*ईद आणि अंनिस* या विषयावरील पोस्टला उत्तर

*ईद आणि अंनिस* या विषयावरील पोस्टला उत्तर: – उत्तम जोगदंड.

बकरी ईद निमित्त अंनिसला टार्गेट करणारी आणि मुस्लिम विद्वेष ओकणारी एक पोस्ट आज समाज-माध्यमांवर फिरत आहे. ही पोस्ट वाचून, काही तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी हिंदू धर्माला किती इस्लामावलंबी केलंय, इस्लामची सावली बनवले आहे याची जाणीव होते आहे. विशेष म्हणजे स्वतःत कसलीही हिम्मत नसलेले हे लोक आपला मुस्लिम द्वेष व्यक्त करण्यासाठी अंनिसचा आधार घेत आहेत आणि एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता त्या पोस्टमधील एक एक मुद्द्यावर विचार करू या: 

पोस्ट: 
देवीपुढे कोंबड्याचा बळी देणे अंधश्रद्धा म्हणणारी 'अंनिस' आज बकरी ईदला आपल्या बायकोच्या पदरात लपून बसणार आणि एकदम २३ जुलैला बाहेर येणार!
उत्तर : 
*याचा अर्थ असा होतो की हिंदू लोक देवीपुढे कोंबडे/बकरे कापतात ही अंधश्रद्धा आहे हे अंनिसचे म्हणणे लेखकास मान्य आहे. तसे नसेल तर ईदला बकरी कापतात म्हणून हिंदू लोक देवीपुढे कोंबडे/बकरे कापतात असा तर्क लेखक करू इच्छित आहेत काय?  दुसरे म्हणजे, मुसलमानांच्या ईदला बकरी कापतात त्या प्रकाराला अंनिसवाले घाबरून जाऊन अंधश्रद्धा म्हणत नाहीत असा लेखकाचा आरोप दिसतो आहे. हा आरोप लेखकाच्या अज्ञानातून किंवा व्हाट्सअॅप युनिव्हार्सिटीच्या ज्ञानातून केलेला दिसतोय. अंनिस सर्वच धर्मातील अंधश्रद्धांना विरोध करते हे जगजाहीर आहे. बकरी ईदच्या दिवशी अंनिसवाले महाराष्ट्रभर मैदानात उतरून रक्तदान शिबीर घेऊन मुस्लिमांना, बकरी कापण्याऐवजी रक्तदान करण्याचे आवाहन करीत असतात. त्यावेळी हे कथित लेखकच त्यांच्या बायकोच्या पदरामागे लपून अशा फालतू पोस्ट लिहीत असावेत असे दिसते.* 

पोस्ट: 
गणपती विसर्जनाला विरोध करण्यासाठी नदीजवळ उभे राहू आंदोलन करणारी 'अंनिस' आज बकरी ईदला कत्तलखान्यासमोर आंदोलन करणार का? 
उत्तर:
*आता अंनिस असा विरोध करायला नदीजवळ उभी राहून आंदोलन करीत नाही. कारण अंनिसची भूमिका पटल्याने आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारच हे काम करीत आहे आणि सूज्ञ हिंदू बांधव त्याला उदंड प्रतिसाद देत आहेत. हे लेखकास माहिती असते तर असे काही त्यांनी लिहले नसते. आता त्यांना असे म्हणायचे आहे काय की ईदला बकरी कापतात म्हणून नदीत गणपती विसर्जन करणे योग्य आहे?* 

पोस्ट: 
शिवपिंडीवर दुध वाहण्यापेक्षा ते पैसे गरीबांना द्यावे म्हणणारी 'अंनिस' बकरी ईदला लाखो रुपयांचा बोकड कापण्याऐवजी ते पैसे गरिबांना द्यावे असे फलक मुस्लिम वस्तीत लावणार का? 
उत्तर: 
*याचे सविस्तर उत्तर वरील पहिल्या मुद्दयात आलेले आहे. बकरी कितीही रुपयांची असो, ती कापण्यास विरोध आहे हे वर आले आहेच. शिवाय अंनिसचा हा उपक्रम पटल्याने, कित्येक हिंदू बांधव आता प्रतिकात्मक असे अत्यंत थोडे दूध पिंडीवर वाहून उरलेले दूध गरीब मुलांना देत आहेत. बरे, शिवपिंडीवर दूध वाहने थांबविले जाणे हे ईदला बकरी कापायचे थांबवण्यावर अवलंबून आहे असे लेखकाचे म्हणणे आहे काय?* 

पोस्ट: 
गणपती विसर्जनासाठी कृत्रिम हौद तयार करणारी 'अंनिस' बकरी ईदला कत्तलखान्यांपुढे मातीची प्रतिकात्मक बकरी तयार करून विकणार का? 
उत्तर: 
*याचेही उत्तर वरील मुद्दयात आले आहे. सरकार आणि तमाम समजदार हिंदूंनी कृत्रिम हौदात विसर्जन करणे सूज्ञपणे स्वीकारले आहे. पण लेखक महोदयांना हे माहिती नसल्याने असे वाटत असावे की हे बकरी कापणे थांबले की मग कृत्रिम हौदात विसर्जन योग्य ठरेल. दुसर्‍या धर्मांतील प्रथांवर आपल्या धर्मातील प्रथा अवलंबून ठेवणे बरे नव्हे.* 

पोस्ट: 
'एक गाव एक गणपती'चा प्रचार करणारी 'अंनिस' 'एक गाव एक बकरी' असा प्रचार प्रत्येक मोहल्ल्यात जाऊन करणार का?
उत्तर: 
*अंनिसच्या या उपक्रमाला देखील राजाश्रय लाभलेला आहे. गल्ली गल्लीत विविध सार्वजनिक गणपती बसवण्यापेक्षा संपूर्ण गावाचा एक गणपती बसवून सामाजिक एकोपा साधला जाणे, पैशांची बचत होणे, इत्यादि बाबी लेखक महोदयांना पचत नाहीत असे दिसते. आता इथे बकरीचा काय संबंध? मुळात ईद निमित्त एकही बकरी कापण्याला विरोध असल्यावर एक गाव एक बकरी असा प्रचार अंनिसने का करावा?  ईदला बकरी कापतात म्हणून एक गाव एक गणपती उपक्रमाला लेखकांचा विरोध आहे की काय?*

हिंदू धर्म सुमारे चार हजारांहून अधिक वर्षे अस्तीत्वात असलेला पुरातन धर्म आहे असे म्हणतात. तो विश्वगुरू आहे असेही म्हणतात. असे असताना सुमारे १६०० वर्षे वय असलेल्या मुस्लिम धर्माला समोर ठेऊन त्यांच्यात एक अमुक प्रथा आहे म्हणून आमच्या अमक्या-तमक्या प्रथा योग्य ठरतात असा या लेखकांचा दावा दिसतो आहे. म्हणजे, हिंदूंच्या प्रथा मुस्लिमांच्या प्रथांवर अवलंबून आहेत असे ते दर्शवीत आहेत. खरे तर या विश्वगुरू मानल्या गेलेल्या धर्माच्या अनुयायांनी स्वतःच्या अनिष्ट प्रथा कालानुरूप सुधारून किंवा बंद करून जगातील सर्व धर्मापुढे आदर्श ठेवायला हवा. त्या ऐवजी या हिंदुत्ववाद्यांनी विश्वगुरू  मानल्या गेलेल्या स्वधर्माला पिछाडीवर नेऊन ‘इस्लाम-चेला’, ‘इस्लामावलंबी’ धर्म बनवायचा संकल्प केलेला दिसतोय.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य