मुलींसाठी पहिली शाळा कोणी काढली?

 


*एका सोनाराचा दाबलेला इतिहास....*

ब्राह्मणद्वेषापायी आपल्या शाळेत कोणीतरी फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली असे शिकवले जाते आणि खरा इतिहास लपवला जातो.

सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा काढण्यापूर्वी दोन वर्षे मुंबईमध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांनी मुलींसाठी शाळा काढलेली होती या शाळेत सर्व जातीजमातीच्या मुलींना प्रवेश होता गेल्या २५० वर्षात भारतात अलौकिक चारित्र्याची व कर्तुत्वाची जी माणसे होऊन  गेली त्या सर्व मंडळीमध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांचे इतका प्रचंड माणूस कोणीही दाखवता येणार नाही १८३२ साली त्यांनी Bombay Education Society काढली आणि पुढे एलीफेस्टॅन कॉलेज काढले १८४५ साली students literrary and scientific society ची स्थापना केली आणि स्वतःच्या घरात मुलींची शाळा काढली हि शाळा काढल्याबद्दल लोकांनी त्यांना सळो कि पळो करून टाकले Grant Medical College काढले मुंबई विद्यापीठ स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता पहिली भारतीय रेल्वे सुरु करण्यात नानांचा मोठा सहभाग होता स्त्रियांसाठी सूतिकागृहाची उभारणी केली ख्रिश्चन धर्माचे आक्रमण थोपवून धरले मुंबईत पहिली सूत गिरणी काढली मराठी व संस्कृत भाषण प्रतिष्ठा मिळवून दिली पुण्याची संस्कृत पाठशाळा बंद करण्याचा डाव उधळून लावला हि फक्त नानांची शैक्षणिक क्षेत्रातील कामे या व्यतिरिक्त प्रचंड कामे केली १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात क्रांतिकारकांना आश्रय दिला अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला मॉरिशसहून उसाचे बेणे आणून त्याची प्रथम लागवड केली Municipal Act पास करून घेवून BOMBAY Municipal council ची स्थापना केली पहिले Grand jury मध्ये त्यांचा समावेश होता Royal Asiatic Society चे जे प्रचंड ग्रंथालय आहे त्याच्या निर्मितीत त्यांचा मोठा सहभाग होता अस्पृशांच्या मुलांना समान वागणूक शाळांमधून मिळावी यासाठी त्यांनी चळवळ केली.

#परंतु जातीयवादी महाराष्ट्रात त्यांची महापुरुषात गणना होत नाही कारण ते दैवज्ञ ब्राह्मण आहेत.

#मुंबईचे_शिल्पकार

मुंबईने ज्यांना श्रीमंत केले असे लक्षावधी लोक आपल्याला सापडतील , पण आपल्या कर्तृत्त्वाने आणि दातृत्वाने ज्यांनी मुंबईला श्रीमंत केले असे अगदीच मोजके. नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ हे त्यातील अग्रगण्य नाव. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत, नानांनी या मुंबईत चोख व्यापार केला. उदंड पैसे कमाविले आणि कमाविलेल्या या पैशाचे फक्त उंच इमले न बांधता त्यातून समाज घडविणाऱ्या संस्था उभ्या केल्या. नानांनी उभारलेल्या संस्था पाहिल्या की आजही आवाक् व्हायला होते. आज नानांच्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांच्या या खऱ्याखुऱ्या श्रीमंतीचे मॉडेल समजून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.

नानांचा काळ (१८०३-१८६५) हा इंग्रजाविरुद्ध सुरू झालेल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या आधीचा काळ. मुंबई हे शहर म्हणून आकाराला येण्याचा हा कालावधी. समुद्री व्यापारामळे हे शहर घडत होते आणि रोजगाराची संधी शोधण्यासाठी लोक या शहरात येत होते. नानांचे कुटुंब या अशा मुंबईत येणाऱ्या लोकामधील अगदी सुरुवातीला आलेल्यामधले लोक म्हणायला हवे. नानांचे पूर्वज बाबूलशेठ मुरकुटे अठराव्या शतकात कोकणातून मुंबईत आले. मुंबईच्या आघाडीच्या व्यापाऱ्यांमध्ये त्यांची गणना होत असे.

नानांचे वडील शंकरशेठजी ईस्ट इंडिया कंपनी व इंग्रजांचेही सावकार होते. सन १८०० मध्ये त्यांची एकूण संपत्ती १८ लाख रुपयांच्या घरात होती, असे संदर्भ सापडतात. नानांची आई लहानपणीच गेली. त्यामुळे वडिलांनीच त्यांना मोठे केले. त्यावेळच्या पद्धतीनुसार घरीच मास्तर येऊन नानांना भारतीय आणि इंग्रजी असे दोन्ही पद्धतीचे शिक्षण मिळाले. त्यामुळे मराठी, संस्कृत आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांवर नानांचे प्रभुत्व होते. या ज्ञानाचा उपयोग करून नानांनी आपला व्यापार यशाच्या शिखरावर पोहचविला.

ज्या शिक्षणाने आपण घडलो ते शिक्षण आज सर्वांना सहज उपलब्ध नाही, हे नानांनी जाणले होते. त्यासाठीच शिक्षण सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न नानांनी सुरू केले. देशातील मुलांना उत्तम शिक्षण मिळायला हवे यासाठी सुरू झालेल्या ‘नेटिव्ह स्कूल सोसायटी’ नावाच्या पश्चिम भारतातील पहिल्यावहिल्या शिक्षणसंस्थेचे नाना संस्थापक होते. याच संस्थेने पुढे मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरला. अर्थातच त्यावेळी त्याला सनातनी लोकांकडून विरोध झाला. नानांनी हा आपल्या अधिकाराने हा विरोध मोडून काढत आपल्या घरात मुलींची शाळा सुरू केली. आजही नानांची ही शाळा ‘स्टुडंट्स लिटररी अ‍ॅण्ड सायंटिफिक सोसायटी’च्या रुपाने गिरगावात आपले अस्तित्व टिकवून उभी आहे.

एखादा समाज किंवा शहर उभे राहते ते संस्थांच्या जोरावर. समाजातील संस्था जेवढ्या ताकदीच्या, तेवढा तो समाज बलवत्तर म्हणून ओळखला जातो. ऑक्सफर्डसारखे शहर तिथल्या विद्यापीठामुळे ओळखले जाते, तर न्यूयॉर्कमधला शेअर बाजार जगातील सर्वात मोठा ठरतो. या अशा संस्था शहरे घडवित असतात. हे नानांमधल्या दूरदृष्टीच्या शिल्पकाराने जाणले होते. म्हणूनच मुंबईच्या जडणघडणीच्या काळात नानांनी दीर्घकाळ टिकतील, समाजाला समृद्ध करतील अशा संस्थांच्या उभारणीकडे याकडे प्रामुख्याने लक्ष दिले. नानांचे हे संस्थाकारण आज पुन्हा एकदा समजून घ्यायची वेळ आली आहे.

१८१९ मध्ये माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन मुंबई इलाख्याचे गव्हर्नर झाले. नानांची आणि एलफिस्टन यांची ओळख झाली. एलफिस्टन यांच्या शिक्षणविषयक कामांमध्ये नानांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले. या दोघांच्या प्रयत्नातून १८२२ मध्ये ‘मुंबईची हैंदशाळा आणि शाळापुस्तक मंडळी’ची स्थापना झाली. सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण न्यायचे असेल, तर ते मातृभाषेतून दिले जावे याबद्दल दोघांचेही एकमत होते. त्यामुळेच मराठी, गुजराती व हिंदी भाषांमध्ये प्रथमच क्रमिक पाठय़पुस्तके छापली गेली.

१८२७ मध्ये एल्फिन्स्टन इंग्लंडला परत जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्या सत्कारासाठी जो निधी गोळा केला गेला, त्यातून एल्फिन्स्टन कॉलेज सुरू झाले. याच एल्फिन्स्टन महाविद्यालयामधून दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे यासारख्या विद्वानांची पहिली पिढी तयार झाली. याच पिढीने नवे शिक्षण घेऊन समाजात नवा विचार रुजविला. या नव्या विचाराने पुढे काँग्रेसची स्थापना झाली आणि देशाचा स्वातंत्र्यलढा उभारला गेला. त्यामुळे आजच्या आधुनिक भारताची मुळे शिक्षणाच्या प्रसारात आणि नानांसारख्यांच्या दूरदृष्टीत आहे, हे विसरून चालणार नाही.

महिलांच्या शिक्षणाप्रमाणेच सतीच्या अमानुष प्रथेविरोधातही नानांनी आपला विरोध नोंदविला. सतीबंदीसाठी १८२३ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटकडे जो अर्ज करण्यात आला होता, त्यावर राजा राममोहन रॉय आणि जगन्नाथ शंकरशेठ यांच्या प्रमुख सह्या होत्या. या सतीबंदीमुळे मुंबई इलाख्यात सनातन्यांकडून काही प्रतिक्रिया उमटली तर नाना ते सांभाळून घेतील, यावर इंग्रजांचा विश्वास होता. म्हणूनच डिसेंबर १८२९ मध्ये लॉर्ड बेंटिकने सतीबंदीच्या कायद्यावर सही केली आणि हजारो वर्षांच्या क्रूर प्रथेचे उच्चाटन झाले. फक्त लोकानुनय करून नव्हे तर, प्रसंगी कटू वाटतील पण भविष्यवेधी असतील असे ठोस निर्णय समाजाच्या नेत्याला घ्यावे लागतात, हेच नानांच्या सतीबंदीच्या वेळच्या वागण्यातून स्पष्ट झाले.

१८४५ मध्ये एतद्देशीयांच्या भागीदारीने पश्चिम भारतात वाफेच्या बोटींचा पाया घालणारी ‘द बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनी’ उभारण्यात नानांचा पुढाकार होता. त्याच वर्षी जे. जे. रुग्णालय आणि ग्रँट मेडिकल महाविद्यालय, १८५१ मध्ये संस्कृतचे शिक्षण सर्वांसाठी खुले करणारे ‘पूना संस्कृत कॉलेज’ (आजचे डेक्कन कॉलेज), १८५५ मध्ये पहिले कायदा महाविद्यालय, १८५७ मध्ये मुंबई विद्यापीठ (बॉम्बे युनिव्हर्सिटी) आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, १८६२ मध्ये व्हिक्टोरिया गार्डन (आजची राणीची बाग) अशा महाकाय संस्थांच्या स्थापनेत नानांनी आपला सिंहाचा वाटा उचलला. याव्यतिरिक्त शासकीय मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय, मर्कटाइल बँक, सेंट्रल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया सारख्या बँकांच्या उभारणीतही नानांनी प्रयत्न केले. एकंदरित या कालावधीत मुंबईत झालेल्या शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, आर्थिक बदलावर नानांनी आपला ठसा उमटविला.

१६ एप्रिल १८५३ रोजी आशियातील पहिली रेल्वे बोरिबंदर ते ठाणे अशी धावली. या रेल्वेसाठी नानांचे प्रयत्न महत्वाचे होते. म्हणूनच या पहिल्या रेल्वेप्रवासात जे काही मोजके मान्यवर होते, त्यात नानांचाही समावेश होता. एवढेच नव्हे तर बोरिबंदर स्थानकाच्या इमारतीवर (आजचे सीएसएमटी) आजही ज्या एकमेव भारतीयाचा पुतळा आहे, तो नानांचा. रेल्वेमुळे मुंबईत आधुनिकता धावू लागली आणि या शहराचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला, हे कोणीच नाकारू शकत नाही.

भारतीयांच्या समस्या इंग्लंडपर्यंत पोहाचाव्या यासाठी १८५१ मध्ये ‘बॉम्बे असोसिएशन’ नावाची पश्चिम भारतातील पहिली राजकीय संस्था स्थापन झाली. या संस्थेचे ‘प्रतिष्ठित’ अध्यक्ष म्हणून जमशेठजी जेजीभाई, तर अध्यक्ष म्हणून जगन्नाथ शंकरशेठ यांना निवडले गेले. या संस्थेतर्फे ब्रिटिश पार्लमेंटकडे सुधारणांसाठीचे अर्ज केले गेले आणि ते मंजूरही झाले. १८५७ च्या उठावात क्रांतिकारकांना मदत केल्याचा आरोप नानांवर झाला. त्यात नानांची चौकशीही झाली. पण काही पुरावे न आढळल्याने त्यांच्यावर कारवाई मात्र झाली नाही.

पुढे १८६१ साली लेजिस्लेटीव कौन्सिलमध्ये एतद्देशीय स्थान देण्याचे ठरले तेव्हा या परिषदेचा पहिले सदस्यत्व नानांनाच मिळाले आणि नाना अधिकृतरित्या भारतीयांचे प्रतिनिधी झाले. याच बॉम्बे असोसिएशनचे रूपांतर १८८५ मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये झाले. पुढे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या सभासदांनीच गोवालिया टँक येथे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली आणि स्वातंत्र्यलढ्याला अधिकृतरित्या सुरुवात झाली.

नानांच्या मालकीची प्रचंड मोठी जमीन मुंबईत होती. असे म्हणतात की आजच्या मरिन लाइन्स ते मलबार हिल परिसरात ही जमीन होती. नानांनी ही जमीन शहराच्या उभारणीसाठी दिली. त्यावेळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची योग्य ती व्यवस्था शहरात नव्हती. नानांनी स्वतःची जमीन त्यासाठी दिली, अंत्यविधीसाठी लागणारी व्यवस्था तेथे लावून दिली. आजही त्याच नानांच्या मालकीच्या जागेवर मरिन लाइन येथील जग्गनाथ शंकरशेठ स्मशानभूमी उभी आहे.

नानांनी उभारलेले हे काम पाहिले की आपल्याला यासाठी एक जन्म पुरणार नाही असे वाटत राहते. पण नानांनी आपल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा आणि श्रीमंतीचा उपयोग समाजासाठी केला. जेवढे या शहराकडून घेतले, त्याच्या कैकपटीने या शहराला, समाजाला परत दिले. म्हणूनच नानांच्या या श्रीमंतीचा थोडा तरी अंश प्रत्येकाने घेतला तरी समाज म्हणून आपण खूप श्रीमंत होऊ.

अशा  ह्या थोर पुरुषाला त्यांच्या १५४ व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🙏

=============================================



मुलींची पहिली शाळा आणि श्रेयवादाचे राजकारण - विजय चोरमारे


सनातनी मंडळींना जोतिरावांबद्दल असुया का वाटते याच्या तपशीलात जाण्याचे इथे कारण नाही. परंतु मुलींची पहिली शाळा जोतिरावांनी सुरूच केलेली नाही, असा दावा ही मंडळी करतात. काही लोक अज्ञानामुळे, करतात मात्र बहुतांश लोक मुद्दाम ती मोहीम चालवतात. त्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी त्यांचे प्रयत्न सुरू असतात आणि सध्याचा सोशल मीडियाचा प्रभाव ही पर्वणी ठरत आहे.


जोतिरावांनी मुलींची पहिली शाळा १८५१ मध्ये सुरू केली, असे रूढ केले की, मुलींची पहिली शाळा सुरू केल्याचा दावा आपोआप निकालात निघतो. जोतिरावांचे श्रेय हिरावून घेण्यासाठी मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेट यांचे नावही पुढे केले जाते. मुलींची पहिली शाळा सुरू करणारे नाना शंकरशेट असा उल्लेख करून जोतिरावांच्याबद्दल संशय निर्माण केला जातो. नाना शंकरशेट यांनी १८४८ साली मुलींची शाळा सुरू केल्याचे रूढ करण्याचा प्रयत्न केला जातो.


यासंदर्भातील नेमकी वस्तुस्थिती काय आहे ?


धनंजय कीर यांच्या ‘महात्मा जोतीराव फुले’ या १९६८ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात, ‘स्वतंत्रपणे मुलींची शाळा काढणारे जोतीबा हेच पहिले भारतीय होत.’ असा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जोतिबांची शाळा बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात १८४८च्या ऑगस्ट महिन्याच्या आसपास सुरू झाली असावे असे या शाळेसंबंधी ‘बॉम्बे गार्डियन’वर्तमानपत्राच्या २८ नोव्हेंबर १८५१च्या अंकात जे पत्र प्रसिद्ध झाले आहे त्यावरून अनुमान काढता येते. जोतिबांचे सहकारी सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे व सदाशिवराव गोवंडे हे त्यांना ती शाळा चालविण्यात आर्थिक सहाय्य करीत असत.(पृष्ठ ३०-३१)


एकोणिसाव्या शतकातील हिंदू मुलींकरता पहिली शाळा कलकत्त्यात १८१९ साली तेथील अमेरिकन मिशनने सुरू केली. त्याकाळी मुली शाळेत आणण्याकरिता शिक्षकाला प्रत्येक दिवशी घरोघरी जावे लागे.मुलींनी शाळेत यावे म्हणून त्यांना काही विद्यावेतन द्यावे लागे. शिक्षक शाळेत ज्या प्रमाणात मुली आणील त्या प्रमाणात त्याला वेतन मिळत असे. अमेरिकन मिशनने १८४० मध्ये पुण्याच्या आसमंतात मुलींच्या शाळा उघडल्या होत्या. स्कॉटिश धर्मोपदेशकांनी चालवलेली एक मुलींची शाळा पुण्यात होती. सुमारे दहा मुली तीत शिकत असत. ती ख्रिश्चनांची शाळा असल्यामुळे चालू शकली नाही. स्वतंत्रपणे मुलींची शाळा काढणारे जोतीबा हेच पहिले भारतीय होत. जोतिबांची शाळा आणि त्यांचे ते शैक्षणिक कार्य जवळजवळ पाच-सहा महिने चालले.


जोतिबांच्या वडिलांनी त्यांना पत्नीसहित घराबाहेर काढल्यामुळे त्यांची ती शाळा बंद पडली. त्यानंतर जोतिबांनी तीन जुलै १८५१ रोजी बुधवार पेठेतील अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची शाळा काढली. मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांचा याही शाळेत जाता-येताना छळ झाला. आपल्या संस्थेच्यावतीने जोतिबांनी १७ सप्टेंबर १८५१ रोजी रास्ता पेठेत मुलींची दुसरी शाळा काढली. १५ मार्च १८५२ रोजी वेताळ पेठेत मुलींची तिसरी शाळा काढली. पहिल्या शाळेची परीक्षा १६ ऑक्टोबर १८५१ रोजी बुधवार पेठेत घेतली. जोतिबांच्या शाळेची १७ फेब्रुवारी १८५२ रोजी प्रकटपणे परीक्षा घेण्यात आली, तो समारंभ पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. (पृष्ठ ३५-३६)


जोतिरावांच्या आद्य चरित्रकारांपैकी एक असलेल्या पंढरीनाथ सिताराम पाटील यांनी १९३८ साली प्रसिद्ध झालेल्या ‘महात्मा ज्योतिराव फुले यांचा अल्पपरिचय’ या पुस्तकात यासंदर्भात म्हटले आहे की, ‘बरोबर १८४८च्या आरंभीची गोष्ट. ज्योतिरावांनी पुण्यास बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यावेळी याकामी त्यांना रा. जगन्नाथ सदाशिवजी या सद्गृहस्थाने बरीच मदत केली. या शाळेमुळे पुण्यात धर्म बुडाला (?)म्हणून हाहाकार झाला व स्त्रीशिक्षणासारख्या पवित्र कार्यास त्यांना चोहोकडून विरोध होऊ लागला. या विरोध करणारांनी जोतिरावांच्या साध्याभोळ्या वडिलांचे गोविंदरावांचे डोके भंडावून सोडले. मुलगा आणि सून तुमच्या कुळास बट्टा लावीत आहे, असे त्यांना पटवून देण्यात ही मंडळी यशस्वी झाली. त्यातूनच गोविंदरावांनी जोतिराव आणि सावित्रीबाईंना घराबाहेर काढले.’


जोतिरावांच्या १८४८च्या मुलींच्या पहिल्या शाळेसंदर्भातील पुराव्यांची पुष्टी नंतरच्या काळात डॉ. य. दि. फडके, डॉ. हरी नरके Hari R. Narke या अभ्यासकांनीही केली आहे. धनंजय कीर म्हणतात ऑगस्टमध्ये, पंढरीनाथ पाटील म्हणतात बरोबर १८४८च्या आरंभी. काही महिन्यांचा फरक आहे, पण १८४८ सालाबाबत एकमत आहे.


नाना शंकरशेट यांच्यासंदर्भात ज्येष्ठ संपादक अरूण टिकेकर यांनी २०१५ मध्ये लिहिलेल्या एका लेखात म्हटले आहे की, ‘नेटिव्ह स्कूल सोसायटी नावाच्या पश्चिम भारतातील पहिल्या वहिल्या शिक्षणसंस्थेच्या संस्थापकांत नाना शंकरशेट होते. या संस्थेने आपली कात अनेकदा टाकली, प्रत्येकवेळी आपले नावही बदलले. या संस्थेच्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या अवतारात मुलींनाही शिक्षण देण्याचा विचार झाला. त्याला सनातनी मंडळींकडून खूप विरोध झाला. तरी नानांनी आवश्यक धनराशीची सोय केल्यामुळे या सोसायटीने मुलींसाठी पहिलीवहिली शाळा सुरू केली.’


मराठी विश्वकोशाच्या सहाव्या खंडामध्ये स्टुडंट्स लिटररी व सायन्टिफिक सोसायटीची स्थापना १८४८ मध्ये आणि जगन्नाथ शंकरशेट मुलींच्या शाळेची स्थापना १८४९ साली असा उल्लेख आहे.


मराठी वीकिपीडियावर मात्र कुणीतरी चावटपणा केल्याचे स्पष्ट दिसते. इथे सोसायटीची स्थापना १९४५ आणि शाळेची १८४८ असा उल्लेख केला आहे. हा उल्लेख मूळ नोंदीनंतर कुणीतरी घुसडला असल्याचे लक्षात येते, कारण त्या संपूर्ण लेखातील सर्व आकडे मराठीत आहेत, हे स्टुडंट्स लिटररी व सायन्टिफिक सोसायटी तसेच जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा स्थापन करण्यासंदर्भातील आकडे मात्र इंग्रजीमध्ये आहेत.


स्टुडंट्स लिटररी व सायन्टिफिक सोसायटीने सुरू केलेली आणि नाना शंकरशेट यांनी अर्थसहाय्य केलेली मुलींची शाळा १९४९ सालातली असल्याचे अनेक पुराव्यांवरून स्पष्ट होते. पण म्हणून नाना शंकरशेट यांच्या कार्याला उणेपण येतेय असे अजिबात नाही. मुंबईच्या पायाभरणीत त्यांनी केलेले काम डोंगराएवढे आहे. त्यांनी मुलींची शाळा सुरू केली तेव्हा त्यांनाही तत्कालीन उच्चभ्रू हिंदूधर्मीयांनी विरोध केला होता, हे लक्षात घ्यायला हवे. नाना शंकरशेट यांची शाळा जोतिरावांच्या आधी सुरू केलेली असती तरीही दु:ख वाटण्याचे कारण नव्हते. अजूनही तसे ठोस पुरावे पुढे आले तर त्यांचा तसा सन्मानाने उल्लेख करता येईल. परंतु मुलींची पहिली शाळा सुरू करण्यावरून जी मंडळी श्रेयवाद खेळताहेत, त्यांना नाना शंकरशेट यांच्याबद्दल प्रेम नाही. त्यांना जोतिराव फुले यांचे श्रेय हिरावून घ्यायचे आहे. परंतु जसे नानांचे आहे, तसेच जोतिरावांचे आहे. जोतिरावांचे मुलींच्या शाळेचे श्रेय हिरावून घेतले म्हणून त्यांच्या कार्याला उणेपण येत नाही. जशी नानांच्या खांद्यावर मुंबईची इमारत उभी आहे, तसाच आधुनिक महाराष्ट्र जोतिरावांच्या खांद्यावर उभा आहे!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?