गायत्री मंत्रात किती सामर्थ्य आहे?
"गायत्री मंत्र हा जगातला एकमेव पाॅवरफुल मंत्र आहे असे डॉ. हाॅवर्ड स्टेनरेजिल यांनी जाहीर केले आहे...त्यांनी जगातील सर्व मंत्र गोळा केले असून त्यांनी स्वतःच्या प्रयोगशाळेत चाचणी घेतली आहे... त्यांना असे आढळले की फक्त गायत्री मंत्र हाच एकमेव सर्वोच्च शक्तिशाली मंत्र आहे... हिंदूंचा हा मंत्र एका सेकंदात एक लाख दहा हजार ध्वनी लहरी निर्माण करतो असे त्यांना आढळले.... एवढ्या प्रचंड ध्वनी लहरींमुळे व तरंगलांबी मुळे अध्यात्मिक क्षमता प्रचंड वाढते....गायत्री मंत्राचे शारीरिक व मानसिक फायदे खूप आहेत... अमेरिकेतील एका राज्यात व हॉलंड मध्ये रेडिओ स्टेशन वरून रोज गायत्री मंत्र म्हटले जातात..."
अशा आशयाची पोस्ट फिरत असते...!!
वास्तवात जगातील कोणत्याही धर्माच्या वा संस्कृतीच्या मंत्रांमध्ये कोणतेही सामर्थ्य नसते.
कारण मंत्र-तंत्राने जर रोग बरे झाले असते व समाज सुखी झाला असता तर, राजकारण अस्तित्वात आले नसते आणि शासन यंत्रणा निर्माण करण्याची गरजच उरली नसती !
मग वरील पोस्टमध्ये जे दावे करण्यात आलेले आहेत त्यात तथ्य किती आहे याचा धांडोळा आपण घेऊ या...
गायत्री मंत्र हा एका सेकंदामध्ये एक लाख दहा हजार वेळा ध्वनी लहरी निर्माण करून पॉवर्फुल ऊर्जा देते हे म्हणणे मुळात संपूर्ण अवैज्ञानिक आहे. कारण ध्वनिलहरी या सेकंदामध्ये मोजल्या जात नाहीत. त्या हर्टज मध्ये मोजल्या जातात. अगदी ध्वनी लहरी जर वेगात मोजायच्या ठरवल्या तरीही ध्वनी लहरींचा वेग हा मिटर किंवा किलोमीटर मध्ये मोजला जातो. वरील पोस्टमध्ये ११०००० प्रति सेकंद एवढेच म्हटले आहे. ज्याला कोणताही वैज्ञानिक अर्थ नाही. मंत्राच्या ध्वनीलहरींची तरंगलांबी, वेग, वारंवारिता, प्रकार जसे की उभ्या किंवा समांतर ध्वनीलहरी , इ. कोणतेही मोजमाप इथे दिलेले नाही. केवळ प्रती सेकंद म्हटले आहे ज्याला काहीही अर्थ नाही.
आपण सर्व मनुष्यप्राणी २० हर्टज ते २०००० हर्टज ( २० kHz किलो हर्टज) च्या दरम्यानच्या ताकदीचे ध्वनि ऐकू शकतो. समजा या पोस्ट मधील म्हणणे खरे आहे असे समजून आपण गणित करूया. हर्टज गुणिले सेकंद किंवा हर्टज गुणिले साठ म्हणजेच एक लाख दहा हजार गुणिले साठ बरोबर ६,६००,००० हर्टज झाले. म्हणजेच ६६००० किलो हर्टज झाले. आपण जेव्हा वैद्यकीय कारणासाठी सोनोग्राफी करतो तेव्हा त्या मशीन मध्ये २०००० हर्टजच्या वर जर ध्वनीलहरींची वारंवारिता गेली तर त्यास अल्ट्रासाऊंड ध्वनीलहरी म्हणतात. याचा अर्थ गायत्री मंत्राने सोनोग्राफी मशीन चालू शकते पण तसा तरी अजून शोध लागलेला नाही. आणि लागणार ही नाही कारण तुमचे आमचे सर्वांचे कान २०००० किलोहर्टज पर्यंत ताकदीचे ध्वनी ऐकू शकतात. २०००० च्यावर जर ते गेले तर आपल्या कानाचे काय हाल होतील ते मंत्रच जाणोत.
गायत्री मंत्राने अचाट उर्जा जर निर्माण होत असेल तर ऐकणारे बहिरे होऊन जातील किंबहुना कानच बाद होऊन जातील! गायत्री मंत्रवाल्यांचे जर असे म्हणणे असेल की अज्ञात शक्ती ती निर्माण करते तर अज्ञात शक्ती ज्ञात करून दिली तर जगद् कल्याण होईल. कुत्र्याचे कान तीक्ष्ण असतात असे आपण म्हणतो.. कारण कुत्रे हे २० हजार किलोहर्टज पेक्षा जास्त ताकदीचे ध्वनी ऐकू शकतात. म्हणजे माणूस नव्हे तर प्राणी हे गायत्री मंत्र जर ऐकत असतील तर त्यांच्यात प्रचंड सुधारणा दिसून यायला हव्यात.
ध्वनी लहरींची लांबी ही फूटात, इंचात किंवा मीटरमध्ये मोजली जाते. ( सामान्य ध्वनी लहर लांबी ही १७ मीटर ते १७ मिमी मध्ये असते ) गायत्री मंत्रवाल्यांनी त्यांच्या लहरींची लांबी मोजलेली दिसत नाही. कारण तसा कुणीच उल्लेख करत नाही. ध्वनीलहरींची ताकद जर मोजायची ठरवली तर ती परिस्थितीनुसार बदलते. ज्या माध्यमातून ध्वनी जाणार आहेत त्या माध्यमांची घनता ही महत्त्वाचे ठरते. गायत्री मंत्र सर्व घनतांमधून जात असेल तर त्याचे कुठलेच पुरावे कोणीही दिलेले नाहीत.
कान आणि कानातील पडदा हे ऐकण्यामध्ये भाग घेतात. तिथून ध्वनिलहरी मेंदूकडे ऑडिटरी नर्व किंवा कर्ण शिरेतून मेंदूकडे जातात. आणि तिथून ते ऐकण्याच्या केंद्रात जातात. या सर्व गोष्टी मोजण्याकरिता सायकोऍकॉस्टिक किंवा मनोश्रवण विज्ञान वापरले जाते. आणि या विज्ञानानुसार गायत्री मंत्राचा कोणताही दावा टिकलेला नाही.
न्यूटन-लाप्लास समीकरणाने ध्वनीच्या लाटांचा वेग मोजला जातो. गायत्री मंत्राचा वेग पोस्टकर्त्याने या समीकरणाने मोजून दाखवावाच. मग सत्य बाहेर येईल. प्रती सेकंद किती मीटर वेगाने गायत्री मंत्राच्या ध्वनीलहरी धावतात ते न सांगता सेकंदास ११०००० लहरी असले भंकस विज्ञान मांडले आहे.
विज्ञानानुसार, पाण्यातून वाहताना ध्वनीलहरींचा वेग १४८२ मीटर प्रती सेकंद असतो. तोच स्टील धातूतून जाताना ५९६० मीटर प्रती सेकंद असतो. तर सर्वांत जास्त वेग घन रूपातल्या हायड्रोजन मधून असतो. तो ३६००० मीटर प्रती सेकंद असतो इतका असतो. आता गायत्री मंत्राचा वेग लाखांच्या वर गेला असा दावा केला असेल तर जगाच्या बाहेरील मोजणी यंत्र बहुधा असावे..देवाचे! आणि घनता असावी श्रद्धेची !! जाता जाता गायत्री मंत्राच्या ध्वनीचा दाबही (साऊंड प्रेशर) ही सांगितले असते तर देवाचे कौतुक करायला वाव तरी मिळाला असता.
ध्वनीलहरींचे मोजमाप करण्यासाठी ६ पद्धतीने ते करावे लागते. ही पद्धत डॉक्टर हावर्ड स्टॅनरेजीलला माहित नसावी. ती माहित नाही त्याचं कारण डॉक्टर हाॅवर्ड स्टॅनरेजील नावाची व्यक्तीच कुठे अस्तित्वात नाही. पोस्टमध्ये म्हटले आहे की ती अमेरिकन सायंटिस्ट आहे. पण अमेरिकेत असा कुठलाच वैज्ञानिक नाही. इंटरनेटवर शोधल्यानंतर अशा नावाचा माणूस सापडत नाही. त्याचे प्रसिद्ध झालेले शोधनिबंध नाहीत. त्यामुळे जगात कुठेही खळबळ उडालेली नाहीय्ये. बहुदा पोस्ट करणाऱ्यांनी स्वतः वैज्ञानिक पैदा केला असावा. आणि तो पोस्टमध्ये घुसडला असावा. गायत्री मंत्राच्या सामर्थ्याचे पुरावे देणारा वैज्ञानिक बेनामी आणि गायब असावा यासारखे मंत्र सामर्थ्य कोणते नसावे. त्याचे नाव घेऊन अनेक अंधभक्त ट्विटरवर, फेसबुकवर, युट्युबवर, गायत्रीमंत्राचे अफाट आणि अचाट कौतुक करणारे व्हिडिओज, पोस्टस् आणि ट्विट्स टाकून मोकळे झाले आहेत. या सर्वांनी मिळून डॉक्टर हाॅवर्डला शोधून आणावे आणि त्याचे नाव, गाव, पत्ता, आणि त्याच्या मानसिक प्रयोग शाळेचा पत्ता मला दिल्यास पुढचा शोध घेणे आणखी सोपे होईल. आणखी एक रेफरन्स दिलेला आहे. हॅम्बुर्ग यूनिवर्सिटीमध्ये गायत्री मंत्राचे संशोधन झाले आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. डॉक्टर हावर्ड स्टॅनरेजील अमेरिकन आहे आणि हॅम्बुर्ग युनिव्हर्सिटी जर्मनीत आहे. या युनिव्हर्सिटी मध्ये जर गायत्री मंत्रावर संशोधन झालेले असेल आणि ते प्रचंड क्रांतिकारी असेल तर त्याचा गाजावाजा न होता सर्व ठिकाणी जागतिक पातळीवर सारे काही थंड थंड आहे. याचे कारण ही पोस्ट फेकू युनिव्हर्सिटी मधून आल्यामुळे भक्तांमध्येच गाजावाजा होणार.
दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर गायत्री मंत्र म्हटल्याने भयंकर ऊर्जा निर्माण होत असेल तर म्हणणारा जिवंत कसा काय राहू शकतो? त्याच्या तोंडातून मंत्र बाहेर पडल्या पडल्या निर्माण होणार्या अफाट ऊर्जेमुळे तो आणि त्याचा परिसर क्षणार्धात हलून जायला हवा. ध्वनीवादळच म्हणा ना!पण तसे तर काही घडत नाही. कारण गायत्री मंत्राच्या अफाट सामर्थ्याचा दावा करताना असेही सांगण्यात येते की ते म्हटल्यावर शरीरात अफाट आध्यात्मिक शक्ती जागृत होते. म्हणजे नेमके काय ते सांगितले नाही.
एका भक्ताने तर असा दावा केला आहे की या मंत्रामुळे दुसऱ्याच्या मनातले सुद्धा ओळखता येते. टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वृत्तपत्राने, तुमच्या शरीरातील सर्व विषारी द्रव्य या मंत्राने बाहेर टाकली जातात, तुमच्या मेंदू आणि फुप्फुसांना निरोगी बनवले जाते, ह्रदयातली नकारात्मकता (??) घालवली जाते, तुमची ताणविकृती आणि काळजी विकृती दूर होते,... इत्यादी अफाट दावे बिनबुडाचा आधार घेत केले आहेत. हे प्रतिष्ठित वृत्तपत्र जर असे दावे करत असेल तर इतर वृत्तपत्रांची काय कथा? एवढेच नव्हे, तर गायत्री मंत्र म्हटल्यामुळे बुद्धिमत्ता वाढते आणि माणूस इंटेलिजंट होतो असा वेडगळ दावा करण्यात आला आहे. असे जर असते तर भारतात पुरातन काळापासून लाखो वैज्ञानिक निर्माण झाले असते !!
मंत्र सामर्थ्य दाखवण्याच्या नादात विज्ञानाचा आधार घेतला तर तो किती हास्यास्पद होतो त्याचा नमुना म्हणजे ध्वनी लहरी आणि गायत्री मंत्र यांचा संबंध जोडणे.
जगातील कुठल्याही धर्मातल्या, मंत्र, तंत्र, जप आणि तप यांच्यात कोणतेही अचाट आणि अफाट सामर्थ्य नसते. तोंडातून बोलले गेलेले, नादाचा ठेका धरलेले, शब्द हे जर प्रत्येक व्यक्तीस निरोगी बनवत असते तर वैद्यकीय विज्ञानाचा उदयच झाला नसता एवढे जरी लक्षात घेतले तरी पुरे!
- डाॅ. प्रदीप पाटील
अंधभक्ती ऐकली होती... आता अंधविरोध पण पाहायला मिळाला असे ही पोस्ट वाचून वाटते....��
उत्तर द्याहटवामी कुठल्याही दाव्याचे समर्थन करत नाही, पण लेखकाने तरी तर्क मांडताना मुद्द्यावर सखोल अभ्यास केला असे वाटत नाही. Hertz हे frequency म्हणजेच वारंवारता चे एकक आहे. Hz = cycles / second. म्हणजेच एखाद्या गोष्टीची एका सेकंदात किती वेळा पुनरावृत्ती झाली. ११०००० प्रती सेकंद म्हणजेच ११०००० Hertz. साधारणतः २००००Hz पेक्षा जास्त वारंवारता असेल तर तो ध्वनी कानाला ऐकू येत नाही.लेखकाने उगाच त्याला ६० ने गुणाकार करून ६६०००० Hertz अशी काही तरी आकडेवारी काढली आणि त्यातून काय सिद्ध करायचा प्रयत्न केला हे मला तरी उमगले नाही.
तोंडातून निघणाऱ्या ध्वनीच्या ताकदीचे जर उदाहरण द्यायचे झाले तर खूप वर्षा खाली डिस्कवरी टीव्ही चॅनल वर एका इंग्रजी बाईला अगदी किंचाळवाण्या आवाजात ऑपेरा गाऊन काचेचा पेला फोडून दाखविल्याचा प्रयोग केलेला पहिला होता....😁
हटवात्यामुळे ध्वनी मध्ये सामर्थ्य नसते असे लेखकाचे म्हणणे मला तरी पटले नाही...
एका पोस्ट मध्ये cycle/second असे तथाकथित स्टेनरेजिल नाव घेऊन पोस्टणार्याने म्हंटले नाही तर सेकंद गुणिले हर्टज असे म्हटलेय. त्याचा हा परामर्ष आहे.
हटवाडिस्कव्हरी च्या प्रयोगाचे रिसर्च पेपर देणे.
वरील ज्याने कमेंटस् केल्यात त्या Unknown या नावाने आहेत. तो एक ब्लॉगर आहे. त्याचा ब्लॉग बंद आहे.
हटवाब्लॉगर भित्रा दिसतोय. स्वतःचे नाव सांगायला घाबरतो आहे.
उत्तर द्याहटवाडॉक्टर प्रदीप पाटील यांनी गायत्री मंत्राच्या संबंधीचा छद्म वैज्ञानिक माहितीचा पर्दाफाश केला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन
उत्तर द्याहटवा