नास्तिकांचं संघटन...

नास्तिकांचं संघटन... - डॉ सचिन लांडगे.

संघटना म्हणली की नियम आले... नियम असले की बंधने आली... बंधनं म्हणलं की विचार खुंटले... आणि विचार खुंटला म्हणजे तर्कबुद्धीचा अस्त!! (तर्कबुद्धी म्हणजे रॅशनालिटी किंवा बुद्धिप्रामाण्यवाद..) 

खूप जणांचं म्हणणं असतं की नास्तिकांनी संघटन करू नये कारण, नास्तिकता ही रॅशनालिटीचं (बुद्धिप्रामाण्यवादाचं) बायप्रॉडक्ट असतं आणि कोणतंही संघटन तुमच्या फ्रीथिंकिंग वर घाला घालतं.. पर्यायानं तुमची रॅशनालिटी अफेक्ट होते.. आणि हे बरोबरही आहे.. 'धर्माला विरोध करता करता आपण पण 'नास्तिक्य' नावाच्या दुसऱ्या धर्माला आमंत्रण तर देत नाही ना?' ही अनेकांच्या मनात भीती आहे.. 

मुळात 'नास्तिक' म्हणजे प्रचलित देवधर्म न मानणारी व्यक्ती, अशी साधी सरळ व्याख्या केली तर त्यात अनेक उपप्रकार पडतात.. 

'देवाने माझ्यावर खूप अन्याय केला म्हणून मी देवाला मानत नाही', हि देवविद्वेषातून आलेली नास्तिकता अगदीच उथळ नास्तिकता आहे... यांना 'अपॉर्च्युनिस्टीक नास्तिक' म्हणतात... त्याचा विचार आपण इथे करणार नाहीत. कारण अशा स्थितीला तर्कबुद्धीची अथवा कुठल्याही वैचारिकतेची जोड नसते, आणि ती नास्तिकता 'दिवार' मधल्या बच्चन प्रमाणे 'खुश तो बहुत होगे तुम आज' असं म्हणत कधी ना कधी देवाच्या दारात जातेच! किंवा वास्तवात तर्कविसंगत (illogical) भूमिका घेऊ शकते.. अशा नास्तिकतेचं आणि नास्तिकांचं उत्तरदायित्व कोणताही विवेकवादी नास्तिक अथवा संघटना घेऊ इच्छित नाहीत.. (आणि विशेष म्हणजे बऱ्याच अस्तिक मित्रांना नास्तिकांची नास्तिकता ही याच प्रकारातली वाटत असते.. त्यांना कुठेतरी असा विश्वास असतो की, 'त्याला कधी न कधी देवाची गरज पडेलच किंवा देवाचा साक्षात्कार होईलच!') असो..

थोडक्यात सांगण्याचा उद्देश इतकाच की, मानवतावादी आणि वैज्ञानिक कसोटीवर टिकत नाही म्हणून 'देव' (आणि पर्यायाने धर्म) ही सारी संकल्पनाच नाकारणारे, देव/नियंता/रचनाकर्ता/उद्गाता या अर्थाने परमेश्वर नाकारणारे, अनेक विचारप्रवाह अस्तित्वात आहेत. तर्कनिष्ठ नास्तिक, अज्ञेयवादी नास्तिक, विवेकवादी नास्तिक, मुक्तचिंतक (फ्री थिंकर), जडवादी, इहवादी इत्यादी अशा काही सूक्ष्म फरकाने असलेल्या या सगळ्या निरिश्वरवाद्यांना ढोबळमानाने नास्तिक असे संबोधले जाते... 

सगळे मुक्त विचारांचे असल्यावर संघटनेच्या संहितेला आणि नियमांना भीक कोण घालणार! आणि जर ठराविक साच्यात असंच राहायचं म्हणलं तर तर्कबुद्धी गहाण ठेवावी लागणार... की जे नास्तिकतेच्या मूळ गाभ्यालाच छेद देणारं आहे... आणि म्हणून या नास्तिकांना तुम्ही एका संघटनेत एकच नियम-बंधने घालून बांधून ठेवू शकत नाही. कारण, हे म्हणजे उड्या मारणाऱ्या अनेक बेडकांचं एकाच तराजूत घालून वजन करण्यासारखं आहे! 

पण, फक्त किमान समान कार्यक्रम ठरवून एकत्र येणे, ओळखीपाळखी करून घेणे, एकमेकांचे अनुभवकथन आणि रोजच्या जगण्यात नास्तिकता बाळगल्याने येणाऱ्या अडचणींचे अनुभव शेअर करणे, तर्कनिष्ठ साहित्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणखी काय काय करता येईल यावर चर्चा करणे, शिवाय होऊ पहाणाऱ्या नास्तिकांना जाहीरपणे नास्तिक आहोत हे मान्य करण्यापूर्वी अनेक शंका असतात, काही भावनिक बौद्धिक मार्गदर्शनाची गरज असते, अशी गरज आपली संघटना भागवू शकते. याव्यतिरिक्त शाळा-कॉलेजात व्याख्याने देणे, माध्यमांमध्ये लेख लिहिणे, इतपत नास्तिकांच्या मेळाव्याचे अथवा संघटनेचे उद्दिष्ट असू शकते, आणि त्यावर कोणाचा तात्विक आक्षेप असण्याचे कारण नाही/नसावे.. पण जर नास्तिक लोक भगतसिंगाच्या किंवा आणखी कोणाच्या रूपाने दुसरा देव उभा करणार असतील, त्यासाठी गाणी/आरत्या/कथा/कविता रचणार असतील, ते मूळ उद्देशालाच हरताळ फासल्यासारखे होईल... 

दाभोळकर यांची हत्या ही घटना पुरोगामी वर्तुळात एक मैलाचा दगड असणारी घटना ठरली.. धार्मिक विद्वेषाच्या आणि उन्मादाच्या वातावरणात तर्कबुद्धीचा अंगिकार करणार्‍या प्रत्येकाला त्यात असुरक्षित वाटू लागलं... ती गोळी कोणा एका व्यक्तीला नाही, तर आपल्या विचारांना लागल्याचं प्रत्येकाला जाणवू लागलं, आणि त्या असुरक्षितेतूनच आपले एक संघटन असावं असं नास्तिकांना वाटू लागलं... 

इथं एक गोष्ट लक्षात घ्या, अंनिस असो वा सेवादल, किंवा डावे असोत वा समाजवादी, यातल्या कोणालाच (समाजकारणासाठी असो अथवा राजकारणासाठी) उघडउघड नास्तिक भूमिका घेता येत नाही, (आणि ते सगळे नास्तिक नसतातही) म्हणून कुठल्याही दबावाला अथवा आजूबाजूच्या दैवभावनाप्रधान वातावरणाला बळी न पडता 'उघडउघड' नास्तिक भूमिका घेण्यासाठी म्हणून संघटना निर्माणाची पहिली पायरी म्हणून 'नास्तिक मेळावा' घेण्याचे ठरले...

जर तुम्ही संघटित असाल तर एक दबावगट निर्माण करता येतो. जर कोणी धर्मांध एखाद्याचा कोणत्याही प्रकारे छळ करत असेल, ट्रोल करत असेल, धमक्या देत असेल, तर त्याच्यावर संघटनेच्या माध्यमातून (अथवा कायदेशीर मदत मिळवून देऊन वगैरे) वचक ठेवता येतो.. इतकंच काय तर पोलीस यंत्रणा आणि राजकीय मुजोर यांच्यावर पण एक वचक ठेवण्यात त्याची मदत होते.. या गोष्टींसाठीही संघटन महत्त्वाचे असते... 

दुसरी गोष्ट अशी की, भारतीय अतिप्राचीन इतिहासात चार्वाकांच्या रूपाने नास्तिक मतप्रवाह अगदी प्रबळ होता. हे 'लोकायत तत्वज्ञान' इतकं प्रसिद्ध होतं की त्याकाळच्या सगळ्या धर्मांना चार्वाकांनी तगडं आव्हान उभा केलं होतं. पण राजेशाहीच्या सहाऱ्यानं धर्म टिकून राहिले वगैरे तो भाग वेगळा.. पण इथे विशेष नमूद करायचे हे की, त्या प्रबळ परिस्थितीतही नास्तिकांचा धर्म बनला नाही, तर आता विज्ञानाच्या या प्रगत अवस्थेत तो बनेल, ही भीतीच काहीशी अनाठायी आहे...  

तिसरा मुद्दा म्हणजे, सध्या काही प्रगत देश नास्तिक आहेत, तर काही देशांत नास्तिकांची संख्या जास्त आहे, तिथंही नास्तिकांचा धर्म बनला नाहीये, हेही तितकेच वर्तमान सत्य आहे. म्हणून 'तुम्हीही धर्माच्याच वाटेने जाताय' असा हेत्वारोप करत नास्तिकांच्या एकत्र येण्याला विरोध करणे हे एकतर आपले अज्ञान असू शकते किंवा हा आपला बनाव असू शकतो...

आता चौथी गोष्ट ही की, जिथं पठडीबाज ज्ञान असतं एकतर्फी गृहितकं असतात आणि त्यावरच्या प्रश्न विचारण्याला बंधनं असतात, तिथंच धर्म जन्म घेतात. किंबहुना म्हणूनच त्या ज्ञानाचे धर्म होतात; पण जिथं कालचं ज्ञान तपासून पाहण्याची सोय असते, नवीन ज्ञानाला सामावून घेण्याची प्रगल्भता असते आणि एकमेकांच्या मतमतांतरांना तर्काची कसोटी लावून सिद्ध करण्याची धमक असते, तिथं त्याचा धर्म/पंथ/कल्ट होऊच शकत नाही.. म्हणून आजपर्यंत विज्ञानाच्या कोणत्याही शाखेचा धर्म झाला नाही. मग विज्ञानाप्रमाणेच तर्कावर आधारित असलेल्या (बुद्धिप्रामाण्यवादाचंच बायप्रॉडक्ट असलेल्या) नास्तिकतेचा धर्म कसं काय होईल? सायन्स आणि रॅशनॅलिटी दोन्हीही सतत सत्याच्या शोधात असतात व सिद्ध झालेले सत्य मग ते कितीही त्यांच्या मनाविरुद्ध असू दे, ते स्वीकारण्याची वैज्ञानिकांप्रमाणे नास्तिकांचीही तयारी असतेच.. कारण 'वैज्ञानिक दृष्टिकोन असणे' हीच नास्तिकतेची पहिली पायरी असते...

पाचवा मुद्दा म्हणजे, धर्मासारखं किंवा धर्मांच्या इतर शाखांसारखं कोणाला नास्तिक 'बनवता' येत नाही. किंवा नास्तिकांच्या संघटनेत देखील नास्तिक बनविण्याचा कोणता विधी/फॉर्म्युला/परीक्षा अथवा सर्टिफिकेट नाहीये. तुम्हाला स्वतःलाच प्रश्न पडले पाहिजेत, त्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न अभ्यासून/वाचून/चर्चा करून/पडताळून पाहून स्वतःच केला पाहिजे, हे अगदी स्वच्छ आहे... 

खरंतर लहानपणापासून देवावलंबीत वातावरणात वाढल्याने नास्तिकता या मार्गाने मिळवावी लागतेय, पण जर लहानपणापासून देवधर्म विरहित वातावरणात एखाद्याला वाढवले तर त्याच्यासाठी देवधर्म नाकारणं ही अत्यंत 'सहजक्रिया' असेल! आणि सुखी आणि निर्भयचित्त आयुष्य जगण्यासाठी देवाची नव्हे तर सदसद्विवेकबुद्धीची गरज आहे हे त्याला काही अभ्यासाअंती पटवून घेण्याची गरज नसेल; आणि मग नास्तिकांच्या संघटनेचीही गरज उरणार नाही अन मेळाव्यांचीही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?