नास्तिकता म्हणजे वैफल्य नव्हे आणि श्रद्धा म्हणजे विवेकवाद नव्हे!

*नास्तिकता म्हणजे वैफल्य नव्हे आणि श्रद्धा म्हणजे विवेकवाद नव्हे! –जगदीश काबरे*

अंनिसने रोजगाराच्या किती संधी निर्माण केल्या? नास्तिक माणसे आयुष्याच्या उत्तरार्धात वैफल्यग्रस्त असतात की नाही? त्यांनी आरोग्यासाठी काय केले? शिक्षणासाठी एकाग्रतेचे कोणते कार्य केले? आणि भ्रष्टाचार नियंत्रणासाठी काय चिंतन केले? असे प्रश्न विचारण्यापूर्वी नास्तिकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा नेमका अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.

नास्तिकता ही रोजगार निर्माण करण्याची संस्था नाही आणि प्रत्येक सामाजिक संस्थेचे मूल्यमापन तिने किती नोकऱ्या निर्माण केल्या, या एकाच निकषावर करता येत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, विवेकनिष्ठ विचार, सामाजिक प्रबोधन आणि संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मूल्याचा प्रसार ही स्वतंत्र सामाजिक कार्यक्षेत्रे आहेत. या कामांचे मूल्यमापन त्यांच्या प्रत्यक्ष योगदानावर करावे, पूर्वग्रहांवर नव्हे. 

बहुतांश नास्तिक आयुष्याच्या उत्तरार्धात वैफल्यग्रस्त असतात, हा दावा कोणत्या संशोधनाच्या आधारे केला आहे? नास्तिकांच्या मानसिक आरोग्याविषयी असा सार्वत्रिक निष्कर्ष काढण्यासाठी प्रतिनिधिक नमुना, शास्त्रीय अभ्यास आणि तुलनात्मक पुरावे आवश्यक आहेत. ते नसताना स्वतःच्या समजुतीला वस्तुस्थितीचा दर्जा देणे म्हणजे अज्ञानाला ज्ञानाचा दर्जा देणे होय. धार्मिक श्रद्धा असलेल्या व्यक्तींनाही नैराश्य, चिंता आणि वैफल्याचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे नास्तिक व्यक्तीही समाधानी, आनंदी आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय असू शकतात. मी माझ्या आयुष्याच्या 22व्या वर्षापासून आजतागायत म्हणजे 76व्या वर्षापर्यंत असा जवळपास 50 वर्षाहून जास्त काळ नास्तिक राहिलेलो आहे. माझ्या आयुष्यातही अनेक चढउतार आले. पण मला कधी देवाची करुणा भाकण्याची गरज वाटली नाही. त्या संकट काळावर वैज्ञानिक दृष्टिकोनाने योग्य तो विचार करून मात केली आणि आजही आनंदाने जगत आहे. हेच माझ्या अनेक नास्तिक मित्रांच्या बाबतीत सांगता येईल. कारण मानसिक आरोग्याचा संबंध अनेक जैविक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक घटकांशी असतो. एखाद्या व्यक्तीच्या आनंदाचे किंवा दुःखाचे कारण तिची ईश्वरावरील श्रद्धा किंवा अश्रद्धा एवढ्यावर ठरवता येत नाही.

शिक्षणाचा पाया मनाची एकाग्रता आहे, हे मान्य केले तरी एकाग्रता विकसित करण्याचा एकमेव मार्ग धार्मिक प्रार्थना, मंत्रोच्चार किंवा ईश्वरावरील श्रद्धा हाच आहे, असे म्हणता येणार नाही. नियमित व्यायाम, पुरेशी झोप, अभ्यासाचे नियोजन, लक्षपूर्वक वाचन, स्मरणशक्तीचे प्रशिक्षण आणि योग्य अध्यापनपद्धती यांमुळेही एकाग्रता विकसित होऊ शकते. प्रार्थना किंवा ध्यानामुळे काही व्यक्तींना मानसिक शांतता आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत होत असेल, तर त्या अनुभवाचा आदर करता येतो. मात्र, त्यावरून ईश्वराचे अस्तित्व सिद्ध होत नाही किंवा श्रद्धेशिवाय एकाग्रता विकसित होऊ शकत नाही, असाही निष्कर्ष काढता येत नाही. भारतीय परंपरेत ध्यान, योग आणि मनाच्या प्रशिक्षणासंबंधी अनेक विचार विकसित झाले आहेत. त्यांतील उपयुक्त बाबींचा अभ्यास करणे स्वागतार्ह आहे. पण एखादी गोष्ट प्राचीन आहे म्हणून ती वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध ठरत नाही. तिचे मूल्यमापन निरीक्षण, प्रयोग, परिणामांची पुनरावृत्ती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे केले पाहिजे. 

अंनिसने किंवा एखाद्या प्रबोधनकर्त्याने एकाग्रतेवर काय मूलभूत कार्य केले, हा प्रश्न विचारणे गैर नाही. संबंधित व्यक्तीचे लेखन, संशोधन, व्याख्याने किंवा प्रकाशित साहित्य मागवून त्यांचा अभ्यास करता येईल. मात्र, एखाद्या व्यक्तीने एकाग्रतेवर स्वतंत्र संशोधन केले नसेल, तर त्यावरून तिचे संपूर्ण सामाजिक कार्य निरर्थक ठरत नाही. कोणत्याही व्यक्तीच्या कार्याचे मूल्यमापन करताना तिने प्रत्यक्ष काय केले, त्याचे परिणाम काय झाले आणि त्या कार्याचे पुरावे काय आहेत, हे पाहिले पाहिजे.

सश्रद्ध हिंदू नास्तिकांपेक्षा अधिक विवेकवादी आहेत, हा दावाही तितकाच उथळ आहे. एखाद्या व्यक्तीची विवेकशीलता तिच्या धार्मिक ओळखीवरून ठरत नाही. श्रद्धाळू व्यक्ती विवेकवादी असू शकते तशी नास्तिक व्यक्तीही असू शकते. मात्र, कोणताही दावा पुराव्याशिवाय स्वीकारू नये, स्वतःच्या मताचीही चिकित्सा करावी आणि नवीन पुरावा मिळाल्यास मत बदलण्याची तयारी ठेवावी, ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची मूलभूत तत्त्वे आहेत. एखाद्या व्यक्तीला स्वतःची श्रद्धा जशी प्रिय असते, तशीच दुसऱ्याला अश्रद्ध राहण्याची मुभाही असली पाहिजे. सहिष्णुता म्हणजे स्वतःच्या मताशी असहमती असलेल्या व्यक्तीला तिचे मत बाळगण्याचा अधिकार मान्य करणे.

भ्रष्टाचाराच्या नियंत्रणासाठी काय चिंतन केले, हा प्रश्नही विचारतांना भ्रष्टाचार ही संस्थात्मक, प्रशासकीय, आर्थिक आणि राजकीय कारणांशी संबंधित समस्या आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पारदर्शक प्रशासन, माहितीचा अधिकार, स्वतंत्र आणि सक्षम तपासयंत्रणा, प्रभावी लोकपाल व्यवस्था, न्यायप्रक्रियेतील विलंब कमी करणे, सार्वजनिक खर्चाचे लेखापरीक्षण, हितसंबंधांचा संघर्ष रोखणे आणि राजकीय निधीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणणे यांसारख्या उपायांची गरज असते हे लक्षात ठेवले पाहिजे. पण अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या संस्थेने या सर्व क्षेत्रांत काम केलेच पाहिजे, अशी अट नाही. परंतु तिच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचारावर मत व्यक्त केले, तर त्या मताची चिकित्सा त्यांच्या धार्मिक किंवा अधार्मिक ओळखीऐवजी त्यातील तथ्ये आणि तर्क यांच्या आधारे व्हायला हवी.

मुळात, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे धर्माचा द्वेष करणे नव्हे आणि नास्तिकता म्हणजे प्रत्येक धार्मिक व्यक्तीला कमी लेखणेही नव्हे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे निसर्ग, समाज आणि मानवी जीवन यांविषयीचे दावे पुराव्यांच्या आधारे तपासणे, कारणमीमांसा करणे, प्रश्न विचारणे आणि आवश्यकतेनुसार आपली मते बदलणे. भारतीय संविधानातील अनुच्छेद ५१अ(ह) नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक वृत्ती विकसित करण्याचे कर्तव्य सांगतो. हे कर्तव्य नागरिकांच्या धार्मिक किंवा अधार्मिक ओळखीवर अवलंबून नाही. ईश्वरावर श्रद्धा ठेवणे हा व्यक्तीचा अधिकार आहे; त्याचप्रमाणे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणे हाही व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. प्रश्न श्रद्धाळू कोण आणि नास्तिक कोण, हा नसून कोणता दावा पुराव्याने समर्थित आहे, कोणता तर्कसंगत आहे आणि कोणती भूमिका मानवी स्वातंत्र्य, समता व प्रतिष्ठेला पूरक आहे, हा आहे.

म्हणून नास्तिकतेवर टीका करायची असेल, तर नास्तिकांच्या मानसिक आरोग्याविषयी पुरावे द्यावेत. अंनिसच्या कार्यावर प्रश्न उपस्थित करायचे असतील, तर तिच्या प्रत्यक्ष कामाचे मूल्यमापन करावे. धार्मिक परंपरेतील ध्यान किंवा प्रार्थनेची उपयुक्तता मांडायची असेल, तर त्यांचे परिणाम आणि मर्यादा स्पष्ट कराव्यात. आणि स्वतःला विवेकवादी म्हणवायचे असेल, तर स्वतःच्या श्रद्धांचीही चिकित्सा करण्याची तयारी ठेवावी. विवेकवादाची खरी कसोटी दुसऱ्याच्या विचारांतील दोष शोधण्यात नाही; तर स्वतःच्या समजुतींनाही तर्क, पुरावा आणि चिकित्सेच्या कसोटीवर तपासण्यात आहे. JK

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

फिंगरप्रिंट्स दैवी नाही तर वैज्ञानिकच

पितृपक्षात कावळ्यासच का खाऊ घातले जाते?