एपीजे यांच्या नावाने फिरणार्‍या पोस्ट ला उत्तर.

एपीजे यांच्या नावाने फिरणार्‍या पोस्ट ला उत्तर.


*ती पोस्ट* :
आमच्या 3000 वर्षातील इतिहासात जगातील विविध कानाकोपऱ्यातून लोकं भारतात आले आणि आम्हाला लुटून निघून गेले ,
आमची जमीन काबीज केली, आमच्या बुद्धीला गुलाम बनविले. अलेक्झांडर पासून ग्रीक, तुर्क, मुघल, पोर्तुगाल , ब्रिटिश, फ्रेंच, डच सर्वांनी आमच्या देशाला लुटले......
हे सर्व आमच्या देशात आले आणि आम्हाला लुटले आणि जे काही आमचे होते ते सर्व घेऊन गेले......

परंतु आजपर्यंत आम्ही दुसऱ्या देशासोबत असे केले नाही.
आम्ही कुणालाही आपले गुलाम नाही बनविले.
आम्ही कोण्या देशाची जमीन काबीज केली नाही,
कोणत्याही देशाच्या संस्कृतिला ठेच पोहोचविली नाही आणि कोण्या देशाची जीवनपद्धती बदलण्याचा प्रयत्न केला नाही.
आम्ही असे का करतो?
कारण कि आम्ही दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करतो..........
@एपीजे...

*आता या पोस्टचे विश्लेषण करून निर्माण होणारे काही प्रश्न, एपीजे यांचा आदर राखून, विचारत आहे:*
१) तीन हजार वर्षाच्या इतिहासात जगाच्या (१९५ पैकी १९४ देशातून) कोणत्या कानाकोपर्‍यातून लोक *भारतात* आले बरे? आणि संपूर्ण तीन हजार वर्षे इथे त्यांचा अमल होता काय? ग्रीक, तुर्क, मुघल, पोर्तुगाल , ब्रिटिश, फ्रेंच, डच म्हणजे जगाचा कानाकोपरा नव्हे!
२) *भारत* नावाचा देश त्या वेळेस होता काय? १९४७ साली भारत स्वतंत्र झाला त्या वेळी *भारतवर्षात* सुमारे ६०० संस्थाने  होती व ती त्यावेळी स्थापन झालेल्या भारतात विलीन झाली, हा इतिहास नव्हे काय? तो एपीजे यांना माहिती नव्हता काय?
३) या *कानाकोपऱ्यातून* आलेल्या लोकांनी भारताला लुटले व आपले सर्व काही लुटून घेऊन ते निघूनही गेले? त्या वेळेस भारतातील शूर, पराक्रमी राजे व करोडो लोक काय तंबाखूला चुना लावून चोळत बसले होते की भांगेच्या तारेत पडून होते? आपण लुटले जात आहोत हे कळण्याएवढी अक्कल त्यांना नव्हती काय? स्वतःचे व स्वतःच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याचे ज्ञान व बळ तेंव्हा नव्हते काय? ग्रीस, तुर्कस्तान, पोर्तुगाल, ब्रिटन, फ्रांस, हॉलंड हे आकाराने व लोकसंख्येने क्षुल्लक असलेले देश, हजारो मैल प्रवास करून, इथे येऊन, विशाल भारतवर्षातील शेकडो राजांना व करोडो लोकांना कसे काय लुटू शकतात? आपली जमीन कशी काय काबीज करू शकतात? 
४) या परदेशातील लोकांनी *आमच्या बुद्धीला गुलाम बनविले* असे म्हणताना, ती आमच्या लोकांची बुद्धी प्रचंड कमकुवत आहे याची कबुलीच नाही काय? त्या काळात आपल्याकडे विमाने, दूरदर्शन, अण्वस्त्रे, प्लॅस्टिक सर्जरी, जनुक शस्त्र, इंटरनेट अस्तित्वात होते असे हल्ली टाहो फोडून सांगितले जाते. तर अशा सुपर बुद्धिमान लोकांची बुद्धी परदेशातील टुकार अशा विदेशी लोकांकडून गुलाम कशी काय होऊ शकते बुवा?
५) एपीजे यांनी शेवटच्या परिच्छेदात दुसर्‍या देशांनी जे आपल्याला केले  तसे आपण दुसर्‍या देशाला केले नाही याचे कारण दिले आहे, ते म्हणजे आपण दुसर्‍यांच्या स्वातंत्र्याचा आदर करतो. व्वा व्वा! क्या बात है!!! ज्या लोकांना तीन हजार वर्षे गुलाम केले आहे, लुटले आहे, ज्यांना स्वतःचे व स्वतःच्या मालमत्तेचे साधे रक्षण करता येत नाही, ज्यांची बुद्धी गुलाम केली गेली आहे, असे रया गेलेले नेभळट, बुद्धिभ्रष्ट, निष्कांचन, लोक दुसर्‍यांवर आक्रमण करून, त्यांना गुलाम करू शकतात ही अपेक्षाच कशी काय केली जाऊ शकते? या अशा पराभूत मनोवृत्तीच्या लोकांनी, दुसर्‍यांना हरवू शकत नाही म्हणून, आम्ही दुसर्‍यांच्या स्वातंत्र्याचा आदर करतो असे म्हणणे म्हणजे एखाद्या भंगारवाल्याने टाटा स्टील कंपनीचा आपल्यासमोर टिकाव लागणार नाही असे मानून, टाटाचा सन्मान राखण्यासाठी आपण आपले भंगाराचे दुकान बंद करीत आहोत असे म्हणण्यासारखेच आहे.

तात्पर्य :  वरील पोस्ट, जो पर्यन्त आपण पुरावा देत नाहीत, तो पर्यन्त ‘नांगरे पाटील’ प्रवर्गातील आहे असे दिसून येते. अशा पोस्ट टाकून एपीजे यांचा अपमान होतो आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?