फिंगरप्रिंट्स दैवी नाही तर वैज्ञानिकच
*फिंगरप्रिंट्स दैवी नाही तर वैज्ञानिकच –जगदीश काबरे*
खरं सांगायचं तर *फिंगरप्रिंट्स दैवी आहेत* अशी भलामण करणारे विचार “थक्क करणारे तथ्य” या नावाखाली इतक्या आत्मविश्वासाने पसरवले जातात की सामान्य वाचक क्षणभर गोंधळतो. कारण त्या विचारांमध्ये सत्यापलाप करत काही अर्धसत्य वैज्ञानिक निरीक्षणे, काही शब्दांची जादू (DNA, रेडिओ वेव्ह्ज, बायोलॉजिकल मेमरी, सेलुलर इंटेलिजन्स) आणि शेवटी धार्मिक निष्कर्ष असा एक “भावनिक-सायंटिफिक” मसाला मिसळलेला असतो. पण विज्ञान हे भावनेवर नाही, पुराव्यावर चालते. फिंगरप्रिंट्स म्हणजे बोटांच्या त्वचेवरील रेषा हा एक जैविक विकासाचा (biological development) भाग आहे; त्यातून देव, आत्मा, कर्मकथा किंवा दैवी स्क्रिप्ट सिद्ध करणे म्हणजे वैज्ञानिक प्रक्रियेचा गैरवापर करून धार्मिक श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच ’फिंगरप्रिंट्स दैवी' म्हणत प्रसूत केलेल्या प्रत्येक मुद्द्यांचे चिकित्सक खंडन करणे गरजेचे आहे.
१) दावा : मानवाच्या बोटांच्या रेषा गर्भावस्थेच्या चौथ्या महिन्यापासून तयार होऊ लागतात. त्या वेळी मूल बाह्य जगापासून खूप दूर असते, तरीसुद्धा त्याची ओळख देणारी भाषा त्याच्या शरीरावर लिहिली जात असते.
सत्य : गर्भावस्थेच्या चौथ्या महिन्यापासून फिंगरप्रिंट्स तयार होतात आणि मूल बाह्य जगापासून दूर असताना “ओळख देणारी भाषा” शरीरावर लिहिली जाते. यातला वैज्ञानिक भाग अंशतः बरोबर आहे: गर्भाच्या विकासात १०-१६ आठवड्यांदरम्यान (साधारण तिसऱ्या-चौथ्या महिन्यात) epidermal ridges तयार होऊ लागतात. पण “बाह्य जगापासून दूर” हा दावा चुकीचा आहे. गर्भ पूर्णपणे बाह्य जगापासून तोडलेला नसतो; गर्भाशयातील द्रव, गर्भाची हालचाल, गर्भाची स्थिती, गर्भाशयाची भिंत, पोषण, हार्मोन्स, रक्तप्रवाह, या सर्व गोष्टी गर्भाच्या शरीरावर प्रभाव टाकत असतात. फिंगरप्रिंट्स तयार होणे म्हणजे “दैवी भाषा लिहिली जाणे” नाही; ते भ्रूणाच्या त्वचेची वाढ, पेशींचे विभाजन, आणि बोटांच्या टोकावर होणारा दबाव व घर्षण यांच्या परस्परसंवादातून होणारी एक नैसर्गिक जैविक घटना आहे.
२) दावा : या रेषांची रचना आपल्या DNA च्या सूचनांनुसार होते; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या रेषा ना आई-वडिलांसारख्या असतात, ना पूर्वजांशी जुळणाऱ्या असतात.
सत्य : हा मुद्दा हेतुपुरस्सर गोंधळ निर्माण करणारा आहे. DNA हा आराखडा (blueprint) देतो, पण DNA प्रत्येक सूक्ष्म तपशील “थेट छापून” देत नाही. उंची, चेहऱ्याचा आकार, त्वचेची रचना, मेंदूची जडणघडण, हे सगळे DNA आणि पर्यावरण यांच्या मिश्र परिणामातून घडतात. फिंगरप्रिंट्ससुद्धा “genetic influence + developmental randomness” यांचा परिणाम आहेत. म्हणूनच एकाच आई-वडिलांची मुले असली तरी त्यांच्या फिंगरप्रिंट्स वेगळे असतात. पण याचा अर्थ “DNA निष्फळ आहे” किंवा “दैवी हस्ताक्षर आहे” असा होत नाही. विज्ञानात याला developmental variation म्हणतात. उदाहरणार्थ, एकसारखे DNA असलेले identical twins सुद्धा फिंगरप्रिंट्समध्ये भिन्न असतात ते हेच सिद्ध करते की DNA व्यतिरिक्त गर्भातील सूक्ष्म परिस्थितीचा मोठा प्रभाव असतो.
३) दावा : जणू एखाद्या अदृश्य रेडिओ तरंगांच्या प्रभावाने या रेषा त्वचेवर आपोआप उमटतात—ज्या एखाद्या अलौकिक व्यवस्थेकडे इशारा करतात.
सत्य : हा निव्वळ कल्पनाविलास आहे. रेडिओ वेव्ह्जचा भ्रूणाच्या फिंगरप्रिंट्सशी कोणताही वैज्ञानिक संबंध नाही. रेडिओ वेव्ह्ज म्हणजे विद्युतचुंबकीय तरंग, जे विशिष्ट फ्रिक्वेन्सीत असतात. जर रेडिओ वेव्ह्जमुळे फिंगरप्रिंट्स तयार होत असते, तर गर्भाशयाबाहेर असलेल्या रेडिओ वेव्ह्जच्या प्रमाणानुसार प्रत्येक समाजातील फिंगरप्रिंट्सचा “पॅटर्न” बदलायला हवा होता. तसे काहीही दिसत नाही. ह्या रेषा तयार होतात कारण त्वचेचे थर वाढताना बोटांच्या टोकावर असलेल्या ऊतींमध्ये ताण-तणाव (mechanical stress) निर्माण होतो आणि त्यातून ridges व valleys तयार होतात. या प्रक्रियेत कुठेही “रेडिओ तरंग” ही संकल्पना बसत नाही. वैज्ञानिक भाषेचा वापर करून अध्यात्मिक दावा पेरणे म्हणजेच छद्म-विज्ञान.
४) दावा : प्रत्येक व्यक्तीच्या बोटांच्या रेषा संपूर्ण जगात पूर्णपणे वेगळ्या असतात; आणि आजवर असा एकही मनुष्य जन्माला आलेला नाही की ज्याच्या फिंगरप्रिंट्स अगदी दुसऱ्याशी तंतोतंत जुळतात.
सत्य : हा मुद्दा मुख्यतः खरा आहे, पण त्यातून देवाचा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. फिंगरप्रिंट्स अत्यंत उच्च प्रमाणात unique असतात, कारण ridges चे सूक्ष्म branching, endings, islands, bifurcations अशा अनेक minute details असतात. पण “कधीच जुळत नाहीत” हे विधान शास्त्रीयदृष्ट्या absolute certainty ने सांगता येत नाही, कारण जगात अब्जावधी लोक आहेत आणि त्यांची तुलना सर्वांशी झाली आहे असा पुरावा नाही. फॉरेन्सिक विज्ञानातसुद्धा fingerprint matching हे probability आणि pattern analysis वर आधारित असते. म्हणजे “फिंगरप्रिंट्स इतके वेगळे असतात की त्यांचा वापर ओळख पटवण्यासाठी होतो” हा निष्कर्ष बरोबर; पण “म्हणून देव आहे” हा निष्कर्ष तर्कदोष आहे.
५) दावा : यावरून हे सिद्ध होते की एखादा अद्वितीय ‘कलाकार’ आहे, जो प्रत्येक वेळी एक नवी कलाकृती घडवतो.
सत्य : हा मुद्दा “argument from design” logical fallacy आहे. निसर्गात अनेक गोष्टी अत्यंत गुंतागुंतीच्या आहेत. हिमकण (snowflakes), झाडांची पानं, समुद्रातील शंख, मानवी मेंदूतील न्यूरॉन नेटवर्क, प्रत्येक व्यक्तीचा आवाज, प्रत्येकाची iris pattern. या सर्व गोष्टींमध्ये विविधता असते, पण विज्ञान त्याचे कारण सांगते: मोठ्या प्रमाणावर पुनरावृत्ती होणाऱ्या नियमांमधून आणि सूक्ष्म स्तरावर निर्माण होणाऱ्या यादृच्छिक बदलांमधून (random variation) अनंत विविधता निर्माण होते. कलाकार असणे हा भावनिक निष्कर्ष आहे, वैज्ञानिक निष्कर्ष नाही.
६) दावा : जेव्हा जगातील सर्वात मोठा संगणकसुद्धा अशी रचना तयार करू शकत नाही, तेव्हा हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की ही रचना मानवी बुद्धीपलीकडची आहे.
सत्य : हा मुद्दा हास्यास्पद आहे. संगणक आज लाखो unique patterns सेकंदात generate करू शकतो. procedural generation, random number generators, fractal algorithms, neural नेटवर्क्स यांच्या सहाय्याने संगणक इतकी विविधता निर्माण करू शकतो की त्याची तुलना माणसाच्या कल्पनेपलीकडे जाते. संगणक “नैसर्गिक पद्धतीने जैविक त्वचा निर्माण” करू शकत नाही, हे मान्य; पण unique pattern निर्माण करणे ही काही अशक्य गोष्ट नाही. म्हणजे इथे मुद्दाम “निसर्ग” आणि “संगणक” यांची चुकीची तुलना करून देवाचा निष्कर्ष लादला जातो. विज्ञानाचा नियम असा आहे की, एखादी गोष्ट आपण बनवू शकत नाही म्हणून ती देवानेच बनवली असे म्हणणे म्हणजे “God of the gaps” हा तर्कदोष.
७) दावा : प्रश्न उभा राहतो — “माझ्यासारखी निर्मिती कोण करू शकतो?” हा प्रश्न त्या अदृश्य कारागिराच्या कलेला सलाम करतो.
सत्य : हा मुद्दा निव्वळ भावनिक भाषण आहे. विज्ञान “सलाम” करत नाही, तर विज्ञान कारण शोधते. मानवी निर्मिती म्हणजे गर्भधारणा, पेशींचे विभाजन, भ्रूण विकास, जनुकीय वारसा आणि नैसर्गिक निवड (evolutionary processes) यांचा परिणाम आहे. त्यात अदृश्य कारागिराची गरज भासत नाही. “मी इतका गुंतागुंतीचा आहे म्हणून मला कुणीतरी बनवलं” हा निष्कर्ष वैज्ञानिक नाही, तो श्रद्धेचा आहे.
८) दावा : एखादी दुर्घटना घडली, त्वचा भाजली किंवा रेषा नष्ट झाल्या, तरी कालांतराने त्या अगदी तशाच रेषा पुन्हा जशाच्या तशा परत येतात—ना एक पेशी इकडे-तिकडे, ना रचनेत बदल!
सत्य : हे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. फिंगरप्रिंट्स त्वचेच्या बाह्य थरावर नसून dermis मध्ये असलेल्या ridge pattern वर आधारित असतात. जर फक्त वरचा थर (epidermis) खराब झाला तर तो भरून निघतो आणि ridge pattern बराचसा परत तयार होतो, कारण “template” dermis मध्ये असतो. पण जर जखम खोलवर dermis पर्यंत गेली, तर permanent scarring होते आणि फिंगरप्रिंट्स कायमचे बदलू शकतात. अनेक कामगारांच्या बोटांवर, जळालेल्या त्वचेवर किंवा खोल जखमेमुळे असे बदल दिसतात. म्हणजेच “अगदी तशाच परत येतात” हा दावा खोटा आहे. इथे सत्याचा अर्धा भाग घेऊन देवाचा निष्कर्ष जोडला आहे.
९) दावा : यावरून दिसून येते की या रेषा केवळ त्वचेवर नाहीत, तर अस्तित्वाच्या अधिक खोल पातळीवर कोरलेल्या असतात—एक प्रकारची आत्मीय प्रतिमा.
सत्य : हा शुद्ध अध्यात्मिक दावा आहे; विज्ञानात “आत्मीय प्रतिमा” ही measurable गोष्ट नाही. ridge pattern dermal papillae च्या संरचनेतून तयार होतो. तो कोणत्याही आत्म्याच्या “डेटाबेस” मध्ये कोरलेला आहे असा दावा करण्यासाठी पुरावा काय? कोणती प्रयोगशाळा? कोणती मोजणी? कोणते निरीक्षण? काहीही नाही. म्हणून हा मुद्दा विज्ञानाच्या कसोटीवर शून्य ठरतो.
१०) दावा : मानवी शरीराचा दुसरा कोणताही भाग असा नाही की जो पूर्णपणे तसाच पुन्हा निर्माण होऊ शकेल; पण फिंगरप्रिंट्स हा अपवाद आहे—हे एखाद्या दैवी योजनेची झलक आहे.
सत्य : हा मुद्दा अज्ञानावर आधारित आहे. मानवी शरीरात अनेक regenerative प्रक्रिया आहेत, त्यामुळे त्वचा भरून येते, नखं पुन्हा वाढतात, केस वाढतात, यकृताचा काही भाग regenerate होऊ शकतो, हाडं भरून येतात. फिंगरप्रिंट्स “पुन्हा निर्माण” होतात कारण त्वचेचा बाह्य थर regenerate होतो आणि खालील pattern पुन्हा वर येतो. यात दैवी योजना नाही; ही शरीराची जैविक repair mechanism आहे. आणि जर जखम खोलवर गेली तर फिंगरप्रिंट्स बदलतात—हे आधीच स्पष्ट केले आहे.
११) दावा : आजतागायत विज्ञान या रहस्याचा पूर्ण उलगडा करू शकलेले नाही. याला ‘बायोलॉजिकल मेमरी’ किंवा ‘सेल्युलर इंटेलिजन्स’ असे म्हणते; परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे आत्म्याची ओळख आहे.
सत्य : हा मुद्दा म्हणजे विज्ञानाच्या अपूर्णतेचा फायदा घेऊन अध्यात्मिक दावा लादणे. विज्ञानाला अनेक गोष्टींचे सूक्ष्म स्तरावरचे संपूर्ण गणिती मॉडेल अजून विकसित करायचे असते, पण म्हणून “आत्मा” सिद्ध होत नाही. biological memory किंवा cellular intelligence हे शब्द अनेकदा पॉप-सायन्समध्ये सोयीस्करपने वापरले जातात. फिंगरप्रिंट्सची निर्मिती embryonic development, gene expression आणि mechanical forces यावर आधारित आहे, हे वैज्ञानिक संशोधनाने व्यवस्थितपणे स्पष्ट केले आहे. “विज्ञान थांबलं म्हणून आत्मा आला” हा तर्क म्हणजे अंधश्रद्धेचा आधुनिक प्रकार आहे.
१२) दावा : या रेषांमधील वळणे, फांद्या, वर्तुळे—हे सगळे एका खास भाषेत लिहिलेले कोड आहेत, जे केवळ त्यांच्या निर्मात्यालाच समजतात.
सत्य : हा दावा हास्यास्पद आहे, कारण फिंगरप्रिंट्सचा कोड आपण समजू शकतो, म्हणूनच फॉरेन्सिक विभाग गुन्हेगार ओळखतो. fingerprints मध्ये loops, whorls, arches असे प्रकार असतात, आणि minutiae points द्वारे तुलना होते. जर ते “फक्त देवाला समजतात” तर पोलीस, प्रयोगशाळा, biometric system हे कसे काम करतात? इथे लेखकाने “कोड” हा शब्द वापरून लोकांना प्रभावित केले आहे. कोड म्हणजे काहीतरी गूढ नसते; कोड म्हणजे pattern. आणि pattern चे विश्लेषण मानव करू शकतो.
१३) दावा : फिंगरप्रिंट्स केवळ ओळखीचे साधन नसून, ब्रह्मांडाचे नियम आणि आपल्या कर्मांची कहाणीही त्यात सामावलेली आहे.
सत्य : हा मुद्दा म्हणजे हस्तरेखा ज्योतिष आणि कर्मसिद्धांत यांना वैज्ञानिक भाषेत गुंडाळण्याचा प्रयत्न आहे. फिंगरप्रिंट्समध्ये “कर्म” वाचता येते याचा कोणताही पुरावा नाही. जर कर्म फिंगरप्रिंट्समध्ये असते, तर fingerprint पाहून एखाद्याचे आयुष्य, आरोग्य, अपघात, मृत्यू, विवाह, संपत्ती सांगता आले असते. पण हस्तरेखा, फिंगरप्रिंट्स किंवा palmistry कधीच प्रयोगशाळेत नियंत्रित पद्धतीने सिद्ध झालेली नाही. जेव्हा भविष्य सांगणाऱ्यांना blind tests मध्ये तपासले गेले, तेव्हा ते अपयशी ठरले. कारण ते विज्ञान नाही, हा मानसशास्त्रीय खेळ आहे. याला confirmation bias आणि Barnum इफेक्ट असे म्हणतात.
१४) दावा : आजवर कोणतीही तंत्रज्ञान, कोणतेही आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा प्रयोगशाळा अशा रेषा निर्माण करू शकलेली नाही, ज्या खऱ्या अर्थाने पूर्णतः युनिक असतील.
सत्य : हा दावा पुन्हा चुकीचा आहे. AI किंवा संगणक आज सहज unique images, unique textures, unique patterns तयार करून देऊ शकतात. प्रत्येक वेळी random seed बदलला की नवा pattern तयार होतो. “पूर्णतः unique” हा शब्दच दिशाभूल करणारा आहे, कारण uniqueness ही probability ची गोष्ट आहे. निसर्गात जशी विविधता असते, तशीच संगणकीय पद्धतीतही असते. फक्त फरक एवढाच की निसर्ग त्या pattern ला “जैविक ऊती” म्हणून बनवतो, आणि संगणक डिजिटल स्वरूपात. त्यामुळे “AI करू शकत नाही म्हणून देव” हा दावा कोसळतो.
१५) दावा : अनेक परंपरा या रेषांना ‘ईश्वराची भाषा’ मानतात; म्हणूनच हस्तरेखा विद्या आजही प्रासंगिक आणि चमत्कारी मानली जाते.
सत्य : इथे “लोक मानतात म्हणून ते खरं” हा तर्कदोष आहे. अनेक परंपरा ग्रहणामध्ये सूर्याला किंवा चंद्राला राक्षस गिळतो असे मानत होत्या, पण विज्ञानाने ग्रहणाचे कारण स्पष्ट केले. अनेक संस्कृती आजही भूत, नजर, जादूटोणा मानतात. समाजात एखादी श्रद्धा टिकून राहते याचा अर्थ ती सत्य आहे असे होत नाही. हस्तरेखा विद्या प्रासंगिक आहे कारण ती लोकांच्या अनिश्चिततेवर आधारलेली आहे. माणसाला भविष्याची भीती असते, आणि त्या भीतीवर उपाय म्हणून तो “कोणी तरी मला माझं भविष्य सांगेल” या आशेने अशा गोष्टींकडे झुकतो. हा मनाचा खेळ आहे, विज्ञान नाही.
१६) दावा : जर आपली ओळख जन्मापूर्वीच ठरलेली असेल, तर आपले जीवनही कदाचित एखाद्या ‘दैवी स्क्रिप्ट’नुसारच चालत असावे.
सत्य : हा मुद्दा म्हणजे फक्त “फिंगरप्रिंट्स unique आहेत” यावरून “जीवन नियतीने लिहिले आहे” असा उडी मारणारा निष्कर्ष आहे. हे non sequitur आहे—म्हणजे निष्कर्षाचा पूर्वपक्षाशी संबंध नाही. फिंगरप्रिंट्स unique असणे आणि जीवन पूर्वनियोजित असणे या दोन गोष्टींचा जसा परस्पर संबंध नाही तसाच वैज्ञानिक संबंधही नाही. तुम्ही unique आहात म्हणून तुमचं आयुष्य पूर्वनियोजित आहे, हा निष्कर्ष तर्कशुद्ध नाही. उलट, फिंगरप्रिंट्सची निर्मिती developmental randomness दाखवते—म्हणजेच निसर्गात “पूर्वनियोजित स्क्रिप्ट” पेक्षा परिस्थितीजन्य बदल मोठे आहेत हे दर्शवते.
१७) दावा : जेव्हा विज्ञान थकते, तेव्हा अध्यात्म सांगते—“कोणी तरी आहे, जो हे सगळे चालवत आहे. तो पाहतो आहे, समजून घेत आहे आणि निर्माण करीत आहे.”
सत्य : हे वाक्य फार लोकप्रिय आहे, पण तेच विज्ञानविरोधी आहे. विज्ञान थकत नाही; विज्ञान सतत विस्तारत असते. ते निरंतर नूतनवीन गोष्टींचा शोध घेत असते. म्हणून कालपर्यंत अंधारात असलेल्या गोष्टी आज स्पष्टपणे दिसू लागतात. हजारो वर्षांपूर्वी विजेचा अर्थ देवाचा कोप मानला जायचा, आज आपण विद्युतशास्त्र जाणतो. रोगांना पाप मानले जायचे, आज जंतू आणि विषाणू कळले. म्हणून विज्ञान “थकलं” म्हणजे देव आला, हा तर्क म्हणजे माणसाच्या अज्ञानाला देवाचा मुखवटा देणे. यालाच God of the gaps म्हणतात. आणि इतिहास सांगतो की, जे जे हे “देवाचं क्षेत्र” मानलं गेलं, ते ते पुढे विज्ञानाने कारणासहित शोधून काढलं.
१८) दावा : जर निसर्ग इतका सूक्ष्म आणि परिपूर्ण असू शकतो, तर निसर्गामागे एखादी सर्वोच्च चेतना नक्कीच आहे—जिला भारतीय तत्त्वज्ञान ‘ब्रह्म’ म्हणते.
सत्य : हा मुद्दा पुन्हा श्रद्धेचा आहे, विज्ञानाचा नाही. निसर्ग परिपूर्ण नाही. मानवी शरीरात अनेक त्रुटी आहेत: डोळ्यात blind spot आहे, श्वासनलिका आणि अन्ननलिका जवळ असल्याने गुदमरून मृत्यू होऊ शकतो, पाठदुखी ही आपल्या evolutionary history ची देन आहे, अनेक आनुवंशिक आजार आहेत, कर्करोग होतो, बालमृत्यू होतो. जर हे “परिपूर्ण डिझाइन” असते, तर इतक्या त्रुटी नसत्या. एवंच निसर्ग “परिपूर्ण” नाही; तो नैसर्गिक निवडीने टिकलेला तडजोडवादी आहे. म्हणून “परिपूर्णता दिसते म्हणून ब्रह्म आहे” हा दावा भावनिक आहे.
१९) दावा : प्रत्येक फिंगरप्रिंट हा एक ‘ईश्वरी पासवर्ड’ आहे, जो फक्त त्यालाच माहीत आहे, ज्याने आपल्याला घडवले आहे.
सत्य : पण प्रत्यक्षात आज biometric प्रणाली fingerprint वापरून unlock होते. म्हणजे हा पासवर्ड देवाला नाही, मोबाईलला समजतो! इथेही धार्मिक काव्यात्मक भाषा वापरून एक सामान्य जैविक वैशिष्ट्य “दैवी रहस्य” म्हणून रंगवले आहे. पासवर्ड ही मानवी संकल्पना आहे. निसर्गाला पासवर्डची गरज नसते. fingerprint हे फक्त friction वाढवण्यासाठी (grip) उपयुक्त असणारे ridges आहेत, ज्याचा दुय्यम फायदा म्हणजे ओळख पटवणे शक्य होते.
२०) दावा : म्हणून शेवटी तोच प्रश्न उरतो—त्या कलाकाराची बरोबरी कोणी करू शकते का? उत्तर स्पष्ट आहे—“नाही!” तो एकमेव आहे, जो प्रत्येक वेळी, प्रत्येक देहावर एक नवी स्वाक्षरी रचतो; आणि तोच सृष्टीकर्ता आहे!
सत्य : हा निष्कर्ष पूर्णपणे पूर्वग्रहदूषित आहे. कारण आधीच “कलाकार आहे” हे गृहित धरले आणि मग त्यावरून सृष्टीकर्ता सिद्ध केला. विज्ञानात असे चालत नाही. तुम्ही जर देव मानत असाल, तर तो तुमचा श्रद्धेचा अधिकार आहे. पण fingerprint चा दाखला देऊन देव “सिद्ध” होतो असे म्हणणे म्हणजे तर्कशास्त्राचा अपमान आहे. देव सिद्ध करण्यासाठी प्रयोगशाळेत मोजता येईल असा पुरावा हवा, फक्त भावनिक रूपकं नकोत.
या संपूर्ण मजकुरात एक अतिशय धोकादायक पद्धत दिसते: आधी विज्ञानाचे शब्द वापरायचे, मग “आश्चर्य”, “अलौकिक”, “दैवी”, “अदृश्य कारागीर” अशी भाषा टाकायची, आणि शेवटी हिंदू धर्म श्रेष्ठ आहे असा निष्कर्ष द्यायचा. हा केवळ अंधश्रद्धेचा प्रचार नाही, तर वैज्ञानिक विचारसरणीला कमकुवत करण्याचा प्रकार आहे. कारण जेव्हा एखादा सामान्य वाचक अशा पोस्टवर विश्वास ठेवतो, तेव्हा त्याच्या मनात विज्ञानाबद्दल संशय निर्माण होतो. मग तो उद्या लसीकरण, औषधे, मानसिक आजार, खगोलशास्त्र, उत्क्रांती सिद्धांत यावरही संशय घेऊ लागतो. म्हणजे fingerprint च्या नावाखाली हा व्यापक वैचारिक प्रकल्प असतो—“विज्ञान अपूर्ण आहे म्हणून धर्मच अंतिम सत्य” हा प्रचार.
याशिवाय या पोस्टमध्ये अजून एक मोठा धोका आहे: “हिंदू धर्मीय याच शक्तीची उपासना करतात—कधी मूर्तिपूजक म्हणून, तर कधी नास्तिक म्हणूनही” हा दावा. हा दावा धार्मिक राजकारणाचा भाग आहे. कारण तो सूचित करतो की नास्तिकसुद्धा शेवटी हिंदूच आहेत किंवा हिंदू चौकटीतच बसतात. पण नास्तिकता ही धार्मिक ओळख नाही, ती तत्त्वज्ञानात्मक भूमिका आहे. एखादा माणूस नास्तिक असू शकतो तसेच कोणत्याही धर्माचा भाग नसू शकतो. पण अशा पोस्ट्स नास्तिकतेलाही धर्मात ओढून “हिंदुत्वाचा विस्तार” करतात. म्हणजे हा केवळ वैज्ञानिक फसवणूक नसून सांस्कृतिक आणि वैचारिक कब्जा आहे.
*फिंगरप्रिंट्सचे खरे वैज्ञानिक स्पष्टीकरण अतिशय सुंदर आहे आणि त्यात देवाची गरज नाही. भ्रूणाच्या विकासात त्वचेचे थर वाढत असताना बोटांच्या टोकावर ऊतींच्या वाढीचा वेग, गर्भातील द्रवाचा दबाव, गर्भाच्या हालचाली, सूक्ष्म रक्तप्रवाह, पेशींचे विभाजन—या सर्व घटकांमुळे ridge patterns तयार होतात. हे patterns “सारखे” असू शकत नाहीत कारण प्रत्येक गर्भाचा विकास हा सूक्ष्म फरकांनी भरलेला असतो. म्हणून identical twins सुद्धा वेगळे fingerprints घेऊन जन्मतात. ही uniqueness म्हणजे दैवी हस्ताक्षर नाही, तर निसर्गातील complexity आणि randomness चे सुंदर उदाहरण आहे. निसर्गाचे नियम इतके प्रभावी आहेत की ते साध्या प्रक्रियांतूनही अमाप विविधता निर्माण करतात. म्हणून शेवटी मुद्दा असा आहे: fingerprints हे देवाचे अस्तित्व सिद्ध करत नाहीत, ते फक्त जैविक विकासाची (developmental biology) आणि निसर्गातील सूक्ष्म विविधतेची साक्ष देतात.*
“विज्ञान अजून सगळं सांगू शकत नाही” हे खरं असलं तरी “म्हणून देव आहे” हा निष्कर्ष तर्कशुद्ध नाही. विज्ञानाचा उद्देश देव नाकारणे नाही; विज्ञानाचा उद्देश सत्य शोधणे आहे. पण छद्म-विज्ञानाचा उद्देश वेगळा असतो—तो लोकांना “थक्क” करून विचार थांबवतो. विचार थांबला की श्रद्धा सुरू होते. आणि श्रद्धा सुरू झाली की राजकीय-सांस्कृतिक सत्ता मजबूत होते. अशा पोस्ट्सचा खरा मुकाबला म्हणजे लोकांना हे शिकवणे की वैज्ञानिक दावा कसा तपासायचा. एखादी गोष्ट “युनिक” आहे म्हणून ती दैवी नाही. एखादी गोष्ट “समजायला कठीण” आहे म्हणून ती आत्म्याची नाही. एखादी गोष्ट “आजही पूर्ण समजली नाही” म्हणून ती ईश्वराची सही नाही. उलट, अशा गोष्टी आपल्याला सांगतात की निसर्ग स्वतःच इतका समृद्ध आहे की त्याला अलौकिक हाताची गरज नाही. माणसाने जर विवेक ठेवला, तर तो fingerprint मध्ये देव शोधण्याऐवजी fingerprint च्या मागचे विज्ञान समजून घेईल. आणि ते समजून घेतल्यावर त्याची निसर्गाविषयीची जाणीव अंधश्रद्धेमुळे नाही, तर ज्ञानामुळे अधिक गहिरी होते हे कळेल.
म्हणून “आपण आस्तिक असो वा नास्तिक—देव मान्य करावा लागतो” हा शेवटचा दावा हा बौद्धिक दडपशाहीचा प्रकार आहे. नास्तिकाला कोणताही देव मान्य करावा लागत नाही. त्याला फक्त एवढं मान्य करावं लागतं की, निसर्गात नियम आहेत, प्रक्रिया आहेत, आणि त्या प्रक्रियांमुळे विविधता निर्माण होते. देव मान्य करणे हा वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्न आहे, वैज्ञानिक निष्कर्षाचा नाही. fingerprint चा आधार घेऊन धर्म श्रेष्ठ ठरवणे म्हणजे विज्ञानाच्या नावाखाली धार्मिक प्रचार करणे होय. आणि म्हणूनच अशा मजकुराला ठामपणे छद्म-विज्ञान म्हणून ओळखणे आणि त्याचे खंडन करणे ही आजच्या काळातील विवेकवादी जबाबदारी आहे.JK
( लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा