जगन्नाथ पुरीच्या कथित रहस्यांमागचे अज्ञान

जगन्नाथ पुरी येथील चमत्कारांबाबत उत्तर देत आहे. 

जगन्नाथ पुरीच्या कथित रहस्यांमागचे अज्ञान 

जगन्नाथ पुरी येथील तथाकथित ‘न उलगडणार्‍या रहस्यांची’ पोस्ट सध्या फिरत आहे, त्यास हे उत्तर:  

पुरी येथील हे मंदिर जुन्या काळातील अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमूना आहे याबादधल शंकाच नाही. परंतु अशा या भव्य वास्तूला बिनबुडाच्या ‘चमत्कारांची’ जोड देऊन त्या काळातील मानवांनी केलेल्या अफाट कर्तृत्वाला खुजे करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो मात्र योग्य वाटत नाही.    

या पोस्ट मधील भगवान श्रीकृष्णाच्या न जळालेल्या हृदयाच्या लगद्याची कहाणी ऐकून सहज उत्सुकता म्हणून नेटवरील विविध साइट्सचा धांडोळा घेतला. त्यांची लिंक देत आहे. त्यावरून पुढील निष्कर्ष निघतात: 

1) जगन्नाथ पुरीचे प्रसिद्ध मंदिर हे खरे तर विष्णुचे आहे व त्यातील मुख्य मूर्ति विष्णूची आहे.  भगवान श्रीकृष्णाच्या न जळालेल्या हृदयाच्या लगद्याची कहाणी काही कुठे सापडली नाही.  इंद्रद्युम्न विषयी वाचायला मिळालेली कथा पूर्णतः वेगळी आहे. 
2) जगन्नाथाची मूर्ति दर 12 वर्षांनी नाही तर 8 ते 19 वर्षांनी, अधिक मास वगैरे अनेक बाबी पाहून मग बदलली जाते. ती बदलतांना मूर्तीच्या आतील ‘लगदा’ वगैरे बदलला जात नाही. कारण त्यासाठी मूर्ति फोडावी लागेल ना? लिंक्स मधील माहितीनुसार नबकलेबरा या विधीमध्ये जुन्या मूर्तींचा विधिवत अंत्यसंस्कार (दफन केले जाते. आता हिंदू संस्कृतीत हे दफन कोठून आले हे विचारू नये.) केला जातो. त्यावेळी हे अंत्यसंस्कार कोणी पाहू नयेत (कारण ते पाहील्यास ती पाहणारी व्यक्ति मरते असा समज आहे) म्हणून शहरातील वीज बंद केली जाते. नंतर नवीन मूर्ति (या मूर्तीसाठी लाकडाचे विशिष्ट झाड शोधण्यापासून ते मूर्ति बनविण्यापर्यंत विविध विधी आहेत, नियम आहेत ते लिंक मध्ये पहावेत) स्थापित करून त्यांच्यात प्राण भरले जातात. हे प्राण भरीत असतांना मूर्तीला स्पर्श होऊ नये म्हणून तसेच मूर्ति त्या सुमारास पाहीली जाऊ नये म्हणून  संबंधितांचे हात व डोळे कापडाने झाकले जातात.  थोडक्यात ‘लगदा’ ही बाब रहस्य नसून त्या पोस्टच्या लेखकाच्या मनाचे खेळ आहेत हे दिसून येते. 

या विषयी पुढील लिंक्स देत आहे. त्यात सविस्तर माहिती उपलब्ध आहे. 





आता लेखक महाशयांनी दिलेल्या मुद्द्यांना उत्तरे: 
1) भगवान जगन्नाथच्या मंदिरावरील ध्वज हवेच्या विरुद्ध दिशेला फडकणे हे विशिष्ट अपवादा‍त्मक परिस्थितीत शक्य आहे. त्यास Karman Vortex Street हा प्रकार कारणीभूत आहे. त्या विषयी माहिती पुढील लिंक मध्ये आहे. https://www.quora.com/Why-do-birds-and-planes-not-fly-above-the-Jagannath-Temple-of-Puri हा काही चमत्कार नाहीये. 
2) मंदिरावरील सुदर्शन चक्र मंदिर उंच असल्याने शक्य असेल तेथून दिसते. पण ते कोणत्याही ठिकाणाहून अगदी समोर आहे असे दिसते हे म्हणणे खोटे आहे. पुढील लिंक मध्ये दिलेल्या फोटो मध्ये हे चक्र असे ‘समोर’ दिसत नाही. http://2.bp.blogspot.com/-YxpQNErLUqU/T-BiS2KgXoI/AAAAAAAAFIs/0D2MI0xaRHg/s1600/Beautiful-Jagannath-Puri-Temple-Photos6.jpg 
3) जमीनिकडून समुद्राकडे व उलट वारे वाहणे हे भौगोलिक परिस्थितीनुसार सर्वत्र सारखे आहे. यास पुरी हे अपवाद असू शकत नाही. भौगोलिक परिस्थितीनुसार तिथेही वारे वाहतात.  तिथे राहून आलेले व राहणारे लोक हे सांगतात. लेखकाने यासाठी हवामान खात्याचा पुरावा द्यायला हवा.  
4) मंदिराची विशाल उंची तसेच वरील क्रमांक 1 मध्ये दिलेल्या परिस्थितीमुळे व उंचावरील हवेच्या वेगामुळे शिखरावर नेहमीचे छोटे मोठे पक्षी न येणे साहजिकच आहे. परंतु अशा उंचीवर गरुड आरामात उडू शकतात व या मंदिरावर गरुड पाहिल्याची उदाहरणे आहेत. तसेच पुढे दिलेल्या लिंक मधील व्हीडीओ मध्ये 45व्या सेकंदाच्या सुमारास वरील डाव्या कोपर्‍यात मंदिरावरील आकाशात एक पक्षी उडतांना दिसत आहे. https://www.youtube.com/watch?v=yq9Kuq-p6Yk 
5) समुद्राचा आवाज ऐकू येणे अथवा न येणे हे बांधकामाची रचना, दिशा, दर्जा यावर अवलंबून असते. त्या नुसार पुरी येथेही काही ठिकाणी आवाज येतो तर काही ठिकाणी कमी येतो किंवा येत नाही. यात चमत्कार कसला?
6) मंदिरात कोणत्या देवाच्या मूर्ति ठेवाव्यात हे ते बांधणार्‍या व्यक्तीच्या श्रद्धेवर अवलंबून असते. त्या नुसार इथे मूर्ति असल्यास त्यात आश्चर्य कसले? 
7) कुठल्याही वास्तूची सावली ही सूर्य आकाशात किती अंशावर आहे यावर अवलंबून असते. त्या नुसार या मंदिराची सावली सुद्धा पडते.  या मंदिराची सावली पडलेला फोटो सोबत लिंक मध्ये देत आहे. http://indiatoday.intoday.in/story/drone-videos-of-goa-delhi-and-puri/1/412106.html 

तर, वरील माहितीवरून हे लक्षात येईल की मूळ पोस्ट मधील लेखकांस जे प्रकार रहस्ये वाटत आहेत व त्याची उत्तरे कोणतेही शास्त्र वा शास्त्रज्ञ देऊ शकले नाहीत असे वाटते आहे, ती खरे तर रहस्ये नसून केवळ सामान्य ज्ञानात त्याची उत्तरे सापडतात. फक्त डोळ्यावर बांधलेली लीलांची अंधश्रद्धेची पट्टी काढून या महान शिल्पाचे खरेखुरे कौतुक केले पाहिजे.
उत्तम जोगदंड

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य