विज्ञान आणि अध्यात्म यातील फरक
......... || जय हरी || .........
" विज्ञान आणि अध्यात्म यातील फरक"
*या पोस्टला उत्तर (कंसात)*
1. विज्ञान प्रयोगातून विकसित होते,
अध्यात्म योगातून प्राप्त होते.
(विज्ञान केवळ प्रयोगातूनच नाही तर निरीक्षणातून, चिकित्सेतून निर्माण होते,
अध्यात्म काल्पनिकतेतून निर्माण होते.)
2. विज्ञानासाठी साधने वापरली जातात,
अध्यात्मासाठी साधना वापरली जाते.
(विज्ञानसाठी केवळ साधनेच नाही तर डोकेही वापरले जाते,
अध्यात्मात डोके अजिबात वापरले जात नाही.)
3. विज्ञानामध्ये शोध आहे,
अध्यात्मामध्ये बोध आहे.
(विज्ञानात शोध आहे तसेच शोधाची चिरफाड ही आहे,
अध्यात्मामध्ये बाळबोधपणा आहे.)
4. विज्ञानामध्ये तत्त्वपरिक्षा आहे,
अध्यात्मामध्ये सत्त्वपरिक्षा आहे.
(विज्ञानात केवळ तत्व परिक्षाच नाही तर समग्र चिकित्सा आहे,
अध्यात्मामध्ये सत्व-परीक्षेचे व्यक्ति-सापेक्ष ढोंग आहे.)
5. विज्ञानामध्ये व्यासंग आहे,
अध्यात्मामध्ये सत्संग आहे.
(विज्ञानात व्यासंग आणि शोधाचा ध्यास आहे,
अध्यात्मामध्ये सम-दांभिकांचा सत्संग नावाचा सहवास आहे.)
6. विज्ञानामध्ये कर्तृत्व आहे,
अध्यात्मामध्ये दातृत्व आहे.
(विज्ञानात कर्तृत्व व ज्ञान शेअर करायचे दातृत्व आहे,
अध्यात्मामध्ये दुसर्यांना बुद्धी-बधीर करायचे लुटारुत्व आहे.)
7. विज्ञानामध्ये शक्ती आहे,
अध्यात्मामध्ये भक्ती आहे.
(याचा अर्थ, अध्यात्मात शक्ति नाही हे कबूल केले आहे,
आहे ती अज्ञाताची पोकळ भीती व भक्ति आहे)
8. विज्ञानामध्ये प्रकल्प आहेत,
अध्यात्मामध्ये संकल्प आहे.
(विज्ञानात सकल-लोकोपयोगी प्रकल्प आहेत,
अध्यात्मात टाळ कुटायचा बिनाकामाचा संकल्प आहे)
9. विज्ञानामध्ये तंत्रज्ञान आहे,
अध्यात्मामध्ये आत्मज्ञान आहे.
(विज्ञानात तंत्रज्ञान तसेच सर्वांगीण ज्ञान आहे,
अध्यात्मात नसलेल्या आत्म्याचे काल्पनिक गुणगान आहे.)
10. विज्ञान उपभोगास पोषक आहे,
अध्यात्म त्यागास पोषक आहे.
(विज्ञान उपभोगास व त्यागास ही पोषक आहे,
अध्यात्म उल्लू बनवून दुसर्यांच्या त्यागावर पोसत आहे.)
11. विज्ञानामुळे पुरुषार्थ घडतो,
अध्यात्मामुळे परमार्थ घडतो.
(म्हणजेच अध्यात्मामुळे पुरुषार्थ तर घडत नाहीच,
पण दुसर्यांना वेडे बनविण्याचा परमार्थ घडतो.)
12. विज्ञानामुळे प्रतिष्ठा वाढते,
अध्यात्मामुळे निष्ठा वाढते.
(म्हणजेच अध्यात्मामुळे प्रतिष्ठा वाढत नाही हे मान्य दिसते आहे,
उलट अध्यात्मात आंधळ्या भक्तीची निष्ठा वाढते.)
13. विज्ञानामुळे संपन्नता प्राप्त होते,
अध्यात्मामुळे प्रसन्नता प्राप्त होते.
(याचा अर्थ अध्यात्मामुळे संपन्नता धुळीस मिळते असाच होतो,
तसेच अध्यात्मात भास किंवा दृष्टिभ्रम यामुळे खोटी प्रसन्नता प्राप्त होते.)
14. विज्ञानामुळे प्रसिध्दी मिळते,
अध्यात्मामुळे सिध्दी मिळते.
(विज्ञानाची प्रसिद्धी कर्तृत्वामुळे आहे,
अध्यात्माची सिद्धि हे मानसिक आजाराचे उदात्तीकरण आहे.)
15. विज्ञानामुळे परिस्थिती बदलते,
अध्यात्मामुळे मनःस्थिती बदलते.
(विज्ञानात ज्ञान लाभून विचारांची, मनाची कक्षा रुंदावते,
अध्यात्मामुळे मनोविकार होऊन खरोखरच ‘मनःस्थिती बदलते.)
16. विज्ञानामुळे चातुर्य विकसित होते,
अध्यात्मामुळे चारित्र्य विकसित होते.
(विज्ञानामुळे चातुर्य व चारित्र्य दोन्ही विकसित होते,
अध्यात्मामुळे माणूस मठ्ठ तर बनतोच, पण चारित्र्याच्या खोट्या कल्पनात अडकतो.)
17. विज्ञानामध्ये तपशिलावर भर आहे,
अध्यात्मामध्ये तप व शील यावर भर आहे.
(अध्यात्मात तपशीलावर भर नाही हे लेखकाने मान्य केले आहेच,
तप व शील काय असते ते आसारम व राम-रहीम इत्यादींनी दाखवून दिले आहेच.)
18. विज्ञानामध्ये पराक्रम आहे,
अध्यात्मामध्ये आत्मसंयम आहे.
(विज्ञानात पराक्रम नव्हे, विनम्रता आहे,
अध्यात्मात आत्म-कोंडमारा आहे.)
19. विज्ञानामुळे भौतिक विकास होतो,
अध्यात्मामुळे आत्मिक विकास होतो.
(विज्ञानामुळे भौतिक व आत्मिक विकास सुद्धा होतो, प्रगल्भता वाढते,
उलट, अध्यात्मात दोन्ही बाबतीत माणूस भकास होतो.)
20. विज्ञानामुळे बाह्य सुख प्राप्त होते,
अध्यात्मामुळे अंतरात्म्यातून सुख प्राप्त होते.
(विज्ञानामुळे बाह्य सुख व नवीन शोधाचे, त्याच्या उपयोगाचे आत्मिक सुख प्राप्त होते,
अध्यात्मात अंतरात्म्याच्या सुखाच्या दिवास्वप्नात माणूस रमतो व मरतो.)
21. विज्ञानामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात,
अध्यात्मामुळे सर्व प्रश्न सुटतात.
(विज्ञानामुळे एक एक करून जातील प्रश्न सुटत आहेत,
अध्यात्म नव-नवीन निरर्थक प्रश्नांना जन्म देत राहते आहे.)
22. विज्ञानामुळे भौतिकता सुधारते,
अध्यात्मामुळे नैतिकता सुधारते.
(विज्ञानामुळे भौतिकता व नैतिकता दोन्ही चांगली राहते,
अध्यात्म अवतार, बुवाबाजीच्या नावाखाली लैंगिक व आर्थिक शोषण करते.)
23. विज्ञानामुळे धन निर्माण होते,
अध्यात्मामुळे समाधान निर्माण होते.
(विज्ञानामुळे शोध लागतात, पैसे निर्माण होत नाहीत,
अध्यात्मात धन लालसेने लडबडलेली तिरुपति, शिर्डी सारखी संस्थाने निर्माण होतात.
24. विज्ञानाकरिता उपकरणाची आवश्यकता,
अध्यात्माकरिता अंतःकरणाची आवश्यकता.
(विज्ञानास उपकरणे तसेच वैज्ञानिक दृष्टीकोण हवा असतो,
अध्यात्मात गुलामासारखे आज्ञा पाळणारे अंतःकरण आवश्यक असते.)
25. विज्ञान हव्यासाची पेरणी करते,
अध्यात्म ध्यासाची पेरणी करते.
(विज्ञान नवीन शोधाचा, मानवी सुखाचा हव्यास धरते,
अध्यात्माला नसलेले दिसण्याचा हव्यास असतो.)
26. विज्ञान आमचा विश्वास आहे,
अध्यात्म आमचा श्वास आहे.
(विज्ञानात शेवटचा श्वास लांबवायचे सामर्थ्य आहे,
अध्यात्म शेवटच्या श्वासाकडे शीघ्रगतीने घेऊन जाते हा विश्वास आहे.)
27. विज्ञानामुळे कार्यास चालना मिळते,
अध्यात्मामुळे स्व-धर्मास चालना मिळते.
(विज्ञानामुळे समस्त मानवाच्या कल्याणास चालना मिळते,
अध्यात्म स्व-धर्मांध होऊन मानवात उभी फूट पाडते.)
28. विज्ञानामुळे स्वार्थ निर्माण होतो.
अध्यात्मामुळे परमार्थ निर्माण होतो.
(विज्ञान सर्व मानवासाठी खुले असल्याने त्यात स्वार्थाला स्थान नाही.
अध्यात्मात फक्त आपल्याच अंध भक्तांच्या तथाकथित कल्याणाची सोय असते.)
29. विज्ञानामुळे क्षणिक आनंद मिळतो,
अध्यात्मामुळे कायम स्वरूपाचा आनंद मिळतो.
(विज्ञानाचा चिरंतन आनंद आज ही आध्यात्मिक लोक सुद्धा घेत आहेत,
आध्यात्मिक आनंद गोंधळलेला, फसवा व क्षणभंगुर ठरत आहे.)
30. विज्ञानामुळे जीवनाला गती मिळते,
अध्यात्मामुळे जीवनाला योग्य दिशा मिळते.
(विज्ञानामुळे जीवनाला गती व दिशा सुद्धा मिळते आहे,
अध्यात्म धर्म-जाती-देव यात लोकांना गुंतवून जीवनाची गती रोखून दिशाहीन बनवीत आहे व खड्ड्यात घालीत आहे.)
वरील मुद्दे दर्शवितात हे ही दर्शवितात कि विज्ञान व अध्यात्म परस्परविरोधी आहेत. सबब पोस्टकर्त्याने स्वतःचा मोबाईल (जे विज्ञानाचे एक साधन आहे) तात्काळ फोडावा, विज्ञानाने बनविलेली वाहने सोडून बैलगाडीने प्रवास करावा, विजेचा वापर करू नये, टीव्ही-इंटरनेट-वायफाय, कारखान्यात बनलेले/प्रोसेस केलेले पदार्थ (तेल, साबण, डाळी, धान्ये, कपडे) वापरू नयेत, लाऊड स्पीकर, सीसीटीव्ही कॅमेरा, व अन्य वस्तु वापरू नयेत. विज्ञानाच्या, न पेलवणार्या भानगडीत न पडता खुशाल हरी हरी करत तथाकथित परमार्थ जेवढे मूर्ख भेटतील त्यांना घेऊन साधावा.
चला उत्तर देऊ या टिम.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा