पाण्यावर पेटणारी पणती: किती खरे? किती खोटे?

      सोशल मीडियातून पाण्यावर पेटणाऱ्या पणतीचे व्हिडीओ सध्या पसरत आहेत. व्हिडीओमध्ये तेजस खरे नावाचा तरुण या पणतीची माहिती देताना दिसत आहे. पणतीमध्ये पाणी ओतताच पणतीची ज्योत आपोआप प्रज्वलित होताना दिसते. तरुणही त्या प्रकाशाला 'पणतीची ज्योत' पेटलेली आहे असेच म्हणताना दिसत आहे. आपण तो व्हिडीओ खाली पाहू शकता.  या व्हिडीओसोबतच एक मेसेजही पसरवला जात आहे. त्यामध्ये या पणतीची जाहिरात केलेली आहे. या मेसेजमध्ये 'विद्युत उर्जे शिवाय उत्कृष्ट रोषणाई करा' असे म्हटले आहे. याचा अर्थ विद्युत ऊर्जेशिवाय ही पणती प्रज्वलित होते असा तेजस खरेचा दावा दिसतो. याच मेसेजमध्ये या पणतीला तेल आणि वातीचीही गरज नसल्याचे म्हटले आहे. आणि सर्वात कहर म्हणजे साई बाबांनी पाण्यावर पणती पेटवण्याचा चमत्कार केला होता, त्याच आधारावर आपण ही पणती तयार केली असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे. एकंदरीत ही पणती चमत्कारिक असल्याचा आभास निर्माण केलेला आहे.

यामागील तथ्य काय आहे? 
      पहिली गोष्ट म्हणजे या पणतीला विद्युत उर्जा लागत नाही, ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे. या पणतीची ज्योत म्हणजे LED बल्ब आहे. LED बल्ब विद्युत ऊर्जेवरच चालतात. LED बल्ब पेटल्यावर  'पणतीची ज्योत पेटलेली आहे' असे तेजस खरे म्हणत आहे, ते पूर्णपणे खोटे आहे. ती पणतीची ज्योत नाही तर LED बल्ब आहे. पणतीमध्ये विद्युत ऊर्जा साठवण्यासाठी सेल किंवा बॅटरी असते. पणतीची रचनाच अशी आहे की पणतीमध्ये पाणी ओतले की सर्किट पुरे होते व बल्ब पेटतो. सेल किंवा बॅटरी उतरल्यानंतर पणतीमध्ये पाणीच नव्हे, तेल, दूध, रॉकेल असे काहीही ओतले तरी पणती प्रकाशित होणार नाही. पणतीचा संबंध साईबाबांशी जोडणे हा मार्केटिंग फंडा आहे. लोकांच्या भावनिकतेला हात घालून आपले उत्पादन खपवण्यासाठी साईबाबा आणि चमत्काराचा आधार घेतला आहे. 
     खालील व्हिडीओमध्ये या पणतीला बल्ब जोडले जात आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे ही पणती विद्युत उर्जेशिवाय चालते हे खोटे आहे. 



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?