एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या बाहेर एक मोठ्या चैनलचे पत्रकार आपल्या लक्झरी कार मधे बसून निघणारच होते की एक जोडपं अतिशय सभ्य दिसणारं त्यांच्या गाडीसमोर येउन थांबलं ....ड्रायव्हर ने गाडी थांबवली तो मनुष्य पत्रकार साहेबांच्या जवळ आला आणि म्हणाला "साहेब येथून मेन रोड पर्यंत जाण्यासाठी कुठलही वाहन नाहीये ...मेहरबानी करुन आम्हाला तिथपर्यंत लिफ्ट द्या तेथून आम्ही बस पकडून जाऊ.

रात्री चे साडेअकरा वाजले होते आणि त्यांच्या कडेवर एक मूलही होतं ....पत्रकार साहेबांचं मन कळवळलं आणि त्यांनी त्या जोडप्याला आत घेतलं ...ड्रायवर कार पुढे दामटू लागला

गाडी थोडी पुढे जाताच शरणार्थी म्हणून गाडीत बसलेलं ते जोडपं एकमेकांना बघून कुटील हसलं...... प्लैन सक्सेस/कामगिरी फत्ते हा भाव त्यांच्या डोळ्यात होता ....त्यांच्या पैकी पुरुषाने लगेच आपले पाय पसरवले आणि न विचारता /न मागता गाडीतली पाण्याची बाटली उचलली आणि सरळ तोंडाला लावली...

महिला देखील मुलाला खाली सोडून गाडीत इकडे तिकडे चापसू लागली ....तिच्या हाती एक ड्रेस लागला, लगेच तिने तो उचलला आणि तो ड्रेस स्वतःला लाऊन बघू लागली...

आता मात्र पत्रकार साहेबांची सटकली आणि ते ड्रायवरला म्हणाले गाडी थांबव, पण ड्रायवर गाडी न थांबवता तसाच पुढे जात होता ...आणि मग ड्रायवर ने वळून मागं बघितलं आणि तो ही कुत्सितपणे हसला .....पत्रकार साहेबांना झटकाच लागला की अरेच्च्या हा तर आपला ड्रायवर नाहीये ...कोण आहे मग हा ड्रायवर च्या युनिफॉर्म मधे ??

आता ते तिघंच्या तिघं जोरजोरात हसू लागले ..... पत्रकार साहेबांना आपले सगळे इष्टदेव आठवले ....थोडा धीर एकवटून त्यांनी थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न सुरुच केला होता की त्यातल्या पुरुषाने खिश्यातून चार इंची धारधार चाकू काढला ...आता मात्र साहेबांची भितीने गाळणच उडाली ...ते समजून चुकले की खुप मोठं अघटित घडणार आहे.

त्यांनी स्वतः हूनच आपल्या खिशातलं पाकीट काढून सगळे पैसे त्या माणसाच्या हातात ठेवले ...तरी तो त्यांच्या कडे बघतच होता मग साहेबांनी आपली सोन्याची चेन, आंगठी काढून त्याच्या हातात ठेवली तरी त्याची नजर गळ्यातील लॉकेटवर टिकून होती...हे बघताच पत्रकार साहेब याचनेच्या स्वरात त्याला विणवू लागले की ती त्याच्या पुर्वजांची निशाणी आहे ...पुर्वापार चालत त्याच्या पर्यंत आलीये ...पण त्या लुटारू ला काय घेणंदेणं होतं त्यानं ते अक्षरशः ओरबाडून घेतलं ...

एव्हाना गाडी पत्रकार साहेबांच्या बंगल्याबाहेर येऊन थांबली होती (साहेबांनी पत्ता न सांगताच ते तिथवर पोहचले होते)

त्यातला तो माणूस म्हणाला ..."घ्या आलं घर आत जाऊन आणखीन पैसे आणि याच्या मुलीला देखील उचलून आणूयात"

आता मात्र साहेबांचे हातपायच गळाले ....त्याचे पाय धरत ते त्याला विणवू लागले, जोरजोरात रडू लागले की "भावांनो मी तुम्हाला शरण दिली तुमची मदत केली आणि तुम्ही माझ्या च बायका मुलांच्या मुळावर उठलात ....काहीतरी त्या परमेश्वराची भिती बाळगा ...असं करु नका आणि ते आणखीन च जोरजोरात रडू लागले.

अचानक ते तिघंही कार मधून खाली उतरले आणि घेतलेलं सगळं सामान त्यांना परत केलं आणि म्हणाले "आम्हाला माफ करा सर ....गेली आठवडा भर तुम्ही तुमच्या चैनलवरनं CAB चा विरोध करताय ...हे बिल कसं अमानवीय आहे हे सांगताय, बाहेरच्या त्या शरणार्थींना पण आत घेतलं पाहीजे हे ओरडून लोकांना सांगताय म्हणूण तुम्हाला समजावण्यासाठी आम्हाला हे सगळं सोंग करावं लागलं कारण तुमच्या शी तथ्यात्मक चर्चा करावी इतकी आमची ऐपत/पोहोच नाही

आता तुम्ही स्वतः ला भारत देश समजा आणि आम्हाला ते (बांग्लादेशी/रोहींग्या) शरणार्थी आणि परत जे काही आता घडलंय त्यावर शांत डोक्याने विचार करा आणि तुम्ही च ठरवा यावर तुम्ही काय स्टैंड घ्यायचाय तो

"हा देश म्हणजे तुमच्या कार मधील पाण्याची बाटली नव्हे किंवा तुम्ही तुमच्या मुलीला घेतलेल्या त्या ड्रेसचं कापड नव्हे .... ही सगळी या देशाची संसाधनं आहेत इथली संस्कृती आहे ज्याचं रक्षण आपले जवान आपल्या रक्ताचं पाणी करुन करतात

हे फुकट नाहीये ....आपल्या पुर्वजांनी रक्त सांडलंय ह्या साठी ही खिरापत नाहीये सगळ्यांना वाटत सुटायला.

इतकं बोलून तो युवक पत्रकारां जवळ आला आणि आपल्या हातातला चाकू त्यांच्या हातात देत म्हणाला सर हा चाकू तुमच्या मुलीला माझ्या बहीणी ला द्या....कारण सर तुम्ही सपोर्ट करुन ज्या शरणार्थींना इकडे वसवण्याचा विचार करत आहात एके दिवशी अश्याच एका कारमधे तिला याची गरज नक्कीच पडेल.

हे बोलून ते तिघं तिथनं निघून गेले ....पत्रकार साहेब हतबल हताश त्यांना पाठमोरं जातांना बघू लागले ...अंधारात ते तिघं दिसेनासे झाले

आणि आपसूकच पत्रकार साहेबांच्या तोंडून शब्द बाहेर पडले "भारत माता की जय"

#जय_हिंद
~~~~~~~~~

उत्तर:
एका फाईव्ह स्टार हॉटेलला शोभेल अशा आपल्या आलीशान फ्लॅट मध्ये एक मोठ्या चॅनलचे पत्रकार आपल्या चॅनलच्या स्टुडिओ मध्ये जाण्यासाठी निघणारच होते की त्यांच्या दारावरची बेल वाजली. त्यांनी दार उघडून पहिले तेंव्हा अतिशय सभ्य दिसणारं एक जोडपं त्यांच्या फ्लॅटसमोर उभं होतं. कपाळावर आठ्या आणून ते त्यांना काही बोलणार एवढ्यात ते जोडपे दिवाणखान्यात घुसले व सोफ्यावर घट्ट रुतून बसले. घरात अन्य कोणीच नव्हते. त्यांची पत्नी मुलीला सोडायला शाळेत गेली होती.

“कोण आहात तुम्ही, असे घरात काय घुसलात?” पत्रकार वैतागून ओरडले. एकमेकांकडे बघून ते जोडपे सूचक हसले. त्या जोडप्यातील पुरुष म्हणाला आम्ही एनआरसी राबविण्यासाठी नेमलेले अधिकारी आहोत. “काय हवय तुम्हाला?”, पत्रकाराने जरा दरडावून विचारले. “आम्ही तुम्हाला डिटेन्शन कॅम्प मध्ये घेऊन जाण्यासाठि आलो आहोत. चुपचाप आमच्याबरोबर चला.” आपल्या खिशातून पत्रकार साहेबांनी रागारागाने मोबाइल बाहेर काढला, त्यावर ते एक नंबर डायल करणार तेवढ्यात त्या पुरुषाने तो मोबाइल त्यांच्या हातातून हिसकावून घेतला व आपल्या खिशातून पिस्तूल काढून त्याच्या समोर धरले व पत्रकार साहेबांना सोफ्यावर बसायला सांगितले. आता मात्र पत्रकार महोदयांना घाम सुटला. तो पर्यन्त ती महिला किचन मध्ये गेली. फ्रीज मधून कोल्ड ड्रिंकच्या बाटल्या काढल्या, एका बरणीत ठेवलेली महागडी कुकीज बिस्किटे काढली व हॉल मध्ये येऊन ते जोडपे कोल्ड ड्रिंकचे घुटके घेत कुकीजवर ताव मारत बसले. पत्रकार महोदय ओरडले, “हे काय तुमच्या बापाचे घर वाटले काय?” तेंव्हा ती महिला म्हणाली “आता हे घर तुमच्याहि बापाचे नाही.” तुम्ही एनआरसी नियमांनुसार घुसखोर ठरलेले आहात. जो पर्यन्त तुम्ही आपली नागरिकता सिद्ध करत नाही तो पर्यन्त तुम्ही डिटेन्शन कॅम्प मध्ये राहाल. “अहो पण माझ्याकडे शाळेचा दाखला, पॅन, आधार, पासपोर्ट हे पुरावे आहेत की.” त्यावर तो पुरुष विकट हसला व म्हणाला, “अहो महाराजे, एनआरसी करिता ते पुरावे चालत नाहीत. तुम्ही पत्रकार आहात. तुम्हाला आठवत असेल की ईशान्येकडील राज्यातल्या आपल्या सियाचीन लढाईत पराक्रम गाजविणार्‍या एका सेना अधिकार्‍याला, माजी राष्ट्रपतीच्या परिवाराला सुद्धा घुसखोर ठरवले गेले होते. तुमच्या चॅनेल वर तर त्याची दखल सुद्धा घेतली नव्हती. तर, थोडक्यात सांगायचे तर तुमच्या वडिलांचा, १९५१ ही डेडलाईन आहे बरं का, जन्मतारखेचा दाखला नाही. सबब, तुम्ही घुसखोर आहात.” आता काय बोलावे ते पत्रकाराला सुचेना. तो म्हणाला अहो, माझे आईवडील ठार अशिक्षित होते. त्या काळात ८२ टक्के भारतीय लोक अशिक्षित होते. मग ते कुठून आणणार होते जन्मतारखेचा दाखला?” “आधी त्या डिटेन्शन कॅम्प मध्ये चला. रस्त्याने जाताना गाडीत सर्व सांगतो.” त्या पत्रकार महोदयांची मानगुट पकडून खाली घेऊन गेले व काळ्या काचा असलेल्या गाडीत घेऊन गेले. गाडीचा ड्रायव्हर पत्रकाराकडे पाहून कुत्सित हसला.  गाडीत बसल्यावर त्याच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधली. गाडी सुरू झाली. ती कुठे जात आहे हे पत्रकाराला कळेना. तेवढ्यात तो माणूस म्हणाला. “पत्रकार महोदय, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. १९५१ साली जवळपास ८२ टक्के लोक निरक्षर होते. त्यांचे दाखले मिळणे केवळ अशक्य आहे. सीएए, एनआरसी, एनपीआर  विरोधक हेच कानीकपाळी ओरडून सांगत होते. सीएए, एनआरसी, एनपीआर यामुळे काहीही होणार नाही असे सत्ताधारी, त्यांचे समर्थक व सर्व चॅनेल जोरजोरात ओरडून सांगत होते. त्यात तुमचे चॅनेल व तुम्हीही आघाडीवर होता. विरोधकांना तर तुम्ही देशद्रोहि, टुकडे टुकडे गॅंग आणि काय काय म्हणत होता. पण आता कायदाच तसा आहे तर काय करणार? तुम्ही न वाचता, न समजता त्याचे समर्थन करत होता.” पत्रकार म्हणाला “अहो पण ते मुसलमानांसाठी होते की सगळे. मी तर हिंदू आहे.” तो पुरुष म्हणाला “आसाम मध्ये तर  १९ लाख घुसखोरांपैकी १२ लाख हिंदू होते की! पण तुम्ही आपले मुस्लिम द्वेशामुळे आंधळे झाला होतात व आपल्याच पायावर आपण कुर्‍हाड मारून घेत होता याचे भान सुद्धा तुम्हाला नव्हते. आता मरा. आता तुम्ही घुसखोर ठरल्याणे तुम्हाला कसलेही अधिकार नाहीत. सडा आता डिटेन्शन कॅम्प मध्ये.”  

सुमारे अर्ध्या तासानंतर गाडी थांबली. पत्रकार सहबांना एका खोलीत नेण्यात आले. त्यांच्या डोळ्यावरची पट्टी खोलण्यात आली. ती खोली पाहून पत्रकाराला उलट्या येऊ लागल्या. तो माणूस म्हणाला “या पेक्षा भयानक सोय तुमच्या पत्नी व मुलीसाठी केली आहे. त्यांना आम्ही आधीच पकडून आणले आहे. चला तुम्हाला मी ती जागा बहरून दाखवतो.” पुन्हा पत्रकारांना डोळे बांधून गाडीत बसवण्यात आले. गाडी निघाली. आता मात्र पत्रकाराचा धीर सुटला. तो बडबडू लागला. “माझे चुकलेच. मंत्र्यांच्या खोट्या बोलण्याला मी भुललो. कायद्याचा अभ्यास केला नाही. खोटा प्रचार केला. त्या बळावर मला मुख्य संपादक पद मिळाले. माझा वापर केला गेला. आज कोट्यवधी लोकांचे असेच हाल असणार आहेत. स्वार्थापुढे मी जनतेशी व देशाशी  गद्दारी केली. खरे माझ्या सारख्या लोकांना देशद्रोहीच मानले गेले पाहिजे. मला ही जी शिक्षा मिळत आहे ते माझ्या पापाचे फळच आहे.” तेवढ्यात गाडी थांबली. एका लिफ्ट मधून आपल्याला कुठे तरी नेले जात आहे हे त्याला जाणवले. मग त्याला एका घरात आणले गेले. डोळ्यावरची पट्टी काढल्यावर पाहतो तर काय, तो त्याच्याच फ्लॅट मध्ये होता. तिथे त्याची पत्नी व मुलगी वाट पहात होते. सोबत त्या जोडप्यामधील तरुणी बसली होती.  मुलीने पत्रकाराला घट्ट मिठी मारली. पत्रकाराच्या चेहर्‍यावरील प्रश्नात्मक भाव बघून तो पुरुष म्हणाला,  "आम्हाला माफ करा सर ....गेली आठवडा भर तुम्ही तुमच्या चैनलवरनं CAB, NRC, NPR चे जोरदार समर्थन करताय ...हे बिल कसं मानवतावादी  आहे हे सांगताय,  देशातल्या लोकांना काहीही होणार नाही हे ओरडून लोकांना सांगताय म्हणूण तुम्हाला समजावण्यासाठी आम्हाला हे सगळं सोंग करावं लागलं कारण तुमच्याशी तथ्यात्मक चर्चा करावी इतकी आमची ऐपत/पोहोच नाही. तुमच्या लक्षात सर्व आलेच असेल.” आणि ते निघाले.
पत्रकार थक्क होऊन बघत राहिला व त्याच्या तोंडून आपोआप शब्द निघाले, “जय भारत, जय संविधान”.  ते जोडपे जाताजाता गालात हसले व म्हणाले, “साहेब दोन गोष्टी! एक, तुम्ही आम्हाला साधे आयकार्ड विचारले नाही. दोन, तुमच्या लक्षात नाही आले की अजून एनआरसी तर लागू झालेलेच नाही. आणि तुमच्या तोंडून त्यावर एक शब्द ही निघाला नाही. जरा अभ्यास करत चला, भानावर रहा. आणि हे घ्या ते नकली पिस्तूल. आठवण म्हणून ठेवा!”

“आता फक्त अभ्यास, नो बकवास! आता बघाच मी या कायद्याच्या कशा चिंधड्या उडवतो ते.”
जय भारत! जय संविधान!!
   
- उत्तम जोगदंड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य