देशी गायीचे महत्व
देशी गाईचे महत्व पटवून देणारा खणखणीत लेख.
भारतीय वंशाच्या वळुंची सक्तीने कत्तल करण्यात आली. परदेशातुन प्रचंड मोठ्या प्रमाणावर जर्सी, होल्स्टेन फ्रिजियन या घाणेरड्या प्राण्यांचे वीर्य आयात करुन त्या वीर्यामार्फत देशी गायी भरवुन त्याना नासविण्यात आले. खेडोपाडी असे वीर्य पाठविण्यासाठी एसटी बसेस ची मदत घेण्यात आली. खाजगी पशुवैद्यक डॉक्टराना देशी गायीला एका वेळी जर्सी प्राण्याच्या विर्याने भरविण्यासाठी पाचशे रुपये व संकरीत (नासविलेले) वासरु जन्मल्यावर एक हजार रुपये देण्यात आले. संबंधीत शेतकरयाना देखील पैश्याचे अमिष दाखविण्यात आले. हा सर्व पैसा परदेशी कंपन्यांचा होता. हा प्रकार अजुनदेखील सुरु आहे. सर्व बाजुनी प्रयत्न करुन भारतामधुन देशी गाय नष्ट करायची यावर लक्ष केंद्रीत केले गेले. दुर्देवाने हा कट 99% यशस्वी झाला असुन आता फक्त आपल्या देशात 1% देशी गायी शिल्लक आहेत. यामुळे आपल्या राष्ट्राचे कधीही भरुन न येणारे आतोनात नुकसान झाले आहे. संकरीकरण थांबले नाहीतर पुढील 5 वर्षात शिल्लक असलेल्या देशी गायी देखील नामशेष होतील व त्याना फोटोमधे पाहण्याची वेळ येइल. बाहेरुन देखावा करण्यासाठी देशी गायींचे संकरीकरण दुधाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी करत असल्याचा कांगावा करण्यात आला. पण हे सपशेल खोटे आहे कारण संकरीकरणामुळे गायीचे दुधाचे उत्पादन वाढलेलेच नाही. पुर्वीच्या शुध्द देशी गायी भरपुर दुध देत होत्या त्या नामशेष केल्या गेल्या. देशी गायींचे शुध्द बीज (वळु) नष्ट केले गेले. त्यांच्या खाद्याकडे दुर्लक्ष केले गेले. कृषी शिक्षणातुन देशी गायी दुध देत नाहीत त्यामुळे त्यांचे culling (कत्तल) करुन जर्सी होल्स्टेन फ्रिजियन हे प्राणी पाळले पाहीजेत असे विद्यार्थ्यांच्या मनावर चुकीच्या पध्दतीने बिंबविले गेले. संकरीकरणामुळे दुध विषारी व रोगकारक बनले. आजही देशाच्या दुग्ध उत्पादनात साठ टक्क्यांहुन अधिक वाटा म्हशींच्या दुधाचा आहे. मग गायींचे संकरीकरण करुन काय साध्य झाले ?? भारतीय गीर (काठीयवाडी) गाय ब्राझीलमधे एका दिवसाला 64 लिटर दुध देते. केनिया सारख्या मागास आफ्रिकन देशातील शास्त्रद्न्यानी भारतातुन गीर गायी नेउुन त्यांचे शुद्ध स्वरूपात जतन करुन एका गीर गायीपासुन दिवसाला ५६ लिटर इतके दुध उत्पादन मिळविले आहे . भारतीय गीर गायीला जगामधे सर्वात जास्त दुध देणारी गाय म्हणुन जागतिक मान्यता मिळाली आहे. मग प्रश्न असा पडतो की आपल्याला जर दुधाचे उत्पादन वाढवायचे होते तर मग देशी गीर, लाल सिंधी, साहीवाल, कांकरेज या भरपुर दुध देणाऱ्या देशी गायींचा शेतकऱ्यांमधे का प्रसार केला नाही ?? शासकीय योजना राबवुन गीर गायी शेतकरयाना का दिल्या नाहीत ??संकरीकरण करुन देशी गायी नासविण्याची काय गरज होती ?? आश्चर्य म्हणजे गेल्या पन्नास वर्षात भारतातुन देशी गायी अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया या देशान्मधे मोठ्या प्रमाणावर नेण्यात आल्या. तेथे त्यांचे शुध्द स्वरुपात उत्तम संगोपन करण्यात आले. भारतातुनच नेलेल्या देशी गायी हे देश आंतरराष्ट्रीय बाजारात एकाला गायीला तिन ते चार कोटी या किमतीला विकत आहेत. मुळ भारतातुन नामशेष केलेली ब्राह्मण ही भारतीय देशी गायीची जात आज अमेरिकेत आहे. अमेरिका या गायीला करोडो रुपये घेउन ऑस्ट्रेलिया, मलेशिया या देशाना विकत आहे. *मलेशियाच्या राष्ट्रीय कॅलेंडर मधे भारतीय देशी गायीला स्थान दिले आहे. प्रत्येक भारतीय गायीच्या जातीवर संशोधन करणारया कंपन्या ब्राझील, अमेरिकेमधे कार्यरत आहेत. अमेरिकेने भारतीय गायींवर संशोधन करण्यासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च करुन संशोधन प्रकल्प सुरु केला आहे. अमेरिकेमधे भारतीय गायीचे दुध ( A2 milk ) नावाने मोठमोठ्या मॉलमधुन विक्री केले जात आहे. आपल्या देशातील कृषी शास्त्रज्ञ मात्र देशी गाय आणि जर्सी् प्राणी यामधील फरक व जर्सीच्या दुधाचे घातक परिणाम जाणुनबुजुन धोरण ठरविणारया राज्यकर्त्यांच्या लक्षात आणुन देत नाहीत आणि खरे वास्तव जनतेपासुन लपवुन ठेवत आहेत. जर्सीचे दुध पिल्याने भारतातील मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आज जगातील सर्वातजास्त मधुमेही रुग्ण भारतात आहेत. ज्या ज्या घरी संकरीत जर्सी होल्स्टेन यांचे दुध पिले जाते तिथे हमखास मधुमेहाचे रोगी तयार झाले आहेत. अगदी चार पाच वर्ष वयाच्या लहान मुलान्मधे देखील मधुमेह रोगाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मुळ जर्सी होल्स्टेन फ्रिजियन हे प्राणी 1.5 ते 2 टन वजणाचे असतात. त्यांच्या वासराचे वजन 22 किलो असते .देशी गायीचे वजन ५०० किलोअसुन वासराचे वजन ११ किलो असते. ज्यावेळेस देशी गायीचा जर्सी सोबत संकर केला जातो तेव्हा २२ किलो वजनाचे संकरित वासरू गायीला ९ महीने पोटात वागवावे लागते. गायीला विताना प्रचंड त्रास होतो. कित्येक गायींचे विताना अंग बाहेर पडते.अनेकदा गायी मरण पावतात. संकरीकरणाचा देशी गायीच्या प्रजनन संस्थावर अतिशय वाईट परिणाम होतो.
देशात सध्या दररोज लाखो देशी गायींचे संकरीकरण करुन त्याना नासविण्यात येत आहे.असा अनैसर्गिक प्रयोग होणारा जगातील एकमेव प्राणी म्हणजे भारतीय देशी गाय होय.देशी गाय भारतातुन संपविण्याचे हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे.
हे संकरीकरण असेच चालु राहीले तर येत्या पाच वर्षानंतर मुळ देशी गायी नामशेष होतील व जर्सीसारखे घाणेरडे प्राणी गाय म्हणुन सांभाळण्याची वेळ जनतेवर येइल.म्हणुन संकरीकरण तातडीने बंद होण्याची गरज आहे तरच कायद्याचा गोरक्षणाचा मुळ उद्देश सफल होइल.
धक्कादायक बाब म्हणजे गेल्या पाच दशकात ब्राझील , अमेरिका ,ऑस्ट्रेलिया ,मलेशिया या देशांनी भारतातुन देशी गायी नेउन त्यांचे शुद्ध रुपात उत्तम संवर्धन केले आहे.ब्राझीलमधे 60 लक्ष शुध्द भारतीय गीर गायी आहेत.तर भारता फक्त तिन हजार शुध्द गीर गायी शिल्लक आहेत. ब्राझीलच्या शास्त्रज्ञांनी गीर गायीची शुध्द रुपात उत्तम जोपासना करुन दिवसाला 64 लिटर इतके दूध उत्पादन साध्य केले आहे. ब्राझीलच्या एकुण दुध उत्पादनामधे भारतीय गीर गायीचा 80% वाटा असुन देशाची अर्थव्यवस्था भारतीय गायींच्या आधाराने उभी केली आहे. ब्राझील जागतिक बाजारात भारतीय गायी ब्राझीलीयन कॅटल
नावाने विकत आहे.
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करुन संकरीकरणावर तातडीने बंदी आणून भारतीय देशी गाय वाचवणे काळाची गरज आहे.नाहीतर निसर्गाचा हा अनमोल ठेवा आपण कायमस्वरुपी गमावुन बसू.
..................................................................................
विडिओ पाहा -- ब्राझीलमधे दिवसाला ६४ लिटर दूध देणारी भारतीय देशी गीर गाय
https://youtu.be/DePBg_LYoU0
https://youtu.be/Rv0qQyExNPc
https://youtu.be/PBp6ztVJLzE
Ground Reality: Brazil is the biggest exporter of Indian breeds of cows. Gir cow now records over 62 litres/day in Brazil.. - http://devinder-sharma.blogspot.in/2012/07/brazil-is-biggest-exporter-of-indian.html?m=1
⚡⚡ संकरीकरण थांबवा, देशी गाय वाचवा.⚡⚡
संकलन रमेश मानकर
गौ सेवा विभाग प्रमुख नाशिक
..........................................
जास्तीत जास्त लोकांना हे सत्य कळवावे ही विनंती..🙏🙏🙏 फाॅरवर्ड करा please. कंटाळा करू नका बंधूंनो!🙏🏻🙏🏻🚩🚩🇮🇳 (शेवटी आईचे आणि देशी गाईचे दूधच महत्वाचे )
==========================================================
या पोस्टला उत्तर
देशी गाईचे महत्व पटवून देणारा खणखणीत लेख. या रमेश मानकर यांनी संकलित केलेल्या लेखास उत्तर
आपल्या देशातील गायींचा कोणाला अभिमान वाटत असेल तर ते समजू शकते. परंतु विदेशी गायींच्या बाबतीत मनात तिरस्काराचे जहर भरलेल्या या लेखकाने जे गरळ ओकले आहे, चुकीची किंवा विपर्यस्त माहिती दिलेली आहे, स्वतःच दिलेल्या लिंक मधील (गैरसोयीच्या) महितीकडे जे दुर्लक्ष केले आहे, याचा समाचार घेतला पाहिजे.
१) भारतीय वंशाच्या वळुंची सक्तीने कत्तल करण्यात आली असे लेखक म्हणतात, याला आधार काय? ही कत्तल कोणी आणि का केली? याची आकडेवारी कुठे उपलब्ध आहे?
२) जर्सी, होल्स्टेन फ्रिजियन या गायींना लेखक घाणेरडे प्राणी असे म्हणतात, यास आधार काय? जगभरात या दोन प्रकारच्या गायींना आणि त्यांच्या दुधाला प्रचंड मागणी आहे कारण त्यांची दूध देण्याची क्षमता भरपूर आहे. पुढील लिंक पहावी. (https://en.wikipedia.org/wiki/List_of_dairy_cattle_breeds) या लिंक मधील लिस्ट अनुसार होल्स्टेन फ्रिजियन गाय प्रतिदिन ५३ लीटर दूध देते तर जर्सी गाय १९ लीटर देते. या सूचित एकमात्र भारतीय गाय आहे साहिवाल, जी फक्त ७.२ लीटर दूध देते.
३) लेखक म्हणतात, सर्व बाजुनी प्रयत्न करुन भारतामधुन देशी गाय नष्ट करायची यावर लक्ष केंद्रीत केले गेले. मग हे होत असताना या देशातले गोभक्त लोक काय झोपा काढत होते असे लेखकाला म्हणायचे आहे काय? डेअरी हा व्यवसाय आहे. देशी गायी तेवढ्याच खर्चात दूध कमी देत असतील आणि संकरीत गायी जास्त देत असतील तर गोपालांनी हा घाटा का उचलावा?
४) संकरीकरणामुळे दुध विषारी व रोगकारक बनले या लेखकाच्या दाव्याला आधार काय आहे? उचलली जीभ लावली टाळ्याला??? जर्सीचे दुध पिल्याने भारतातील मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, असेही लेखक म्हणतात. याच्या पाहणीची आकडेवारी आणि अहवाल असेल तर तो द्यायला लेखक विसरलेले दिसतात. आणि हेच लेखक दुसरीकडे असेही म्हणतात की “आजही देशाच्या दुग्ध उत्पादनात साठ टक्क्यांहुन अधिक वाटा म्हशींच्या दुधाचा आहे.” उरलेल्या चाळीस टक्क्यांमध्ये देशी गायी, संकरीत गायी, बकरी, मेंढी, उंट, याक हे प्राणी येतात. इथे लेखकाचा दावा उघडा पडतो. तसेच (Jerseys round the world | RJAHS (royaljersey.co.uk) ) या लिंक नुसार जगात संखेच्या बाबतीत जर्सी गाय दुसर्या नंबर वर येते. भारतीय गाय तर जागतिक सूचीमध्ये खूप मागे आहे. मग जगभरातील लोकांना या गाईचे दूध विषारी आणि रोगकारक कसे वाटत नाही?
५) भारतीय गीर (काठीयवाडी) गाय ब्राझीलमधे एका दिवसाला 64 लिटर दुध देते हे विधान अर्धसत्य आहे. लेखकास प्रतिप्रश्न आहे की ही गाय ब्रझिल मध्ये ६४ लीटर दूध देते, मग भारतात का देत नाही? याचे उत्तर लेखक देणार नाहीत. कारण ब्रझिल मधील एका स्पर्धेत या गायीने तेवढे दूध दिले आहे आणि ती गाय शुद्ध गिर गाय नव्हे तर ब्राझिलच्या लोकांनी या गाईच्या प्रजातीला ‘improve’ केले आहे म्हणजे तिच्यात बादल केले आहेत. हे लेखकांनी स्वतः शेवटी दिलेल्या लिंक मध्येच लिहलेले आहे, ते यांनी वाचायचे कष्ट घेतले नाहीत.
६) लेखक म्हणतात भारतीय गीर गायीला जगामधे सर्वात जास्त दुध देणारी गाय म्हणुन जागतिक मान्यता मिळाली आहे या विधानास देखील कसलाही आधार नाही. कारण या गायीचे नाव जागतिक सूचीमध्ये (वरील मुद्दा क्रमांक २ मध्ये दिलेल्या लिंक नुसार) कुठेही नाही.
७) भारतातील फक्त गीर गायींवर लेखकांचा खूप जास्त भर दिसतो आहे. देशभरातील गायींच्या अन्य प्रजातींबद्दल लेखक गप्प का आहेत?
८) भारतातुनच नेलेल्या देशी गायी हे देश आंतरराष्ट्रीय बाजारात एका गायीला तिन ते चार कोटी या किमतीला विकत आहेत, ही लेखकांनी ठोकलेली लोणकढी थाप आहे. एखादी स्पर्धेतील गाय ज्यादा किमतीला कोणी विकत घेतली असेल तर ठीक. परंतु रोज ५६ लीटर दूध मिळविण्यासाठी तेवढे दूध देणारी सर्वसाधारण गाय तीन ते चार कोटी रुपयांना विकत घेणारा मनुष्य केवळ मूर्खच असू शकतो. कारण चार कोटी रकमेवर दिवसाला सुमारे साडेपाच हजार व्याज मिळू शकेल. तेवढ्या रकमेत हवे तेवढे दूध मिळेल. शिवाय गाईच्या पालन पोषणाचा खर्च वेगळा.
९) अमेरिकेमधे भारतीय गायीचे दुध ( A2 milk ) नावाने मोठमोठ्या मॉलमधुन विक्री केले जात आहे, असे लेखक म्हणतात. यात विशेष ते काय? जर्सी गायीचे दूध सुद्धा A2 Milkच आहे.
१०) ब्राह्मण जातीची गाय भारतात कधी होती हे लेखकांनी सांगितले नाही. तसेच लेखक महोदयांनी जी लिंक दिली आहे (आणि ती त्यांनी स्वतःच वाचलेली नसावी) त्यानुसार: The Brahman has become the most popular beef cattle breed in the southern parts of the US and in South America, Asia, and Australia because of its excellent adaptability to sub-tropical climates and its production abilities. म्हणजेच ही प्रजाती बीफ म्हणून वापरली जाते. आता या बीफ शब्दाचा अर्थ लेखकांना माहिती असेलच. या लिंक मध्ये पुढे असेही म्हटले आहे : Brahman-type cattle were, in fact, imported to Australia from the US, and today the Australian Brahman is the mainstay of the northern beef industry of Australia. ब्राह्मण गाय बीफ म्हणून वापरली जाते याचा लेखकाला अभिमान वाटतो आहे काय? तसेच (12 Most Popular Beef Cattle Breeds of The World For Farm Owner (thevetexpert.com) ) या लिंक नुसार ब्राह्मण प्रजाती ही The beef cattle breeds were developed in the Gulf area of the Southwestern USA between 1854 and 1926.
११) देशी गाय भारतातुन संपविण्याचे हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे अशी भीती लेखकांनी व्यक्त केली आहे. खरे तर गोभक्तांनी त्यांच्या अतिरेकी गोभक्तीमुळे शेतकर्यांना गायी पाळणेच मुश्किल आणि न परवडणारे करून टाकले आहे. त्यामुळे इथल्या गायींना भारतातून संपविण्यासाठी गोभक्तच समर्थ आहेत. अन्य कोना देशाला षड्यंत्र करण्याची काहीही गरज नाही. गायीचे अर्थशास्त्र न कळल्याने लेखक अशी विधाने करीत आहेत. आता तर गाईसाठी जीव ‘घेणारे’ लोक सत्तेवर आहेत. तेंव्हा समस्त विदेशी गायींचा संहार करण्यासाठी लेखक त्यांची मदत घेऊ शकतात. आणि स्वतः शुद्ध देशी गायींचा उद्धार करू शकतात.
१२) लेखक वारंवार ब्राझीलमधील “शुद्ध” गीर गायींचा संदर्भ देतात. परंतु ते हे विसरतात की तिथे संकर केल्यामुळे तिथल्या त्या संकरीत गीर गायी अधिक दूध देतात. (भारतातल्या गीर गायी तेवढे दूध देत नाहीत.) त्या शुद्ध गीर गायी नाहीयेत. तशा असत्य तर भारतातील गीर गायींनी सुद्धा तेवढे दूध दिले असते की! ही बाब लेखक जाणूनबुजून लपवीत आहेत आहे ब्राझीलचा घोषा लवीत आहेत. ब्राझील मधील गीर गायींशी बरोबरी करायची असेल तर आता तिकडील संकरीत बीज इकडे आणावे लागेल एवढे तरी लेखक महाशयांना कळायला हवे.
१३) लेखकांच्या मनात स्थानिक गाय म्हणजे गीर गाय एवढेच समीकरण घट्ट रूतलेले बसते. या गीर गायी जर देशभर न्यायाच्या असतील तर गुजरात सोडून अन्य राज्यातील सर्व स्थानिक गावराण गायींचा देखील संहार करावा लागेल. त्याचीही काही योजना लेखक महोदयांकडे असेलच. तर देशातील कोणत्या प्रजातींच्या गायींचे संवर्धन आणि संरक्षण करायचे या बाबत लेखकांनी त्यांच्या मनातील गोंधळ आधी घालवून टाकावा.
आता लेखकांनी दिलेल्या विडिओ आणि लिंक्स विषयी.
१) https://youtu.be/DePBg_LYoU0 या संपूर्ण विडिओ मध्ये गीर या शब्दाचा उल्लेख ऐकू येत नाही. जे सबटायटल आहेत त्यात सुद्धा असा उल्लेख नाही. दूध देण्याच्या वीताच्या काळात १८३१५ किलो दूध देणारी गीर गाईसारखी दिसणारी ही गाय ब्राझील मध्ये भारताच्या गीर गाईच्या संकारातून केले आहे असे दिसते.
२) https://youtu.be/Rv0qQyExNPc या मध्ये घागरीसारखी मोठी आचळे असलेली गीर सारखी दिसणारी गाय फक्त फिरतांना दाखवली आहे. तिच्या वडीलाचे वीर्य मिळेल अशा अर्थाचे त्या विडिओच्या खाली लिहलेले आहे.
३) https://youtu.be/PBp6ztVJLzE त्यात जे पोर्तुगीज भाषेत लिहलेले आहे त्याचा अर्थ असा होतो की, दिवसाला सरासरी २० किलो दूध देणारी गाय!
४) http://devinder-sharma.blogspot.in/2012/07/brazil-is-biggest-exporter-of-indian.html?m=1 ही लिंक देविंदर शर्मा या गोभक्ताची असावी असे दिसते. ही लिंक ओपन होत नाही. यात .in ऐवजी .com असे टाकल्यास ही लिंक ओपन होते. (लेखक नीट लिंक सुद्धा देऊ शकत नाहीत.) या लिंक मधील बर्याच बाबी लेखकांना अडचणीत टाकणार्या आहेत ज्याकडे लेखकांनी अगदी व्यवस्थित कानाडोळा केला आहे.
लेखक महोदयांची स्थानिक गायींविषयी तळमळ समजण्यासारखी आहे. आपल्या गायीचे माहात्म्य सांगताना दुसर्या गायींना घाणेरडे ठरवणे, तेही खोट्या आधारावर, हा लेखकांचा अत्यंत केविलवाणा आणि घाणेरडा प्रयत्न ठरतो आहे. त्यांनी जे असंबद्ध, अतिशयोक्त आणि विपर्यस्त लिखाण केले आहे त्याची खरोखरच गरज नव्हती. त्यांची आपल्या गायींचे महत्व वाढविण्याची, जतन करण्याची प्रामाणिक इच्छा खरोखरच असेल तर असला आचरटपणा टाळून, ब्राझील मधील शास्त्रज्ञ गीर गायींचा संकर करून जे करू शकतात तसे प्रयत्न इथे जरूर करावेत.
- चला उत्तर देऊ या टीम
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा