समजून घ्यायचे असेल तर...
समजून घ्यायचे असेल तर... जेट जगदीश
आम्ही जेव्हा देवाधर्मातील कर्मकांड, अंधश्रद्धा, चुकीच्या रूढी-परंपरा,नास्तिक्य तसेच धर्मसुधारणेच्या बाबत आमचे विचार मांडतो तेव्हा अनेकदा अंधभक्त हा प्रश्न विचारतात की, 'तुम्ही तुमच्या घरातल्या किती लोकांचे विचार बदलले आहेत, किती लोकांना नास्तिक केले आहे?' वरवर पाहता हा प्रश्न अगदी बिनतोड वाटतो, पण विचार केल्यावर त्यातील फोलपणा सिद्ध होतो. कसा तो खालील उदाहरणावरून स्पष्ट होईल...
यासंदर्भात मला ल. रा. पागारकरांना सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकरांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते. आगरकर हे पांगारकरांचे शिक्षक होते. एक दिवशी वर्गात पांगारकरांनी आगरकरांना प्रश्न विचारला, "सर तुम्हाला एक प्रश्न विचारू काय?"
आगरकर म्हणाले, "विचार की, त्यात परवानगीची काय गरज?"
पांगारकर म्हणाले, "काल श्रीमती आगरकरांना मी देवळात नाकदुऱ्या काढताना पाहिले."
आगरकर म्हणाले, "मग?"
पांगारकर म्हणाले, "नाही, पण सर तुम्ही देव मानत नाही ना."
त्यावर आगरकर म्हणाले, "अरे मी म्हणजे माझी बायको नाही ना." (म्हणजे तिला तिचे स्वातंत्र्य आहे.)
याचा मतितार्थ असा की, देवाधर्मावर टीका करणारे जर स्त्रियांना गुलाम समजत नसतील तर ते त्यांच्यावर दबाव आणू शकत नाहीत. ते समजावू मात्र शकतात, नव्हे ते त्यांचे कर्तव्यच आहे. त्याप्रमाणे वागणे न वागणे हे त्या व्यक्तीच्या मनावर अवलंबून आहे. कारण ते त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य आहे असे आम्ही मानतो. म्हणूनच सुधारक कधीही परंपरावाद्यांसारखी दादागिरीची भाषा करत नाहीत, तर लोकांना प्रथा परंपरेतील चुकीच्या गोष्टी काय आहेत ते समजावून देण्याच्या प्रयत्न करतात. त्यातून विचार करणारे बदलतात आणि कट्टर असतात ते मात्र आमच्या नावाने शंख करतात. थोडक्यात काय तर आम्ही समोरच्यावर दाबावाची भाषा न वापरता आमचे विचार स्पष्टपणे मांडतो... अंधश्रध्दांनी भरलेले धर्मातील खाचखळगे आणि खड्डे दाखवतो. अर्थात ज्यांना आमचे विचार पटत नाही त्यांचा त्या खड्ड्यात पाडण्याचा अधिकारही आम्हास मान्य आहे... कारण आमच्यालेखी हा हार-जितीचा मामला नसतोच मुली, तर हा मन परिवर्तनाचा प्रदीर्घ काळ चालणारा कार्यक्रम असतो. जो आम्ही न थकता अथक परिश्रमाने करत असतो.
माझ्याकडे जेव्हा मी नास्तिक्याकडे वळत होतो आणि घरात कर्मकांडाच्या विरोधात बोलत होतो तेव्हा माझे आई-वडील म्हणाले की, 'तू आता मोठा झाला आहेस. तुझे विचार तुला कळतात, पण आमच्या लहानपणापासून आमच्यावर असेच संस्कार झाले आहेत. त्यामुळे आम्ही काही आता बदलू शकत नाही. तेव्हा व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून तू तुझा कसाही वागायला मुक्त आहेस.' याचपद्धतीने मीही मग ठरवले की, त्यांचे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून तेही त्यांच्या पद्धतीने जायला मुक्त आहेत. ह्यात मी त्यांना नास्तिक बनवू शकलो नाही याचे मला दुःख वाटत नाही.
मुळात विवेकवादी नास्तिक होण्याची प्रक्रिया ही एक वेळ घेणारी प्रक्रिया आहे. कारण लहानपणापासून आपण ज्या धर्मात जन्मलो आहोत त्याचे संस्कार आपले आई-वडील सतत करत असतात, आणि लहानपणी झालेले संस्कार जोपर्यंत तुम्ही स्वतः विचार करून... स्वतःशी झगडून बदलत नाही तोपर्यंत ते बदलणे कठीण! पण अशाप्रकारे विचार करणारी किती मंडळी असतात? समाजात चालत आलेल्या रीतीरीवाजाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी अंगी धाडस लागते. असे धाडस सगळ्यांच्यातच असते असे नाही. असे बरेच लोक असतात की, ज्यांना समाजातील घातक रूढी-परंपरा आवडत नाहीत. पण त्याविरोधात बोलायला त्यांची जीभ रेटत नाही. कारण समाजाच्या विरोधात जायचे धाडस नसते. त्यापेक्षा 'यामुळे आपले काही नुकसान होत नाही ना' असा कातडीबचाऊ विचार करून ते गप्प राहणे पसंत करतात आणि प्रवाहपतित त्याप्रमाणे वाडवडील जे करत आहेत तेच कुळाचार पुढे करत राहतात. पण सगळ्यांनाच असे गप्प राहणे जमत नाही, म्हणून ते तेवढे बदलतात. अशावेळी त्यांच्या घरच्यांनीही त्यांच्याप्रमाणे बदलावे अशी अपेक्षा करणे गैर आहे. कारण त्या परिस्थितीत आम्ही आमच्या परीने जेवढे प्रयत्न करायचे ते केलेलेच असतात, पण आम्ही व्यक्तिस्वातंत्र्य मानतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे 'तुम्ही तुमच्या घरातील किती लोकांना नास्तीक बनवले?' असे बोल लावणे चुकीचे आहे, असे मला वाटते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा