मंदिरांनी पैसा दिला पण दवाखान्यांनी लुटले...

मंदिरांनी पैसा दिला पण दवाखान्यांनी लुटले – *कौस्तुभ शेजवलकर* यांनी संवाद रुपात खालील उत्तर लिहिले आहे. ते जेवढे वाचनीय आहे तेवढेच मनानीयही आहे...

मूळ Post: मंदिरांना दान करण्यापेक्षा दवाखान्यांना करा हे सांगणारे हे विसरतात कि संकटात मंदिरांनीच पैसा दिला दवाखान्यांनी मात्र लुटला!
➖➖➖➖➖➖
मी: असं म्हणणारे हे विसरतात की, जीव दवाखान्यांनी वाचवला मंदिरांनी नाही.
➖➖➖➖➖➖
तो: खरं आहे... जीव दवाखान्यांनी वाचवला पण पैसे घेऊनच ना? ते पण अनेकांच्या आवाक्याबाहेरची बिले वसूल करूनच ना? म्हणजे शुद्ध लाभासाठी ना? अनेकदा मृतदेहाचा ताबा पैसे वसूल केल्याशिवाय न देताच ना? आमचे म्हणणे दवाखाने नकोच असे नाहीये, तर त्या साठी देवस्थानांची अपकीर्ति नको इतकेच आहे.

मंदिरात मात्र जाताना आणि परत येताना कोणत्याही प्रकारच्या बिलाची जबरदस्ती तर नसते ना??? Advance पण भरावा लागत नाही. शिवाय ज्यांची श्रध्दा मंदिराच्यापेक्षा दवाखान्यांवर आहे त्यांनी नक्कीच मंदीरात न जाता दवाखान्यात जावे आणि शक्य असेल तितके किंबहुना क्षमतेच्या पेक्षा अधिक पैसे दवाखान्यात द्यावेत काहीच हरकत नाही. _मंदिरात मात्र जाताना आणि परत येताना कोणत्याही प्रकारच्या बिलाची जबरदस्ती तर नसते ना???_
––––––––––
मी: अरे तू जसा देवळात नुसताच जाऊन येतोस तसा दवाखान्यात नुसताच जाऊन आलास तर काही पैसे पडत नाहीत. 😃
_Advance पण भरावा लागत नाही_ पण... तुला जर देवळात अभिषेक, रूद्र, अमुक पुजा, तमुक पुजा करायची असेल तर पैसे भरावेच लागतात की... ते सुद्धा बहुतेक ठिकाणी अ‍ॅडव्हान्सच. 😃
––––––––––
तो: _खरं आहे..._
_जीव दवाखान्यांनी वाचवला पण पैसे घेऊनच ना?_ …
_आमचे म्हणणे दवाखाने नकोच असे नाहीये, तर त्यासाठी देवस्थानांची अपकीर्ति नको इतकेच आहे_
––––––––––
मी: तू दवाखान्याबाबतची जी उदाहरणे देतो आहेस ती दवाखान्यात होणाऱ्या चुकीच्या गोष्टींची, भ्रष्टाचाराची आहेत. ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, व्हायला नकोत. पण मग देवळात ह्या अशा चुकीच्या गोष्टी होतचं नाहीत असं कुठे आहे? तिथेही मोनोपोली, VIP line, वाहिलेल्या वस्तू पुन्हा विकणे, एवढेच काय तर काही पुजारी स्त्रियांचे शोषण करून त्यांच्यावर बलात्कारही करतात, अशा पध्दतीने अगदी देवाच्या नाकाखाली चुकीच्या गोष्टी होत असतातच.

मुद्दा हा आहे की, भ्रष्टाचार मुक्त देऊळ आणि भ्रष्टाचार मुक्त दवाखाना ह्यात जीव कोणामुळे वाचतो? आपल्या समाजाला देवळाची गरज आहे की दवाखान्याची? किती देवळांनी मदत केली आणि किती दवाखान्यांनी लुटलं? तू असं म्हणतो आहेस जणू प्रत्येक देवळाने मदत केली तर प्रत्येक दवाखान्याने लुटलं. परिस्थिती नेमकी उलट आहे. *जेवढ्या देवळांनी मदत केली त्यापेक्षा फार जास्त दवाखान्यांनी जीव वाचवले. किंबहुना जे काही जीव वाचवले ते दवाखान्यांनीच वाचवले. दवाखान्यात न नेता देवळात नेल्याने जीव वाचला असं माझ्यातरी वाचनात, ऐकण्यात आलेलं नाही.*

...आणि त्या देवळांनी कुठून दिले हे पैसे? लोकांनी दिलेल्या पैशांतला काही भाग त्यांनी दवाखान्यांना दिला. म्हणजे स्वतःचा स्वार्थ बघूनच पैशाची मदत केली ना! देवळाची दानपेटी, इतर मार्गांनी आलेले सगळेच्या सगळे पैसे देवळांनी दवाखान्यांना दिलेत अशी किती उदाहरणे आहेत?

मग *जर लोकांनी दिलेल्या पैशांतून जीव न वाचवणारी देवळं काही रक्कम वजा करून उरलेली रक्कम दवाखान्यांना देत असतील तर त्यापेक्षा देवळांना दिलेली संपूर्ण रक्कमचं जीव वाचवणाऱ्या दवाखान्यांना दिलेली काय वाईट?*

देवळांची अपकिर्ती नको म्हणतांना तू दवाखान्यांची अपकिर्ती करतो आहेस त्याचे काय?
➖➖➖➖➖➖
तो: _शिवाय ज्यांची श्रध्दा मंदिराच्या पेक्षा दवाखान्यांवर आहे त्यांनी नक्कीच मंदीरात न जाता दवाखान्यात जावे आणि शक्य असेल तितके किंबहुना क्षमतेच्या पेक्षा अधिक पैसे दवाखान्यात द्यावेत काहीच हरकत नाही_
––––––––––
मी: आणि या उप्पर ज्यांची मंदिरावर श्रध्दा आहे त्यांनी उपचारांसाठी जावे की खुशाल मंदिरात. म्हणजे जीव वाचवायला दवाखान्यात धाव घ्यायची आणि नंतर भलावण मात्र मंदिरांची करायची आणि वर दवाखान्याची अपकिर्ती करायची हे म्हणजे ज्या थाळीत खायचे तिच्यात थुंकायचे असे झाले.
➖➖➖➖➖➖
ह्यानंतर मित्राने, तर मग आम्ही काय मॉलमधे न जाता, हॉटेलिंग न करता, चांगल्या शाळेत मुलांना न घालता ते पैसे काय दवाखान्यांची बिलं भरण्यासाठीच वापरायचे का? देवळं , मॉल्स, शाळा, हॉटेल्स हे सुद्धा जीवनाचे भाग आहेत. त्यांची सुध्दा आपली एक जागा आहे या धर्तीवर एक मोऽऽठ्ठी पोस्ट लिहिली.त्यावर मी म्हणालो...

मी: मित्रा, ह्या सगळ्याची सुरवात तुझ्या खालील पोस्टने झाली.
_मंदिरांना दान करण्यापेक्षा दवाखान्यांना करा हे सांगणारे हे विसरतात कि संकटात मंदिरांनीच पैसा दिला दवाखान्यांनी मात्र लुटला!_

ह्या पोस्टच्या दुसऱ्या भागात पैसे देणाऱ्या मूठभर मंदिरांवरून सगळ्या मंदिरांना तारणहार आणि लुटमार करणाऱ्या मूठभर दवाखान्यांवरून सगळ्या दवाखान्यांना लुटारू म्हटलं आहे. ह्याला कसलाही आधार नसतांना विनाकारण दवाखान्यांची अपकिर्ती नव्हे तर सरळसरळ बदनामी केली आहे. आमच्या श्रद्धेची अपकिर्ती करायची नाही म्हणायचं आणि त्याच वेळी दुसऱ्याची बिनदिक्कत बदनामी करायची हा एकतर शहाजोगपणा झाला किंवा दादागिरी... 

...आणि तुझ्या पोस्टचा पहिला भाग आहे तो तू शब्दशः घेतो आहेस. म्हणजे लोकांनी देवासमोरच्या दानपेटीत पैसे टाकण्याऐवजी त्या पैशांनी दवाखान्यांची बिलं भरावीत असा जो तू त्याचा अर्थ घेतो आहेस तो तसा नाहीये. त्याचा लाक्षणिक अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे देवळं उभारण्यापेक्षा सरकारी दवाखाने, हॉस्पिटल्स् उभारा, एकंदर सार्वजनिक आरोग्यसेवा सुधारा असा त्याचा अर्थ आहे. आणि आजतरी तोच अर्थ योग्य आहे. 

श्रध्दा, हौसमौज, खेळ, करमणूक, शिक्षण, आरोग्य, सण समारंभ (ही यादी आणखीनही वाढवता येईल) हे आयुष्याचे पैलू जरूर आहेत. आणि ज्याने त्याने आपापल्या ऐपतीप्रमाणे ह्यातल्या कशावरही पैसे खर्च करावेत. पण एक व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणून आपण कशाला प्राधान्य देतो, आपल्या priorities काय त्यावरून त्या व्यक्तीची, समाजाची समज, प्रगल्भता दिसते. मुलांच्या शाळेची फी भरायला पुरेसे पैसे नसतांना थाटामाटात सण साजरा करणाऱ्या व्यक्तीच्या अकलेची कीव आणि शहाणपणा विषयी शंका येणारच. 

एखाद्या भागातल्या लोकांचे वयोगट, तिथले हवामान, लोकांचे उद्योगधंदे इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन त्या भागात किमान किती डॉक्टर्स, किती PHCs, किती खाटांची सरकारी इस्पितळं हवीत ह्याचा अभ्यास करून जी संख्या येते त्यापेक्षा कायमच आपल्याकडे कमी डॉक्टर्स, इस्पितळं असतात. मग असे असतांना पुरेशी सरकारी हॉस्पिटल्स बांधण्याऐवजी देवळं बांधणं ह्यात कुठला शहाणपणा आहे? बरं, पंचक्रोशीत हजारो लोकांसाठी एखादे देऊळ पुरेसे असतांना आपल्याकडे गल्लीबोळांत देवळं असतात आणि त्याऊलट दर दोन-तीन विभागात मिळून एकेक सरकारी हॉस्पिटल असायला हवे तिथे आपण जवळपास पंचक्रोशीत एक सरकारी हॉस्पिटल बांधतो. आता सरकारी हॉस्पिटल्स, सार्वजनिक आरोग्यसेवा कमी पडल्यामुळे खासगी हॉस्पिटल्सचं फावतं. ह्या परिस्थितीचा फायदा घेऊन शुध्द व्यावसायिक हेतूने एखाद्याने खासगी हॉस्पिटल काढले तर त्यात त्याची काय चूक? त्यात बिघडलं काय? 

हे असे होऊ नये म्हणूनच आजतरी आपल्या समाजाला मंदिरांपेक्षा हॉस्पिटल्सची जास्त गरज आहे. आपली सार्वजनिक आरोग्यसेवा सुधारली पाहिजे... काय?

माझ्या या प्रतीवादावर तो अजूनही गप्पच आहे. कारण बहुतेक त्याला कळले आणि पटलेही आहे; पण वळायला त्रास होतो आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?