रक्षाबंधनाचा मुहूर्त??

 रक्षाबंधनाचा मुहूर्त??

         अगदी गेल्यावर्षापर्यत रक्षाबंधनासाठीही मुहूर्त असतो हे माहित नव्हते, गेल्यावर्षी कुजबूज होती. यावर्षी आवाज वाढलाय, याबाबतीत आपली प्रगती पाहता पुढीलवर्षी पेपरमध्ये /कॕलेंडरवर याची नोंद येवू शकते. एवढा बिनडोकपणा येतो कुठून? 

काही दिवसांपूर्वी चांद्रयान 3चे कौतुकसोहळे करणारे आज रक्षाबंधनाचा मुहूर्त शोधत आहेत, असं असेल तर अशी हजारो चांद्रयान सोडली तरी आपण तिथेच राहणार आहोत.

अशा गोष्टीमागे नक्की लॅाजीक काय? असं विचारलं तर "असेल कायतरी...आपला एवढा अभ्यास नाही, कशाला उगा रिस्क घ्या, उगाचच एवढी लोकं सांगतात का?"

"असेल कायतरी" या वाक्याने आपण कितीतरी अंधश्रद्धा अगोदरच बळकट केल्या आहेत आणि त्याच कारणाने कितीतरी अंधश्रद्धा  नव्याने जन्माला घालत आहोत. विज्ञानाने अज्ञानाचा अंधःकार दूर होण्याऐवजी आपण त्यातच अडकत चाललो आहोत.

इतिहास, विज्ञानाचा फार मोठा अभ्यास करण्याची गरज नाही. प्राथमिक शाळेतील सामान्य विज्ञान आणि चौकस बुद्धीतून साधेसाधे प्रश्नआठवून बघा कि. या आधी कधी रक्षाबंधनसाठी मुहूर्त शोधले होते का? इतरांचे सोडा आपल्या लहापणाचं आठवून बघा असे काही..!

 बरं, हा मुहूर्त सांगीतला कुणी? कशाचे आधारे? याने काय होणार?  काय होणार नाही? याची पडताळणी कोणी केली का? करणार का? जगभरात जाऊ दे, संपूर्ण देशभरात तरी असे सण मुहूर्त पाहून केले जातात का? मुहूर्त पाहून करणाऱ्यांवर, न करणाऱ्यांवर यामुळे नक्की काय परिणाम झाला, हे कोणी पाह्यलय का?

आज कुजबुज स्वरुपात पाळली जाणारी अंधश्रद्धा उद्या वाजतगाजत धार्मिक कर्मकांड म्हणून पाळली जाईल, त्यासाठी नवीन व्रतं तयार होतील, आजकालची व्रतं स्वतःला त्रास न घेता पैशात किंवा वस्तुत कनव्हर्ट होत चालली आहेत. धर्माच्या नावाने सुरु होणारी एक नवी बाजारपेठ. मग याविरुद्ध आवाज उठवायला गेलो कि आमच्याच धर्मात लुडबूड का, असा कांगावा केला जातो. पण आपल्याच धर्मात अशी आगंतुक बांडगुळ वाढत असते तेव्हा आपण काय करतो हा प्रश्न स्वतःला विचारलाय का कधी? धर्माचा स्वच्छ प्रवाह, अशी बांडगुळं गढूळ करतात त्यासाठी अशी बांड‌गुळं वाढू न देणं हा यावरचा उपाय असतो. त्यावेळी केलेलं दुर्लक्ष नंतरच्या  पिढ्यांना भोगायला लागतं.

       "रक्षाबंधन" बहिणाभावाच्या नात्याचा  सुंदर सण. तिथे रक्षा- सुरक्षा असली अवास्तव ओझी बाजुला ठेवून, एकमेकांतील नातं, बंधूभाव..(अगदी दादागिरी, आणि ताईगिरीही😄) आठवण्याचा दिवस आहे. रक्षा-सुरक्षेसाठी पोलीस, न्यायालय, संविधान खंबीरपणे आहेच. 

 "आहोत एकमेकांसाठी" हा दिलासा एकमेकांना देण्याचा दिवस. त्यानिमित्ताने माहेरी आलेल्या बहिणीला, बालपणीच्या खोड्या आठवून आणि आता जबाबदारीची जाणीव झालेला, वयानुसार आलेला समजूतदारपणा आणि ह्यासगळ्यानी काळानूसार घट्ट झालेलं नातं हे. 

भाऊ छोटा असो कि मोठा,

बहिण छोटी असो कि मोठी,

या दिवसाच्या निमित्ताने भेटत असतील, तर त्यासाठी कशाला हवाय मुहूर्त ?

आपलं ऐकमेकांसाठी असणच महत्वाचं नाही का?

त्यासाठी मुहूर्ताच्या कुबड्या नकोत कि, त्यावरुन मनात शंका/कुशंकांची भिती नको!

कोणत्याही मुहूर्ताशिवाय "बंधन तो प्यार का बंधन है" हा विश्वास असला कि पुरे!

तुम्हाला काय वाटतं?

💐💐💐💐💐

माणसामाणसांतील बंधूभाव वाढीस लागण्यासाठी कृतिशील हातभार लावणाऱ्या सर्व भावाबहिणींना रक्षाबंधनाच्या  मनःपूर्वक सदिच्छा !!

*सारे भारतीय माझे "बांधव" आहेत!*

✍️ संदेश शंकर बालगुडे 

घाटकोपर 

३० आॕगस्ट २०२३

रक्षाबंधन (राखीपोर्णिमा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य