नक्की कोण???

*आम्हाला आलेला मेसेज आणि "चला उत्तर देऊ या" ग्रुपने दिलेले उत्तर*

मुळ मेसेज 👇🏽

*कोण?*

कोण फिरवतो कालचक्र हे?
दिवसामागून रात्र निरंतर
कोण मोजतो खेळ संपता?
आयुष्याचे अचूक अंतर

कोण निर्मितो श्वासांसाठी?
करूणेचा हा अमृतवारा
कोण फुलवतो आठवणींनी?
रंध्रारंध्रातुन पिसारा

कोण राखतो काळजावरी?
शरीराचा हा खडा पहारा
कोण शिकवतो कसा धरावा?
स्वप्नांमधला मुठीत पारा

कोण ठरवतो; पाऊस येथे
कधी दडावा, कधी पडावा?
कोण सांगतो कधी कसा अन,
कोणावरती जीव जडावा?

कोण पढवतो जगता जगता?
नावडता, तरी हात धरावा
कोण रोखतो अदम्य ईच्छा?
हृदयामधला श्वास सरावा

कोण भरितो श्वासांमधूनी?
रक्तामधल्या प्रेमळ लहरी
कोण साठवी गंध कळ्यांतून?
दवभरल्या या गुलाबप्रहरी

रात्रीच्या या रोज ललाटी
चंद्रटिळा हा कोण रेखितो?
वसुंधरेला न्हाता न्हाता
सूर्याआधी कोण देखितो?

आई नसता जगात जरीही
घास भरवतो कोण तरीही?
पहाट स्वर्णिल कोण दावितो?
कटू स्मृतींची रात्र जरीही

रचतो कैसा कोण नभातुन?
थेंबांमधली भिजली गाणी
मातीच्या या ओठांमधूनी
कोण बोलतो हिरवी वाणी?

कोहं कोहं कोण वदवितो?
प्रश्न चिरंतन, बाकी नश्वर
कोण लुब्ध जो या सृष्टीवर?
नतमस्तक हे उत्तर 'ईश्वर ll

*आम्ही दिलेले उत्तर 👇🏽*

*नक्की कोण ???*

सूर्या भोवती धरती फिरता
दिवस रात्र ही होतच असते 
कालगणना बेतली त्यावर 
त्यामागे मानव मती दिसते 

वारा वाहे या अवनिवर 
कमी दाबाचा पट्टा कारण 
मानव लुटतो मोद तयाचा 
भरूणी रन्ध्रे क्षण प्रती क्षण 

निसर्ग निर्मित मानव तनु हि
काळीज आणि अवयव सारे
स्वप्ने खेळ हे मानव मनीचे 
जाणती ज्ञानी जन सारे 

जल बाष्प अन वर्षा चक्र
निसर्ग नियम नित्य असे 
ज्यास न कळते इतुकेही 
डोके त्यांचे रिते असे 

हृदय न घेते श्वास कधीही 
फुप्पुस त्यास्तव धडपडते  
मनो भावना स्वयंभू सार्‍या 
मानसशास्त्र त्या उलगडते 

श्वासोच्छवास ही शरीर क्रिया 
अथवा सुगंध फूल कळ्यांचे 
गुणधर्म हे पृथ्वीतलावर 
प्राणी आणि वनस्पतींचे 

चंद्र ग्रहाच्या कलेमुळे तो  
कधी दिवसा कधी रात्री दिसे 
सूर्या आधी तो रोजच दिसतो 
पोकळ कवी कल्पना असे 

उदार भरण करणे स्वतःचे 
नैसर्गिक इन्स्टिंक्टच ती  
घास भरवितो जर कुणी तरी
का लाखो भूके मरती

जल वर्षावे उगवे हिरवळ 
माती अन बीज असे जिथे 
वाळवंट का उजाड आहे 
जर “तो” आहे कुठे जिथे 

जरी म्हणती जन सारे
सारे ईश्वराने निर्मिले 
परी पडतो प्रश्न बापडा
ईश्वरास कुणी निर्मिले

कोहं कोहं प्रश्न फुकाचा 
सत् बुद्धीने जाण तू आता
प्रज्ञा देईल जाणीव तुजला 
ईश्वराचा मानव निर्माता
ईश्वराचा मानव निर्माता

उत्तम जोगदंड
*(चला उत्तर देऊ या टीम)*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य