महालक्ष्मी कॅलेंडर मधील भाकीत

घरात महालक्ष्मी कॅलेंडर असेल तर जुलै 2021 महिन्याचं पान उघडा, उजव्या हाताला 'पर्जन्य अंदाज' चा रकाना बघा. 

8-9 महिन्यांपूर्वी सूर्याची स्थिती 22 जुलैला कोणत्या नक्षत्रात असेल, त्यावरून त्यांनी पावसाचा अंदाज लावला आहे. त्यात भरीस भर म्हणजे पूर येणार हे भाकीतही केलं आहे. त्यानुसार 22 जुलैला झालेल्या पावसामुळे कोकणात बहुतेक सर्वच ठिकाणी पूर आलेला आहे. 

आता महत्वाचा मुद्दा, काही पुढारलेली लोकं, ज्यांचं मस्तिष्क अभिनव शैक्षणिक पद्धतीने तासून घेतलेलं आहे असे वास्तववादी लोक या हिंदू ज्योतिष शास्त्राला आणि पंचांगाला थोतांड म्हणून हिणवतात आणि हे पंचाग बघणाऱ्या विशारदांना किडमिडे गुरुजी म्हणून टोपण नावे ठेवतात. 

मला अशा सो-कॉल्ड सुधारलेल्या लोकांना एवढंच सांगावस वाटत की ब्रिटिशांच्या मार्गदर्शनाच्या आणि शिक्षणपद्धतीचा कुबड्या घेऊन तुम्हाला वाटत असेल की तुमचा सर्वांगीण विकास झाला आहे तर खरं म्हणजे ते तुमचं वैचारिक अध:पतन आहे. हिंदू संस्कृती ही विश्वगुरु होती आणि भविष्यातही राहील, कुणी परकीय शक्तीने तिच्या बद्दल कितीही वाईट गोष्टींचा प्रचार केला तरी तिचे सत्व तुसभरही कमी होणार नाही.
=================

या पोस्टला उत्तर
तर महाराज,
तुमच्या म्हणण्यानुसार महालक्ष्मी कॕलेंडर पाह्यले, त्यातच तुम्ही वर्तवलेले भविष्य आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे हिंदु जोतिषशास्राने गदगद व्हायला झाले. साश्रु नयनांनी काही दिसेनासे झाले. 'मरो ती पाश्चिमात्य संस्कृती' असे म्हणालो. पण आपल्याच मातीतील बहिणाबाई आणि तुकोबाबाबाने जोतिषाबद्दल सांगितलेले आठवून, डोळे पुसून तेच महालक्ष्मी कॕलेंडर पाहिले तर,
खाली उजवीकडे कोपऱ्यात शुभ दिवस दिसले. त्यात दि. २२ मध्यम दाखवला आहे. त्याच बाजुला त्याज्य दिवस आहेत. त्यात २२ तारखेचा उल्लेखच नाही. आणि पर्जन्य अंदाजमध्येही दि. २२ ते २७जुलै आणि दि. ३० जुलै ते १ आॕगस्ट रोजी पाऊस अपेक्षित असे लिहलेले आहे.
(मला वाटते, आपण सांगितलेले पावसाचे भविष्य १९जुलैला असावे. असो, याबाबतीत आमचा अभ्यास तसा कमीच!)
या पानावर अजून एक गमंत सापडली, म्हणजे बघा हं,  २२ तारखेचं पर्जन्यवृष्टीचं भविष्य खरं मानलं तर इथे डाव्या कोपऱ्यात साखरपुडा मुहूर्त आहे. त्यात २२ तारीख आहे. भर पावसात साखरपुडा.....??
एवढ्यात आठवलं की, यावर्षी पाऊस तर "मे" महिन्यापासून सुरु झालाय, पण "मे" महिन्यातील महालक्ष्मी कॕलेंडरच्या पानावर पर्जन्य अंदाज काय, नुसतेच 'पर्जन्य' हा शब्दही नाही.

तर महाराज हो,
आपला मुद्दा असा होता की,
आपण लिहिलंय..
"....हिंदू संस्कृती ही विश्वगुरु होती, आणि भविष्यातही राहील, कुणी परकिय शक्तीने तिच्याबद्दल कितीही वाईट गोष्टीचा प्रचार केला तरी तिचे सत्व तसूभरही कमी होणार नाही" ही भाषाच अहंकारी मीपणाची झाली. सत्व (सत्याचे काय?) कमी होणार नाही, ही अहंकारी भाषा विज्ञान कधीच वापरत नाही. उलट असं अपडेट होणं हेच विज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. याउलट कट्टर धार्मिक लोक उर्मटपणे आम्हीच अंतिम असा दावा करत असतात.
एखाद्या कॕलेंडरमधील, योगायोगाने खरे झालेले वाक्य म्हणजे प्रमाण नव्हे. वैज्ञानिक दृष्टिकोनाची काही पद्धत आहे. त्याबाबत ही धार्मिक कॅलेंडर्स विरोधाभासात आहेत. दोन कॕलेंडर घेतली तरी त्यात विरोधी विधाने आढळतील. २२जुलैला पाऊस होणार असल्याचे भाकीत फक्त महालक्ष्मी कॅलेंडरमध्येच का? दुसऱ्या कॅलेंडरमध्ये का नाही? फलज्योतिष खरोखरच शास्त्र असते तर सगळ्या कॅलेंडरमध्ये हे भाकीत दिले असते. बरे हे कॅलेंडरवाले काही रस्त्यावरचे कुडमुडे ज्योतिषी नाहीत. हे फलज्योतिषाचे चांगले जाणकार आणि अधिकारी व्यक्ती आहेत. मग त्यांच्यात एकवाक्यता का नाही? एक लक्षात घ्या, एखादा योगायोग म्हणजे शास्र नव्हे.
जोतिष केवळ थोतांडच नाही तर ते माणसाला पांगळं बनवतं, दैववादी बनवतं. आपल्या संस्कृतीचा अभिमान दाखवताना त्यातील चांगल्या गोष्टींचा नक्कीच उल्लेख व्हायला हवा. पण जोतिषासारख्या बेभरवशाच्या, टाकाऊ गोष्टी सोडूनच द्यायला हव्यात. पिकलं पानं गळून पडतं, सुकलं झाडं मोडून पडतं. त्याप्रमाणे अशा बेगडी आणि तकलादू गोष्टी सोडूनच द्यायला हव्यात. पण अशा गोष्टी, हाच ज्यांच्या पोटापाण्याचा उद्योग आहे. ज्यांचे हितसंबध जोतिषासारख्या थोतांडात गुतलेले आहेत. अशा लोकांकडून आपण धर्माचे नावे फसवले तर जात नाही आहोत ना? याचा विचार आपण करायला हवा.
आणि असा विचार करणं हे आपल्या माणुसपणाचे लक्षण आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य