परधर्म द्वेषी हिंदुत्ववाद्यांच्या चुकीच्या प्रश्नांना खरी उत्तरे...

परधर्म द्वेषी हिंदुत्ववाद्यांच्या चुकीच्या प्रश्नांना खरी उत्तरे... – उत्तम जोगदंड.

सुशिक्षीत हिंदु मित्रानो खालील प्रश्न गांभीर्याने वाचा व त्यांची उत्तरे शोधा या धर्मांध  पोस्टला उत्तर : 

1. आज जगामधे 56 देश अधिकृत इस्लामीक देश आहेत. 112 देश अधिकृत ख्रिस्तीयन देश आहेत. 11 देश अधिकृत बौध्द धर्मीय देश आहेत. वीस लक्ष लोकसंख्या असणारा इस्त्राइल अधिकृत ज्यु धर्मीय देश आहे. एक ते दोन लक्ष लोकसंख्या असणारे व तालुक्याएवढे क्षेत्रफळ असणारे मुस्लिम व ख्रिस्ती यांचे जगात अनेक देश आहेत, पण 100 कोटी हिंदु धर्मीयांसाठी संपुर्ण पृथ्वीतलावर एकही हिंदुराष्ट्र का अस्तित्वात नाही ? मुस्लिम व ख्रिस्ती यांच्या लहान देशाना देखील आदर व सन्मान मिळतो मग 100 कोटी हिंदुंसाठी हिंदुराष्ट्र का असु नये ? भविष्यात जगामधे धर्माच्या आधारावर तिसरे महायुध्द होण्यची शक्यता आहे अशा वेळी हिंदुंनी कोणाकडे मदतीच्या अपेक्षेने पहायचे ?

उत्तर: 
1. एक तर अधिकृत धर्म असलेल्या देशांची आकडेवारी चुकीची आहे. अधिक महितीसाठी पुढील लिंक पहावी (https://simple.wikipedia.org/wiki/State_religion#Hindu_countries) 
एक हिंदू देश होता नेपाळ तोही आता हिंदू देश राहिलेला नाही. तो का राहिलेला नाही याचा विचार करावा. अन्य धर्म एका विशिष्ट तत्वाने बांधलेले आहेत पण हिंदू धर्म हा मानवतेस कलंक असलेल्या उच्च-नीच अशा हजारो जातींच्या जातीयतेने बरबटलेला आहे. अशा विभाजित लोकांचा एक देश हिंदू या नावाखाली कसा काय निर्माण होईल बरे? तिसरे युद्ध  धर्माच्या नावावर होणार नाही. समजा झालेच तर दूसरा हिंदू देश आहे कुठे मदत मागायला? असा धर्म केवळ भारतातच टिकू शकतो.   न्यूनगंडाने ग्रासलेल्या काही मूठभर बिनडोक हिंदूंनाच असली भीती वाटते.  

2. अमेरिकेच्या राज्यघटनेची सुरुवात In The Name Of GOD  या वाक्याने होते, तर अमेरिकन डॉलरच्या दहा रुपयांच्या नोटेवर We Trust On GOD असे वाक्य लिहिलेले आहे.पण भारतातील सुशिक्षीत हिंदुना मात्र देवावर श्रध्दा ठेवणे ही अंधश्रध्दा असते असे का शिकविले जाते ?

उत्तर 
2. देवावर श्रद्धा ठेवणे ही अंधश्रद्धा आहे असे भारतात कुठे शिकवले जाते? उलट अशा श्रद्धेचा बाजार मांडून आसराम, गुरमीत राम रहीम, अशा प्रकारचे बाबा श्रद्धाळूंची प्रचंड लूट करून त्यांच्या लेकीच्या वयापेक्षा लहान मुलींवर बलात्कार केल्याच्या/अन्य आरोपाखाली तुरुंगात आहेत.  मिडिया वर ज्योतिष, यंत्रे, वास्तु यांचा सुळसुळाट आहे. जे हिंदू लोक आपले स्वतःचे डोके वापरुन श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक ओळखून विवेकी निर्णय घेत आहेत ते या असल्या प्रचाराला बळी पडत नाहीत व देवावरील श्रद्धेचे नाटक करीत नाहीत.  

3. 1947 साली अखंड भारताची धर्माच्या आधारे फाळणी करुन मुस्लीमांसाठी पाकीस्तान व हिंदुंसाठी हिंदुस्तान मंजुर झाला होता .पाकीस्तानने स्वतला अधिकृत इस्लामिक राष्ट्र घोषीत केले पण भारताने स्वतला हिंदुराष्ट्र का घोषीत केले नाही ?

उत्तर 
3. वरील विधान हे अर्धसत्य आहे. 1947 साली फाळणी झाल्यावर सुमारे नऊ वर्षांनी म्हणजे मार्च 1956 मध्ये पाक इस्लामिक राष्ट्र झाला. भारत हिंदू राष्ट्र का होऊ शकत नाही ते मुद्दा क्रमांक 1 मध्ये लिहले आहेच. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याने त्याची प्रगति झाली तर पाकिस्तान आज एक मुस्लिम देश म्हणून कोसळण्याच्या मार्गावर आहे.   

4. स्वातंत्र्यावेळी भारतात 95% हिंदु असुनही व अनेक देशभक्तांची मागणी असुनही राष्ट्रध्वजाचा रंग भगवा का ठेवला नाही ? भगवा व हिरवा रंगाचा पट्टा समान ठेवला त्यामागे काय लॉजीक आहे ??घटना समितीमधे हिंदु महासभेला का स्थान दिले नाही ?

उत्तर 
4. पुन्हा चुकीची माहिती! 1951 च्या जनगणणेनुसार हिंदूंची लोकसंख्या 84 टक्के होती, 95 टक्के नव्हे.  (https://en.wikipedia.org/wiki/1951_Census_of_India) राष्ट्रध्वजावर वरचा रंग भगवा नव्हे केसरी रंग आहे. ध्वजाचे तीन रंग व अशोकचक्र याचे लॉजिक 1947 पासून वेळोवेळी सांगीतले गेले आहे. ते कोणाच्या पोकळ डोक्यात घुसत नसेल तर काय करणार. घटना समिती मध्ये लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व दिले गेले होते. हिंदू महासभा या पक्षात मध्ये नावात हिंदू असले तरी या पक्षाला जनाधार नव्हता. (जानेवारी 1946 साली झालेल्या प्रांतीय निवडणुकीत हिंदू महासभेचे उमेदवार आढळून येत नाहीत. पुढील लिंक पहा https://en.wikipedia.org/wiki/Indian_provincial_elections,_1946)  त्यामुळे अशा किरकोळ संघटनेला घटना समितीत केवळ हिंदू नावामुळे स्थान कसे मिळणार?  

5. भारताला हिंदुराष्ट्र घोषित न केल्यामुळे हिंदु तरुणांचा उस्फुर्त उत्साह दाबला जाउन राष्ट्राचे चैतन्य हरविल्यासारखे वाटत नाही काय ?

उत्तर 
5. भारताला स्वातंत्र्य मिळाले ते इंग्रजांपासून. त्यात मुसलमानांना त्यांचा वाटा मिळाला. ते वेगळे झाले. यात तरुणांचा उत्स्फूर्त उत्साह दाबला जायचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण त्या काळात तरुण लढत होते ते हिंदू राष्ट्रासाठी नव्हे तर इंग्रजांपासून आझादी मिळविण्यासाठी.  राष्ट्राचे चैतन्य हरवलेले नाहीच, उलट राष्ट्राने सर्वांगीण प्रगति केली आहे. काही तथाकथित स्वघोषित हिंदुत्वाचे ठेकेदार प्रगतीत  अडथळे मात्र आणत आहेत. 

6. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत शेवटचा हिंदु भारतात येत नाही आणि शेवटचा मुस्लिम पाकिस्तानात जात नाही तोपर्यंत फाळणीला मान्यता देउ नका,जर असे झाले नाही तर पाकीस्तानातील हिंदु गुलाम होतील व भारतातील मुस्लिम राजकीय बंड करतील.  असे म्हणाले होते.त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष का केले गेले ??.
जगामधे स्वित्झर्लंड स्पेन या देशांप्रमाणे अनेक देशान्मधे नविन देश निर्माण झाल्यावर संपुर्ण धार्मीक आधारावर  लोकसंखेची विभागणी केली .ती आपल्याकडे का केली नाही ?

उत्तर 
6. बाबासाहेब असे कुठे, कधी म्हणाले? त्यांच्या नावावर हल्ली काहीही खपवायची पद्धत पडली आहे. तसेच हे. आणि “शेवटचा हिंदू भारतात आणि शेवटचा मुस्लिम पाकिस्तानात” जाण्यासाठि आधी फाळणी तर व्हायला हवी की नको?  पाकिस्तानात जे हिंदू राहिले ते बहुतांश दलित समाजातील होते (मुद्दा क्रमांक 7 मध्ये लेखकाने ते मान्य केले आहेच). त्यांना हिंदू धर्मियांची अमानुष गुलामी पत्करण्यापेक्षा तिथे रहावेसे वाटले तर त्याला काय करणार. ते हिंदू असले तरी फाळणीनंतर ते पाकिस्तानी झाले.  त्यांच्यासाठी धर्माच्या नावाने गळा काढण्यात काय अर्थ? 

7. फाळणीनंतर पाकीस्तानात अडकुन राहीलेल्या  दलिताना गुलामासारखी वागणुक दिली गेली.कराचीतील बांधकामावर त्यांचा अमानुष छळ करुन  वेठबिगार म्हणुन वापरले गेले.अनेकांचे जबरदस्तीने धर्मांतर केले गेले.त्यावर आजपर्यंत एकाही नेत्याने आवाज का उठवला नाही ?

उत्तर 
7. भारतातील दलितांना जी भयावह आणि अमानुष वागणूक 70 वर्षांनंतर आज ही दिली जाते त्या विषयी न बोलता पाकिस्तानी दलित नागरिकांचा पुळका का बरे येतोय? इथे तर या अमानुष वागणुकीला कंटाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला ही सत्य परिस्थिती आहे.  तर आदिवासी लोक हिंदू नसतांना सुद्धा त्यांना जबरदस्तीने हिंदू बनविले जातेय. आधी आपले घरात काय जळते आहे ते पहावे मग दुसर्‍यांचे उकिरडे फुंकावेत.  

8. सर्व धर्म समान आहेत असे इतर कोणतेही धर्मीय मानत नसताना सर्वधर्मसमभाव हे फक्त हिंदुनाच का शिकविले जाते ? 

उत्तर 
8. खोटे आहे हे! भारतीय संविधान हे सर्व धर्म समान आहेत असे मूल्यमापन अजिबात करत नाही, मानत नाही, तर, संविधानाला धर्मनिरपेक्षता अपेक्षित आहे. धर्म ही व्यक्तिगत बाब मनाली गेली असून शासनाचा कोणताही धर्म नाही, कोणत्याची धर्माचा पुरस्कार किंवा तिरस्कार नाही हे ते तत्व. ते सर्वांनाच लागू होते. कोणी मुसलमानांचे तर कोणी हिंदूंचे लांगूलचालन राजकारणासाठी करीत असेल तर त्याला संविधान काय करणार.  आणि हे हिंदूंनाच कोणी शिकवत असेल तर याचा अर्थ असा ही होतो की हे त्यांना शिकविणे गरजेचे आहे. 

9. महात्मा गांधी यानी आयुष्यभर गोहत्या बंदी व्हावी यासाठी प्रयत्न केले.गांधींच्या अनुयायानी मात्र स्वातंत्र्यानंतर देशात गोहत्याबंदी कायदा करुन खरी अहिसा का कृतीत आणली नाही.गायींबाबत का अहिंसा गुंडाळुन ठेवली ?
एका बाजुने हिंदुना अहिंसा शिकवुन नेभळट बनविणारे पुरोगामी गोवंशाच्या हत्येचे समर्थन कसे काय करतात ?

उत्तर
9. संविधानात गोधन संरक्षणाचे मूलभूत कर्तव्य आहे की. अनेक भारतीयांचे गोमांस हे अन्न आहे हे कटू वाटले तरी वास्तव आहे. आता बीजेपी सरकारने गोहत्याबंदीचे कायदे जरी आणले असले तरी ईशान्येकडील राज्यात, गोव्यात, दक्षिणेकडील काही राज्यात ते लागू नाहीत व वारंवार तिथे आश्वासन दिले जाते की इथे गोहत्याबंदी लागू होणार नाही. भारतातच काही ठिकाणी गोवध चालतो तर अन्य ठिकाणी चालत का नाही याचे प्रथम स्पष्टीकरण द्यावे.  गोवध व हिंदूंना अहिंसा शिकवणे (नेभळट बनवणे) याचा काय संबंध? अन्य प्राण्यांच्या हिंसेचे काय?  

10. प्रत्येक हिंदुंच्या सणांवर अनिष्ट रुढी समजुन टिका केली जाते.पण ख्रिस्ती व मुस्लिम यांच्या एकाही सणावर तथाकथीत सुधारणावाद्यांकडुन टिका केली जात नाही असे का ??

उत्तर 
10. हिंदू धर्म अनेक अनिष्ट रूढी परंपरा यांनी बरबटलेला आहे. सुधारणावादी सर्वच अनिष्ट प्रथांवर टीका करतात पण, चोराच्या मनात चांदणे या प्रमाणे ती हिंदूंना अधिक झोंबते. ख्रिस्ती व मुस्लिम हे हिंदू धर्मापुढे तसे नवीन धर्म आहेत. तरीही  हिंदूंनी त्यांनाच आधी सुधारायला सांगणे म्हणजे आपल्या धर्माचे आपल्याच हाताने अवमूल्यन करण्यासारखे नाही काय? एका अत्यंत पुरातन धर्माने आपल्या सकारात्मक कृतीने अन्य धर्मापुढे उदाहरण घालून द्यावे. 

11. भारतातील मेडीया फक्त  हिंदु विरोधी बातम्या का देतो ?

उत्तर 
11. खोटे विधान! भारतीय मिडिया हिंदुत्ववादी पक्षाने विकत घेतला असून हिंदू विरोधी बातम्या दिल्या जात नाहीत.  काही अत्यंत अनिष्ट बाबतीत (आसारम, रामरहीम, रामपाल वगैरे )अशा बातम्या येत असतील तर त्याची हिंदू धर्मियांना खरे तर लाज वाटली पाहिजे. 

12. भारतीय मेडीयामधे अरब देशातील मुस्लिम व ख्रिस्ती चर्च यांची मोठी भागीदारी आहे हे जनतेला का सांगीतले जात नाही ?

उत्तर 
12. पुरावे द्या! आज अधिकांश मिडिया अंबानीच्या ताब्यात आहे.  जे काही उरले आहे त्याची भागीदारी विषयी माहिती उपलब्ध आहे.  कोणत्या मिडियमध्ये अरब देशातील मुस्लिम व ख्रिस्ती यांची किती भागीदारी आहे ते पुराव्यानिशी दाखवून द्यावे. उगाच फेकूगिरी करून मोदींच्या पुढे जाण्याचं प्रयत्न करू नये. 

 13. हिंदुत्ववादी नेते मेडीयावरील चर्चेत आले तर त्याना पुर्ण का बोलुन दिले जात नाही ?

उत्तर 
14. तथाकथित हिंदुत्ववादी नेते मीडियावर येऊन अक्षरशः हिंदू धर्माची नाचक्की करतात असे दिसून आले आहे. अत्यंत उर्मट, मुद्द्याला सोडून बोलणारे व खोटे बोलणारे म्हणून ते प्रसिद्ध आहेत.  एका चर्चेत तर अॅन्कर ने एका अशाच मूर्ख हिंदुत्ववाद्याला चर्चेतून हाकलून बाहेर काढले होते. अशा मूर्खांना कोणीही खरा हिंदुत्ववादी अॅन्कर बोलूच देणार नाही.  यात आश्चर्य कसले? 

14. हिंदु नेते व धर्मगुरु यानी हिंदुंच्या हिताच्या काही बाबी सांगीतल्या तर मेडीया त्याला वादग्रस्त वक्तव्य का म्हणते ??हिंदु हिंदुंच्या हिताबद्दल बोलणार नाहीत मग इतर धर्मीय मुल्ला व पाद्री हिंदु हिताबद्दल बोलणार आहेत का ?

उत्तर 
14. हिंदूंनी 10 मुले जन्माला घालावीत, महिलांनी जीन्स घालू नयेत, अमुकच कपडे घालावेत, प्रेम करू नये, अशा प्रकारची व अन्य वक्तव्ये काय हिंदूंच्या हिताची आहेत? यांना जो खरा हिंदू आहे त्याने खरे तर  जोड्यानेच मारले पाहिजे. 

15. कुटुंबनियोजनाद्वारे छोटे ;कुटुंब सुखी कुटुंब हे फक्त हिंदुवर का लादले आहे ? कोणत्याही हिंदु धर्मग्रंथात कुटुंबनियोजनाला थारा नाही.! अष्टपुत्र सौभाग्यवती भव ! हा हिंदु स्त्रीला दिला जाणारा आशिर्वाद असतो.जगात कुठेही असला कार्यक्रम राबविला जात नाही.इतर धर्मीय मात्र त्यांची लोकसंख्या वेगाने का वाढवित आहेत ? हे हिंदुना गाफील ठेवण्याचे षडयंत्र नाही काय ?

उत्तर 
15. छोटे कुटुंब हे हिंदूंवर कोणीही लादलेले नाही. समजदार बहुसंख्य हिंदूंनी स्वतः ते अंगिकारले आहे. बहुसंख्य हिंदू हे काळाप्रमाणे बदलतात. त्या काळात अष्टपुत्र वगैरे होते, पण त्याच काळात द्रौपदीचे पाच पती होते, दशरथाच्या तीन राण्या होत्या. मग आता ते पळणार काय? इतर धर्मीय आपली लोकसंख्या वाढवितात की नाही ते आकडेवारीवरून पहावे, खोटे क्लेम्स करू नयेत. स्वतःचा न्यूनगंड व विकृत मानसिकता संपूर्ण धर्मावर लादू नये.  

16. भारतात कायद्यापुढे समानता आहे असे म्हणता मग मुस्लिमाना चार बायका करायला कायद्याने परवानगी दिली ,हिंदुना मात्र बंदी का केली ? मुस्लिमाना चार बायका करायला परवानगी देताना कुराणाचा आधार घेतला ,पण हिंदु देवान्मधे देखील बहुपत्नीवाची प्रथा होती हे का दुर्लक्षीत ठेवले.यामागे हिंदु लोकसंख्या कमी करायचा डाव नाही काय ?

उत्तर 
16. हिंदू धर्मियांनी समजूतदारपणे एकपत्नीत्व स्वीकारले आहे कारण बहुसंख्य हिंदू सुधारणावादी आहेत. चार बायका करायला मुस्लिमांना परवानगी असली तरी चार बायका मुस्लिम आणणार कुठून. असल्या बिनबुडाच्या शंका घेण्यापूर्वी लोकसंख्येत स्त्री पुरुष प्रमाण पहा. 

17. घटनेप्रमाणे प्रत्येक नागरीकाला त्याच्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे.शिख लोकाना त्यांचे धर्मात सांगीतले आहे म्हणुन अधिकृतरित्या शस्त्र बाळगायला परवानगी दिली.मग हिंदुंच्या तर प्रत्येक देवतेच्या हातात शस्त्र आहे.विना शस्त्राचा कोणताही हिंदु देव नाही .हिंदुंचा दसरा (विजयादशमी )हा सण शस्त्रपुजनासाठी असतो.तरी सुध्दा हिंदुना शस्त्र सोबत बाळगायला का बंदी घातली ??

उत्तर 
18. शीख धर्माविषयीच्या अज्ञानातून हा प्रश्न आलेला आहे. तसेच यातून हिंदू धर्माचे अज्ञान सुद्धा दिसून येते. शीख धर्म हा लढवैया लोकांचा धर्म आहे (म्हणून त्यांना सरदार म्हणतात). खैबर खिंडीतून येणारी सर्व आक्रमणे त्यांनी वर्षानुवर्षे अडवली आहेत व त्यांना लढण्यासाठी किरपाण सदैव जवळ ठेवणे आवश्यक होते. सर्वच शीख ते बाळगतात असेही नाही.  हिंदूंनी असला कोणता पराक्रम केला आहे म्हणून त्यांना शस्त्र जवळ पाहिजे? शिखांव्यतिरिक्त अन्य कोणालाही असे शस्त्र बाळगण्यास परवानगी नाही हे लक्षात घ्यावे.  

18. फक्त गुलामगीरीत जनतेला निशस्त्र केले जाते.अमेरिका इंग्लंड फ्रांस जर्मनी  व इतर सर्व लोकशाही  देशातील जनतेला आधुनिक रायफली सोबत बाळगायला परवानगी आहे तर मग भारतात का नाही??औरंगजेब व इंग्रज याना देशातील हिंदुंची भिती वाटत होती म्हणुन त्यानी हिंदुना निशस्त्र केले होते.स्वातंत्र्य मिळुनही भारतीयाना  अजुनही निशस्त्र का ठेवले आहे ??हे हिंदुमधील क्षात्रतेज नष्ट करण्याचे षडयंत्र नाही काय??

उत्तर 
18. हिंदूंमधील क्षात्रतेज सातआठशे वर्षांपूर्वीच नष्ट झाले आहे. जर पूर्वी हातात शस्त्रे होती तर मग मोगल/मुसलमानांनी सुमारे सहाशे वर्षे व इंग्रजांनी सुमारे दीडशे वर्ष (ते ही बाहेरून येऊन) या देशावर राज्य कसे केले? औरंगजेबाला हिंदूंची भीती वाटत होती असे हास्यास्पद विधान केले आहे.  त्याने हिंदूंना निशस्त्र करेपर्यंत हिंदू झोपले होते का? आता शस्त्र हवे असेल तर ते कशासाठी व कोणाच्या विरोधात लढायला पाहिजे आहे? 

19. हिंदुंवर झालेल्या अन्यायाची बातमी मेडीया का दाखवत नाही??

उत्तर 
19. हिंदूंवर झालेल्या कोणत्या अन्यायाची बातमी मिडिया ने दाखवली नाही? उलट अन्य धर्मियांवर, दलितांवर झालेल्या अन्यायाच्या बातम्या मिडिया दाबून टाकतो. 

20. जगामधे इस्लामिक जिहाद्याना जिहादी असा शब्द वापरला जातो. भारतात मात्र त्याना अतिरेकी हा मोघम शब्द वापरुन हिंदुंपासुन वस्तुस्थिती का लपविली  जाते ??
आतंकवादी कारवाया कोणत्या धर्माचे लोक करतात हे माहीत असुनही आतंकवादका का कोइ धर्म नही होता असा डायलॉग का वापरला जातो?

उत्तर 
20. भारतात व जगात दहशतवाद्यांना आतंकवादी (terrorist) हाच शब्द वापरतात. तसेच नक्सली, एलटीटीई, खालीस्तानवादी, मालेगाव ब्लास्ट मधील आरोपी, नथुराम गोडसे  हे सुद्धा आतंकवादीच होते. त्यांचा धर्म इस्लाम नव्हता. म्हणून आतंकवाद का कोई धर्म नही होता असे म्हणतात. 

21.जवाहरलाल नेहरु यांची कन्या इंदिरा नेहरु यांचा विवाह फिरोज खान यांचेशी झाला होता हे सर्वाना माहीत आहे.मग लग्नानंतर इंदिरा नेहरुचे नाव इंदिरा खान  व्हायला हवे होते पण ते तसे न होता इंदिरा गांधी असे कसे काय झाले.फिरोज खान हा काही महात्मा गांधींचा मुलगा नव्हता.नेहरु हे काश्मीरी तर महात्मा गांधी हे गुजराती बनीया समाजाचे ,हे एकमेकांचे दुरुनही नातलग नव्हते . खानाची पुढील संतती खान आडनावाने ओळखली जायला पाहीजे होती .पण तसे न होता भारतीय जनता त्याना अजुन भोळेपणाने गांधी परिवार म्हणुन कसे काय समजते??

उत्तर 
21. कुणाच्या तरी सडलेल्या डोक्यातून निघलेली ही माहिती आहे व त्यावर माहितीची शहानिशा न करता विश्वास ठेवणारेही तसेच आहेत. फिरोज गांधी हे पारशी होते, त्यांचे काही नातेवाईक मुंबईत होते. पारशी धर्माचा उदय इराण मध्ये झालेला असल्याने मुस्लिम-सदृश नावे त्यांच्यामध्ये असतात. उदा. जहांगीर, फारोख, सरफराज, आदिल इत्यादि. फिरोजशाह मेहता यांना पण मुसलमान समजणार का?  

22.देशातील साठ हजार हिंदु मंदीरांचा ताबा सरकारने घेतला असुन तेथे देवाला अर्पण केलेला भक्तांचा पैसा सरकारजमा केला जातो.मात्र एकाही मशिदीचा व चर्चचा ताबा सरकारने घेतला नाही असे का?? 

उत्तर 
22. सरकारच्या ताब्यात कुठलीही मंदिरे नाहीत. त्यातील काहींचे प्रबंधन फक्त सरकार द्वारा केले जाते.  यातील पैसा सरकारजमा होत नसून मंदिर ट्रस्ट्स च्या बँक खात्यात जमा होतो. मंदिरात येणारे प्रचंड धन व त्यातून होणारे गैरव्यवहार रोकण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप आवश्यकच आहे.  मशि‍दींचे, त्यांच्या स्मशानांचे नियंत्रण वक्फ बोर्ड करते जे सरकार स्थापन करते. 

23.हिंदु मिरवणुकीवेळी जाणुनबुजुन दंगल कोण करते हे माहीत असुन देखील हिंदुंवरच गुनहे का दाखल केले जातात??

उत्तर
23. मिराणुकीच्या वेळेस मशिदी समोर गोंगाट करणे, जास्त वेळ ढोल, ताशे, डीजे वाजवणे, आदि गोष्टी करून माजलेले काही विकृत हिंदू मुस्लिमांना भडकावतात. त्यामुळे हिंदूंवर गुन्हे दाखल केले जातात.  राज्य हिंदूंचे असतांना सुद्धा असे का होते याचा यावरून बोध घ्यावा. 

24.चित्रपट व जाहीरातीन्मधे हिंदु साधु संत यांची टिंगळ केली जाते.त्याना जोकर अथवा खलनायक दर्शविले जाते..पण मुस्लिम मौलवी व खिस्ती पाद्री यांचे कधीच विडंबन करण्याचे धाडस तथाकथीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावाले कधीच करत नाहीत.यामागे कारण काय आहे??

उत्तर 
25. चित्रपट व जाहिराती बनवणारे बहुसंख्य हिंदुच आहेत. याचा जाब या तथाकथित हिंदू रक्षकांनी त्यांनाच विचारावा. काही हिंदू साधू संत (जसे आसराम, राम राहीम, रामपाल वगैरे) खरे तर खेटरांनी पुजा करावी अशा लायकीचे आहेत. त्यांची टिंगल टवाळी नाही करायची तर काय आरती करायची का बलात्कार, गुन्हे करतात म्हणून?  


25.बॉलीवुडमधे अलिकडे बहुतेक सर्व नायक मुस्लिम व नायीका हिंदु अशीच जोडी का दाखविली जाते.हिंदु नायक व मुस्लिम नायीका अशी जोडी का दाखवत नाहीत?? यामागे नट्यांप्रमाणे कॉलेज हिंदू तरुणीना आपणही मुस्लिम जोडीदार शोधावा असे त्यांच्या मनावर बिंबविण्याचे षडयन्त्र वाटत नाही काय ??

उत्तर 
26. हिंदू किंवा मुस्लिम तरुण तरुणी या लेखकसारखे मूर्ख नाहीत.  त्यांना कळते कुणाशी प्रेम करावे ते. सिनेमा पाहून आपला हीरो किंवा हिरोईन ठरवत नाही कुणी. न्युनगंडाचे अजून एक उदाहरण.  देशात मुस्लिम फक्त 14 टक्के आहेत आणि हिंदू 80 टक्के आहेत. मग एवढ्या हिंदू मुलींना मुसलमान मुलगे आणायचे कोठून? 

26.स्त्रीमुक्तीवाल्या कार्यकर्त्या  हिंदु स्त्रीयांची थोडीफार शिल्लक असलेली  सामाजीक बंधने नाहीसी करुन व  त्याना स्वैर वागायला शिकवुन इतर धर्मीयांच्या जाळ्यात अडकवायला का मदत करत आहेत ??स्त्रीमुक्तीचळवळ हळुहळु कपड्यांपासुनच्या मुक्ततेकडे का वाटचाल करत आहे ??बुरख्यातील मुस्लिम महिलेच्या दुस्थीतीबद्दल बोलायला पुरोगामी स्त्रीमुक्तीवाल्यांचे तोंड का उघडत नाही ?

उत्तर 
26. हिंदू स्त्रीला मनुस्मृती मधील नियमांप्रमाणे अत्यंत हीन वागणूक देऊन वर्षानुवर्षे चूल आणि मूल यात व पुरुषी अहंकाराच्या गुलामगिरीत जखडून ठेवले होते. आता स्त्रीयांचे डोळे उघडू लागले आहेत. सनातनी पुरुषांची गुलामगिरी उखडून निघत असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे, म्हणून ही प्रतिक्रिया दिसते.  आता समानतेचे युग आहे. तेंव्हा बर्‍या बोलाने समानता स्वीकारावी व स्त्रीने काय करावे हे तिला शिकवायचा प्रयत्न करू नये. मुस्लिम स्त्रिया सुद्धा बुरखा सोडीत आहेत.  आधी आपल्या धर्मातील स्त्रियांची काळजी करावी नंतर मुस्लिम स्त्रियांच्या दुस्थितीबद्धल नक्राश्रू ढाळावेत. 

27.सरकारी शाळान्मधुन मुस्लिमाना  धर्मशिक्षण द्यायला परवानगी आहे मात्र हिंदुना धर्मशिक्षण द्यायला बंदी आहे असे का ?हिंदु मुलानी धर्मशिक्षण कोठे घ्यायचे ?
हिंदुनो आता तरी जागे व्हा..
आणि धर्मरक्षणाकरीता एकञ या...

उत्तर 
27. मुस्लिमांचे धर्म शिक्षण हिंदू शाळा देतात काय?  आज सर्व हिंदू शाळांमध्ये हिंदू प्रार्थनाच घेतल्या जातात, हिंदू सण साजरे केले जातात, हिंदू देव देवता यांची माहिती दिली जाते. अजून काय धर्म शिकवायचा आहे? शाळेच्या अभ्यासाने आधीच मुले दबून गेली असतांना त्यांच्यावर काय वेद, उपनिषदे, पुराणे लादणार काय? घरामध्ये शिकवा ना हवा तेवढा धर्म. 

"""""""'"""'""'"'"""""""""""""""""""""""""""""
हा लेख मी लिहीलेला नाही. तरी सर्व हिंदूंबांधवानी, भगीनींनी  वाचावा म्हणून पुढे पाठवित आहे सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी पुढे पाठवा.

उत्तर: या पोस्टचा लेखक न्यूनगंडाने ग्रासलेला आहे व डरपोक आहे हे त्याने आपले नाव टाकले नाही यावरून दिसून येते. तसेच तो मूर्ख, विकृत असावा हे ही त्याचे तर्क पाहता दिसून येते.  अशी पोस्ट पुढे पाठवून हिंदू धर्माला हास्यास्पद ठरवू नका. पाठवणार्‍यालाच उलट प्रश्न करून तिथेच पोस्टच अंत करा. प्रथम आणि नंतर आणि शेझवटी सुद्धा भारतीयच बना.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य