दुसर्यांच्या अपप्रचारामुळे आपल्याच धर्मावर प्रश्न उभे?
मुस्लिम: उर्दू येते आणि कुराण वाचतात
इसाई: इंग्रजी येते आणि बायबल वाचतात
हिंदू: ना संस्कृत येते ना वेदांबद्दल माहिती
फक्त दुसर्यांच्या अपप्रचारामुळे आपल्याच धर्मावर प्रश्न उभे करतात.
कटू आहे पण सत्य आहे.
*मुस्लिम:*
मुळात कुराण हे उर्दू भाषेत नव्हे तर जुन्या *अरेबिक* भाषेत लिहिले गेले आहे, *उर्दूत नव्हे.* ते उर्दूत (आणि जगातील विविध भाषांमध्ये, आता अगदी मराठीत सुद्धा उपलब्ध आहे) अनुवादीत केलेले असू शकते. आणि हा त्यांचा एकमात्र पवित्र ग्रंथ आहे.
*इसाई:*
बायबल हे मुळात *हिब्रू, अर्माईक आणि ग्रीक* भाषेत लिहिले गेले आहे, *इंग्रजीत नव्हे.* ते नंतर जगभरातील विविध भाषांमध्ये अनुवादीत केले गेले (मराठीत सुद्धा उपलब्ध आहे). इसाई किंवा ख्रिस्ती लोकांसाठी बायबल हा एकमात्र ग्रंथ आहे.
*हिंदू:*
१)वेद हे *संस्कृत भाषेत* आहेत. भारतात सुमारे १२१ भाषा (२२ अधिकृत भाषा धरून) आहेत तसेच २७० मायबोली आहेत. त्या भाषांमध्ये वेद कधीही उपलब्ध नव्हते.
२) संस्कृत भाषा ही फक्त ब्राह्मण जातीची, फक्त अध्ययन-अध्यापनाची भाषा होती. त्यांची बोली भाषा नव्हती. त्या भाषेला देववाणी असेही म्हणतात. भारत देशाची सामान्य व्यवहाराची भाषा संस्कृत कधीही नव्हती. तसे पुरावे सापडत नाहीत.
३) हिंदू धर्मातील सुमारे ८० टक्के असलेले शूद्र, अतिशूद्र (एससी, एसटी, ओबीसी-बहुजन) लोकांना संस्कृत शिकण्यास/शिकवण्यास किंवा वेद शिकण्यास/शिकवण्यास (अगदी विसाव्या शतकात देखील) कडकडीत बंदी होती. शुद्रांनी वेद नुसते ऐकले तरी त्यांच्या कानात वितळलेले तप्त शिसे ओतण्याच्या शिक्षेची या धर्मात तरतूद होती. त्यामुळे देशातील या ८० टक्के हिंदूंना संस्कृत येण्याची किंवा वेद समजण्याची शक्यता नव्हती आणि आता तर त्यांचे अनुवाद जरी त्यांच्या मातृभाषेत उपलब्ध असले तरी ते वाचण्याची गरज देखील राहिलेली नाही.
४) इसाई आणि इस्लाम यांचा एक एकच धर्मग्रंथ असताना, हिंदूंचे मात्र वेद (चार), उपनिषदे (चौदा), पुराणे (अठरा), अरण्यके (सात), श्रुति (बावीस), स्मृति (अठरा) एवढे (अजूनही काही असू शकतात. संख्येत थोडाफार फरक असू शकतो) धार्मिक ग्रंथ आहेत. रामायण, महाभारत हे देखील धार्मिक ग्रंथ मानले जातात. हे सारे ग्रंथ किती ब्राह्मण वाचतात हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. यातील मनुस्मृती हा ग्रंथ तर मानवतेला काळिमा फासणारा आहे. हे एवढे सारे कोण वाचणार? आणि का? यातून वाचणाराला काय मिळणार?
एकूणच हिंदू धर्मातील विषमता, जाती-आधारित तीव्र भेदभाव, तिरस्कार आणि धर्ममान्य अन्याय-अत्याचार, स्त्रियांना दिलेला गुलामाहून हीन दर्जा, लोकांना अंधश्रद्धेत आकंठ बुडालेलेच ठेवणे, लोकांमधील ज्ञानार्जनाची, नवनिर्माणाची, वैज्ञानिक दृष्टीकोणाची गळचेपी करणे हे प्रकार जर वरील हिंदू धर्मग्रंथांमुळे अस्तित्वात आलेले आणि टिकून राहिलेले असतील तर समता, स्वातंत्र्य, बधुता, न्याय मानणार्या हिंदूंनी का वाचावेत? आणि मृतवत झालेली संस्कृत भाषा, जिचा काडीचाही उपयोग नाही ती भाषा तरी का शिकावी?
आणि हो, हा कोणी दुसर्यांनी केलेला अपप्रचार नाही. जेव्हा बहुजन हिंदू लोकांना संस्कृत शिकायची संधि मिळाली तेव्हा त्यांना संस्कृत धर्मग्रंथ वाचून हे सारे कळले आहे की या ग्रंथांच्या आधारेच त्यांना शतकानुशतके गुलामीत आणि अत्याचाराच्या दलदलीत ठेवले होते. हेच कटू सत्य आहे. ते पचविता न आल्याने काही काही नव-हिंदुत्ववादी तथाकथित उच्च-वर्णीय जात्यंध लोक अशा प्रकारच्या पोस्ट बनवून व्हायरल करतात.
- उत्तम जोगदंड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा