तथाकथित पुरोगामी बुद्धिवाद्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा, जर्मन लेखिका, मरिआ विर्थ यांचा मूळ इंग्रजी आणि अनुवादित मराठी लेख.

Hindu Philosophy- Maria Wirth https://yeshwant.blog/2019/04/20/hindu-philosophy-maria-wirth/

मराठी अनुवाद👇🏻

*हिंदू तत्वज्ञान*

बरीच वर्षे भारतात राहून सुद्धा येथील काही गोष्टींचे मला आकलन होऊ शकत नाही. उदा. भारतीय बहुसंख्येने हिंदू असून सुद्धा चांगले शिकले सवरलेले भारतीय, भारताचा उल्लेख हिंदुराष्ट्र असा केल्यावर संतप्त का होतात? भारत हा त्याच्या हिंदू संस्कृती आणि परंपरेमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. भारताच्या या वैशिष्ट्यामुळेच पाश्चिमात्य लोक भारतात येत असतात. ही गोष्ट माहिती असूनसुद्धा अनेक भारतीयांचा भारताची हिंदुत्वाची परंपरा मान्य करण्यास का विरोध असतो? हिंदुत्वाचा अभिमान बाळगणारा भारत हा धोकादायक आहे अशी प्रतिमा काही लोक का निर्माण करतात? त्यांना जास्त कळतं का?

दोन कारणांसाठी मला हा दृष्टिकोन विचित्र वाटतो.

१) ह्या शिकलेल्या भारतीयांना इतर देशांना मुस्लिम राष्ट्र अथवा ख्रिश्चन राष्ट्र असे म्हटलेलं चालते परंतु भारताला हिंदू राष्ट्र म्हटले की यांचे डोके फिरते. उदाहरणार्थ जर्मनी हा धर्मनिरपेक्ष देश असून तेथील फक्त ५९% जनतेने आपण कॅथलिक किंवा प्रोटेस्टंट ख्रिश्चन चर्चचे अनुयायी आहोत असे नोंदलेले आहे. तरी देखील जर्मनीची गणना ख्रिश्चन राष्ट्रातच होते आणि ह्या गोष्टीला कोणी विरोध करत नाही. काही काळापूर्वी जर्मनीच्या चॅन्सलर श्रीमती एंजेला मार्केल ह्यांनी आपल्या ख्रिश्चन परंपरांचा गौरव करून लोकांनी परत आपल्या ख्रिश्चन मूल्यांचा स्वीकार करावा असा सल्ला दिला. इ.स. २०१२ मध्ये त्यांनी कॅथलिक दिवसानिमित्त राष्ट्राला संबोधित करण्यासाठी जी-८ च्या शिखर परिषदेला जाण्याचे पुढे ढकलले. जर्मनीतील मोठ्या दोन पक्षांच्या नावात ख्रिश्चन हा शब्द आहे. श्रीमती एंजेला मार्केल ह्यांच्या पक्षाचे नाव सुद्धा ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन असे आहे.

खरं तर जर्मन लोकं त्यांच्या देशाची गणना ख्रिश्चन राष्ट्र म्हणून केल्याबद्दल संतप्त झाले तर मी समजू शकते कारण चर्चचा इतिहास लज्जास्पद असाच आहे. ख्रिश्च्यानिटीची तथाकथित यशोगाथा जुलूम जबरदस्तीने भरलेली आहे. केवळ ५०० वर्षांपूर्वी अमेरिकेतील मूळवासियांपुढे धर्मांतर करा किंवा मरा असे दोनच पर्याय ठेवले गेले. १२०० वर्षांपूर्वी कार्ल द ग्रेट ह्या सम्राटाने नवीन पादाक्रांत केलेल्या प्रदेशातील बाप्तिस्मा करून घेण्यास नकार देणाऱ्या लोकांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. त्यावेळी त्याचा सल्लागार, अलक्यूईन, उद्विग्न होऊन म्हणाला की, एक वेळ बाप्तिस्मा लादता येईल पण त्यांच्यावर विश्वास कसा लादता येईल? (कारण बाप्तिस्मा ही शारीरिक क्रिया आहे आणि विश्वास ठेवणे ही मानसिक क्रिया आहे).

सुदैवाने ख्रिश्चन मताला विरोध करण्यासाठी आयुष्य पणाला लावण्याचा काळ संपला आहे. आज अनेक पाश्चिमात्य मतभिन्नता प्रगट करतात व चर्च नाकारणाऱ्यांचा एक पंथ अस्तित्वात आहे. चर्चमधील अधिकाऱ्यांच्या अपवित्र वागणुकीबद्दल त्यांना घृणा वाटते आणि हे लोक (१) जिझसने दाखवलेला मार्ग हाच एकमेव मार्ग आहे आणि (२) जो ह्या शिकवणूकीवर विश्वास ठेवत नाही त्याला देव नरकात पाठवतो ह्या गोष्टी अमान्य करतात.

२) हिंदू धर्म हा अब्राहमप्रणित धर्मांपेक्षा वेगळ्या वर्गातील धर्म असून देखील सुशिक्षित भारतीयांचा भारताला हिंदुत्वाशी संलग्न करण्यास विरोध का असावा हे मला न सुटलेलं कोडं आहे. ख्रिश्चन आणि मुस्लिम (इस्लाम) धर्मांच्या इतिहासाशी तुलना केल्यास हिंदू धर्माचा इतिहास निश्चितपणे कमी प्रक्षोभक आहे. प्राचीन काळी हिंदू धर्माचा प्रसार जोरजबरदस्ती न करता आपली मते पटवून देऊन आणि मने जिंकून करण्यात आलेला आहे. हिंदू धर्माची विचारधारा आपल्या शिकाणूकीवर डोळे मिटून आणि बुद्धी गहाण ठेऊन विश्वास ठेवायला सांगत नाही किंबहुना हिंदू धर्म व्यक्तीला त्याची संपूर्ण बुद्धिमत्ता वापरण्यास प्रोत्साहन देतो. हिंदू धर्म म्हणजे शुद्ध अंतःकरणाने आणि बुद्धीने सत्याचा शोध घेणे हेच होय.

हिंदू धर्मात फक्त धर्माचे आणि तत्वज्ञानाचेच नव्हे तर संगीत, नृत्य, वास्तुशास्त्र (आर्कीटेक्चर), विज्ञान, खगोलशास्त्र, अर्थ आणि राज्यशास्त्र ह्यांचे प्रचंड मोठे ज्ञानभांडार आहे. जर्मनी किंवा कोणत्याही पाश्चिमात्य देशांकडे असे साहित्यिक ज्ञानभांडार उपलब्ध असते तर त्याचा त्यांना प्रचंड अभिमान वाटलं असता आणि त्याचा टेंभा मिरवला असता.

उदाहरण म्हणून सांगते, मी जेव्हा उपनिषदांचा अभ्यास केला तेव्हा मी विस्मयचकित झाले. मला जे प्रज्ञेच्या जोरावर सत्य वाटत होते पण व्यक्त करू शकले नव्हते तेच उपनिषदेत स्पष्ट शब्दात सांगण्यात आले होते. ब्रह्म हे अपूर्ण नसून चराचरात भरलेले अदृष्य, अविनाशी तत्व आहे. प्रत्येकाला अंतिम सत्य शोधण्याची परत परत संधी मिळत असते आणि तो त्याचा मार्ग निवडण्यास पूर्णपणे स्वतंत्र असतो. उपनिषदात मार्ग निवडण्यास मदत होईल अशा सूचना केलेल्या आहेत पण त्यांचा आग्रह धरलेला नाही.

माझ्या भारतातील सुरुवातीच्या काळात मला असे वाटत असे की प्रत्येक भारतीयाला त्याच्या उच्च भारतीय हिंदू परंपरेचे ज्ञान आहे आणि त्याला त्याचा अभिमान वाटत असणार. परंतु मला हळूहळू कळून चुकले की हा माझा गैरसमज होता. भारताच्या ब्रिटिश वसाहतवादी सत्ताधाऱ्यांनी यशस्वीपणे भारतातील उच्चभ्रु समाजाला ना केवळ त्यांच्या प्राचीन परंपरेपासून तोडले तर त्यांच्या मनात ह्या परंपरेविषयी घृणा निर्माण केली. त्याचा त्यांना असा फायदा झाला की, इंग्रजी शिक्षण घेतलेल्या समाज घटकाला मूळ संस्कृत ग्रंथ वाचता येईनासे झाले आणि तो समाज घटक इंग्रजांच्या सांगण्यावरती विश्वास ठेऊ लागला. तथाकथित पुरोगाम्यांचा हिंदुत्वाशी निगडित असलेल्या प्रत्येक गोष्टीला विरोध असण्यामागील कारण इंग्रजी शिक्षणाने केलेला बुद्धीभेद व अस्सल ज्ञानाची उणीव हे असावे असे मला वाटते. परंतु तथाकथित पुरोगाम्यांना एक महत्वाचा फरक लक्षात येत नाही तो असा की, पाश्चिमात्य धर्मात डोळे मिटून विश्वास ठेवावा लागतो (अंधश्रद्धा) किंवा अंगीकार केल्याचे भासवावे लागते. आणि हे धर्म त्यांच्या अनुयायांना स्वतः विचार करण्यावर अगदी बंदी जरी घालत नसले तरी त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत असतात. ह्या उलट बहुविध हिंदू धर्म स्वतःची बुद्धिमत्ता वापरण्यास प्रोत्साहन आणि स्वातंत्र्य देतो.

अनेक भारतीय बुद्धिवंतांना हे कळत नाही की, ह्या मोठ्या देशात ख्रिश्चन आणि इस्लाम पसरविण्याचे स्वप्न रंगवणारे लोक हिंदू धर्मावरती अप्रस्तुत टीका करणाऱ्यांचा उदोउदो करतील कारण त्यांच्या टीकेमुळे पाश्चिमात्य कल्पनांची मुळे रुजविण्यासाठी भुसभुशीत जमीन तयार होते. अशा वेळी अनेक पाश्चिमात्य, अगदी कडवे ख्रिश्चनसुद्धा हिंदू संस्कृतीचा मोठेपणा जाणून भारतीय ज्ञानभांडारातील गहन विचार गुपचूपपणे मूळ हिंदू उगमस्थान दडवून ठेऊन जणू काही हा आपलाच विचार आहे असे भासवितात किंवा हा विचार पाश्चिमात्यांना आधीपासूनच माहित होता असे प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतात. पाश्चिमात्यांच्या ह्या, केवळ हिंदूंचीच असलेली अमूल्य ज्ञानसंपदा गिळंकृत करण्याच्या प्रवृत्तीमुळे शेवटी हिंदूंच्या टाकाऊ गोष्टी शिल्लक राहतात. इन्फिनिटी फाउंडेशनचे राजीव मल्होत्रा म्हणतात त्याप्रमाणे वैश्विकवादाच्या आवरणाखाली हिंदू संस्कृतीला गिळंकृत करण्याचा जो खेळ पाश्चिमात्य खेळत आहेत त्या खेळात भक्ष म्हणजे हरीण किंवा वरील संदर्भात हिंदू विचार, खाऊन टाकला जाऊन नष्ट केला जातो व तो पचवून (म्हणजे हिंदू विचार चोरून) खाऊन टाकणारा भक्षक म्हणजे वाघ जास्त ताकदवान होत जातो.

जर केवळ मिशनरीजनी हिंदू धर्मावरती अयोग्य टीका केली तर एवढे वाईट वाटण्याची गरज नाही कारण त्यांचा तोच एकमेव उद्देश आहे; हे विवेकी भारतीय समजू शकतात. परंतु दुःखाची गोष्ट अशी आहे की, हिंदू नावे धारण करणारे भारतीय त्यांना मदत करतात. त्यांचा असा दृढ विश्वास आहे की, हिंदुत्व हे पाश्चिमात्य धर्मापेक्षा हीन आहे. ते हिंदुत्वाचे संपूर्ण ज्ञान न घेताच हिंदुत्वाला कमी लेखतात. सर्वसाधारणपणे त्यांना त्यांच्या परंपरांविषयी जेवढे इंग्रजांनी शिकविले तेवढेच माहिती असते. उदा. हिंदू धर्मातील जाती व्यवस्था आणि मूर्तिपूजा. परंतु दुर्दैवाने त्यांना हे कळत नाही की, मूलभूत विचार देणाऱ्या व सर्वसमावेशक हिंदू संस्कृतीच्या मागे आपण जर ठामपणे उभे राहिलो तर भारताचे नुकसान होण्याऐवजी फायदाच होणार आहे.

काही काळापूर्वी दलाई लामांनी म्हटले होते की, तरुण वयात ल्हासामध्ये असताना भारतीय वैचारिक श्रीमंतीचा माझ्यावरती खोल ठसा उमटलेला आहे. ते पुढे म्हणतात की, जगाला मदत करण्याचे भारतामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे.

इंग्रजाळलेल्या भारतीय बुद्धीमंतांना ही अक्कल केव्हां येणार?

मरिआ विर्थ

(भारतीय तत्वज्ञानाची जर्मन अभ्यासक)

~~~~~~~~

या पोस्टला उत्तर

हिंदू तत्वज्ञान या मरिआ विर्थ यांच्या लेखास उत्तर

भारताचा उल्लेख हिंदूराष्ट्र केल्यास शिकले सवरलेले लोक संतप्त का होतात असा प्रश्न विर्थ यांना पडला आहे. याचे अर्धे उत्तर या प्रश्नातच आहे. भारतातील शिकल्या सवरलेल्या लोकांना माहिती आहे की भारतीय संविधानानुसार भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे हिंदूराष्ट्र नाही. उरलेले अर्धे उत्तर विर्थ यांच्या भारताविषयी असलेल्या अर्धवट ज्ञानात किंवा अज्ञानात आहे. त्यांच्या लेखात त्यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व किंवा संस्कृती परंपरा हे पाश्चिमात्य लोकांसाठी वास्तव दडपून एका विशिष्ट ‘परिवाराने’ खास ‘बनवलेले’ दिखाऊ हिंदुत्व आहे. इथले वास्तविक हिंदुत्व हे चातुर्वर्ण्य, जातिभेद आधारित उच्च-नीचता, अस्पृश्यता, स्त्रियांना दुय्यम स्थान देणार्‍या मनूस्मृतिवर, पिळवणुकीवर  आधारित आहे. त्याचा अभिमान केवळ अमानवी प्रवृत्तीचे लोकच बाळगू शकतात. ही बाब जर्मनीत वंशभेदावर आधारित, ज्यूंचा नरसंहार करणार्‍या वंशातील जर्मन महिलेला कळणार नाही.

विर्थ यांना ज्या दोन कारणांसाठी तथाकथित दृष्टीकोन विचित्र वाटतो, त्यास उत्तर:
१) मुळात विर्थ यांना हिंदू या शब्दाविषयी काही माहिती नाही असे दिसते. हा शब्द भौगोलिक अर्थाने भारताबाहेरील लोकांनी इथल्या लोकांसाठी वापरलेला शब्द आहे. पुरातन भारतीय संस्कृतीत, साहित्यात, ग्रंथात हा शब्द आढळून येत नाही. इथे सनातन धर्म, वैदिक धर्म किंवा ब्राह्मणी धर्म अस्तीत्वात होता व आहे. पण काही विशिष्ट कारणांसाठी बाहेरच्यांनी दिलेले हिंदू हे भौगोलिक-स्थान-दर्शक नाव इथे अभिमानाने स्वीकारले गेले आहे. इथले हिंदू लोक (एकूण लोकसंख्येत सुमारे ८० टक्के) आपल्या धर्माचे पालन करत असतात, त्यात त्यांना कसली आडकाठी येत नाही. धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याने व धर्म ही वैयक्तिक बाब असल्याने धर्माला देशाशी जोडण्याचा प्रश्नच इथे येत नाही. तसेच इथल्या संविधानात समता, स्वातंत्र्य, बंधुभाव इत्यादि मानवी मूल्ये (जी बहुसंख्य धर्मांचा मूल आधार आहेत) अंगीकारली आहेत. तसेच हिंदू हा धर्म नसून एक जीवनपद्धती आहे असे सर्वोच्च न्यायालय व आरएसएस प्रमुख सुद्धा म्हणतात.

एंजेला मार्केल यांनी जी८ परिषदेला जाणे कॅथॉलिक दिनानिमित्त पुढे ढकलले असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्या जी८ परिषदेला हजर राहिल्या होत्या.  पक्षांच्या नावात धर्म असल्याने काही बिघडत नाही. भारतात सुद्धा डीएमके, अण्णा डीएमके या पक्षांच्या नावात तर चक्क मानव वंश आहे.
जर्मन लोक त्यांच्या देशाची गणना ख्रिश्चन राष्ट्र केल्यास संतप्त झाले तर ते विर्थ समजू शकतात कारण चर्चचा लज्जास्पद इतिहास. असे असेल तर हिंदू संस्कृतीचा, धर्माचा (?) इतिहास तर मानवतेला काळिमा फासणाराच आहे हे भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणार्‍या या विद्वान महिलेला माहिती नसावे याचे आश्चर्य वाटते. अस्पृश्य व शुद्रांवर (तेही त्यांचेच धर्माबांधव बरे) हजारो वर्षे केलेला अमानुष अत्याचाराला मानवी इतिहासात तोड नाही.

लेखिका म्हणतात की आज अनेक पाश्चिमात्य मतभिन्नता प्रकट करतात व चर्च नाकारणार्‍यांचा एक पंथ अस्तीत्वात आहे. तसेच त्यांना चर्च मधील अधिकार्‍यांच्या अपवित्र वागणुकीबद्धल घृणा वाटते. तसेच जिझस ने दाखवलेला मार्ग, स्वर्ग नरक या गोष्टी अमान्य करतात. परंतु भारतात मात्र धार्मिक श्रद्धेला हात न लावता केवळ अनिष्ट रूढी परंपरा यांना विरोध केला म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या जातात हे या विर्थ बाईंना माहिती नसावे असे दिसते. यातून त्यांचा दुटप्पीपणा दिसून येतो.
२) हिंदू धर्माचा इतिहास ख्रिश्चन व मुस्लिम धर्मांच्या इतिहासाच्या तुलनेत कमी प्रक्षोभक आहे असे लेखिका म्हणतात. हिंदू धर्माचा प्रसार जोरजबरदस्ती न करता मते पटवून व मने जिंकून करण्यात आला हे लेखिकेचे म्हणणे म्हणजे कल्पनाविलासच आहे. आपल्याच धर्मातील शूद्र व अतिशूद्रांवर पाशवी बळ वापरणे हे नक्की कशात बसते? पुष्यमित्र शुंग याने बृहद्रथ यास ठार मारून बौद्धांची कत्तल करून हिंदू धर्माचा प्रसार केला तो काय मत आणि मन पटवून?  वेद, उपनिषदे, पुराणे यांना प्रमाण मानणार्‍या धर्मात बुद्धिमत्ता वापरण्यास प्रोत्साहन देण्यात येते हे विर्थ यांचे म्हणणे त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. तसेच लेखिकेने मांडलेले हे मत (बुद्धी गहाण ठेवून विश्वास न ठेवणे व बुद्धिमत्ता वापरण्यास प्रोत्साहन) हे खरे तर बौद्ध धर्माविषयी आहे. परंतु ग्रंथप्रामाण्य व बाबा वाक्यं प्रमाणम मानणार्‍या हिंदू धर्माला ते त्यांनी चिकटवलेले दिसते हा खिसेकापूपणा नव्हे काय?
हिंदू धर्मात संगीत, नृत्य, वास्तुशास्त्र, विज्ञान, खगोलशास्त्र, अर्थ व राज्यशास्त्र याचे प्रचंड ज्ञान भांडार आहे हे लेखिका नमूद करतात. परंतु हे ज्ञान देणे व ग्रहण करणे या धर्मानुसारच काही विशिष्ट जाती/वर्णांपुरतेच मर्यादित होते याचे ज्ञान लेखिकेस नाही. मूठभर लोकांकडे दडवून ठेवलेल्या ज्ञानाचा अभिमान त्या पासून वंचित ठेवलेल्या लोकांनी का बाळगावा?
उपनिषदाविषयी (जे केवळ एका विशिष्ट जातीपुरतेच मर्यादित होते) लेखिकेचे मत व्यक्तिगत आहे. त्याचा उपयोग अन्य समाजास अजिबात होत नाही.

ब्रिटिश सत्ताधार्‍यांनी उच्चभ्रू समाजाला प्राचीन परंपरेपासून तोडले व त्यांच्या मनात परंपरेविषयी घृणा निर्माण केली हे लेखिकेचे मत हे भारतातील एका विशिष्ट ‘परिवाराच्या’ मताशी तंतोतंत जुळते. परंतु इंग्रजांनी सरसकट इंग्रजी शिक्षण दिले हा लेखिकेचा दावा तद्दन खोटा आहे. इंग्रजांनी स्थानिक (व्हार्नाक्युलर) भाषेच्या माध्यमातून नेटीवांना शिक्षण दिले व पुढे इंग्रजी हा विषय जोडलेला असे. तसेच हे शिक्षण त्यांनी अस्पृश्य व शुद्रांना सुद्धा खुले केले. इंग्रजी शिक्षण मिळाल्याने नेटीवांच्या कक्षा विस्तारल्या. औद्योगिक क्रांति इथे येऊ शकली व वैज्ञानिक प्रगतिची फळे इथले लोक घेऊ लागले. हे शिक्षण आले नसते तर संस्कृत वेद, उपनिषदे इत्यादि वाचत आज अंतराळात रॉकेट सोडणारा, महासत्ता होऊ पाहणारा भारत बैलगाडी युगातच राहिला असता. तसेच लेखिका इथे बुद्धिमत्ता वापरण्यास प्रोत्साहन व स्वातंत्र्य मिळते हा खोटा दावा वारंवार कशाच्या आधारावर करीत आहेत याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच संस्कृत भाषेचे शिक्षण कधीही बंद केले गेले नव्हते. आज सुद्धा ते भारतभर दिले जाते. एसएससी परीक्षेत हजारो मुले संस्कृत विषय घेतात (अधिक मार्क्स मिळण्यासाठी). परंतु ते संस्कृत ग्रंथ वाचत नाहीत याचे कारण त्यातील फोलपणा त्यांना कळलेला आहे म्हणून, इंग्रजांनी बुद्धिभेद केला म्हणून नव्हे.  
गॅलिलिओची माफी मागणारा ख्रिश्चन धर्म कोठे व स्वतःची बुद्धिमत्ता वापरणार्‍यांची हत्या करणारा हिंदू धर्म कोठे याचे ज्ञान लेखिकेला अजिबात नाही.    

लेखिका भारतीय संस्कृतीस इस्लाम व ख्रिश्चन धर्माच्या सांस्कृतिक आक्रमणाची भीती दाखवीत आहेत. हे तर गेल्या काही वर्षापासून भारतातील ‘परिवार’ प्रणीत संघटना करीत आहेत. खरे तर भारतवर्षावर (होय, १९४७ पूर्वी भारत नावाचा देश कधीही अस्तीत्वात नव्हता, हे इतिहास सांगतो.) मुस्लिम/मोगलांचे सुमारे सहा/साडेसहाशे वर्षे राज्य होते, त्यानंतर सुमारे शंभर दीडशे वर्षे इंग्रजांचे राज्य नव्हते. तेंव्हा हिंदू संस्कृती किंवा धर्म त्यांच्यामुळे धोक्यात आला नाही. पण आज मात्र सुधारणावाद्यांमुळे त्यांची मुळे रुजविण्यासाठी भुसभुशीत जमीन तयार होते हे म्हणणे न्यूनगंडाचे आहे. भारतीय ज्ञान भांडारातील विचार पाश्चिमात्य गिळंकृत करीत आहेत ही बाब मात्र वरील दाव्याशी विसंगत आहे. ते जर भारतीय संस्कृती अंगिकारत असतील तर त्याचा अभिमानच वाटायला नको का? हिंदूंची ज्ञानसंपदा गिळंकृत केल्याने हिंदूंच्या टाकावू गोष्टी कशा काय शिल्लक राहतील? ज्ञान हे दुसर्‍याने घेतले तर ते ज्याच्याकडे आधी आहे त्याचे कमी व्हायला ज्ञान म्हणजे जंगम मालमत्ता आहे काय? वाघ व हरिण हे उदाहरण पूर्णतः गैरलागू आहे. उलट हिंदू ज्ञान घेऊन अन्य धर्म हिंदू धर्माचीच आवृत्ती बनणार नाहीत काय.
   
हिंदू नाव धारण करणारे हिंदू धर्मावर टीका करतात तेंव्हा धर्मात विधायक बदल व्हावेत ही अपेक्षा असते. त्याने इस्लाम व ख्रिश्चन यांना मदत कशी होईल? तसेच लेखिकेने आधी दावा केला आहे की इथे बुद्धी वापरायचे स्वातंत्र्य आहे, त्याचा वापर करून ते हिंदू अशी टीका करीत असतील तर लेखिकेच्या वरील दाव्याशी सुसंगतच आहे की. आणि अशी सकारात्मक टीका केल्याने हिंदू धर्माला कमी कसे काय लेखले जाईल? तसे ज्यांना वाटते ते लेखिकेच्या वरील दाव्याशी विसंगत विचार करीत आहेत असा अर्थ होत नाही काय?
भारतीयांना इंग्रजांनी हिंदू धर्म शिकवला तेवढाच धर्म माहिती आहे हे लेखिकेचे म्हणणे अत्यंत खोटे आहे. तिने हा शोध कोठून लावला? धर्ममार्तंडांना इंग्रजांनी कधीही धर्म शिकवण्यापासून अडवले नव्हते. परंतु धर्म, शास्त्रे शिकणे, शिकवणे हा एका विशिष्ट जातीचा एकाधिकार हिंदूंनी ठेवल्याने त्यांच्या कर्मानेच धर्माचे नुकसान झाले आहे. यात इंग्रजांचा काय दोष?
दलाई लामा जर म्हणाले असतील की भारतामध्ये जगाला मदत करण्याचे प्रचंड सामर्थ्य आहे, तर ते इथे निर्वासित म्हणून राहत आहेत म्हणून त्यांना असे बोलणे भाग पडते. त्यांचे म्हणणे प्रमाण मानायचेच असेल तर त्यांच्या बौद्ध धर्माचा स्वीकार का करीत नाही? आणि लाखो-कोटी रुपये परदेशी कर्ज असलेला, मोब लिंचिंग करणारा, अंतर जातीय विवाह केले म्हणून मुडदे पाडणारा, महिलांना दुय्यम वागणूक देणारा व काही मंदिरात प्रवेश नाकारणारा भारत जगाला कसली प्रचंड मदत करणार?  
इथल्या तथाकथित नव-हिंदुत्व वाद्यांनी (ज्यांना हिंदू धर्माचा काळा, अमानवीय इतिहास बदलायचा आहे.) या विर्थ बाईंना भाड्याने घेतलेले दिसते आहे. इतिहासाची मोडतोड करून हे नव-हिंदुत्व त्यांनी या बाईंना पढवले आहे व त्या पोपटासारख्या ते बोलून दाखवत आहेत. पाश्चात्य देशातले लोक अभ्यासू असतात असे ऐकले होते. पण जर्मनीसारख्या देशातून आलेल्या या विर्थ बाई मात्र इथल्या परिवाराचा  पोपट बनून मिठू मिठू बोलत आहेत हे पाहून पश्चात्याविषयी जे ऐकले होते त्याला अपवाद असतात असे दिसून येते आहे.
राजीव मल्होत्रा यांचे नाव लेखिकेने घेतले आहे तेंव्हा या लेखिकेचा बोलवता धनी कोण आहे हे चाणाक्ष लोक ओळखतीलच.
- चला उत्तर देऊ या टीम

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?