ग्रह आणि राशी यांची खोटी भीती

ग्रह आणि राशी यांची खोटी भीती :
–य.ना.वालावलकर
   
आपली सूर्यमाला आहे. तिला ग्रहमाला असेही म्हणतात. या मालेत सूर्य हा एकच तारा आहे. त्याच्या प्रकाशात मालेतील सर्व ग्रह, उपग्रह, लघुग्रह, उल्का, धूमकेतू्, चमकतात. सूर्याभोवती फिरतात. 
     
चंद्र स्वत:भोवती, पृथ्वीभोवती आणि पृथ्वीसोबत सूर्याभोवती फिरतो. सर्व उपग्रह असेच फिरतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. म्हणजे महासागर, पर्वत, वृक्ष, इमारती, प्राणी, पशु-पक्षी सर्व सूर्याभोवती फिरतात. आकाशात उडणारे विमानही सूर्याभोवती फिरत असतेच. सूर्यमालेत बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून असे ग्रह आहेत. 
    
कुंडलीतील ग्रह :-  सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, युरेनस, हर्षल, प्लुटो, राहू आणि केतू. खरेतर सूर्य तारा. चन्द्र उपग्रह. राहू-केतू हे काल्पनिक बिंदू. असे हे ज्योतिषांचे बारा ग्रह ! 
   
खगोलशास्त्रानुसार पृथ्वीपासून अंतरे (किलो मिटर) :---
(1)चंद्र :- 40 लक्ष..(2)सूर्य:- 15 कोटी..(3)बुध:- 10 कोटी..(4)शुक्र :- 5 कोटी .. 
(5)मंगळ:- 8 कोटी..(6)गुरू:- 65 कोटी..(7)शनी :- 130 कोटी ..
(8) हर्षल:- 270कोटी..(9)नेपच्युन:- 440 कोटी. 
[ सर्व ग्रह फिरत असल्याने ही अंतरे बदलत असतात. सरासरी अंतरे दिली आहेत.]
भ्रष्टाचाराचे सहस्रावधी कोटींचे आकडे ऐकण्याची सवय झाल्याने ग्रहांची ही अंतरे मोठी वाटत नाहीत. म्हणून हे गणित :--
   
समजा एक विमान ताशी 1150 कि.मी.वेगाने सतत सरळ रेषेत उडत आहे. तर एक कोटी कि.मी.अंतरासाठी त्याला किती वेळ लागेल ?.......याचे उत्तर येते एक वर्ष! म्हणजे ते विमान कुठेही न थांबता सतत ताशी 1150 कि.मी. वेगाने जात राहिले तर आठ कोटी कि.मी.अंतरासाठी आठ वर्षे लागतील. शनी इथून 130 कोटी कि.मी आहे. त्या अंतरासाठी एकशे तीस वर्षे लागतील. यावरून ग्रहांच्या अंतराची कल्पना यावी. 
   
ग्रह हे दगड, खनिजे, वायू यांचे  भले  मोठे गोळे आहेत. ते गुरुत्वाकर्षणामुळे सूर्याभोवती नियत कक्षेत फिरतात. सर्व ग्रह निर्जीव आहेत. निर्बुद्ध आहेत. त्यांना कसलीही समज नाही. जाणीव नाही. निसर्ग नियमानुसार फिरतात. ग्रहांमध्ये कोणतेही सामर्थ्य नसते. यावरून सहज समजते की पृथ्वीवरील कोणालाही, कुठल्याही ग्रहापासून काडीचाही त्रास होण्याची मुळीच शक्यता नाही. इथून 130 कोटी कि.मी. वर असलेला निर्बुद्ध शनी दर तीस वर्षांच्या कालावधीत प्रत्येक माणसाला साडेसात वर्षे छळतो हे खरे मानणे म्हणजे अडाणीपणा आहे. कोट्यवधी कि.मि.दूर असलेल्या ग्रहांच्या शांतीसाठी होमहवन करणे ही तर अज्ञानाची परिसीमा आहे. भटजींना दक्षिणा मिळावी म्हणून ही ग्रहांची खोटी भीती घातली आहे. सूर्याभोवती मुकाट्याने फिरणा-या, कोट्यवधी कि.मी. दूर असणाऱ्या या निर्जीव ग्रहांमुळे कुणाचे काहीही बरे वाईट होऊच शकत नाही हे खगोलशास्त्रीय सत्य आहे. 
   
हे झाले ग्रहांविषयी. "राशिभविष्य" असा शब्द रूढ आहे. त्या राशी किती दूर आहेत?  रास म्हणजे तार्‍यांचा समूह. सूर्य तारा पृथ्वीपासून 15 कोटी कि.मी. दूर आहे. दुसरा जवळचा तारा अल्फा सेंटॉरी इथून साडेचार प्रकाशवर्षे दूर आहे. प्रकाशाचा वेग सेकंदाला तीन लक्ष कि.मी. त्यावरून साडेचार प्रकाशवर्षे म्हणजे चाळीस हजार अब्ज किमी. सूर्यमालेपासून सर्व बाजूंनी चाळीस हजार अब्ज किमी. पर्यंत नुसती पोकळी आहे. त्यात काहीही नाही. कोणतीही रास किमान चाळीस हजार अब्ज कि.मी. दूर आहेच. या प्रंचंड अंतराची कल्पना करावी. म्हणजे “माझी रास अमकी आहे." हे वाक्य किती निरर्थक आहे याची सत्यता  पटेल. तसेच इतक्या दूर दूर असलेल्या राशीचा कोणत्याही व्यक्तीवर किंचितसुद्धा परिणाम होण्याची तिळमात्र शक्यता नाही हेही सहज समजते. ग्रह इथून काही कोटी किमी वर आहेत. तर राशी अब्जानुअब्ज किमी दूर आहेत. यावरून फलज्योतिष खोटेच आहे हे कळून येते. सर्व खगोलशास्त्रज्ञ सांगतात की ग्रह आणि तारे यांचा माणसांवर गूढ परिणाम होतो ही मूढ कल्पना आहे. फलज्योतिषाच्या कुठल्याही ग्रंथात ग्रह आणि राशी यांच्या अंतराविषयी कांहीही नसते. ज्योतिषांना या अंतरांची काही कल्पनाच नाही तर काय  लिहिणार? ते लिहितात “ज्यांच्या पत्रिकेत सिंहराशीत मंगळ असतो त्यांच्यात नेतृत्व गुण असतात.” किमान पन्नास हजार अब्ज कि.मी. दूर असलेल्या सिंहराशीत मंगळ प्रवेश कसा करू शकेल? आकाशाच्या पडद्यावर मंगळ सिंहराशीजवळ दिसतो एवढेच. मंगळापासून सिंहरास नेहमी चाळीस हजार अब्ज किमि.पेक्षा अधिक दूर असतेच. पूर्वीच्या काळी कुणालाच या अंतरांची कल्पना नव्हती. आता ज्योतिषांनी खगोलशास्त्राचा थोडा तरी अभ्यास करावा. म्हणजे राशिभविष्य खोटे आहे, हास्यास्पद आहे हे त्यांनासुद्धा समजेल. 
 
राशी आणि ग्रह यांचा कसलाही बरा-वाईट परिणाम माणसांच्या जीवनावर कधीही होत नाही. होणे शक्य नाही. हे त्रिवार सत्य आहे. म्हणून सर्वांनी भविष्याचा नाद सोडावा. 
   
लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहिली. एका पत्रात आहे, "खगोलशास्त्र ठीक. पण त्यावर भविष्ये पाहण्याचे नियम काढले ते सर्व अगदी खोटे आहेत. आकाशातील ग्रह,तार्‍यांमुळे पृथ्वीवरील माणसाच्या नशिबात कसा बदल होईल? गुरू कोणत्याही राशीत गेला तरी मी पृथ्वीवरच असणार ना? तो माझे काय करील? पण प्राचीन काळच्या ब्राह्मणांनी अडाणी लोकांकडून पैसे काढण्यासाठी ही युक्ती केली."
[लोकहितवादींनी हे 170 वर्षांपूर्वी जाणले. ते अनेकांना आजही समजत नाही. राशीभविष्य वाचतात. "आकस्मिक धनलाभ संभवतो." असे असले की खुष. अज्ञानात आनंद असतो असे म्हणतात तो हा असा.]

टिप्पण्या

  1. Jyotish हे शास्त्र म्हणुन शिकविणारे लोकांना आधीच सांगतात कि वैज्ञानिक अंतराचे , निर्जीवतेचे मुद्दे सांगून ज्योतिष खोटे आहे असे म्हणतात पण ते खरे नाही. व ग्रह तारे यांचा निशंचित प्रभाव असतो.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. त्यांना म्हणावे ग्रह ताऱ्यांचे पृथ्वीपासून अंतर जर काहीच महत्वाचे नसेल तर न्यूयॉर्क मध्ये लागलेला दिवा माझ्या नागपूरच्या घरात प्रकाश देऊ शकला पाहिजे ...☺😊😀

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य