देवळांचे छद्मविज्ञान- अध्यात्म आणि सायन्स

 पुरातन देवळात  दर्शन घेण्यास का जावे ?( गल्ली बोळातील नाही)


अध्यात्म आणि सायन्स


         !! श्री !!


देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते.


देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू.


सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भोवताली रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश. 


त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई.


आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.


1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो........


ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.


जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेउ शकाल,तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..


2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे......


ह्यामागेही दोन उद्देश आहेत.. पहिला म्हणजे.. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने ( inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मकविचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.


3) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.


अ. कापूर जाळणे -- दृष्टी


ब. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे... स्पर्श


क. मुर्तीवर फुले वाहणे...फुलांच्या अरोमामुळे वास.


क. कापूर व तुळशीपत्र घातलेलेतीर्थ प्राशन करणे..चव.


हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.


ड. घंटानाद व मंत्रोच्चरण....ऐकणे.


अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते. 


मूर्तीच्या मागील बाजूस व भोवताली पसरलेली उर्जाही मिळावीम्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन..


पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा. 


मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळात जाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल हिच अपेक्षा..🙏


शुभंम् भवतू !!


===================================

या पोस्टला उत्तर 

देऊळ आणि त्यातील मूर्तीसंबंधीचे छद्मविज्ञान जाणून घेऊया...


1) मूर्तीची प्रतिष्ठापना करताना मूर्तीखाली ठेवलेल्या तांब्याचा तुकडा जास्तीत जास्त शुभ(!) चुंबकीय ऊर्जा स्वतःत सामावून नंतर तो भवताल रेडीएट करतो म्हणे!!! सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे की नेहमीचे तांबे हा किरणोत्सारी धातू नाही, तेव्हा रेडीएशनचा प्रश्न इथेच निकालात निघतो. दुसरं ऊर्जा ही नुसती उर्जाच असते, शुभ-अशुभ ऊर्जा हा प्रकार फक्त धर्मअंधासाठीच असू शकतो. त्यामुळे चुंबकीय वैश्विक ऊर्जा असा भारदस्त शब्द वापरून लोकांना दिपवून त्यांचा मेंदू बधीर करणे हाच धर्मअंधाचा उद्देश आहे, हे स्वच्छ आहे.अशी कुठेलीही ऊर्जा तांबे शोषून घेऊ शकत नाही.धातू विद्युत वाहक आहेत याचा अर्थ ऊर्जा शोषणे असा लावणाऱ्याच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे.


2) चर्च मध्ये शेकडो स्त्रीपुरुष बुटचप्पल घालूनच त्यांच्या देवाची एकाग्रतेने आणि एकासुरात प्रार्थना करतात. बुटचपला पायात असूनही त्यांची चर्चेस आपल्या देवळांपेक्षा शेकडो पटीने स्वच्छ असतात. याचे कधी आपण आत्मपरीक्षण करणार आहोत काय ? खरं तर शुभ आणि पवित्र व्हायब्रेशन अस्तित्वाच नाही. हा आंधळ्या मनाचा खेळ आहे. जर ते वैज्ञानिक सत्य असेल तर ते कुठल्या वैज्ञानिक संशोधन प्रबंधात लिहून सिद्ध केले आहे, त्याचा संदर्भ आजतागायत कुणीच का दिला नाही ? नुसते वैज्ञानिक शब्द वापरले म्हणजे ते विज्ञान होत नाही, आणि ज्यांना ते विज्ञान वाटते त्यांचा I Q तपासायची वेळ आली आहे हे निश्चित.


3) देवळातील घंटा वाजवल्यामुळे सप्तचक्र उद्दीपित होतात आणि नादाची व्हायब्रेशन्स आपल्यात शोषली जातात. ह्यावरही कुठेही शास्त्रशुद्ध माहिती उपलब्ध नाही. घंटेला नाद असतो हे जरी मान्य असले तरी तेवढाच प्रभाव melodious संगीताचाही पडतोच की. आणि ती अनुभूती घरातही घेता येते, त्यासाठी देवळात जायची गरज काय ? त्या अस्तित्वात नसलेल्या व्हायब्रेशन्स काय फक्त देवळात असतात असे म्हणणाऱ्याला लहरीच्या विज्ञानाची प्राथमिकही माहिती नाही असे म्हणावे लागेल.


4) कापूर, फुले, तीर्थ,घंटानाद आणि मंत्रोच्चारण या पाच गोष्टींचा संबंध पंचेंद्रियांशी जोडणे हा एक चांगला कल्पनाविलास आहे.त्या पलीकडे त्याची किंमत शून्य आहे. हा सगळा आंधळ्या मनाचा खेळ आहे. जर तांब्याच्या/चांदीच्या भांड्यातील पाण्याने कफ व तापासारखे आजार बरे होत असतील तर अशी भलामण करणाऱ्याने डॉक्टरकडे न जाता स्वतः वर हा प्रयोग करून पहावा. आणि त्याचे documentation तयार करून प्रसिद्ध करावे.नुसत्याच उंटावरून शेळ्या हाकू नयेत.

5) प्रदक्षिणेमुळे मूर्तीच्या मागील बाजूस पसरलेली ऊर्जा मिळते. आणि ती settle व्हावी म्हणून क्षणभर टेकायचे. पहिली गोष्ट ऊर्जा ही कधीही स्थिर नसते, मग ती settle व्हायचा प्रश्नच नाही. दुसरी गोष्ट क्षणभर टेकण्याची, तर तिचा उर्जेशी काही संबंध नाही तर तो आहे विश्रांतीशी,आणि विश्रांती कुठेही चांगलीच. 


एवंच यातील एकाही मुद्यात कुठेही विज्ञान नाही... म्हणजे धर्मअंधाने लावलाय तो बादरायण संबंध... लोकांना वैज्ञानिक शब्द वापरून उल्लू बनवण्यासाठी! कारण यातील एकाही मुद्याला वैज्ञानिक सिद्धता नाही. हा सगळा अस्मितेचा आणि "पहा, आमचा धर्म कसा वैज्ञानिक आहे", हे दाखवणाऱ्या अभनिवेशाचा अट्टाहास आहे. जर धर्म एवढा वैज्ञानिक आहे तर, आजतागायत एकही शोध का लावला नाही धर्मअंधांनी ? व्हाट्सअँप, फेसबुकचा सढळ वापर करणारे हे धर्मान्ध पाश्चात्यांना शिव्या देत त्यांनीच लावलेले हे शोध वापरून अंधश्रद्धा मात्र पसरवत असतात. ह्यालाच विज्ञानाचा दुरुपयोग करणे म्हणतात. 


तेव्हा नव शिक्षित तरुणांनो, यांची ही चाल शेकडो वर्षे यशस्वी झाली तरी आता मात्र त्याच्या या फसवणुकीला बळी पडायचे नाही. अशाप्रकारची माहिती देणाऱ्याला संदर्भ विचारायचे... प्रतिप्रश्न करायचे... उत्तरासाठी पाठपुरावा करायचा . योग्य उत्तर मिळेपर्यंत सोडायचे नाही. त्या निमित्ताने जर ते अभ्यासाला लागले तर सत्य कळल्यावर आपोआपच त्यांचा धर्मअंधळेपणा कमी होईल, आणि तेही आपल्याबरोबर विवेकशील होतील... वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारतील. तेव्हा त्यांना तुच्छ लेखू नका, उलट त्यांच्याशी प्रश्नोपनिषधाने संवाद साधा.- जगदीश काबरे. (^j^)

टिप्पण्या

  1. सुयोग्य उत्तर! आता जास्तीत जास्त लोकांनी वीर सावरकर यांच्या विचारांना स्मरून विज्ञानवादी तर्कशुद्ध दृष्टिकोन अंगी बाणवण्याची वेळ आली आहे!

    उत्तर द्याहटवा
  2. सुयोग्य उत्तर! आता जास्तीत जास्त लोकांनी वीर सावरकर यांच्या विचारांना स्मरून विज्ञानवादी तर्कशुद्ध दृष्टिकोन अंगी बाणवण्याची वेळ आली आहे!

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुयोग्य ..तर्कपूर्ण उत्तर आहे जगदीश काबरे सरांनी दिलेले !!!

    उत्तर द्याहटवा
  4. स्वर आणि भाषा हे फक्त मानव जातीलाच का मिळालं असेल याचं उत्तर द्याल काय ?

    उत्तर द्याहटवा
  5. स्त्री ला बरोबर बाळाला जन्म दिल्या दिल्याच स्तनातुन दुध कसं काय येतं ?
    बरं येतं तर बाळाच्या वडीलांना का नाही येत बाळ त्यांचंही आहेच ना ?
    याचं उत्तर द्याल का ?

    उत्तर द्याहटवा
  6. मानवी शरीराला अन्नामुळे उर्जा मिळते ती उर्जा कोणती हे सांगाल काय ?
    बरं अन्नामुळे उर्जा मिळते तर प्राणी हवेतुन ऑक्सीजन का घेतात याचं उत्तर द्याल का ?

    उत्तर द्याहटवा
  7. हवेत हजारो संयुगे असतात तरी प्राणी फक्त ऑक्सीजनच का घेतात ?
    बरं घेतात तर त्या सगळ्या संयुगांमधून प्राणी बरोबर ऑक्सीजनच कसंकाय फिल्टर करून घेतात ?

    उत्तर द्याहटवा
  8. बरं ऑक्सीजन घेऊन कार्बनडाय ऑक्साइड च का बाहेर सोडतात ?

    उत्तर द्याहटवा
  9. बरं झाडे कार्बनडाय ऑक्साइड च का घेतात ?
    पृथ्वीवरचे सगळे प्राणी ऑक्सीजन घेतात मग फक्त व्हेल मासाच का कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेतो ?

    उत्तर द्याहटवा
  10. अशी अनेक प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीत आणि कधीच नसतील
    या सगळ्यांच उत्तर एकच आहे देव

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?