चित्रपटाच्या निमित्ताने सुद्धा जातीय मानसिकतेचेच प्रदर्शन. आर्चीला तिच्या वडिलांनी लिहिलेले एक पत्र आणि त्याला दिलेले उत्तर


प्रिय आर्ची...

बाळा मी बोलतोय...
तुझा तात्या....

माझ्या बाळा,
तु जरी चिरडुन गेली आमचं आयुष्य तरी..

प्रिन्सनं तुमच्या सोबत जे केल ते लय वाईट...

बाळा, त्याला काय माहीत

माझ्या या काळजाच्या तुकड्याला मी किती जपलं होतं...

तु तुझ्या आईला म्हनाली होती ना !
डोळ्यात पाणी आणुन !

तात्या बोलतील का....?

हो मीच बोलतोय...!!

बाळा मला विचारायचंय तुला

काय कमी पडलो
आम्ही तुला वाढविण्यात...?

बाळा जातीपातीच्या चिखलातला मी नाही....!

प्रत्येक हौस मौज हात जोडुन उभी होती तुझ्या समोर .

आधुनिक जगातल्या आधुनिक जिवन शैलीत तुला वाढविले!

तुला बुलेट, ट्रॅक्टर, कार सर्व चालवायला शिकविले!

प्रिंन्स व तुझ्यात काही भेदभाव केला नाही...

अशा वेळी मी काहीच न कमवणाऱ्या पोरा सोबत लग्न कसं मान्य करु..?

कोणता गुण होता परशात म्हणून मी तुझा हात त्याच्या हातात द्यायचा होता..?

किशोर वयात मन हळवं व शरीराची भुक तिव्र असते हे
मान्य आहे मला..!

पण तेवढ्या एकाच कामासाठी जन्म नाही झाला आपला...

या वयात उज्वल करियर करायचे सोडून तुम्ही आजकालची पिढी प्रेमातच करियर करत आहात.

बाळा तुला जिवापाड जपनारी तुझी आई...

तुझ्या केसालाही धक्का लागु नये याची काळजी घेनारा भाऊ...

आजी आजोबा मामा मावशी काका काकी आत्या...

या सगळ्यांचा एकदाही विचार आला नाही का तुला...?

एका मुलासाठी एका झटक्यात आम्हाला लाथाडून गेलीस.

अग लहानपणी तुला झोपवण्यासाठी
तासनतास खांद्यावर घेऊन फिरायचो तेंव्हा
झोपेतही कोनाकडे जात नव्हती मला सोडुन...

आम्हा सर्वांपेक्षा काल परवा भेटलेला तो एक पोरगा
जास्त महत्वाचा वाटला का तुला..?

आर्चे हे आकर्षन  फक्त तुलाच वाटत होत असं नाही...
ते प्रत्येकालाच असतं या वयात.

काही जगावेगळं सैराट करावं असं प्रत्येकालाच वाटत
असतं...

कधी तरी बोलायचं असतं
माझ्याशी नायतर आईशी...

अगं सैराट व्हायला का हा एवढाच मार्ग नाही.

माॅ जिजाऊंनी सैराट होऊन शिवबांना स्वराज्याचा धडा दिला...

राणीलक्ष्मी बाई सारखं
देशासाठी,
मेधा पाटकर समाजासाठी,
मदर तेरेसा रंजल्या गांजल्यांसाठी सैराट झाल्या होत्या...

तुला माहीत आहे का तु गेल्यानंतर आपल्या तालुक्यात लोकांनी पोरींना शाळा कॉलेजात पाठीवणं जवळपास बंदच केलय,

अन् बऱ्याच कवळ्या पोरींचे लग्न उरकीले मायबापांनी.

अशा सैराट होण्याच्या भितीनं.

तु पळुन गेल्यावर त्या वासनांध लांडग्यांची शिकार होण्यापासून वाचली !

जर ती अनुभवी बाई आली नसती तर तो किशोर वयीन परशा तुला वाचवू शकला नसता बेटा..

मात्र सगळ्याच वाचतात असं नाही...

अन मग बाटलेपणाची जाणीव दोघांनाही सतावते....

तु गेल्यापासुन तुझी आई कधीच हसली नाही ...

अन् आमदारकीचा उमेदवार मी ...
स्वतःला बुडवुन घेतलं दारुत,
हे सगळं विसरण्यासाठी...

पोरीचे बाप नसलेले काहीजण मला बुरसटलेल्या विचाराचा म्हणतीलही ...
पण...

बाळ आर्चे व परशा,
मला एकच विचारायचंय आम्हा सगळ्यांना उध्वस्त करुन...

खरचं तुमच सैराट होणं जरुरी होतं का ...? ? ?

            तुझा तात्या....

तरूण मुलांना वाचायला द्या
------------------------------------



आज whats app वर आर्चीच्या नावे तात्याने लिहिलेले एक पत्र मित्राने पोस्ट केले. ते वाचून आर्ची आणि परश्यासारख्या अनेक कोवळ्या जीवांचे बळी घेऊनदेखील हे जातीचे विष संपत नाही याचा संताप आला. वाटलं या तात्याला प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे. म्हणून हे लेखन....
                                 ....कृष्णात कोरे
-----------------------------------------------------

प्रिय तात्या,
तुम्ही जणू एखाद्या निरागस बाळाप्रमाणे प्रश्न विचारलाय, "आम्हाला सगळ्यांना उध्वस्त करून खरंच तुमचं सैराट होणं जरुरी होतं का ?
तात्या, मला सांगा, असं सैराट व्हायची कुठल्या तरुण - तरुणीची हौस असते?
या किशोर वयात आकर्षण नावाची गोष्ट असते हे खरं आहे. या आकर्षणाबद्दल, आमच्यात होणाऱ्या बदलांबद्दल तुम्ही किंवा आईने घरी कधी काही समजावून सांगितलेय? की शाळा कॉलेजात याविषयी काही शिकवण दिलीय?
तात्या, खरंतर या आकर्षणाबरोबरच स्वतःच्या आयुष्याची अनेक छान स्वप्नं देखील असतात आमच्या मनात. त्यासाठीच तर आम्ही कॉलेजला जातो. शिकतो. कुणीतरी होण्यासाठी धडपडतो.
अर्थात हे सगळं शिकत असताना आपल्याला कुणीतरी आवडू लागतं.
आपली स्वप्नं साकार करण्यासाठी त्याची साथ मिळेल हा विश्वास वाढू लागतो.
आणि कळत नकळत सुरु होतो एकमेकांची सुख दुखं वाटून घेत, एकमेकांची स्वप्नं साकार करण्यासाठी एकत्र धडपडण्याचा सहप्रवास.
पण संस्कार आणि संस्कृतीच्या नावाचं कातडं हजारो वर्षे डोळ्यांवर ओढून घेतलेल्या तुमच्यासारख्या माणसांना आमचं हे एकत्र येणं पटतच नाही. तुम्हाला दिसते केवळ आमची वेगळी जात. आणि तुम्हाला वाटतं आम्ही तुमच्या घराण्याला आणि इज्जतीला काळीमा फासायला निघालोय.
एरव्ही तुम्ही आणि प्रिन्ससारखे तुमच्या घराण्याचे नाव रोषण करणारे वारस अनेक अनैतिक गोष्टी करता तेव्हा घराणे, इज्जत असे प्रश्न पडत नाहीत.
उलट प्रिन्सने शाळेत येऊन सरांच्या कानाखाली वाजवल्यावर तुम्ही त्याचं कौतुकच करता. आणि सरांना माणसं ओळखण्याचं शिक्षण देता.
का? तर तुम्ही वरच्या कुळातले!. तुमच्या हातात सत्ता!
असा कोणता गुण होता परश्यात म्हणून तुम्ही विचारताय?
मी म्हणते, “एक तुमची जात सोडली तर कोणता गुण नव्हता परश्यात?”
“तो वर्गातला सर्वात हुशार मुलगा होता. हे विसरलात तुम्ही? संघाला एक हाती जिंकून देत तुमच्या हस्तेच तर क्रिकेटचा चषक घेतला होता ना त्याने! तो देताना तुमच्या डोळ्यात दिसणारं अप्रूप अचानक कसं गायब झालं? त्यानं तुमच्या पोरीवर जीव लावला म्हणून?”
तात्या, विचारायचं होतंत मला, घ्यायचं होतंत समजून असं काय पाहिलं आम्ही एकमेकांत ते.
उज्वल करीअर करायचं सोडून आम्ही प्रेमातच करीअर करतो म्हणून आमच्या पिढीला हिणवण्यापूर्वी द्यायचा होतात थोडा वेळ आम्हाला आमचं करीअर घडवण्यासाठी.
पण नाही!
तुम्हीही निघालात इतर अनेक बापांसारखे लाडानं वाढवलेलं आपलं लेकरू कदाचित प्रिन्ससारखंच वाढलेल्या एखाद्या अनोळखी पुरुषाच्या दावणीला बांधायला. ज्याच्याविषयी माझ्यासह तुम्हालाही काहीच माहिती नसणार केवळ ऐकीव माहितीशिवाय.
अजिबात नाही तुम्हाला वाटलं आपल्या पोरीला काय वाटतं याचा थोडातरी विचार करावा.
खुशाल पाठवलेत मारेकरी जातीच्या खोट्या अस्मितेच्या दर्पानं तळपणारी धारदार शस्त्रं घेऊन!
का? तर तो केवळ आपल्या जातीचा नव्हता म्हणून?
हे असंच चालत आलंय शेकडो वर्षे. आणि असंच राहील सुरु अजूनही शेकडो वर्षे जोपर्यंत माणसाच्या मनातून खोट्या जातींचा दंभ कायमचा जात नाही तोपर्यंत.
हिणवत राहाल जातीधर्मांच्या पलीकडे केवळ माणसांवर प्रेम करणाऱ्या युवा पिढीला उगीचच सैराट होतेय म्हणून!
हो, हे खरं आहे, आईने, तुम्ही, आजी-आजोबांनी, काका-काकींनी, मामा-मामींनी आणि बाकी सगळ्यांनीही काहीच कमी केलं नाहीत मला. माझी प्रत्येक हौस मौज पूर्ण केली. इतर अनेक मुलींना जे स्वप्नातही पहायला मिळालं नाही ते मला जगायला मिळालं, अनुभवायला मिळालं. केवळ तुमच्यामुळं.
म्हणूनच मला काळात नाही माझी लहान सहान हौस पुरवणारे तुम्ही माझ्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न सोडवण्याच्या माझ्या निर्णयाच्या वेळी माझ्यासोबत का उभे राहिला नाहीत?
का जाणून घेतलं नाहीत आपल्या पोरीचं मन?
का दाखवला आपल्याच संगोपनावर अविश्वास?
की वाटत होतं तुम्हाला तुम्ही पुरवलेल्या हौसेच्या बदल्यात तुमच्या पोरीनं आपल्या पुढील आयुष्याभारांच्या सर्व सुखांची किमत मोजावी?
तुम्ही त्यावेळी आपल्या पोरीला जवळ घेऊन विचारलं असतंत, "काय आवडलं संग पोरी त्या दीड दमडीच्या पोरात?" तर सांगितलं असतं मी तुम्हाला, 'मला आवडला त्याचा प्रामाणिकपणा!
भाळले मी त्याच्या त्या निरागसपणावर! भावलं मला त्याचं व्यसनी मित्रांच्यात राहूनही त्याचं ते निर्व्यसनी असणं!
बसला माझ्या मनात त्याचा वर्गात पहिला आणि खेळत अव्वल असूनही निगर्वी राहण्याचा स्वभाव!
वेड लावून गेलं त्याचं मित्रांसोबतचं ते दिलखुलास वागणं!
आश्वस्त करून गेलं माझ्या मनाला त्याचं आपल्या बापाला कष्टकरी बापाला मदत करत चिकाटीनं शिकत राहणं आणि आनंदानं जगात राहणं!
मला जीव ओवाळून टाकावासा वाटला त्याच्या गरीबीने कुढत बसण्यापेक्षा तिच्याशी लढत उभारीनं नवं आयुष्यं जगण्याच्या त्याच्या जिद्दीवर!
आणि अजूनही सांगितलं असतं बरंच काही.....
पण तुम्हाला काही समजूनच घ्यायचं नव्हतं. कारण.... जातीसाठी मती खाणाऱ्यांचा तुमचा वारसा!
तुमच्या मुली, घरांतल्या स्त्रिया हे तुमच्या घराण्याचे मानबिंदू!
तुम्ही ऊठ म्हंटलं की त्यांनी उठायचं, बस म्हंटलं की बसायचं, नीज म्हंटलं की निजायचं!
तुम्ही सांगाल त्याच्याचबरोबर संसार मांडायचा! आयुष्यभर त्याच्यासाठी रांधायचं, वाढायचं, उष्टी काढायची, तो सांगील तेवढी पोरं जन्माला घालायची.
तुम्हीच देणार त्यांना स्वातंत्र्य तुम्हाला जेवढं हवं तेवढंच आणि वर मारणार गप्पा स्त्री - पुरुष समानतेच्या! लग्नाच्या बाजारात तुम्ही बघणार पहिल्यांदा जात, कुळ आणि बाहेर बोलणार आम्ही जातीपातींच्या पलीकडे गेलोय म्हणून!
तात्या, कशाला मारता केवळ पोकळ बाता आणि बडेजाव राजकारणापुरता?
 मी गेल्यापासून आई हसली नाही म्हणता. खरंच हसली नसेल. मलाही पटतंय ते.
पण खरं सांगा, तुमच्या आणि आईच्या लग्नापासून आई कितीवेळा आपल्या स्वतःच्या मनाप्रमाणे वागली?
लग्नापूर्वीच्या कोणत्या आवडी – निवडी, मित्र – मैत्रिणी जपल्या तिनं स्वतःला हव्याशा म्हणून?
नाही देता येणारं तुम्हाला उत्तर....
 तात्या, जातीयवादी आणि पुरुषप्रधान व्यवस्थेचे आणखी किती बळी घेणार आता?
तुम्हाला समाजात मान होता. तुमच्या शब्दाला किंमत होती. तुम्ही मनात आणलं असतं तर जातीयतेचे आणि पुरुषप्रधानतेचे हे चिरेबंदी वाडे उध्वस्त करण्याची संधी मिळाली होती तुम्हाला माझ्या आणि परश्याच्या रूपाने....
परश्याकडे पाहून आपल्या प्रिन्सलाही काही चांगल्या गोष्टी शिकवू शकला असता तुम्ही....
पण नाही!
वरवर इतरांपेक्षा वेगळे वाटणारे तुम्हीही इतर बापांसारखेचं निघालात.
घराण्याच्या खोट्या इज्जतीसाठी पोटाच्या गोळ्याचा जीव घ्यायला मागे पुढे न पाहणाऱ्या, जातींचा खोटा टेंभा मिरवणाऱ्या निर्दयी हैवानासारखे!
त्यादिवशी प्रिन्सला पाहून किती आनंद झाला होता आम्हाला!
वाटलं होतं आता खरंच सगळं व्यवस्थित होईल. माझे आई बाबा आम्हाला परत एकदा कुशीत घेतील. छोट्या तात्याला आपल्या अंगाखांद्यावर खेळवतील. पण तो आनंद फार काळ टिकला नाही.
मी मोठी असूनही माझं आयुष्यभर रक्षण कार म्हणून लहानपणापासून ज्या हातांना मी राखी बांधली त्याच हातांनी आमचं आयुष्य संपवलं.
माहेरच्या प्रेमासाठी तीळ तीळ तुटत उभा केलेला संसार एका क्षणात नाहीसा केला.
आमच्या प्रेमाच्या रोपावर उमलेला अंकुर आता कसा वाढेल? जात, धर्माच्या रंगांनी बरबटलेल्या या जगात त्याची काळजी आता कोण घेईल?
तात्या, आता यापुढे कोणती बहिण आपल्या भावाला विश्वासाने राखी बांधील?
स्वतःच्या मनाप्रमाणे जोडीदार निवडून कष्टानं सुखाचे आयुष्य जगू पाहणारी कोणती मुलगी आपल्या आईला यापुढे विश्वासाने संपर्क करील?  
तात्या, प्रिन्स आम्हाला संपवायच्या हेतूने बाहेर पडलाय हे खरंच माहिती नव्हतं तुम्हाला?
तात्या, आता आम्हाला संपवल्यानंतर तरी खोटा आव सोडा. अजून किती फसवाल स्वतःला आणि इतरांना?
आता तरी मान्य करा ना, जातीच्या खोट्या अभिमानापायी तुम्ही आमचं जगणं हिरावून घेतलंत....
एका हिकमती, लढवय्या मुलीला आणि प्रामाणिक, हुशार, कष्टाळू आणि नम्र मुलाला कायमचं संपवलंत...
 तात्या, तसेही आम्ही तुमच्या आयुष्यात नव्हतोच ना?
 मेली होती ना तुमची आर्ची तुमच्यासाठी?
 मग लढू द्यायचं होतंत आम्हाला आमच्या हिंमतीवर आमच्या आयुष्याशी ....
 हरलो नव्हतोत आम्ही संकटांना घाबरून....
 उभे होतोत दोघेही घेऊन हातात हात कोणत्याही वादळाशी लढण्यासाठी....
 हाच विश्वास पहिला होता मी परश्यात आणि म्हणूनच, म्हणूनच निवडलं होतं मी त्याला जोडीदार म्हणून...
 पण.....
 असो.....
तात्या, किमान यापुढे तरी केवळ खोट्या जातीसाठी कुणा आर्ची – परश्याचा जीव जाऊ नये याची काळजी घ्या...
अगदी खरं सांगतेय तात्या, कुठल्याच तरूण तरुणीची इच्छा नसते सैराट व्हायची...
जाती धर्माच्या दोरखंडांनी करकचून बांधलेली समाजव्यवस्थाच त्यांना सैराट व्हायला भाग पाडते....
नाहीतर प्रत्येकाला वाटतं आपणही छान करीअर करावं...
आपलंही छोटसं घरटं असावं....
त्यात आपलं लेकरू निर्भयपणे, आनंदानं बागडावं...
आणि या सगळ्यासोबत आपल्या आई बाबांनाही आपण सुखी ठेवावं...
आणखीही बरंच काही...

.....जातीच्या खोट्या अस्मितेची बळी ठरलेली, तुमची मुलगी,
आर्ची...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य