सगुण-निर्गुणामागील छद्म विज्ञान


सगुण-निर्गुणामागील छद्म विज्ञान - जेट जगदीश. (^j^)

राजेंद्र वैशंपायन नावाचा ज्ञानोबांचा श्रद्धाळू भक्त एकदा मला म्हणाला, 'ज्ञानदेवांच्या खालील ओवीवर मी एक कथा लिहिली आहे, त्यावरून हे सिद्ध होते की, ज्ञानोबा हे किती महान वैज्ञानिक होते! एक ती कथा'.......

'तुज सगुण म्हणू की निर्गुण रे
सगुण निर्गुण एकू गोविंदू रे
अनुमाने ना अनुमाने ना श्रुती
नेती म्हणती गोविंदू रे'...
ही ओवी माधवराव आजोबा गुणगुणत होते. ते ऐकून त्यांचा नातू शंतनूने त्यांना छेडले. त्याच्यातला भौतिकशास्त्रज्ञ जागा झाला.
'तुज सगुण म्हणू की निर्गुण रे' या अभंगावर माधवरावांना म्हणाला, "आजोबा, तुम्ही म्हणता की ज्ञानेश्वर महाराज हे आत्मज्ञानी आणि अत्यंत बुद्धिमान संत होते. मग देवाला सगुण म्हणायचं की निर्गुण असा प्रश्न पडून स्वतः इतके कन्फ्युज कसे झाले आणि मग पळवाट म्हणून 'सगुण निर्गुण एकू गोविंदू रे' असं काहीतरी गुळमुळीत उत्तर दिलं.  त्यांनापण देव नक्की कसा आहे हे उत्तर मिळालं नाही बहुतेक. तुम्ही सांगा देव नक्की सगुण की निर्गुण ?"
त्यावर माधवराव मंद स्मित करून म्हणाले, "मी काही प्रश्न विचारतो त्याची उत्तरं दे."
शंतनू मानेनेच हो म्हणाला.
माधवराव म्हणाले, "ही सृष्टी वेगवेगळ्या मुलद्रव्यांनी आणि त्यांच्या संयुगांनी बनलेली आहे हे मान्य?"
शंतनूने होकारार्थी मान डोलावली.
"मग त्या मूलद्रव्याच्या मुळाशी अणू आहे हे मान्य ? "
पुन्हा शंतनूचा होकार.
"अणू इलेक्ट्रॉन आणि अणुकेंद्राने बनला आहे ?"
शंतनूचा होकार.
या अणुकेंद्राचे पुन्हा प्रोटॉन व नुट्रॉन असे भाग असतात ?"
शंतनूचा पुनश्च होकार.
"असं करत वैज्ञानिक सृष्टीच्या मुलकणांना शोधत शोधत कुठपर्यंत पोहोचले आहेत ?" "आधी क्वार्क्स आणि आता तर हिग्स बोझॉन या कणापर्यंत. आणि हाच कण इतर सगळ्या मुलकणांना शक्ती देतो असा वैज्ञानिकांचा सिद्धांत आहे.  " शंतनूचं उत्तर.
"पण मग हिग्स बोझॉन कणांना शक्ती कोण देत?" मधवरावांचा पुढचा प्रश्न.
"अहो आजोबा, वैज्ञानिकांना तेच तर कळत नाहीये कारण हिग्स फिल्ड नावाचं सर्व सृष्टीला व्यापून राहिलेलं एक तत्व त्या तत्वाच्या आधाराने हा हिग्स बोझॉन इतर मूलकणांना शक्ती देतो असा एक सिद्धांत सध्या मांडला जातोय, पण त्या हिग्स फिल्डच्या सर्व गुणधर्मांच स्पष्टीकरण भौतिकशास्त्राच्या आणि ऊर्जेच्या संवर्धनाच्या कक्षांमध्ये राहून देता येत नाहीये. कणांचे म्हणजे मॅटरचं आणि लहरींचे म्हणजे ऊर्जेचं एकमेकांमधील स्थित्यंतर आणि ती प्रक्रिया नक्की काय होते हेच कोडं आहे अजून." शंतनूचं स्पष्टीकरण. "म्हणजे सृष्टीच्या निर्मितीमागे सर्वव्यापक काहीतरी आहे आणि मॅटर आणि एनर्जी मधील सीमारेषा एका विशिष्ट पातळीवर पुसट होते... सर्व सृष्टी एकात्म पद्धतीने अस्तित्वात आहे असंच वैज्ञानिक निष्कर्ष काढतायत ना ?" माधवरावांनी शंतनूच स्पष्टीकरण संक्षिप्त रुपात मांडलं.
"हो असं म्हणता येईल". शंतनू उत्तरला.
"मग असं बघ की मॅटरला सगुण आणि एनर्जीला निर्गुण संबोधता येईल का ?" माधवरावांचा प्रश्न.
"होय असं म्हणता येईल" शंतनूचं उत्तर.
"मग ज्याला वैज्ञानिक 'हिग्स फिल्ड' असं म्हणतायत त्याला एक क्षण 'गोविंद' असं म्हटलं तर सध्या वैज्ञानिकांची अवस्था 'तुज सगुण म्हणू की निर्गुण रे , सगुण निर्गुण एकू गोविंदू रे अशीच झाली आहे असं नाही का म्हणता येणार?"
माधवराव  पुढे म्हणाले ,"तसंही तीनपेक्षा अधिक मिती आहेत आणि स्ट्रिंग थिअरीच्या आधारे त्रिमितीय भौतिकाच्या पालिकडलं जग शोधण्याचाही वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत हेही खरं आहे ना ?"
शंतनूचा मूक होकार आला.
" मग वैज्ञानिक ज्याचा अजून शोध घेतायत ते ज्ञानोबामाऊलींना जाणवलं नसेल ? त्यांनी ते अनुभवलं नसेल कशावरून? ज्ञानोबांनी ओव्यात, अभंगात जे मांडलं, वर्णन केलं ते बरचसं वैज्ञानिकांच्या निष्कर्षाशी जुळत असेल तर त्याच्याही पुढचं जे माउलींनी पाहून अनुभवून वर्णन करून ठेवलं आहे त्याचा शोध वैज्ञानिकांना लागेपर्यंत ज्ञानोबामाऊलींच्या वचनांच आपल्या शास्त्रात संगीतल्याप्रमाणे शब्दप्रमाण मानून त्यातील सकारात्मक ऊर्जा स्वीकारायला काय हरकत आहे ?"

ही कथा ऐकल्यावर मी म्हणालो, "शिक्षणाने माणूस शास्त्रज्ञ होतो, पण त्याच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होईलच असे नाही. म्हणजे असे की, त्याला शिक्षणामुळे हे नक्की माहीत असते की, ऊर्जा निर्माणही होत नाही आणि नष्टही, तसेच उर्जेला भावना नसतात, तरीही धर्ममार्तंड सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेबद्दल जे सांगेल ते भान हरपून तो ऐकतो. कथेच्या सुरवातीचा भाग म्हणजे प्रत्येक पदार्थ अनेक मूलद्रव्यांच्या संयुगाने बनलेला असणे, मूलद्रव्यात आणू आणि त्यातील सूक्ष्म कण इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, त्या नंतरचे क्वासार्स आणि हिग्स बोसॉन इथपर्यंतचे सगळे खरे विज्ञान आहे. पण मॅटर, एनर्जी आणि हिग्ज फिल्डचा यांची सगुण, निर्गुण आणि गोविंद अशी विजोड तुलना करून आजोबांनी बाजी मारल्याचे दाखवून आमचे ज्ञानोबा कसे वैज्ञानिकांचे बाप आहेत हे कथाकाराने लालित्यपूर्ण शब्दांनी बिंबावण्याचा प्रयत्न केला आहे. यालाच छद्म विज्ञान म्हणतात. म्हणजे विज्ञानातील खऱ्या सिध्दांताना अवैज्ञानिक गोष्टींची जोड देऊन सरमिसळ करणे. कसे ते पहा हं... मॅटर दिसते म्हणून सगुण आणि एनर्जी दिसत नाही म्हणून निर्गुण समजणे हा ढोबळपणा झाला. याच न्यायाने हवा दिसत नाही म्हणून निर्गुणच म्हणायला हवी! पण एनर्जी काय किंवा हवा काय ह्या अदृश्य रुपात असल्या तरी त्यांचे परिणाम दृश्यच असतात. आणि ते शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध करता येतात. तसा ज्ञानोबांना निर्गुणतेचा परिणाम शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध का करता आला नाही ? आणि हिग्स फिल्डला गोविंद समजणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठणेच होय. तसेच मॅटर आणि एनर्जी मधील सीमारेषा एका विशिष्ट पातळीवर पुसट होते आणि तिचे कोडे शास्त्रज्ञाना अजून उकलले नाही, हे तर धादांत असत्य आहे. कारण आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार, 'ऊर्जा = वस्तुमान(मॅटर) × प्रकाशाच्या वेगाचा वर्ग' हे सूत्र कोणतेही मॅटर प्रकाशाच्या वेगाने गेल्यास त्याचे ऊर्जेत रूपांतर होते, असे स्पष्ट करते. सबब ती त्यांची कवी कल्पनाच होती. *ह्या कवी कल्पनेला आजचे अर्धवट शिक्षित छद्म विज्ञानाच्या आधारे ग्लोरिफाय करू पाहत आहेत. कारण अशाप्रकारे वैज्ञानिक शब्दांची अधूनमधून पेरणी केली की, आजच्या विज्ञान युगात जगणाऱ्या पण वैज्ञानिक दृष्टिकोन नसणाऱ्या सामान्यजनांचा विश्वास लवकर बसतो, आणि आमचे पूर्वज किती थोर होते अशी समजूत करून आपली अस्मिता सुखावते."*

"विज्ञानात महत्व असते ते निरीक्षण आणि डॉक्युमेंटेशनला. ज्ञानोबांनी केलेले वर्णन वैज्ञानिक निष्कर्षाशी जुळणारे आहे, असे सांगून त्यांना वैज्ञानिक ठरवणे हे तर हास्यस्पदच आहे. कारण त्या ओव्यात ज्ञानोबांनी कुठलीही वैज्ञानिक उपपत्ती दिली नाही की विज्ञानिक सूत्र. जे आहे ते आपणच आपल्या सोईच्या कल्पनेने तयार करायचे. खरे तर ते वर्णन कवी कल्पनेच्या पलीकडे सरकत नाही, हेच सत्य आहे. आणि 'जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते' असे टाळी खाऊ वाक्य प्रमाण मानणाऱ्यांना ज्ञानोबांच्या अध्यात्मालाच विज्ञान चिकटवण्याचा प्रयत्न करायला लागावा यातच त्यांचे अपयश दडलेले आहे. *अध्यात्मिक क्षेत्रात मोठेच तत्वज्ञान सांगणाऱ्या ज्ञानोबांना वैज्ञानिक बनवण्याच्या नादात त्यांचे भक्त त्यांनाच आजाणतेपणाने अशाप्रकारे थिटे करत असतात.* सर्वात महत्वाचे म्हणजे जो स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक असतो आणि त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची जबाबदारी स्वतः उचलण्यास समर्थ असतो त्याचे मन नेहमीच शांत असते. म्हणून त्याला मनःशांतीसाठी अशा बाह्योपचाराची गरज लागत नाही. म्हणूनच कुणा संताच्या शब्दप्रमण्यापेक्षा विवेकी माणूस चिकित्सेला महत्व देतो. ह्या चिकित्सक वृत्तीमुळे त्याला प्रश्न पडतात. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पुन्हा चिकित्सक विचारच बळ देतात. निरीक्षण, कारणमीमांसा, प्रयोग आणि निष्कर्ष या चतूसूत्रीनुसारच आजवरची प्रगती घडली आहे. उलट शब्दप्रमण्यामुळे प्रश्न पडण्याचे थांबतात, आणि माणूस प्रयत्नवादाकडे पाठ फिरवून 'ठेविले अनंते तैसेचि राहावे', अशा अळशीपणाने जागून आपल्याच प्रगतीला पारखा होतो. तेव्हा एक लक्षात ठेव, विज्ञानात अनुभूतीला शून्य किंमत असते. महत्व असते ते प्रयोगशिलतेला."

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?