“होय निर्भीडच” या शीर्षकाची व ‘खरी अंधश्रद्धा कोणती?’
“होय निर्भीडच” या शीर्षकाची व ‘खरी अंधश्रद्धा कोणती?’ असा प्रश्न करून, अंधश्रद्धेची नवीन बिनडोक व्याख्या करणारी एक पोस्ट समाज-माध्यमांमध्ये फिरते आहे त्यास हे उत्तर... – उत्तम जोगदंड
।। होय बिनडोकच।।
दगडाला देव मानून जो पूजतो त्याने फुले, शाहू, आंबेडकर, तुकाराम यांना ओढून ताणून वेठीस धरणे हाच मुळात असमंजसपणा आहे. तुकारामांनी तर “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखवा, देव तेथेची जाणावा।“ असे सांगून दगडाचा देवच नाकारलेला आहे. तीर्थी धोंडा पाणी | देवरोकडा सज्जनी| असेही तुकोबा म्हणतात. फुले, शाहू, आंबेडकर हे तर त्या ही पुढे गेलेले आहेत. दगडाची पुजा करायचा लेखकला अधिकार असू शकतो. परंतु त्यासाठी दगडाच्या देवाला नाकारणार्यांचे अशा प्रकारे नाव घेण्याचा लेखकाला काहीही अधिकार नाही.
माझ्या घामाचे पैसे दानपेटीत टाकतो हे वाक्य केवळ माज व उर्मटपणा दर्शविते. आपल्या घामाचे पैसे दानपेटीत टाकावेत, दारू/डान्स बार वर उधळावेत, जाळून टाकावेत कि सत्कारणी लावावेत हा ज्याच्या त्याच्या बौद्धिक कुवतीचा प्रश्न आहे. त्या बद्दल प्रश्नच नाही. तरीही, असे पैसे, किंवा देवावर ओतले जाणारे तेल, दूध वगैरे गरीबांना दिल्यास किंवा तसे सांगितल्यास काय बिघडते? शिवाय, दानपेटीत टाकलेल्या पैश्याने अन्नदान, दवाखाना, शिक्षण संस्था निर्माण व परिसर विकास होतो हे सरसकटपणे म्हणणे हे वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे आहे.
2011 च्या जनगणणेनुसार भारत देशात 593615 खेडी, 4378 छोटी नगरे, 35 मोठी शहरे (महानगरे पकडून) आहेत. प्रत्येक खेड्यात वेगवेगळ्या देवांची (हनुमान, ग्राम दैवत, स्थानीय देव, अश्पृश्यांची वेगळी) काही मंदिरे असतात. शहरे व महानगरात गल्लोगल्लीत, फूटपाथवर देवळे असतात. अशा प्रकारे देशातील देवळांची संख्या लाखोंच्या घरात जाईल. या देवळांच्या मार्फत किती अन्नछत्रे, दवाखाने, शाळा चालवल्या जातात याची आकडेवारी दिलेली नाही. यावर काही प्रश्न:
1) मंदिरातून अन्नदान होते तर, तिथे कायम भिकार्यांची गर्दी का असते? काही मोठ्या मंदिरात प्रसादाच्या नावाने भोजन दिले जात असले तरी अन्यत्र भिकार्यांचा उच्छाद का दिसून येतो?
2) दोनचार मोठ्या मंदिरांनी आपल्या उत्पन्नातीत मामुली हिस्सा वापरुन एक दोन हॉस्पिटल्स (आणि शिक्षण संस्था) उघडले असतील. पण बाकी देवळांनी उभारलेली हॉस्पिटल्स कुठे आहेत? लाखों देवळे असतांना, देशात शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था यांचा खेळखंडोबा झालेला का दिसतोय? आणि देवळातला देव सुखकर्ता, दुःखहर्ता असेल तर देवळांना हॉस्पिटल उभरायची गरज का भासते हा ही प्रश्न आहेच.
3) परिसराचा विकास तर सोडा, उलट रस्ता रुंदीकरणात मंदिरांचा (यात काही नगण्य अन्य धर्मीय श्रद्धा स्थाने ही आहेतच) अडथळा आल्याने कित्येक शहरांमध्ये वाहतूक कोंडी होऊन लोकांचे आर्थिक (पेट्रोल, डिझेल वरील खर्च) नुकसान तर होतेच पण वाहतूक कोंडीमुळे वेळेचा प्रचंड अपव्यय होतो. काही मोठ्या मंदिरांच्या ठिकाणी पर्यटन स्थल म्हणून विकास झालेला आहे हे मान्य. पण अन्य ठिकाणी मंदिरे ही विकासास अडथळाच ठरू लागली आहेत.
मंदिर हे फक्त भटजीसाठी नसून मूर्तिकार, फुलझाडे लावणारे शेतकरी, विकणारे लोक, दुकानदार, रिक्षावाले, हॉटेल चालक, मंदिर बांधणारे इंजिनीअर, गवंडी, मजूर हे “भटजी” नसतात व यांचा चरितार्थ मंदिरावर चालतो असे लेखक म्हणतात. परंतु, मंदिरात विविध पुजा, अभिषेक, यज्ञ व अन्य विधींच्या नावाने भक्तांची जी लूट होते त्या बद्दल एक चकार शब्द सुद्धा काढला नाही. तसेच, भक्तांनी वाहिलेले नारळ, हार इत्यादि साहित्य मागच्या दाराने परत दुकानदाराकडे जाऊन ‘रीसायकल’ होते त्यावर काही लिहलेले नाही. जोडून सुट्ट्या आल्यावर भक्तांची जेंव्हा देवळात गर्दी होते तेंव्हा 50 रुपयांचे पुजा पात्र (नारळ हार वगैरे असलेले) अचानक हजार बाराशे रुपयांवर कसे काय जाते, 20 रुपये सीट आकारणारे रिक्शावाले 100 रुपये कसे काय आकारतात, व्हिआयपी लोकांना व जास्त पैसे देणार्यांना (म्हणजेच लाच देऊन भ्रष्टाचार करणार्यांना) आधी दर्शन का व कसे होते, सर्व मंदिरातील पुजारी एका विशिष्ट जातीचेच का? अस्पृश्य जातीचा पुजारी का नसतो? यावर सुद्धा काही भाष्य या दगडाच्या देवाला पूजणार्याने केलेले नाही.
तसेच, एकदा मंदिर बांधून झाल्यावर मूर्तिकार, गवंडी, इंजिनियर यांना काय जन्मभर देवळांकडून पेन्शन दिले जाते काय (आणि त्यावर त्यांचा चरितार्थ चालतो)? एकंदरीत, आपली पुरोहितशाही सुरळीत चालू रहावी म्हणून वरील सर्वांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन निशाणा साधायचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय.
पुजा करा म्हणून भटजी घरोघरी फिरत नाही असा उद्धट दावा करून लेखकाने भक्तांचे डोळेच उघडले आहेत. कारण भक्त, भटजींनी बोलावले नसतांना सुद्धा मंदिरात येतात असा याचा अर्थ होतो. यावरून लेखक हे भटजी असावेत व हा लिहण्याचा आटापिटा कशासाठी चालला आहे ते स्पष्ट होते. अशा उद्धट लोकांना खरे तर भक्तांनी धडाच शिकवायला हवा.
हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई यांच्याबद्दल प्रेम असणे हे चांगलेच आहे. पण अनेक हिंदू योगी, धर्मगुरू, साधू, साध्वी मात्र कायम मुसलमान व ख्रिस्ती लोकांच्या नावे बोटे मोडत असतात व गरळ ओकत असतात. काही चर्चेस जाळली गेली आहेत ती इतर धर्माच्या आदरातून जाळली गेलीत की काय?
दगडाला देव मानावे, पंचमहाभूतांना देव मानावे कोणत्याही देवापुढे, मग तो सागर किनारी आहे की डोंगर दरीत, किती वेळा झुकावे, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्याबद्दल कोणी बोलत सुद्धा नाही किंवा त्यास अंनिस ने कधीही त्यास विरोधही केलेला नाही.
परंतु अंनिस च्या सूत्राप्रमाणे बुवाबाजी, जादूटोणा, चमत्कार यांना फटकारणारे हे आस्तिक लेखक यांनी नवीनच “अंधश्रद्धे”चा शोध लावला आहे व विज्ञानवादी त्यास बळी पडत आहेत हे संगितले आहे. तसेच अंनिसवाले धार्मिक बाबतीतच अंधश्रद्धा हा निकष लावतांना स्वतःला संतांपेक्षा ग्रेट समजतात काय असा सवाल केला आहे. हे करतांना, संत तुकाराम, संत गाडगे बाबा, महात्मा वसवेश्वर इत्यादि संतांनी धार्मिक अंधश्रद्धेवर कोरडे ओढले, व अंनिस त्यांच्याच पावलावर टाकून पुढे चालते आहे हेच लेखक विसरलेत किंवा त्याकडे कानाडोळा केला आहे. तसेच विश्वास व अंधश्रद्धा यांची गल्लत करून श्रद्धा म्हणजेच विश्वास हे अतार्किक समीकरण प्रस्तुत केले आहे. खरे तर श्रद्धा व विश्वास हे एकच असू शकत नाहीत. देवाने मला परीक्षेत पास करावे म्हणून पुजा करणे ही श्रद्धा असते, विश्वास नसतो. कारण देवाला साकडे घालून सुद्धा परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास मात्र करावाच लागतो. कारण अभ्यास करून पास होता येते हा विश्वास असतो. श्रद्धा व विश्वास यातील हा फरक अगदी सामान्य भक्ताला सुद्धा माहीत असतो.
लेखकाने ज्या नवीन अंधश्रद्धेचा शोध लावला आहे त्यात टीव्ही वरील फेयर अँड लव्हली, बोर्नव्हीटा, होरलीक्स, कॉम्पलॅन, सेंट, साबण इत्यादींच्या जाहिरातींचा दाखला दिला आहे. या पदार्थांमुळे, गोरे होणे, बुद्धी तेज होणे, स्त्रिया मागे लागणे, भीती जाणे याची जाहिरात टीव्ही वर केली जाते व त्यावर “श्रद्धा” ठेवून विज्ञानवादी बळी पडतात असे लेखकाचे म्हणणे आहे. ही “अंधश्रद्धा” आधी तुम्ही दूर करा व मग समाजाची दूर करा असे लेखक म्हणतात.
मात्र, टीव्ही वरील जाहिरातीची वरील वस्तूंची तथाकथित अंधश्रद्धा रेखाटतांना, कुबेर धन लक्ष्मी यंत्र, हनुमान चालीसा यंत्र, भाग्योदय यंत्र इत्यादि वस्तूंच्या खर्या अंधश्रद्धा मात्र लेखकांस दिसल्या नाहीत याचे आश्चर्य वाटते, कारण त्या विषयी लेखकांनी अवाक्षर सुद्धा काढले नाही.
आता या विद्वान लेखकू यांना वरील उपभोग्य वस्तूंची खरेदी विक्री ही व्यावसायिक व व्यावहारिक बाब आहे एवढेही कळत नाही काय? या वस्तु लोक घेतात त्या वापरतात, त्यांचा पंचेंद्रियांमर्फत अनुभव घेऊ शकतात. (क्रीम त्वचेला लावू शकतात, साबण अंगाला लावू शकतात, बोर्नव्हीटा वगैरे खाऊ शकतात) पटले तर पुन्हा घेऊ शकतात नाहीतर टाळू शकतात. यात अंधश्रद्धा कसली?
वरील उत्पादनांशी साधर्म्य असलेली रामदेव बाबांच्या पतंजलिची, सुवर्ण कांती हे फेयरनेस क्रीम, पतंजलि हर्बल पॉवर विटा व अन्य उत्पादने, उपलब्ध आहेत. ती मात्र या लेखक महाशयांच्या नजरेतून कशी सुटली हे एक कोडेच आहे.
या वस्तु विकण्यासाठी उत्पादकाने विविध माध्यमात जाहिरात देणे, त्यात आपल्या वस्तूंचे अतिशयोक्त गुणगान (याला जाहिरातशास्त्र असे म्हणतात) करणे व ते लोकांच्या गळी उतरवणे यास अंधश्रद्धा या व्याखेत बसवायचे ठरवले तर दैनंदिन वापरतील बहुतेक वस्तूंचा वापर ही अंधश्रद्धाच ठरवावी लागेल.
बरे, या वस्तु विज्ञानवादी लोक अंधश्रद्धेतून वापरतात, या विधांनाला आधार काय? विज्ञानवादी लोक या वस्तूंचे गुण/अवगुण तपासून, त्यांचे कंटेण्ट (त्या उत्पादनावर लिहलेले असते) तपासून मगच गरज पडली व योग्य असेल तरच या वस्तु वापरतात किंवा वापरतच नाहीत. या उलट अंधश्रद्धाळू लोक मात्र त्यांच्या सवयीप्रमाणे या जाहिरातींमधील भूलथापांवर आंधळेपणाने विश्वास ठेवतात व त्या वापरतात. त्याची जबाबदारी अंनिस ची कशी काय असू शकते?
तर, लेखकाची ती पोस्ट त्यांचा बावळटपणा, अतार्किकता दाखवते व तिला ना शेंडा आहे ना बुडखा, तसेच ती दिशाभूल करणारी आहे.
अशा लेखकांच्या कुठल्याही पोस्ट पासून सावधान रहा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा