच्या वेळेला हा जळफळाट दिसतोच आपल्याला. *(आपले मुल दारूच्या आहारी जात असेल तर आपल्याच मुलाला समजावून सांगावे लागते. शेजाऱ्याच्या मुलाला 'गुटखा खाऊ नको' म्हणून चालत नसते.)*

नवऱ्यासाठी उपास करणं हे अमानुषपणाचं आहे', *(उपासाला 'अमानुष' हा शब्द वापरलेला एकही पुरोगामी मला तरी सापडला नाही.)* असले जळजळीत स्त्रीवादी वगैरे संदेश पुरोगाम्यांच्या फेसबुक भिंतींवर झळकायला लागले की समजावं 'करवा चौथ किंवा वटसावित्री' आलीच पुढच्या पंधरवड्यात! 'मंगळसूत्र घालणं ही मानसिक गुलामगिरी आहे' म्हणणारे हेच लोक 'बुरखा घालणं हा मुसलमान स्त्रीचा वैयक्तिक प्रश्न आहे' हे ही तितक्याच जोरकसपणे सांगत असतात हे महत्वाचे. *(हेही खोटेच. उलट बुरखा पद्धती ही महिलांच्या गुलामीची निदर्शक आहे हे पुरोगामी लोकांनीच ठासून सांगितले आहे.)*  दसरा-दिवाळीच्या वेळेला तर अश्या लोकांच्या अंगभर पुरोगामित्वाचे पुरळ येते. मग 'राम हा रामायणाचा खरा हिरो नाहीच, रावणच कसा ग्रेट होता' , 'नवरात्राचा खरा अर्थ महिषासुराच्या पूजेत आहे, तोच खरा मूलनिवासी' असले दिव्या साक्षात्कार होतात. 

 दिवाळी म्हणजे तर काय, पुरोगामी अरण्यरुदनाचे सुवर्णपर्वच! अगदी 'फटाके लावू नका, गोड खाऊ नका' ह्यापासून सुरु होऊन पार 'पाडव्याला नवऱ्याला आणि भाऊबीजेला भावाला ओवाळू नका' इथपर्यंतचे उद्बोधक पुरोगामी संदेश सर्दीत नाकातून अखंड शेंबूड गळावा तसे ह्या पुरोगामी वगैरे लोकांच्या वॉलवरून सतत गळत असतात. *(हे सगळे काही इतर धर्मीय लोकही आहेत, जे तुमच्यासारखेच दुसऱ्या धर्मावर टीका करायलाच बसलेले असतात, ते आहेत. त्यांना पुरोगाम्यांच्या पंक्तीत बसवू नका.)* वर 'दिवाळीला एवढे पैसे खर्च करायची काय गरज आहे, ते पैसे वाचवून सामाजिक कार्याला द्यावेत. देवळात हुंडीत पैसे घालायची काय गरज आहे, ते पैसे वाचवून गरिबांना द्यावेत' वगैरे शहाजोगपणाचे किरकोळ फुकटचे सल्ले घाऊक प्रमाणात दिलेले असतातच. मजेची गोष्ट अशी की हे सल्ले देणाऱ्या ह्या लोकांपैकी बहुतेक लोक स्वतः कधी देवळात जात नाहीत आणि चुकून कधी गेलेच तर दहा रुपयांपेक्षा जास्त पैसे हुंडीत टाकायची त्यांची दानतही नसते आणि औकातही नसते. *(तुम्ही कधी बघितले? नुसत्याच हवेत गोळ्या मारायच्या का? कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगेबाबा, क्रांतिसिंह नाना पाटील, बाबा आमटे, प्रकाश आमटे, अभय बंग आणि अशा कित्येक पुरोगामी लोकांनी केवळ पैसेच नव्हे तर आपले सगळे जीवनच समाजासाठी अर्पण केले आहे. आणि औकातबाबत पुढच्या परिच्छेदात उत्तर देत आहेच.)*  पण सर्वसामान्य भाविक हिंदू माणसाला फुकटचे उपदेश करायला कुणाचं काय जातंय?

'दिवाळीला एवढे पैसे खर्च करायची काय गरज आहे' हा ज्वलंत, सामाजिक प्रबोधनपर संदेश ह्यातले बरेच लोक स्टारबक्स वा केफे कॉफी डे मध्ये अडीचशे रुपयांची कॉफी पीत आपल्या साठ हजार रुपये किमतीच्या आय-फोनवरून टाईप करत असतात हे विशेष. *(हेही खोटे. पुरोगामी चळवळीतील बहुसंख्य कार्यकर्ते खेड्या-पाड्यातील आहेत. मी स्वतः खेड्यात राहतो. आणि मी अजून आय-फोन बघितलाही नाही. आणि वरील परिच्छेदात दहा रुपये देऊ न शकणारे म्हणजे औकात नसणारे लोक अडीचशे रुपयांची कॉफी कशी काय पितात? एक तर त्यांची औकात नसेल किंवा एक तर अडीचशे रुपयांची कॉफी पीत नसतील. दोन्हीपैकी कोणतीतरी एकच गोष्ट खरी असायला हवी. शिव्यादेण्याच्या नादात आपण काय बोलत आहोत याचेही लेखिकेला भान राहिले नाही.)* असे ह्यांना जर कुणी विचारलं की 'एवढी महाग कॉफी प्यायची काय गरज आहे? ते पैसे वाचवून तुम्ही सामाजिक कार्याला का नाही देत?' तर लगेच, 'आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेला हा घाला आहे हो' असे म्हणून हे तथाकथित पुरोगामी गळे काढायला मोकळे.

मला व्यक्तिशः आपले हिंदू सण साजरे करणं मनापासून आवडतं. अगदी दिवाळी, दसऱ्यापासून ते रक्षाबंधनापर्यंतचे सगळे हिंदू सण मी आवडीने माझ्या कुटुंबियांसह साजरे करते. कालानुरूप सण साजरे करायच्या पद्धतीमध्ये बदल होतोच आणि ते अगदी साहजिकच आहे. काही काही वेळेला काळाच्या ओघात सण साजरा करायचा मूळ उद्देश्य मागे पडलेला आहे हेही खरेच आहे. हिंदू संस्कृती ही मूलतः निसर्गपूजकच आहेत. सर्व सृष्टी ही त्या सर्वशक्तीमान परमेश्वराने माणसाला तिचा उपभोग घेता यावा म्हणून बनवली आहे असे हिंदू लोक मानत नाहीत. आपण निसर्गाचा सन्मान करतो. आपल्या सगळ्या सणा-समारंभांमध्ये ऋतुचक्राचा, निसर्गाचा आदरच केलेला आहे.

दिवाळीपासून थंडीचा मौसम सुरु होतो म्हणून तेल लावून अभ्यंगस्नान करायचं. होळीला हिंवाळा संपतो, वसंत सुरु होतो, म्हणून शेवटची शेकोटी पेटवायची आणि वसंताचे रंग खेळायचे. गणेशचतुर्थीला गणपतीची मृण्मय मूर्ती घरी आणायची, तिची पूजा करायची आणि तिचं विसर्जन करायचं, कारण आपण पंचमहाभूतांपासून जन्मून परत त्यांच्यातच विलीन होणार. जेवण केळीच्या पानावर करायचं, शाकाहारी करायचं, उरलंसुरलं त्याच केळीच्या पानात गुंडाळून गाईच्या तोंडात द्यायचं हे आजही भारतात अनेक ठिकाणी होत असतं. आज 'गो ग्रीन' 'गो ग्रीन' म्हणून ज्या चळवळीचे गोडवे पाश्चात्य देशात गेले जातात, ते तर आपण शतकानुशतके करत आलेलो आहोत. परवाच मी एका परदेशी विद्यापीठाचा ट्विट वाचला, त्यांनी चक्क पत्रावळीचे फोटो दिले होते आणि म्हटलं होतं की 'ही पर्यावरणपूरक पद्धत आम्ही शोधून काढलीय'. *(विद्यापीठाचे नाव सांगायचे धाडस नाही. खोटे बोलायचे म्हटल्यावर असेच बोलावे लागते.)* अहो ही पर्यावरणपूरक पद्धत ह्या देशात शेकडो वर्षांपासून होती आणि आजही अस्तित्वात आहे. थंडीत तीळ आणि गूळ शरीराला पचतो, पौष्टिक असतो म्हणून संक्रांतीच्या वेळेला तिळगुळ खायचे. गणपतीच्या सुमारास गोव्यात नवीन धान्य तयार होतं म्हणून देवापुढे भाताच्या लोंब्या ठेवून त्यांची पूजा करायची. *(गणपती काय फक्त गोव्यातच बसवतात का?)* वडाचं झाड हवेत प्राणवायू सोडतं, त्याचं रक्षण करता यावं म्हणून वटसावित्रीला त्याचं पूजन करावं. *(मग वडाच्या झाडांची संख्या का कमी होतेय? मुळात हा सण सुरु झाला त्या काळात वडाच्या झाडाला रक्षणाची गरजच नव्हती. आणि बाकीची झाडे काय कार्बन डायऑक्साईड सोडतात का? बाभळीच्या पूजनाचा एखादा सण का नाही?)* पिंपळ, औदुंबर ह्यासारखे वृक्ष सहसा तोडू नयेत अशी शिकवण हिंदूंना लहानपणापासूनच मिळते. माझी मुलं आजही चुकून पुस्तकाला पाय लागला तर नमस्कार करतात कारण पुस्तकात सरस्वतीचा वास असतो अशी हिंदूंमध्ये श्रद्धा आहे.

 'गो ग्रीन' वगैरे घोषणांची आपल्या पूर्वजांना कधी गरज भासली नाही कारण त्यांची पूर्ण जीवनशैलीच निसर्गाला पूरक, निसर्गपूजक अशीच होती. कालांतराने सण साजरे करायच्या पद्धतीत फरक पडला. त्याच बराच अनावश्यक फाफटपसाराही आला. त्यात बदल व्हायलाच पाहिजेत. पण ते बदल करणं म्हणजे आपल्या परंपरेपासून दूर जाणं नव्हे. आपल्याला खरोखरच आपले सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करायचे असतील तर आपण आपल्या परंपरांकडे परत गेलं पाहिजे.  *(मग पुरोगामी लोक काय सांगत आहेत? हेच तर सांगत आहेत. मग एवढे आकांडतांडव आणि शिव्याशाप कशासाठी?)*

सध्या एकूणच हिंदू परंपरांना, हिंदू सणांना, हिंदू चालीरीतींना, प्रतिकांना सरसकट नावे ठेवणे हेच पुरोगामित्वाचे एकमेव लक्षण आहे असे समीकरण झालेले आहे. *(तसे अजिबात नाही.)* "फेस्टिवलशेमिंग" हा त्याचाच एक प्रमुख भाग. सरसकट हिंदू सणांवर टीका करून हिंदूंना त्यांच्या चालीरीतींबद्दल, त्यांच्या परंपरांबद्दल शरम वाटायला लावणे आणि हळूहळू हिंदूंना त्या परंपरांपासून तोडणे हा एक खास पुरोगामी म्हणवणाऱ्या लोकांचा कावा आहे आणि त्याच्याकडे आपण अजिबात लक्ष द्यायची गरज नाही. *(पुरोगामी लोक सण विधायक पद्धतीने साजरा करावे म्हणतात. सण साजरे करूच नका असे कोणत्याही पुरोगामी व्यक्तीने म्हटलेले नाही. वटपौर्णिमे सारखे विषमता आणि अंधश्रद्धा जोपासणारे सण सुद्धा वटवृक्ष लावून विधायक पद्धतीने अनेक साजरा करण्यात पुरोगामी लोकांनीच लोकांनीच पुढाकार घेतला आहे.)*

तुमच्या वैयक्तिक मूल्यपद्धतीप्रमाणे आपले सण साजरे करायची पद्धत जरूर बदला पण हिंदू सण साजरे करूच नका कारण ते वाईट आहेत असं जर कुणी तुम्हाला सांगितलं तर ते मुळीच ऐकून घेऊ नका. *(तसे पुरोगामी लोक अजिबात सांगत नाहीत.)* मी स्वतः सगळे हिंदू सण आवर्जून आणि दणक्यात साजरे करते. दिवाळीला माझी मुलं दिवसभर खपून ओल्या मातीचा  किल्ला बनवतात. आमचा आकाश कंदील कागदाचा, हाताने तयार केलेला असतो. फटाके असतात पण अस्सल भारतीय बनावटीचे आणि कमी आवाज करणारे. *(फटाके भारतीय आहेत का? हिंदू धर्मात फटाके वाजवण्याची पद्धत होती का?)* मातीच्या पणतीचा मंद, सौम्य, तेवता उजेड मला फार आवडतो त्यामुळे मी पणत्या खूप लावते दिवाळीत आणि विजेचे दिवे कमी लावते. दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा सण आहे, त्यामुळे त्या निमित्ताने सामाजिक काम करणाऱ्या काही संस्थांना आम्ही दरवर्षी यथाशक्ती मदत करतो. केवळ घरी किंवा सोसायटीत काम करणाऱ्या लोकांनाच नाही तर इतरही बऱ्याच लोकांना आमच्या दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेतो. *(पुरोगामी लोक सुद्धा हेच करतात.)* इतर वर्षभर मी विजेचा अपव्यय करत नाही किंवा पाणीही व्यर्थ वाया घालवत नाही, उलट यथाशक्ती झाडे लावून आणि पावसाचे पाणी मातीत जिरेल असं बघून मी पाण्याचे नियोजनही करते. *(आम्हीसुद्धा वर्षभर हे करतो. हे करणे आपले कर्तव्यच आहे.)* त्यामुळे होळीला माझ्या मुलांनी तीन-चार बादल्या पाणी होळी खेळायला घेतलं तर मला त्यात काहीही वावगं वाटत नाही. मुलं वापरतात ते रंग फुलांपासून, हळदीपासून, मेंदीपासून  केलेले असतात त्यामुळे ते रंगमिश्रित पाणी शेवटी बागेतच मुरतं.  *(दुष्काळी भागात जाऊन हे करून दाखवा. शेजारच्या घरात माणूस वारलेला असताना आपण आपल्या घरात सण साजरा करत नाही. किंवा आनंदोत्सव साजरा करत नाही. यालाच माणुसकी म्हणतात. तसेच आपल्याच राज्यातील, देशातील एखादा भाग पाण्यासाठी तडफडत असताना आपण पाण्याची उधळपट्टी करणे माणुसकीला काळिमा फासण्यासारखे नाही का?)*

रक्षाबंधनाच्या दिवशी माझी मुलं आणि मुलगी एकमेकांना राखी बांधतात कारण रक्षण तिघांनाही एकमेकांचं करायचं असतं. नवरात्रात मी जेव्हा देवीची, शक्तीची सरस्वतीची उपासना करते तेव्हा माझ्या लेकीत मला निर्भय, समर्थ, कुठल्याही राक्षसाच्या निर्दाळनाला सज्ज अशी देवी दिसते. माझ्या धर्माबद्दल, माझ्या परंपरांबद्दल मला अभिमान आहे. हिंदू हा सदैव काळाबरोबर बदलत आलेला आहे. *(मग बदल घडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या नावे खोटी माहिती का पसरवताय?)* आमचे सण आम्ही कसे साजरे करू, त्यात काळानुरुप बदल कसे करू ही जबाबदारी सामान्य हिंदूंची आहे. *(आम्ही हिंदू नाही आहोत का? धर्माची सर्टिफिकेट्स वाटण्याचा तुम्हाला ठेका दिला आहे का?)* धर्माशी, आपल्या परंपरांशी काही देणे घेणे नसलेल्या तथाकथित स्वघोषित पुरोगामी लोकांकडून धडे घेण्याची हिंदूंना गरज नाही. हिंदू धर्माच्या सर्व परिवर्तनवादी चळवळी ह्या स्वधर्माविषयी कळकळ असणाऱ्या हिंदूंनीच घडवून आणलेल्या आहेत आणि ह्यापुढेही ते तसेच राहील. *(तुमची कळकळ दिसली. हिंदूंनी मागासलेले राहावे अशी तुमची विचारसरणी हिंदूंच्या अवनतीला कारणीभूत ठरली आहे. आता तरी शहाणे व्हा.)*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य