कृष्णाच्या पदस्पर्शाने पाणी हटले? काय आहे वसुदेव प्याल्याचे रहस्य?





‘काय विचित्र कारागिरी आहे …
या 250 वर्षांच्या पितळी भांड्यात भगवान कृष्णाजी वासुदेवाजींच्या मांडीवर बसले आहेत.
हा वाडगा पाण्याने भरल्याने ते कोठूनही सांडत नाही परंतु जेव्हा पाणी भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या तळव्यांना स्पर्श करते तेव्हा सर्व पाणी तळाच्या छिद्रातून सांडते.’

या मजकुरासोबत हे व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहेत. यामध्ये कृष्णमूर्तीच्या पायाला पाण्याचा स्पर्श होताच प्याल्यात जमा झालेले सर्व पाणी वाहून जाते. याला काही लोक चमत्कार म्हणत आहेत. पहिल्यांदा हे व्हिडीओ पहा.





या व्हिडीओंंला दिलेले उत्तर वाचा.

द्रव पदार्थ हा नेहेमी उच्च पातळीकडून खालच्या पातळीकडे वाहतो हे वैज्ञानिक तत्व आहे. पाण्याची पातळी वाढतवाढत सर्वोच्च पातळीला पोचली की कमी पातळीकडे वाहू लागते आणि ते पूर्ण रिकामे होईपर्यंत वाहत राहते. याला Siphon असे म्हणतात. एक वैज्ञानिक तत्व, एक अख्यायिका आणि एक पौराणिक कथा यांचा उत्कृष्ट मिलाफ असलेली एक अनोखी वस्तू म्हणजे 'वसुदेव प्याला'!

एखाद्या उंच ठिकाणी ठेवलेल्या पिंपातून अथवा टाकीतून आपल्याला पाणी (किंवा इतर एखादा द्रव पदार्थ) खाली काढायचे असेल तर वक्रनलिका (Siphon) विविध प्रकारे वापरता येते. एका लांब, पोकळ नळीचे एक टोक उंचावरील टाकीतील पाण्यात बुडलेले असताना दुसऱ्या टोकाने तोंडाने पाणी खेचून पाण्याचा प्रवाह चालू करता येतो. नळीचे टाकीमधील टोक जोपर्यंत पाण्यात बुडलेले असेल तोपर्यंत पाणी वक्रनलिकेतून खाली पडत राहते. लवचिक नळी असेल तर प्रथम नळी टाकीत बुडवून नळीमध्ये पूर्ण पाणी भरून नळीचे वरील टोक बोटाने बंद करून नळी बाहेर काढावी व खाली आणून बोट काढल्यास पाण्याचा प्रवाह चालू होतो. ही पद्धत रॉकेल, डिझेल, सौम्य आम्ल इ. द्रवांसाठी फार उपयुक्त ठरते.

सायफनचा उपयोग करून फिश टँकमधील पाणी हळूहळू काढून नवीन पाणी घालता येते. तसेच, फिश टँकमधील तळाशी जमलेली घाण बाहेर काढून टाकता येते. सायफनच्या तत्त्वावरच शौचालयातील फ्लशचे कार्य चालते. सायफनचे अनेकविध प्रकार कारखान्यांमध्ये वापरले जातात.

एक मजेदार प्रयोग : वसुदेव पात्र किंवा वसुदेव पेला.(सोशल मीडियावर याचाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.) हे उपकरण सायफनच्या तत्त्वावर कार्य करते. या पेल्यामध्ये हळूहळू पाणी भरत निरीक्षण केल्यास असे दिसते की, पाणी एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचले की आपोआप पेल्याच्या तळाशी असलेल्या भोकातील नळीतून पाणी खाली गळू लागते, आणि जवळजवळ सर्व पाणी नळीतून खाली गळून जाते.

या पेल्याला वसुदेव पेला असे नाव पडण्यामागे मजेदार कथा आहे. कंसाच्या कैदेतून वसुदेव नवजात अर्भक (श्रीकृष्ण) घेऊन यमुना नदी पार करून जाताना यमुनेला महापूर आलेला असतो. वसुदेव पाण्यातून चालत नदी पार करण्याचा प्रयत्न करताना श्रीकृष्णाचा पाय यमुनेच्या पाण्याला लागताच झरझर पाणी ओसरते!

असे उपकरण स्वत: घरी बनवायचे असेल तर प्लास्टिकचा उभट पेला, सलाइनची नळी इ. साहित्य वापरून प्रयत्न करा. पेल्याच्या तळाशी मध्यभागी एक बारीक भोक पाडून त्यातून नळी सरकवून नळीचे पेल्यातील टोक वळवून परत तळाकडे तिरके टेकवा. यासाठी सेलोटेपचा वापर करून नळी पेल्याच्या आतमध्ये हलणार नाही अशी बसवा. नळी भोकात नीट घट्ट बसावी म्हणून अ‍ॅरेल्डाइट किंवा ग्लू वापरा. पेला पारदर्शक नसेल तर हा एक छानसा जादूचा प्रयोग वाटेल!

वसुदेव पेल्याच्या खाली एक तळाशी मोठेसे भोक पाडलेले प्लास्टिकचे भांडे उपडे घालून ठेवा व त्याच्या आत एक वाटी ठेवा म्हणजे पाणी सांडलेले दिसणार नाही. - जेट जगदीश.




खाली याबाबतचे स्पष्टीकरण देणारे व्हिडीओ देत आहे. ते जरूर पाहावेत.
(१)


(२)


(३)
 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?