हे परम ईश्वरा...
कुठे असशील खरोखर तर,
आणि हे स्वगत, अनामिक अज्ञात लहरींद्वारे जर पोचत असेल तुझ्यापर्यंत,
तर काही मागायचं आहे रे तुला..

छोट्या छोट्या लेकरांना पोटभर खायला मिळू दे रे सर्वांच्याच..कुपोषणानं हाल हाल होऊन मरण्याइतकी चूक तरी काय असते त्यांची?
लहान लहानग्यांना कोणीही ओरबाडून ओचकरून लचके तोडून फेकू देऊ नये रे, या साठी कर ना काहीतरी..कर ना त्यांच्या वासनेचं रूपांतर ममतेत..

सगळे श्वास,आभास,फुलांच्या फुलण्यापासून ते ग्रहताऱ्यांचं
भ्रमण ही तूच नियंत्रित करतोस ना?
मग  पोटाच्या टीचभर खळग्यासाठी वेश्या बनून एका रात्रीत दहा जणांना अंगावर घेण्याचं दुःख एकाही स्त्री वर येऊ नये यासाठी काही करता येतंय का बघ..

तू कर्ता करविता आहेस ना? मग सगळं शोषणही तूच घडवून आणतोस असं आम्ही समजायचं का?

मुलगा हवाच म्हणून एकामागून एक मुली जन्माला घालत राहून एखादया बाळंतपणात चुपचाप मरून  जाणाऱ्या बायका तुझ्यासारख्या विघहर्त्याला आयुष्यभर पूजेत आलेल्या असतात रे,एकही उपवास सोडत नाहीत बापूडया.

तुझ्या सर्वशक्तिमान स्वरूपाचं दर्शन घडवून तू आता हे जग सावरायलाच हवंस..
केवढे ते अणुबॉम्ब आहेत सगळ्यांकडे..करू शकतोस निष्प्रभ?एखादया मंत्राने,सुदर्शन चक्राने, अस्राने?

विश्वाच्या या अफाट पसाऱ्यात ,तुझ्या मर्जीशिवाय पानही हलत नाही ,मग जे काही सगळं आजूबाजूला होतंय,घडतंय ती तुझी मर्जी आहे असं समजायचं का?
माणसं झोपडपट्टीत जन्माला येतात,आयुष्यभर दारू ढोसतात,पोरांचं लेंढार बायकोच्या उरावर मागं ठेवून अकाली मरूनही जातात.
निपाह व्हायरसची साथ येते,स्वाइन फ्लू ची साथ येते शेकडो माणसं डोळ्यात भविष्याची स्वप्नं तशीच घेऊन डोळे मिटतात.
सिरीयात ,अफगाणिस्तानात बंदुकीच्या बॉम्बच्या  धाकात कुणा निरपराधांची आख्खी आयुष्यं जातात,तर कुठे त्सुनामीने लाखो लोक वाहून जातात.
ही  तुझी मर्जीच आहे असं समजायचं का?


इकडचा जागृत,तिकडचा नवसाला पावणारा,हा धन दुप्पट करून देणारा,ती कडक उतल्या मातल्यास कोपणारी देवी अशी तूझी रूपे तर किती कीती रंगवली आहेत..
तू निर्गुण निराकार असलास तरी एकदा साकार होऊन सर्वांना सांगून टाक तुझं खरं रूप.....
हो, पण हा साक्षात्कार subjective नसून objective हवा ,सर्वांना अनुभवता यायला हवा.

मिटवून टाक दुःख दैन्य आणि दे प्रचिती तुझ्या अस्तित्वाची..एकदाच फक्त

परमेश्वर फक्त अनुभवायचा असं म्हणतात..
कसं अनुभवायचं सांग ना,
म्हणजे चांगलं सगळं जे जे काही ते 'परमेश्वर हैं तो मुमकिन हैं'।आणि वाईट जे जे काही ते  'शेवटी नशीबच दुसरं काय?'असंच ना?
ऐसे कैसे चलेगा देवा?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य