तथाकथित संतांचे प्रकटीकरण

तथाकथित संतांचे प्रकटीकरण - डॉ प्रकाश कोयाडे

'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' असं म्हणण्यापाठीमागचा अर्थ हाच की, 'तु भित्रा आहेस!'

ही पोस्ट वाचून एखाद्याच्या भावना दुखावत असतील तर दुखू देत, पायताणाशेजारी मेंदु ठेवून मंदिरात प्रवेशनाऱ्या लोकांसाठीच ही पोस्ट आहे.
एकीकडे देश महासत्ता होणार अशी स्वप्न पहायची आणि दुसरीकडे साईबाबाचा जन्म कुठे झाला अशा वांझोट्या प्रश्नावर वाद घालायचा हे भारताशिवाय कुठेच होत नसेल. हे बाबालोक प्रकट कुठे झाले, कधी झाले, कसे झाले यापेक्षा ते प्रकट 'का' झाले... हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज या चारशे पाचशे वर्षांपूर्वी जन्मलेल्या संतमंडळींच्या जन्मतारखा किंवा जन्मवर्ष तरी उपलब्ध आहेच. एवढंच नाही तर तेराव्या शतकातील संत ज्ञानेश्वरांच्या जन्ममृत्युबद्दल, त्यांचे आई-वडील,गाव, कुळ सर्व माहिती उपलब्ध आहे. मग हे दीडशे वर्षांपूर्वी अगदी इंग्रज असताना उपजलेल्या (प्रकटलेल्या) बाबा लोकांचं मुळ का सापडू नये? 

स्वामी समर्थ, साईबाबा आणि गजानन महाराज... या तिघांचा इतिहास जवळपास सारखाच आहे. विना घडविता 'माठ' सुद्धा बनत नाही, ही तर चालती बोलती माणसे. हे तिघेही अवतारी पुरुष होते... तर या अवतार पुरूषांची कामे काय तर विक्षीप्तपणा करणे, आज पाचवी सहावीची मुलं प्रयोगशाळेत जे प्रयोग करतात तसे थातुरमातुर चमत्कार करणे, गांजा फुंकणे...
   
*ज्याठिकाणी संत कबीर, तुकाराम महाराज, नामदेव महाराजांनी लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धेची, अज्ञानाची जळमटे काढून महाराष्ट्राची भूमी आधुनिक काळासोबत लढण्यासाठी सुपीक केली त्याच भूमीवर अज्ञान आणि चमत्काराचा नांगर घेऊन हे तिघे 'दत्त' म्हणून उभे राहिले!*

एकीकडे ज्ञानेश्वरी, गाथा, अभंग, भारूडे असा मानवतेला चिरकाल ज्ञान देणारा साठा जिथे निर्माण झाला तिथे या तिघांनी एक अक्षरही लिहून ठेवू नये ही आश्चर्याची गोष्ट नाही का? भग्वदगीतेनुसार अवतारी पुरुषाचे काम पीडीत समाजाला अंध:कारातून बाहेर काढणे असते, मग देश पारतंत्र्यात असताना यांचं अवतारकार्य पाण्यावर दिवा लावणे आणि उधळलेला घोडा शांत करणे एवढ्यापुतंच का मर्यादित असावं? इंग्रजांची एखादी पलटन नेस्तनाबूत केली असती तर 'क्रांतीकारी संत' अशीच उपमा आपण दिली असती.
     
*शोकांतिका अशी आहे की, ज्या संतांनी समाजाला दिशा दिली, माणूस म्हणून जगण्याचे ज्ञान दिले त्यांचे मृत्यू संशयास्पद आहेत आणि ज्यांनी पाच दहा भक्त भक्तिणी गोळा करून नशापाणी करत, मजा मारत आयुष्य काढले त्यांचे जन्म संशयास्पद आहेत.* या शोकांतिकेतूनच या नग्न, फकीर लोकांच्या उदयाच्या रहस्याचा मार्ग जातो. 
   
या शोकांतिकेच्या पुढचे दुर्दैव असे की, समाज जेवढा सुशिक्षित आणि सधन होत गेला तेवढा तो या बाबालोकांच्या आहारी जात राहिला. वारकरी सांप्रदायातील संतांचा काळ वेगळा होता. *त्यामानाने संत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज हे आधुनिक... यांनी शिक्षण आणि माणूसकीचे महत्त्व रूजवले.* या शिक्षणाला हाताशी धरून समाज पुढे आला सुशिक्षित, सधन झाला... आणि त्यांची शिकवण विसरून अक्कलकोट, शिर्डी आणि शेगावला गर्दी करू लागला.😢 

आज महाराष्ट्रात देवाच्या नावाने धंदे सर्वात जास्त या तीन ठिकाणी होतात. *आपल्या मुलाने सिगारेट ओढु नये म्हणून जागरूक असणारा बाप जेव्हा सहकुटुंब शेगावला जाऊन चिलीम वाहून येतो तेंव्हा खरंच त्या बुद्धीची कीव येते.*

स्वामी समर्थ म्हणजे सदाशिव भाऊ, साईबाबा म्हणजे नानासाहेब पेशवे आणि गजानन महाराज म्हणजे यातले टोपे...या असल्या थेअरीला काहीही आधार नाही, कसलाही पुरावा नाही. या तिघांचंही युद्धभूमीतून अचानक गायब होणं, त्यानंतर काहीच महिन्यांत या बाबांचं प्रगट होणं, आपल्या जन्मठिकाणाबद्दल कधीही न बोलणं, गजानन महाराजांच्या मृत्यूनंतर साईबाबांनी 'माझा सेनापती गेला' म्हणून हमसून हमसून रडणं तसेच, पार्वतीबाईंनी सदाशिव भाऊच्या नावाने आयुष्यभर कुंकू लावणे या गोष्टी फार फार तर योगायोग असतील... पण याला काही आधार नाही.

*यांच्यावर स्पष्टपणे बोलल्यामुळे जर कोणा हिंदूच्या श्रद्धेला ठेच पोचत असेल तर त्यांना सांगावं वाटतं की, या तिघांचंही हिंदू धर्मात अंधश्रद्धा पसरविण्यापलीकडे काहीही योगदान नाही. यांच्यावर चित्रपट शेकड्याने येतील पण यांच्या नावाने विद्यापीठ मात्र कधी उभा राहू शकत नाही. त्यासाठी गाडगेबाबासारखा झाडू आणि तुकडोजी महाराजांसारखी लेखणी हाती घ्यावी लागते... कफनी, गांजा आणि लंगोट नाही!*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?