शिवथरघळ

*आम्हाला आलेला मेसेज आणि 'चला उत्तर देऊ या' ग्रुपने दिलेले उत्तर...*

*मुळ मेसेज 👇🏽*

*शिवथरघळ :*
वाचावाच असा एक अद्भूत वैज्ञानिक चमत्कार!!!

एकदा सहज म्हणून शिवथर घळीत गेलो होतो. रहायला नेहेमी मिळते तशी मोफ़त खोली मिळाली...आज फ़ारसे भाविक नसल्याने व्यवस्थापकांनी अजुन कुणाला तरी माझ्याच खोलीत विनंती करून रहावयास पाठविले.
एक चांगली जाडजूड वजनदार सॅक घेऊन एक चाळिशीच्या पुढचे गृहस्थ आत आले! "हाय! मी भोपळे!" ओळख करून दिली गेली. मनुष्य पेहेरावावरून मॉडर्न वाटत होता...इतक्यात त्यांनी पॅंटच्या खचाखच भरलेल्या खिशांतून काही इक्विपमेंट्स काढून टेबलावर मांडली...माझी उत्कंठा ताणली गेली.."हे काय आहे?" "ही जीपीएस मशीन्स आहेत,,,डू यू नो व्हॉट जीपीएस इज?"
माझ्यातला सुप्त शास्त्रज्ञ जागा होऊ लागला! "येस, आय नो...पण आपण इतकी सारी जीपीएस यंत्रे का वापरता?" हसत हसत ते म्हणाले,"मी जीपीएस वेंडर आहे. माझा तो व्यवसायच आहे " असे म्हणत त्यांनी माझ्या उत्कंठित चेहे-यावरचे भाव ओळखत लॅपटॉप बाहेर काढला आणि म्हणाले," हे जे प्रेझेंटेशन आहे जे मी आता तुम्हाला दाखविणार आहे याचे मी बाहेर किमान ५-५० हजार रुपये घेतो! पण तुम्ही समर्थ भक्त आहात म्हणून तुम्हाला हे ज्ञान मोफ़त!"
असे म्हणत त्यांनी सुमारे एक तास अतीशय सखोल पणे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम अर्थात जीपीएस ची इथ्यंभूत माहिती मला सांगितली...ज्ञानात चांगलीच भर पडली! आता तुम्ही म्हणाल याचा आणि शिवथर घळीचा काय संबंध? मलाही तोच प्रश्न पडला! पण खरी गम्मत तर पुढे आहे! वाचत रहा!
भोपळे म्हणाले, चलो यंग मॅन, आता थियरी खूप झाली, आता थोडे प्रॅक्टिकल करुयात...असे म्हणत ती सर्व यंत्रे घेऊन आम्ही बाहेर आलो...उघड्या आकाशाखाली...कारण जीपीएस ला ओपन स्काय अर्थात खुले आकाश लागते! त्या आकाशातील उपग्रह या आपल्या हातातील यंत्राला त्याची पोझीशन, स्थान सांगत असतात! आता माझी परीक्षा सुरु झाली!
भोपळे: बर, वर पहा, किती डिग्री आकाश खुले आहे?
मी: ९० तरी असेल
भोपळे: गूड..मग मला सांगा अत्ता या स्पेस मध्ये साधारण किती सॅटेलाईट्स असतील?
मी: तुम्ही मघाशी सांगितलेत त्याप्रमाणे ३० एक तरी असावेत.
भोपळे: करेक्ट! लेट्स व्हेरीफ़ाय!
असे म्हणत त्यांनी जमिनीवर मांडलेली सर्व यंत्रे एक एक करत सुरू केली. कुणी २० उपग्रह पकडले (उपग्रहांची रेंज पकडली), कुणी २४, कुणी २८...
नियमानुसार २४ उपग्रह असतील तर एक मिटरपर्यंत अचूक स्थान सांगता येते तसे त्या यंत्रांनी सांगितलेही!
भोपळे: मी जगभरातील अनेक देश फ़िरलोय...सगळीकडे या यंत्रांचे असेच बिहेवियर असते.
आता मात्र मला रहावेना, मी म्हणालो, भोपळे सर, आपण इतके उच्चशिक्षित आणी शास्त्रसंपन्न आहात तर या इथे खबदाडात, खनाळात कसे काय वाट चुकलात?
"तीच तर गम्मत आहे!" भोपळे हसत हसत म्हणाले! "इथे रायगड पोलीस स्टेशन च्या वायरलेसचे काम करयाला आलो होतो. सर्वेक्षणच होते म्हणजे..आणि अचानक एक चमत्कार झाला!"
मी अति उत्सुकतेने ऐकत होतो!
"डु यु वॉंट टू विटनेस इट? या माझ्या सोबत!" असे म्हणत ते मला शिवथर घळीच्या तोंडापाशी घेऊन गेले.
"वर पहा, किती आकाश आहे?"
मी: ७० अंश तरी आहेच आहे.
मग किती उपग्रह दिसावेत?
मी:निदान २०-२५?
करेक्ट, नाऊ लेट्स चेक...असे म्हणत त्यांनी पुन्हा सर्व यंत्रे खुल्या आकाशाखाली मांडून सुरु केली..आणि काय आश्चर्य! जर्मन, चायनीज, जपानी, अमेरिकन, ब्रिटिश, कोरियन अशा सर्व बनावटीच्या एकाही यंत्राला एकाही उपग्रहाची रेंज येईना! चमत्कारच हा! उपग्रह नजरेच्या टप्प्यात होते! पण यंत्रांना मात्र सापडत नव्हते, म्हणजे त्या घळीभोवती असे काहीतरी क्षेत्र होते जे उपग्रहांच्या फ़्रीक्वेन्सीज खाली पोहोचूच देत नव्हते!
भोपळे म्हणाले, पूर्ण जग फ़िरलो परंतु अब्सोल्युटली फ़्रीक्वेन्स्वीलेस अशी केवल हीच एक जागा पाहिली! आणि मग मला समर्थांच्या शिवथर घळीचे वर्णन करणा-या ओळी झर्र्कन स्मरल्या! विश्रांती वाटते येथे। यावया पुण्य पाहिजे!!
विश्रांती! शांतता! फ़्रीक्वेन्सीलेस अवस्था! निर्विचार स्थिती!
अशा स्थीतीत केवळ आपल्याच मनातले विचार ऐकु येणार! त्यात भेसळ होणे नाही! आणि म्हणूनच समर्थांनी दासबोध लिहायला ही जागा निवडली असणार!
म्हणूनच हा ग्रंथ शुद्ध समर्थांचाच आहे!
अंगावर काटा उभा राहिला, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या...
भोपळेंचे मनापासून आभार मानत घळीत पाय ठेवला...समार्थांच्या पायावर लोटांगण घातले...आज तिथे भासणारी शांतता अधीक खोल होती...अधीक गंभीर होती...अधीक शांत होती! भ्रांत मनास विश्रांती खरोखरीच वाटत होती!
आधुनिक विज्ञानास जे गवसले ते माझ्या या माऊलीला ४०० वर्षांपूर्वीच केवळ जाणिवेने जाणवले होते!
दासबोधाचे जन्मस्थान म्हणजे रायगडाजवळील शिवथरची घळ हे समीकरण आता सर्वांनाच माहिती आहे!
_____________________

*आम्ही दिलेले उत्तर 👇🏽*

आमचं जुनं ते कसं वैज्ञानिक होतं हे सिद्ध करण्यासाठी ज्या लटपटी चालू आहेत त्यापैकी एक उत्तम नमूना म्हणून या पोस्टकडे पाहता येईल. त्यातील वर्णन वाचतांना जीपीएस विक्रेता भोपळे या पोस्ट-लेखकास आपल्या विक्री-कौशल्याने कसा मामा बनवतो हे पाहून मस्त करमणूक होते. या पोस्टवर काही शंका उपस्थित होतात. त्या पुढे प्रस्तुत करीत आहे:

1) लेखकाने आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक दिलेला नाही. त्यामुळे याची सत्यता पडताळता येत नाही.
2) भोपळे आपल्या खचाखच भरलेल्या खिशातून यंत्रे बाहेर काढतात! शक्य आहे! तो जीपीएस यंत्रेच विकत असल्याने अशी खिशातच घेऊन फिरत असेल. पण त्याने जे काही प्रेझेंटेशन लॅपटॉप वर दाखवले त्याचे तो पाच-पन्नास हजार रुपये घेतो हे अगदी अकल्पनीय आहे.  आपले उत्पादन विकण्यासाठी, आपल्या वस्तूची वैशिष्ठ्ये दाखवून देण्यासाठी जे प्रेझेंटेशन करावे लागते त्याचे सुद्धा पैसे (पाच-पन्नास हजार) घेणारा विक्रेता (आणि मूर्खपणे ते देणारा ग्राहक) मी तरी आजतागायत पाहीलेला नाही. परंतु पोस्ट-लेखकासारखे निर्बुद्ध लोक ग्राहक म्हणून लाभल्यास हे सहज शक्य होत असावे.
3) भोपळे यांनी दाखवलेली यंत्रे विश्वसनीय नसावीत असे सरळ सरळ दिसते. कारण 30 उपग्रहांपैकी कुण्या यंत्राने 20 उपग्रह पकडले, कुणी 24 तर कुणी 28, असे या लेखकानेच लिहलेले आहे. जीपीएस यंत्रांकडून आकाश मोकळे असलेल्या एकाच ठिकाणी अशा चुका जर होत असतील तर घळी मध्ये असतांना त्यांनी एकही उपग्रह न टिपण्याची चूक नक्कीच संभवते. त्यामुळे घळीत असतांना रेंज न मिळणे यात कसलेही आश्चर्य नाही, चमत्कार ही नाही.
4) एकाद्या ठिकाणी उपग्रहांची रेंज पोहोचत नसल्यास त्याची कारणे न शोधता त्याचा चमत्कार म्हणून उल्लेख करून संत रामदासांशी बादरायण संबंध जोडणे हे छद्म विज्ञान आहे. जंगलातील कुठल्याही गुहेत, घळीत नीरव शांतता असते. याला शिवथर घळ ही सुद्धा अपवाद नाही. तिथे कुठल्याही लहरी पोहोचू शकत नाहीत हे विज्ञानाने सिद्ध केले पाहिजे. रेंज न मिळणार्‍या जीपीएस यंत्राने नव्हे.
5) एका दुचाकी-स्वाराने दिलेला आपला अनुभव (तिथे जीपीएस उपलब्ध आहे, 7 उपग्रह दिसतात असे तो म्हणतो)  पुढील लिंक वर जरूर वाचवा:
http://thesixthgear.nene.in/post/121745759252/shivtharghal-has-gps-coverage
6) संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांनी सुद्धा अप्रतिम लेखन केले आहे.  परंतु त्यांना ते लिखाण करण्यासाठी कधीही फ्रिक्वेंसीलेस घळीची गरज भासली नाही.
7) समर्थ रामदास या घळीत का व कसे पोहोचले यावर मला काही म्हणायचे नाही. परंतु 400 वर्षांपूर्वी मोबाइल सदृश कसल्याही लहरींचा शोधच लागलेला नसतांना रामदासांना त्या आधीच कशा ज्ञात होत्या याची भाकडकथा रचून एका संताला शास्त्रज्ञ बनविण्याचा अट्टाहास करणे हे कशाचे लक्षण आहे ?

*उत्तम जोगदंड*
*(चला उत्तर देऊ या- टीम)*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?