राजापूरची गंगा आणि सत्य



राजापूरची गंगा दर तीन वर्षांनी अवतरते व साधारणतः दोन महीने राहते असे म्हटले जाते.
तिचे दर तीन वर्षांनी अवतरणे व सुमारे दोन महीने राहणे ही एक मान्यता आहे. तसेच ती येते कुठून ही दुसरी बाब आहे. यातील दुसर्‍या बाबी बाबत भूगर्भशास्त्रज्ञ असे म्हणतात की हा भूगर्भीय वक्र नलिकेचा (siphon) प्रकार असावा. भूगर्भातील हालचाली सुद्धा या गंगेचे वेळी अवेळी येण्यास कारण असाव्यात. कुठल्याही एकाद्या झर्‍या सारखाच, थोडी वेगळी पार्श्वभूमी असलेला हा एक झरा आहे.  पावसाळ्यात दिसणारे धबधबे पाऊस (म्हणजे पाण्याचा स्त्रोत) संपताच गायब होतात. त्याच प्रमाणे शुद्ध तर्क शास्त्र वापरल्यास राजापूरच्या गंगेच्या पाण्याचा स्त्रोत उपलब्ध होताच ती अवतरते व संपला की आटते, असे म्हणता येईल. *आपण भारतीय धबधब्याला, अन्य झर्‍यांना चमत्कार मानत नाही पण या गंगेला मात्र मानतो.*

या गंगेला चमत्कार मानण्याचे दुसरे कारण असावे की दर तीन वर्षांनी प्रकट होते. तसेच भर पावसाळ्यात तिची कुंडे कोरडी असतात असाही एक समज आहे. परंतु उपलब्ध माहितीच्या आधारे दिसून येते की ही वस्तुस्थिती नाही. इंटरनेट वर शोधलेल्या विविध साइट्स व वर्तमान पत्रातील वृत्ते, टीव्ही चॅनलचे वृत्तान्त यावरून असे दिसून येते की हा समज चुकीचा आहे. त्याची माहिती पुढील प्रमाणे आहे.

*1) राजापूर गंगेची सुरुवात मार्च 1883 पासून झाली. त्या वर्षी ती 68 दिवस राहिली. त्या नंतर 2-3 वर्षांच्या अंतराने (तीन वर्षांच्याच नव्हे!) 1918 पर्यन्त प्रकट होत राहिली.*

*2) 1918 नंतर 18 वर्षे ही गंगा काही प्रकटच झाली नाही. 1936 साली प्रकट झाली. त्या नंतर 1945 पर्यन्त अशीच 2-3 वर्षांच्या अंतराने प्रकट होऊ लागली.(konkansearch.com)*

*3) जुलै 1936 ते जुलै 1955 या काळात ती पावसाळ्यात सुद्धा 12 ते 48 दिवसांसाठी अवतरली. (लोकसत्ता दिनांक 26.06.2013).*

*4) त्यानंतर 2008 पर्यन्तचे रेकॉर्ड सापडत नाही, तो प्रत्यक्ष गंगेच्या ठिकाणी लिहून ठेवला असल्यास माहिती होऊ शकतो.*

*5) 2009 साली 20 दिवसांसाठी गंगा अवतरली. 2010 ची माहिती मिळत नाही. त्यानंतर  फेब्रुवारी 2011 ते जुन 2011 पर्यन्त गंगा उपस्थित होती असे आढळले. एप्रिल 2012 रोजी अवतरलेली गंगा 321 दिवस राहिली.  आणि लगेच थोड्याच कालावधीत म्हणजे जुन 13 मध्ये परत अवतरली आणि सप्टेंबर 2014 पर्यन्त राहिली. 2015 मध्ये 27 जुलै रोजी अवतरली व 102 दिवस राहिली. 2016 मध्ये 31 ऑगस्ट मध्ये येऊन 88 दिवस राहिली. व या वर्षी म्हणजे 2017 मध्ये 8 मे रोजी अवतरली आहे.*

वरील माहिती ताडून पहावी. वेगवेगळ्या साईट वर काही दिवसांचा फरक फार तर दिसून येईल. परंतु या माहिती वरून खालील निष्कर्ष काढता येतील:

*1) गंगेचे येणे जाणे ही एक नैसर्गिक परिस्थिती आहे. पाण्याचा स्त्रोत, भूगर्भातील पाण्याची पातळी व हालचाली यावर ती अवलंबून असते.*

*2) तिच्या आगमनात कसलीही नियमितता नाही.  ही गंगा दर तीन वर्षांनी प्रकटते हे खरे नाही. ती गेल्या काही वर्षांत तर प्रत्येक वर्षी उपलब्ध दिसते. तर पूर्वी सलग 18 वर्षे प्रकटलीच नाहीये.*

*3) पावसाळ्यात तिची कुंडे कोरडी असतातच असे नाही. अनेक पावसाळ्यात तिला पाणी असते.  अवकाळी पावसात तिने दमदार हजेरी लावलेली आहे.*

*4) तिचे राहणे (प्रकट असण्याचे दिवस) सुद्धा अनियमित आहे. 20 दिवसांपासून 300 दिवसांपर्यंत कितीही काळासाठी ती प्रकट राहू शकते.*

अशा झर्‍यांना intermittent springs किंवा rhythmic स्प्रिंग किंवा periodic स्प्रिंग असे म्हणतात. यातील पाणी वक्र नलिकेच्या (siphon) तत्वावर वाहते. वासुदेव प्याला या मध्ये सुद्धा हेच तत्व वापरले जाते. पाण्याची पातळी एका ठराविक उंची पर्यंत (वक्र नलिकेच्या वरच्या टोकाच्या स्तरा पर्यंत) गेल्यास या नलिकेच्या आखूड टोकातून पाणी खेचले जाते व दुसर्‍या टोकातून (लांब वाल्या) बाहेर पडते. हे पाणी जोरात खेचले जात असल्याने त्या बरोबर हवा सुद्धा खेचली जाते. राजापूर गंगेतून विचित्र आवाज काही वेळा येतात असे म्हटले जाते. त्याचे हेच कारण आहे. पाण्याची पातळी कमी झाली (नळीच्या छोट्या टोकाच्या खाली) की पाणी थांबते. पातळी वाढली की परत सुरू होते. भूगर्भात खडकांमध्ये वक्र नलिकेसारख्याच पोकळ्या निर्माण होऊन हे झरे तयार होतात असे भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणतात. अशा प्रकारचे झरे तुरळक प्रमाणात आढळतात. अमेरिकेच्या व्योमिंग प्रांतात (जगातील सर्वात मोठा) व इस्रायल मधील जेरूसलेम येथील सिटी ऑफ डेविड मध्ये सुद्धा असे झरे आहेत. आहेत. पण तिथे त्यांची कोणी पुजा बिजा करीत नाहीत.

*आपले अंधश्रद्ध लोक गरम पाण्याच्या झर्‍याला सुद्धा असाच चमत्कार मानतात. अशा भूगर्भीय परिस्थितीचा आनंद लुटण्या ऐवजी तिचे काही मानलेल्या गोष्टींवरून (तीन वर्षांनी “प्रकटणे” वगैरे) दैवतीकरण करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.*

उत्तम जोगदंड
*“चला उत्तरे देऊ या” टीम*

(संदर्भ, konkansearch.com, लोकसत्ता वेबसाइट, myhinduethics.com, konkanonline.com वगैरे)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?