केदारनाथ मंदिराबाबतची दिशाभूल

मूळ पोस्ट

 

 *केदारनाथ मंदिर*

*एक न उलगडलेल कोडं !*


*(जरा विचार करा)*


केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात.  अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. पण आपल्याला त्यात जायच नाही. केदारनाथ मंदिर हे साधारण ८ व्या शतकात बांधलं गेल असावं असे आजचं विज्ञान सांगत. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीतकमी १२०० वर्षांपासून अस्तित्वात आहे. 

केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२,००० फूट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६०० फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० फुटाचा भरतकुंड. अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी.  ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत. 

ह्या क्षेत्रात फक्त *मंदाकिनी नदीच* राज्य आहे . थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणार पाणी. अशा प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती खोलवर अभ्यास केला गेला असेल. 


*केदारनाथ मंदिर* ज्या ठिकाणी आज उभे आहे तिकडे आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी त्याचं निर्माण कां केल गेलं असावं ? त्याशिवाय १००-२०० नाही तर तब्बल १००० वर्षापेक्षा जास्ती काळ इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मंदिर कसं उभं राहील असेल ? हा विचार आपण प्रत्येकाने एकदा तरी करावा. जर पृथ्वीवर हे मंदिर साधारण १० व्या शतकात होतं तर पृथ्वीवरच्या एका छोट्या *Ice Age* कालखंडाला हे मंदिर सामोरं गेलं असेल असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला. साधारण १३०० ते १७०० ह्या काळात प्रचंड हिमवृष्टी पृथ्वीवर झाली होती व हे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिकडे नक्कीच हे बर्फात पूर्णतः गाडलं गेलं असावं व त्याची शहानिशा करण्यासाठी *वाडिया इंस्टीट्युट ऑफ जीओलोजी डेहराडून* ने केदारनाथ मंदिरांच्या दगडांवर *लिग्नोम्याटीक डेटिंग* हि टेस्ट केली. लिग्नोम्याटीक डेटिंग टेस्ट हे *दगडांच आयुष्य* ओळखण्यासाठी केली जाते. ह्या टेस्टमध्ये अस स्पष्ट दिसून आलं कि साधारण १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णतः बर्फात गाडलं गेलं होत. तरीसुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही. 


सन २०१३ मध्ये  केदारनाथकडे ढगफुटीने आलेला प्रलय सगळ्यांनी बघितला असलेच. ह्या काळात इकडे *सरासरी पेक्षा ३७५% जास्त* पाऊस झाला. त्यानंतर आलेल्या प्रलयात तब्बल *५७४८ लोकांचा जीव गेला* (सरकारी आकडे). *४२०० गावाचं नुकसान* झालं.  तब्बल १ लाख १० हजार पेक्षा जास्त लोकांना भारतीय वायूसेनेने एअरलिफ्ट केलं. सगळंच्या सगळं वाहून गेलं. पण ह्या प्रचंड अशा प्रलयातसुद्धा केदारनाथ मंदिराच्या पूर्ण रचनेला जरासुद्धा धक्का लागला नाही हे विशेष.


*अर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया* यांच्या मते ह्या प्रलयानंतरसुद्धा मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चरच्या ऑडीट मध्ये १०० पेकी ९९ टक्के मंदिर पूर्णतः सुरक्षित आहे. *IIT मद्रास* ने मंदिरावर *NDT टेस्टिंग* करुन बांधकामाला २०१३ च्या प्रलयात किती नुकसान झालं आणि त्याची सद्यस्थिती ह्याचा अभ्यास केला. त्यांनी पण हे मंदिर पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्वाळा दिला आहे.  दोन वेगळ्या संस्थांनी अतिशय *शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक* पद्धतीने केलेल्या चाचण्यात मंदिर पास नाही तर *सर्वोत्तम* असल्याचे निर्वाळे आपल्याला काय सांगतात ? तब्बल १२०० वर्षानंतर जिकडे त्या भागातले सगळं वाहून जाते, एकही वास्तू उभी रहात नाही. तिकडे हे मंदिर दिमाखात उभ आहे आणि नुसतं उभं नाही तर अगदी मजबुत आहे.  ह्या पाठीमागे श्रद्धा मानली तरी ज्या पद्धतीने हे मंदिर बांधल गेलं आहे. ज्या जागेची निवड केली गेली आहे. ज्या पद्धतीचे दगड आणि संरचना हे मंदिर उभारताना वापरली गेली आहे त्यामुळेच हे मंदिर ह्या प्रलयात अगदी दिमाखात उभं राहू शकलं असं आजच विज्ञान सांगतं आहे.


हे मंदिर उभारताना *उत्तर–दक्षिण* असं बांधलं गेलं आहे. भारतातील जवळपास सगळीच मंदिर ही *पूर्व–पश्चिम* अशी असताना केदारनाथ *दक्षिणोत्तर* बांधलं गेलं आहे. याबाबत जाणकारांच्या मते जर हे मंदिर  *पूर्व-पश्चिम* असं असतं, तर ते आधीच नष्ट झालं असतं. किंवा निदान २०१३ च्या प्रलयात तर नक्कीच नष्ट झालचं असतं. पण ह्याच्या दिशेमुळे केदारनाथ मंदिर वाचलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात जो दगड वापरला गेला आहे तो प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे. अन् विशेष म्हणजे जो दगड या मंदिराच्या बांधकामासाठी वापरला गेला आहे तो दगड तिकडे उपलब्ध होत नाही मग फक्त कल्पना करा की ते दगड तीथंपर्यंत वाहून नेलाच कसा असेल ?  एवढे मोठे दगड वाहून न्यायला (ट्रांसपोर्ट करायला) त्याकाळी एवढी साधनंसुद्धा उपलब्ध नव्हती.  या दगडाची विशेषता अशी आहे कि वातावरणातील फरक तसेच तब्बल ४०० वर्ष बर्फाखाली राहिल्यावर पण त्याच्या *प्रोपर्टीजमध्ये* फरक झालेला नाही.  त्यामुळे मंदिर निसर्गाच्या अगदी टोकाच्या कालचक्रात आपली मजबुती टिकवून आहे.  मंदिरातील हे मजबूत दगड कोणतही सिमेंट न वापरता *एशलर* पद्धतीने एकमेकात गोवले आहेत. त्यामुळे तपमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडाच्या जॉइंटवर न होता मंदिराची मजबुती अभेद्य आहे. २०१३ च्या वेळी एक मोठा दगड विटा घळई मधून मंदिराच्या मागच्या बाजूला अडकल्याने पाण्याची धार ही विभागली गेली आणि मंदिराच्या दोन्ही बाजूने पाण्याने सर्व काही आपल्यासोबत वाहून नेलं  पण मंदिर आणि मंदिरात शरण आलेले लोक सुरक्षित राहिले.  ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय वायूदलाने एअरलिफ्ट केलं होतं. 


श्रद्धेवर विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तब्बल १२०० वर्ष आपली संस्कृती, मजबुती टिकवून ठेवणार मंदिर उभारण्यामागे अगदी जागेची निवड करण्यापासून ते त्याची दिशा, त्याच बांधकामाचं मटेरियल आणि अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार केला गेला ह्यात शंका नाही.  *Titanic जहाज* बुडाल्यावर पाश्चिमात्य देशांना *NDT टेस्टिंग* आणि *तपमान* कसं सगळ्यावर पाणी फिरवू शकते हे समजलं. पण आमच्याकडे तर त्याचा विचार १२०० वर्षापूर्वी केला गेला होता. केदारनाथ त्याच ज्वलंत उदाहरणं नाही का ? काही महिने पावसात, काही महिने बर्फात, तर काही वर्ष बर्फाच्या आतमध्ये राहून सुद्धा ऊन, वारा, पाऊस ह्यांना पुरुन उरत समुद्रसपाटी पासून ३९६९ फूट वर *८५ फूट उंच, १८७ फूट लांब, ८० फूट  रुंद* मंदिर उभारताना त्याला तब्बल *१२ फूटाची जाड भिंत आणि ६ फूटाच्या उंच प्लॅटफोर्मची मजबूती* देताना किती प्रचंड विज्ञान वापरलं असेल ह्याचा विचार जरी केला तरी आपण स्तिमित होतोय. 

आज सगळ्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेने *१२ ज्योतिर्लिंगापैकी सगळ्यात उंचीवरच* असा मान मिळवणार केदारनाथच्या वैज्ञानिकांच्या बांधणीपुढे आपण *नतमस्तक* 🙏 होतो.


*! ॐ नमः शिवाय !*

====================================


*केदारनाथ मंदिर, एक न उलगडलेल कोडं!* या पोस्टला उत्तर: 


केदारनाथ मंदिर हे वास्तूकलेचा एक अत्यंत उत्कृष्ट नमूना आहे याबद्दल श्रद्धा बाळगणारे किंवा न बाळगणारे यापैकी कोणाचेही दुमत असणार नाही. २०१३ साली आलेल्या महाभयंकर पुराला तोंड देऊन ते ठाम उभे राहिले यामधून त्याच्या भक्कमतेची कल्पना येऊ शकते. तसेच वरील पोस्टच्या लेखकाने संगितले आहे त्यानुसार  १२ फूट जाडीच्या भिंती आणि एशलर पद्धतीने एकमेकात गोवलेले अत्यंत टणक दगड, अशा प्रकारे बांधलेले हे मंदिर म्हणजे स्वतःच एक प्रचंड आकाराचा, पुराला न जुमानणारा अभेद्य किल्लाच मानता येईल. असे असताना लेखकाने का कुणास ठाऊक, मंदिराची महती दाखवून देण्यासाठी बरीचशी फेकाफेकी, थापेबाजी केलेली दिसते आहे. त्या काळातील स्थापत्य ज्ञानाला संशयाच्या छायेत उभी करणारी अशी फेकाफेकी करायची खरे तर काहीच गरज नव्हती. आता ही फेकाफेकी काय आहे ते पाहू या: 


१) लेखकांनी प्रश्न केला आहे, 'केदारनाथ मंदिर ज्या ठिकाणी आज उभे आहे तिकडे आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी त्याचं निर्माण कां केल गेलं असावं?' हा प्रश्नच खरे तर बावळटपणाचा आहे. बाराशे वर्षांपूर्वी लोक पायी किंवा घोड्यावरून प्रवास करीत असत. कारण तेंव्हा आताच्यासारखे रस्ते, महामार्ग नव्हते. त्या काळात लोक काशीला जात ते सुद्धा पायीच. (आणि ते परत येतील की नाही याची काही गॅरंटी नसे.) आजही आपण केदारनाथ येथे वाहने घेऊन जाऊ शकत नाही, कारण तिथे जायला रस्ते कुठे आहेत? ते बांधावे लागतात ना? असे असताना लेखकास हा प्रश्न कसा काय पडतो याचे आश्चर्य वाटते. 


२) लेखक म्हणतात, "साधारण १३०० ते १७०० ह्या काळात प्रचंड हिमवृष्टी पृथ्वीवर झाली होती व हे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिकडे नक्कीच हे बर्फात पूर्णतः गाडलं गेलं असावं व त्याची शहानिशा करण्यासाठी वाडिया इंस्टीट्युट ऑफ जीओलोजी डेहराडून ने केदारनाथ मंदिरांच्या दगडांवर लिग्नोम्याटीक डेटिंग हि टेस्ट केली. लिग्नोम्याटीक डेटिंग टेस्ट हे दगडांच आयुष्य ओळखण्यासाठी केली जाते. ह्या टेस्टमध्ये अस स्पष्ट दिसून आलं कि साधारण १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णतः बर्फात गाडलं गेलं होत. तरीसुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही." परंतु,  मंदिर बांधण्यासाठी वापरलेल्या दगडाच्या बाबतीत पुढे लेखक स्वतःच असे म्हणतात की "या दगडाची विशेषता अशी आहे कि वातावरणातील फरक तसेच तब्बल ४०० वर्ष बर्फाखाली राहिल्यावर पण त्याच्या प्रोपर्टीजमध्ये फरक झालेला नाही." इथे त्यांनीच स्पष्टीकरण दिलेले दिसते आहे.  लिग्नोमॅटिक टेस्टिंगने दगडाचं आयुष्य ओळखलं जात नाही, मॉईस्चर पाहिलं जातं. त्यामुळे या शब्दाचा उपयोग लेखाला वजन प्राप्त करून देण्यासाठी केलेला दिसतो आहे आणि तो फसलेला आहे. बरे, ज्या आईस एजचा दावा लेखक करतात ते मर्यादित स्वरुपात जगाच्या काही भागात अवतरले होते. आशिया खंडावर, त्यातल्या त्यात हिमालयवर याचा फारसा प्रभाव पडल्याचे पुरावे आढळून येत नाहीत. (https://en.wikipedia.org/wiki/Little_Ice_Age) समजा, जर ते मंदिर बर्फात गाडले गेले असे गृहीत धरले तरी त्यामुळे या भक्कम मंदिराच्या रचनेला धोका कसा काय पोहोचू शकतो? दगड भारीतले वापरलेत ना? आणि बर्फात झाकले गेल्याने उलट आतमध्ये मंदिर सुरक्षित राहिले असणार ना?


३) "तब्बल १२०० वर्षानंतर जिकडे त्या भागातले सगळं वाहून जाते, एकही वास्तू उभी रहात नाही. तिकडे हे मंदिर दिमाखात उभ आहे आणि नुसतं उभं नाही तर अगदी मजबुत आहे." या वाक्यातील पूर्वार्धात केलेला लेखकाचा दावा खोटा आहे. अनेक (सगळ्या नव्हे!) इमारती वाहून गेल्या हे खरे असले तरी कित्येक इमारती या महापुरातून वाचल्या देखील आहेत, हे त्या वेळच्या फोटोवरून लक्षात येते. मग त्या सुद्धा मंदिराएवढ्याच मजबूत वगैरे मानायला नकोत का? 


४) "हे मंदिर उभारताना उत्तर–दक्षिण असं बांधलं गेलं आहे. भारतातील जवळपास सगळीच मंदिर ही पूर्व–पश्चिम अशी असताना केदारनाथ दक्षिणोत्तर बांधलं गेलं आहे. याबाबत जाणकारांच्या मते जर हे मंदिर  पूर्व-पश्चिम असं असतं, तर ते आधीच नष्ट झालं असतं. किंवा निदान २०१३ च्या प्रलयात तर नक्कीच नष्ट झालचं असतं." यावरून लेखकाला काय सुचवायचे आहे? ते पूर्व-पश्चिम असते तर नष्ट झालेच असते याला आधार काय? २०१३ साली पुर येणार म्हणून त्या काळी हे मंदिर उत्तर-दक्षिण बांधले असे लेखक सुचवू इच्छितात की काय? त्या काळी (आणि आजही) अस्तीत्वात असलेला पूर्व-पश्चिम हा मंदिरांचा सर्वसाधारण नियम (किंवा तशी श्रद्धा) चक्क डावलून उत्तर-दक्षिण मंदिर बांधणे खरे तर धाडसाचे मानले गेले पाहिजे. या परिवर्तनाचे जर कौतुक केले जात असेल (करायलाही हवे) तर आज मात्र परिवर्तनवादी चळवळीला अक्षरशः शत्रू मानले जाते आहे, प्रसंगी परिवर्तनवाद्यांचे मुडदे पाडले जात आहेत. हा दुटप्पीपणा का बरे? 


५) "विशेष म्हणजे जो दगड या मंदिराच्या बांधकामासाठी वापरला गेला आहे तो दगड तिकडे उपलब्ध होत नाही मग फक्त कल्पना करा की ते दगड तीथंपर्यंत वाहून नेलाच कसा असेल?" या म्हणण्याला आधार नाही. उलट अशा प्रकारचे दगड त्या परिसरात सापडतात असे उल्लेख आहेत. (https://www.deccanherald.com/content/421709/archaeological-survey-recovers-40-original.html)


६) "मंदिर आणि मंदिरात शरण आलेले लोक सुरक्षित राहिले." हा लेखकाचा दावा खोटा आहे. (hindustantimes.com/india/kedarnath-temple-stays-intact-its-surroundings-have-gone-with-flow/story-usmJ2UmB9Rc8ZQCrLTR4kN.html#:~:text=The%20famous%20Kedarnath%20shrine%20was,pilgrims%20for%20Himalayan%20shrines%20stranded.) या लिंक मधील बातमीनुसार, "The famous Kedarnath shrine was virtually submerged in mud and slush where 50 people died in flash floods that claimed over 130 lives in Uttarkhand and Himachal Pradesh and left over 70,000 pilgrims for Himalayan shrines stranded."


७) लेखक म्हणतात, "Titanic जहाज बुडाल्यावर पाश्चिमात्य देशांना NDT टेस्टिंग आणि तपमान कसं सगळ्यावर पाणी फिरवू शकते हे समजलं. पण आमच्याकडे तर त्याचा विचार १२०० वर्षापूर्वी केला गेला होता." परंतु हे म्हणणे हास्यास्पद आहे. NDT टेस्टिंग काय असते हे पुढील लिंक मध्ये दिलेले आहे. (https://www.twi-global.com/technical-knowledge/faqs/what-is-non-destructive-testing#:~:text=Testing%20(NDT)%3F-,Methods%20and%20Definition,damage%20to%20the%20original%20part.) वेल्डिंग वगैरे वापरुन निर्माण केलेली स्ट्रक्चर्स आणि दगड वापरुन बांधलेले मंदिर यांची तुलना करण्यासाठी NDT शब्द वापरुन फार फार तर पोस्टला आभासी भारदस्तपणा येऊ शकतो. परंतु त्यावरुन मंदिराचे मोठेपण सांगणे गैरलागू आणि हास्यास्पद ठरते. 


त्या काळातील विज्ञान वापरून मंदीर बांधणाऱ्यांचं व मंदीराचं कौतुकच केलं पाहिजे. खरे तर, कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि एक लक्षात घेतले पाहिजे की मंदिर बांधण्यासाठी त्यावेळी अस्तित्वात असलेले विज्ञानच कामी आले आहे. कोणताही मंत्र-तंत्र, पूजापाठ, कर्मकांड, विधी मंदिर बांधायला उपयोगी पडला नाही किंवा श्रद्धा कामी आलेली नाही. ज्या भूमिती, स्थापत्य शास्त्र, वास्तू विशारद इ. शास्त्रांचा वापर करून मंदीरे बांधली गेली तशाच शास्त्रांचा वापर करून मशिदी, चर्चेस हि इतर प्रार्थना स्थळे आणि राजवाडे, घरे, गड, किल्ले, हवेल्या इ. बांधले गेले आहेत. तसेच चीनची भिंत, इंग्लंड मधील स्टोनहेंज, इजिप्तचे पिरॅमिड्स हे स्थापत्यशास्त्राचे प्राचीन नमुने आहेत. ज्या प्रमाणे हे नमुने कौतुकास्पद आहेत तसेच केदारनाथ मंदिर सुद्धा आहे. परंतु अशा कलाकृतींना आपल्याकडे जसे खोटे-नाटे (वरील पोस्ट प्रमाणे) काहीही जोडले जाते, तसे तिकडे होतांना दिसत नाही. असे खोटे-नाटे जोडल्याने त्या काळातील महान स्थापत्य-शास्त्रज्ञांचा अप्रत्यक्षपणे अवमान तर करीत नाही ना, याचे भान बाळगले गेले पाहिजे. 


- चला उत्तर देऊ या टीम.

टिप्पण्या

  1. अतिशय सुंदर आणि योग्य प्रकारे या अवैज्ञानिक दाव्याना उत्तर देण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. या प्रयत्न साठी चला उत्तर देवूया टीमचे अभिनंदन !!

    उत्तर द्याहटवा
  2. https://sawalandjawab.










    सुंदर व शास्त्रीय उत्तर

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?